श्रीविष्णुसहस्रनामातील गुरुतत्त्व

 


नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र। 
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीप।। 

सनातन वैदिक परंपरेमध्यें गुरुचे स्थान परमपूजनीय तथा अनन्यसाधारण आहे. मनुष्य माता-पितानंतर ज्या तत्त्वाच्या किंवा व्यक्तीच्या उपकारात आजन्म ऋणी असतो ते गुरूच्या. अनादीकालापासून चालत आलेल्या ज्ञानपरंपरेचा पायाच मुळी गुरू-शिष्य या पवित्र नात्यावर आधारलेला असून आजही तो अबाधित आहे किंबहुना येणाऱ्या अनेक कालखंडासाठी सुद्धा तसाच राहणार. गुरु मनुष्याच्या जीवाला आकार देणारा केवळ शिक्षक नसून त्याचे संपूर्ण आयुष्य उच्च कोटीच्या ध्येयाकडे घेऊन जाणारा पथदर्शक असतो. वेद, उपनिषद, पुराणे, रामायण, महाभारतासारख्या प्राचीन तत्त्वज्ञानामधून ते अर्वाचीन संस्कृत-प्राकृत रचनांतून ते अगदी आधुनिक काळातल्या पुस्तकांपर्यंत गुरुमहात्म्याला दुसरा पर्याय सापडत नाहीं. गुरु अज्ञानरुपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देणारा आहे म्हणूनच त्याला साष्टांग नमस्कार करून कृपा प्राप्त करून घ्यावी. "अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया। चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः॥" ज्ञान गुरुशिवाय प्राप्त होणे अशक्य. म्हणूनच हा श्रद्धेचा विषय आहे. ब्रह्मविद्या अथवा लौकिक विद्यांचा मार्ग गुरुशिवाय दिसणार नाहीं. मुंडकोपनिषदात एक मंत्र आहे - "तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्॥" (१:२:१२) " त्या परब्रह्माच्या तत्त्वज्ञानाची अनुभूती करून घेण्यासाठी साधकाने हातात समिधा घेऊन गुरुकडे जावे. तो गुरु वेदशास्त्र जाणणारा तथा ब्रह्मनिष्ठ असावा." येथें 'समित्पाणिः' हा शब्द महत्त्वाचा आहे. त्याचे कारण समिधा जशी पूर्ण वाळलेली असते, त्याप्रमाणे साधकाने आपले चित्त वाळलेल्या काडीं प्रमाणें शुष्क करावें जेणेंकरून गुरुनें केलेल्या ज्ञानोपदेशाच्या चैतन्याने ती वाळलेली काडीं लगेच पेट घेऊन अंधकार दूर सारेल.

गुरु शिष्याच्या हृदयांत विवेक, वैराग्य तथा भक्ती जागृत करतो. तोच सनातन संस्कृतीचा धर्म, ज्ञान आणि संस्कार प्रज्वलित ठेवतो. आदर्श गुरु हेच आदर्श शिष्य घडवतात हा रामायणाच्याही आधीपासून आतापर्यंतचा इतिहास सांगतो. तो शिष्याला केवळ माहिती न देता आत्मसाक्षात्कार घडवतो. म्हणूनच गुरु हा ईश्वराचा अंश मानून त्यास 'आचार्य देवो भव' ही आज्ञा आपल्या संस्कृतीने दिली आहे. गुरु-शिष्य परंपरेमुळेच वेदोपनिषदातील ब्रह्मज्ञानापासून लौकिकविद्येपर्यंतची ज्ञानगंगा अक्षुण्ण वाहत आहे. त्या परंपरेची गंगोत्री थेट श्रीनारायणापासून सुरू होते. ती दिव्य परंपरा पुढे ब्रह्मदेव, नारद, व्यास, शुकादि नंतरच्या आचार्यांपर्यंत अखंड प्रवाहित झाली. महर्षी व्यासांनी या ज्ञानपरंपरेला ग्रंथरूप देऊन अखिल मानव जातीवर मोठे उपकार केलें आहे. म्हणून आषाढ पौर्णिमेला "श्रीव्यास पौर्णिमा अथवा गुरु पौर्णिमा" असें संबोधून समस्त गुरुतत्त्वाला अभिवादन आणि कृतज्ञता म्हणून ही तिथी साजरी केली जाते.


साक्षात् भगवान श्रीनारायणांनी ब्रह्मदेवांना ब्रह्मविद्येचा उपदेश केला. ब्रह्मदेवांनी आपल्या मानसपुत्र देवर्षी नारदांना, नारदांनी आपल्या शिष्योत्तम महर्षी वेदव्यासांना आणि व्यासांनी आपल्या परमभागवत सुपुत्र श्रीशुकदेवांदी इतर शिष्यांना ही दिव्य ज्ञानपरंपरा सुपूर्द केली. अशा प्रकारे गुरु-शिष्य परंपरेतून ब्रह्मविद्या अखंडपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होत राहिली. ही केवळ काहीं महापुरुषांची ऐतिहासिक परंपरा नसून, परमात्म्यापासून मानवापर्यंत आणि मानवापासून परमात्मप्राप्तीपर्यंत नेणारा सनातन ज्ञानमार्ग आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरु-परंपरा ही ज्ञानाचे संरक्षण, धर्माचे संवर्धन आणि मोक्षमार्गाचे मार्गदर्शन करणारी दिव्य जीवनरेखा मानली गेली आहे.


आपल्या धर्मामध्यें गुरुवंदनाकरिता अत्यंत सुपरिचित, संपूर्ण विश्व ज्या श्लोकाचे गायन करतो अशी, ज्यामध्यें तीनही दैवीशक्ति, कार्याचा समन्वय साधला आहे अशा सश्रद्ध मनुष्याच्या परिचयाचा आहे. तो म्हणजे, 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥' सृष्टिकर्ते ब्रह्मदेवरुपी गुरु जीवनांत ज्ञानाला जन्म देतात. अज्ञानात असलेल्या शिष्याच्या अंत:करणा साधनेची उर्मी जागृत करतात म्हणून गुरु ब्रह्मसमान आहेत. भगवान विष्णू पालनकर्ते असल्याने शिष्याच्या ज्ञानाचे पालन करतात, त्याची वृद्धी करतात, त्याला योग्य मार्गावर नेतात स्थिर करतात, रक्षण करतात म्हणून विष्णूमय गुरूंचे महत्त्व. महादेव हे संहारकर्ते आहेत. येथे संहार म्हणजे अज्ञानाचा, अहंकाराचा, मोहादि अविद्यांचा नाश करणारे होय. गुरु शिष्याच्या अंतःकरणातील दोषांचे परिमार्जन करतो म्हणून ते महेश्वररूपी गुरु आहेत. तो गुरु स्वतः परब्रह्म स्वरूप आहे. शिष्याला परमात्म्याचा साक्षात्कार करून देणे हा हेतू असल्याने त्यांच्यामध्यें परब्रह्माचे तेज प्रगट झालेलें असते. अशा सृष्टीकर्ते, पालनकर्ते तथा संहारकर्ते त्रिदेवांचे कार्य मूर्तरूपांत करून देणाऱ्या गुरूंना वंदन असो.

श्रीविष्णुसहस्रनाम हे केवळ भगवान श्रीमहाविष्णूंच्या सहस्र नामांचे स्तोत्र नसून, त्यांच्या अनंत गुण, तत्त्व आणि दिव्य स्वरूपांचे शास्त्राधिष्ठित दर्शन घडविणारे अद्वितीय ग्रंथरत्न आहे. या सहस्रनामातील अनेक नामांमधून भगवानांचे आदिगुरु स्वरूप, ज्ञानदाता म्हणून असलेले महत्त्व आणि सनातन गुरु-परंपरेचे अधिष्ठान अत्यंत सूक्ष्मपणे प्रकट होते. प्रस्तुत लेखात विष्णुसहस्रनामातील निवडक नामांच्या आधारे भगवान श्रीमहाविष्णूंच्या गुरुतत्त्वाचे आणि भारतीय गुरु-परंपरेशी समन्वय पाहूया. 

आदिगुरु परमात्मा आणि परमशिष्य श्रीब्रह्मदेव ★

श्रीमद्भागवत महापुराणाच्या द्वितीय स्कंधातील नव्या अध्यायांत परमेश्वराच्या गुरुतत्वाचे अत्यंत गूढ आणि मूलभूत सिद्धांतात प्रतिपादन झालें आहे. या प्रसंगात भगवान् श्रीनारायण हे संपूर्ण सृष्टीचे आदिगुरु म्हणून प्रकट होतात. सृष्टीच्या आरंभी भगवंताच्या नाभीतून पद्म उत्पन्न होऊन त्यात ब्रह्मदेवाचे प्राकट्य झालें. परंतु त्या जलमय विश्वात काहीं न दिसल्याने आपल्या उत्पत्तीचे कारण, स्वरूप, सृष्टी कशी करावीीं याविषयीं काहीं ज्ञान नव्हते. तेव्हा, ज्या कमळातून आपली उत्पत्ती झाली त्या कमळनलिकेत प्रवेश करून आधदिशेला जात ब्रह्मदेवाने त्या मूळाचा शोध घेण्यासाठी प्रवेश केलें. तथापि आपल्या उत्पत्तीचा कारक कोण याचा शोध न लागल्याने पुन्हा वर येऊन कमळावर येऊन बसले. त्यावेळी विचार करीत बसलेल्या ब्रह्मदेवाला उदकातून ‘तप’ ‘तप’ हे शब्द ऐकू आले. आसनावरुन पुन्हा उठून दाही दिशांना पाहिले तरी कोणी दृष्टीस पडेना. भागवतकार म्हणतात ब्रह्मदेवाने तप या शब्दावर चिंतन करून तसेच तोच आपल्या कल्याणाचा मार्ग आणि परमात्म्याची आज्ञा मानून प्रदीर्घ काळ तपाचरण केलें. यांच्या तपाश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान् श्रीनारायणांनी त्यांना आपल्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडवले. वैकुंठातील त्या परम तेजोमय स्वरूपाचे वर्णन भागवतात अत्यंत मनोहारी रसात्मक रितीने केेेेलें आहे. त्या दर्शनाने कृतार्थ होऊन ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली. तेव्हा भगवंतानी त्यांच्या सृष्टीरचनेचे सामर्थ्य, वेदांचे रहस्य आणि परम आत्म-स्वरूपाचे यथार्थ ज्ञान ब्रह्मदेवांना प्रदान केलें. ते ज्ञान भागवतामध्यें ‘चतुश्लोकी भागवत’ या नावाने प्रसिद्ध आहे. तो उपदेश असा, "अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत् परम्। पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्॥" ... - 
भागवतांमध्ये भगवंत ब्रह्मदेवाला  सांगतात की, सृष्टीपूर्वीही मीच होतो, सृष्टीमध्यें  मीच आहे आणि प्रलयानंतरही मीच उरतो. हा उपदेश केवळ सृष्टीविज्ञानाचा नसून परब्रह्मतत्वाचा आहे. पुढे भगवान् मायेचे स्वरूप, जगाचे रहस्य, भक्तीचे रहस्य ब्रह्मदेवांना सांगतात. यावरून स्पष्ट होते की, ब्रह्मदेवांना विश्वरचनेचे पद मिळण्यापूर्वी त्यांना ब्रह्मविद्येचा उपदेश प्रत्यक्ष भगवान् श्रीनारायणाकडून प्राप्त झाला. या प्रसंगामध्यें गुरुपरंपरेचा मूळ सिद्धांत दडला आहे. ब्रह्मदेव सर्वप्रथम उत्पन्न झाले तरी ते सर्वज्ञ नव्हते. त्यांनाही ज्ञानासाठी तपश्चर्या, गुरूंची शिकवण यांची आवश्यकता होती. ते गुरुतत्त्व परमात्मस्वरूप नारायणाच्या रूपाने होते. म्हणूनच भगवान आदिगुरू आहेत. या कारणामुळें विष्णूसहस्रांतील (२८८) गुरुः आणि (२९०) गुरुतमः ही नामे अत्यंत अर्थपूर्ण ठरतात. भगवान् केवळ उपदेश करणारे गुरू नाहींत, तर सर्व गुरूंचेही गुरू आहेत. तो पूर्ण स्वतंत्र असल्याने (३७) स्वयंभू आहे. जो जाणण्यास योग्य तथा संपूर्ण ज्ञान जाणणारा असा (१६३, १६४) "वेद्यः वैद्यः" आहे. वेदांचा यथार्थ जाणणारा तो (१२८) वेदविद् म्हणूनच वेदस्वरूप (१२७) वेदः होय. विश्वाचे तत्त्व ज्याच्यापाशी अबाधित असते तो (१६९) तत्त्वम् म्हणूनच (१७०) तत्त्वविद् तथा ते अगम्य परतत्त्व ॐकार स्वरुप असल्याने (४०९) प्रणव हे ज्ञानाचे स्रोत आहे. जसे समुद्रात पाणी सांठते त्याप्रमाणे ज्याच्या ठायी वेद संरक्षित आहे तो (२६४) श्रुतिसागरः

ज्याच्यापासून काहीं लपून राहात नाहीं किंवा त्याला माहिती नाहीं अशी कोणती गोष्ट नाहीं तो (४५३) सर्वदृक्. अतः जो अंधकाराचा नाश करतो तो (२७६) प्रकाशकः. भगवंताचे स्वरुप ज्ञानानेच उमगते. म्हणून भगवद्गीतेतही भगवंत म्हणतात : यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव। - की "अर्जुना! जे ज्ञान प्राप्त झाल्यावर तू असा पुन्हां मोहात पडणार नाहींस." असा परमात्मा (४९७) ज्ञानगम्य होय.
 नित्या प्रकाशाच्या तेजामुळे उदयास येणारी बुद्धी (७७) मेधावी. प्रकृती व पुरुषाचे तत्त्व सांगणारा (२७) प्रधानपुरुषेश्वरः विद्यारुपी दिव्य ऐश्वर्य ज्याच्यापाशी तो (२२) श्रीमान्. असें परमेश्वराच्या आदिगुरु स्वरूपा सांगणारे अनेक नामें सहस्त्र नामात आली आहेत. कारण तो सर्वोच्च अधिवक्ता असा (४९९) परमेष्ठी होय. खरे म्हणजे भागवतातील केवळ चतुश्लोकाचा संदर्भ घेतला तरी पूर्ण सहस्त्रनामाचे अर्थ यामध्यें सामावले जाईल. त्याचे कारण, वेदाचे मूळ भगवंत आहे, प्रथम ज्ञानोपदेशक, धर्मशास्त्रोपदेशक भगवंतच आहेत. त्यामुळे गुरु परंपरेचा आरंभ कोणत्याही मानवी आचार्यांपासून न होता तो थेट साक्षात् (१७) अक्षर श्रीनारायणाकडे जाऊन त्याच्यातच सामावतो. 

यामुळे भागवतातील हा प्रसंग सनातन संस्कृतीच्या गुरुतत्त्वाचा पाया ठरतो. गुरु हा ज्ञानाचा निर्माता नसतो, तर तो परमेश्वराकडून आलेल्या दिव्य ज्ञानाचा वाहक असतो. ज्ञानाचा उगम भगवान आहेत, गुरु त्याचे माध्यम आहे आणि शिष्य त्याचा अधिकारी आहे. म्हणून भागवतातील हा गुरु-शिष्य प्रसंग विष्णुसहस्रात पहायला मिळाले तर नवल नाहीं, कारण ते एकच तत्त्व सर्वत्र व्यापून आहे.

आद्य आचार्य श्रीब्रह्मदेव आणि आद्य शिष्य श्रीनारद

श्रीनारायणापासून प्राप्त झालेले सृष्टी विज्ञानाचा ब्रह्मदेवाने या विश्वाचे विश्वरचनेसाठी सुविनियोग केला. स्थावरजंगमाची उत्पत्ती करून ब्रह्मदेवाने विश्वकल्याणाकरीता आपल्या योगशक्तीद्वारे मानसपुत्र निर्माण केलें. त्यातील श्रीनारद मुनी. त्यांना परमात्म्यापासून मिळालेले ज्ञान परमपिता ब्रह्मदेवाने दिले. ब्रह्मदेव व नारदांचे गुरुशिष्य नाते हे अलौकिक व तत्व आहे. कारण ब्रह्मदेव त्यांना केवळ ज्ञानदान करीत नव्हते तर त्यातून भक्ती, वैराग्य, लोककल्याणाची दीक्षा देत होते, म्हणून ब्रह्मदेव नारदांचे गुरुशिष्य नाते हे आद्य ठरते. परमात्मा नारायणाकडून प्राप्त झालेले ज्ञान सत्पात्री हाती प्रदान केल्याने गुरुला धन्यता लाभते तेच ब्रह्मदेवांच्या मनात होते. नारद हे ब्रह्मदेवांचे ऋषी पुत्र असले तरी पितृत्वापेक्षा गुरुत्वाला अधिक महत्त्व दिले. ब्रह्मदेवांच्या ज्ञानातून नारदांना जीवनाचे परम ध्येय म्हणजे भगवत्प्राप्तीचे रहस्य सांगितले. भागवतकारांनी ब्रह्मदेवोवाच करत नारदांना परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या संपूर्ण ज्ञानाचा विस्तार साद्यंत कथन केला आहे. जगदुत्पत्तीपासून त्याच्या अगाध पसारा, धर्म सर्वसाक्षीत्व, अनादित्व, असें गुणवर्णन करूनही ब्रह्मदेवाने परम कल्याणाचा अंत लागला नाहीं, विष्णूच्या मायेचा अंत नाहीं असें सांगून म्हणतात - "इदं भागवतं नाम यन्मे भगवतोदितम्। संग्रहोऽयं विभूतीनां त्वमेतद् विपुली कुरु॥ यथा हरौ भगवति नृणां भक्तिर्भविष्यति। सर्वात्मन्यखिलाधारे इति सङ्कल्प्य वर्णय॥ (२ : ७ : ५१, ५२)
याचा भावार्थ असा की, 'नारदा ! जे परमेश्वराने मला गूढ ज्ञान दिले ते हे भागवत होय. त्यात संक्षेपाने आलेल्या भगवद्विभूतीचे वर्णन तू विस्ताराने कर. तो हरि सर्वांच्या अंतःकरणात असून सर्वांचा आधार आहे. त्याच्या विषयी मनुष्यांमध्ये अत्यंत भक्ती उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्याचे गुणसंकीर्तन करण्याचा दृढसंकल्प करून ते तू वर्णन कर.' ब्रह्मदेवाने नारदांना अशा तऱ्हेने भागवताची दीक्षा दिली नि कृतार्थ होऊन नारदांनी त्याचे पालन, प्रसार करून भगवंताची कीर्ती त्रिखंडात नेली.
श्रीज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थदीपिकेत म्हटले आहे 'म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे । तेणे कृतकार्य होइजे ॥ (ज्ञा- १ : २५) या ओवीचा संदर्भ गुरु ब्रह्मदेव आणि शिष्य नारद यांच्याशी जोडला तर गुरुभक्तीने जीवन कृतार्थ होते हे नारदाच्या चरित्रातून आपल्याला पहावयास मिळते.

या गुरुशिष्यांच्या पवित्रतम नात्याचे, विष्णुसहस्रनामांमध्ये प्रतिबिंब जाणवते. नारदांसारख्या महायोगियांना मार्गदर्शन करणारा ब्रह्मदेव (९९) योगविदां नेता. ज्ञानाचे अंतिम प्रमाण निवेदन करून सांगणारे (९४८) प्रमाण, सुबुद्धी प्रदान करणाऱ्यांना (७५२) सुमेधा, परमात्म्यापासून आलेले ज्ञान नारदांपर्यंत सुपुर्द करणारा जणू सेतू असणाऱ्या ब्रह्मदेवाला (७६५) तन्तुवर्धन हे नाम योजविले वाटते. ते (६७) ज्येष्ठ तथा (६८) श्रेष्ठ होय. रहस्यातील शिष्यत्वाचे गुण निवडायाचे तर परमेश्वराने सांगितलेल्या ब्रह्मविद्येच्या श्रवणाने स्वतः ब्रह्मज्ञानी झाले ते (६६६) ब्रह्मविद् , तसेच (६६७) ब्राह्मण, (६६८) ब्रह्मज्ञ. ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या ज्ञानाने ज्यांचे जीवन कृतार्थ झाले ते (८२) कृतज्ञ होय. 

श्रीनारद महर्षींची शिष्य परंपरा अतिप्रचंड व्यापक आहे. त्यांचा कुठेही मठ नाही, वा त्यांनी कुठे आश्रम स्थापिले. जगत् भ्रमण करून त्रिखंड हाच त्यांचा (७२) आश्रम होय. रामायण, महाभारत, सर्व पुराणे, उपनिषद, यामध्यें नारदांचा असंख्य सत्पात्री व्यक्तीसोबत संवाद झाल्याचे आढळेल.
भगवान् श्रीनारायण नि सगळ्याच अवतारांशी नारदांचा संवाद आहे. पिता महर्षी व्यास यांच्यापासून सुरु होऊन, भगवान् श्रीशंकर, भक्तोत्तम ध्रुव, प्रल्हाद, सती, पार्वती, वाल्मीकि ऋषी, प्राचीनबर्ही राजा, श्येतरा, युधिष्ठिर, राजा चित्रकेतु, दक्षप्रजापती, इत्यादी. यामध्ये एक गोष्ट सर्वत्र पाहायला मिळते ती नारदांची युक्ती, भगवद्भक्ती, सन्मार्गदर्शक. यास्तव सहस्रनामातील (२०८) गुरुः, (२२२) नेता, (२४७) सत्कर्ता, (२५३) साधुः, (२५७) शुचिः, (४७५) धर्मगुप्, (६६३) स्तोता , (६८५) पुण्यकीर्ति (७५४) धन्यः, (७५९) सत्यमेधाः, (७९२) लोकाध्यक्षः, (८सहस्रनामात, ज्यांनी भगवद्लीलेचे, कीर्तनाचे पुण्य व्रत घेतले ते (९२२) पुण्यश्रवणकीर्तन. अशा अनेक गुणांनी नारदांचे चरित्र सहस्रनामाच्या भोवती गुंफता येते. 

गुरुपरंपरेचे मेरूमणी महर्षी व्यास

महर्षी व्यास हे भारतीय ज्ञानपरंपरा, गुरुपरंपरा, ग्रंथकार, ऋर्षी एवढ्याच सीमित नसून व्यास या संज्ञेप्रमाणे जगद्गुरु या पदाचे अध्वर्यू आहेत. श्रीव्यासांविषयीं एक श्लोक आहे, " व्यासाय विष्णुरुपाय व्यासरुपाय विष्णवे । नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः।।" की, व्यास हेच विष्णुरुप आहेत आणि विष्णूच व्यासस्वरुप.अशा ब्रह्मवेत्त्या व्यासांना पुनःपुन्हा नमस्कार "
विष्णू म्हणजे व्यापणारा आणि व्यास याचा अर्थ विस्तार करणारा. या दोन्ही नावांमध्ये सूक्ष्म समन्वय दिसतो. भगवंताच्या चोवीस अवतारांमध्यें श्रीव्यासांना विष्णूचा अवतार मानला गेला आहे. भगवद्गीते भगवंतांनी 'मुनीनामप्यहं व्यास:' (१०:३७) असा उल्लेख करून व्यास माझी विभूती आहे असें कथिले आहे. 

परमात्म्याकडून ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवाकडून नारदांकडे आणि नारदांकडून व्यासांकडे ज्ञानविद्या प्राप्त झाली. आली. त्याचे पूर्ण संकलन करण्याचे महत्कार्य नि अखिल मानवजातीवर न फिटणारे उपकार श्रीव्यासांनी केलें आहे. म्हणून गुरुपरंपरेत श्रीव्यासांचे स्थान अत्यंत अद्वितीय मानले जाते. वेदांचे विभाग करून सुपात्र शिष्यांकडे त्याचे उत्तरदायित्त्व दिलें आणि त्या परमज्ञानाचे संवर्धन केलें. पंचम वेद म्हणून ज्याची थोरवी त्रिखंडात निनादत आहे अशा अतुलनीय आर्ष ग्रंथाची अर्थात महाभारताची रचना करणारे महर्षी व्यास यांची स्तुती कोणत्या शब्दांत करावी? संपूर्ण वैदिक तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे आजोड कार्य धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थाच्या विश्वकोशाद्वारें श्रीव्यासांनी केले. "यदिहास्ति तदन्यत्र, यन्नेहास्ति न तत्क्वचित्।" या प्रसिद्ध उक्तीचा अनुभव महाभारतात वाचल्यानंतर अनुभवता येतो. वेदांचे गूढ रहस्य सामान्यजनांना आख्यानांच्या माध्यमातून, तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतून पाहता येतो.  

याच महाभारतामध्यें श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीविष्णुसहस्रनामाचा अंतर्भाव झाला. हे संपूर्ण जगावरचे अनन्य उपकार आहेत. गीतेच्या अठरा अध्यायातून भगवान् श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश व्यासांनी जगासाठी शब्दबद्ध केला. अन्यथा तो दिव्य संवाद इतिहासाच्या वाळटळीत केव्हांच हरवून गेला असता. ज्या भगवद्गीतेच्या ज्ञानाने संपूर्ण जग थक्क करते त्या मागे श्रीव्यासांची दूरदृष्टी आणि कौशल्य केव्हांही विसरले जाणार नाहीं. पितामह भीष्माचार्य आणि राजा युधिष्ठिर यांच्या संवादाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे श्रीविष्णूसहस्रनाम. हे स्तोत्रही व्यासांमुळेच आज आपल्या हाती आहे. भगवंताच्या गुणरूपांचे दिव्यतम वर्णन म्हणजे महाभारताचे नि भगवद्गीतेचे सार आहे.
अठरा पुराणांचे संकलन करून प्रत्येक साधकाला त्या त्या देवाविषयीं जास्तीत जास्त भक्ती करण्यासाठी कोष निर्माण केलें. धर्म, इतिहास, तत्त्वज्ञान, अर्जनपद्धती, श्लोक, स्तोत्रे,कथा, आख्याने, सगळ्या विद्या यांचे अद्भुत दर्शन पुराणांमध्ये घडविले.

उपनिषदातील गुढ तत्त्वज्ञान ब्रह्मसूत्र रूपाने श्रीव्यासांनी मांडले. या ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीतेवर आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, आदी निरनिराळ्या सांप्रदायिक आचार्यांनी भाष्य लिहिली, मते मांडली. तथापि समस्त आचार्यांनी एकमुखानें श्रीव्यासांचे जगद्गुरुपद अधोरेखित केलें. अतः वेदांताच्या सर्व प्रमुख परंपरेचे केंद्रबिंदू श्रीव्यास ठरतात. 
महाभारत, ब्रह्मसूत्रे, वेद संकलन, पुराणे यासारखे महोत्तम ग्रंथ निर्मिती करूनही श्रीव्यासांच्या अंतःकरणात समाधान नव्हते. तेव्हा देवर्षी श्रीनारदांनी त्यांना भगवान् श्रीकृष्णाच्या लीला चरित्र निष्काम भक्तीने वर्णन करण्याचा उपदेश केला. त्या प्रेरणेतून श्रीमद्भागवत महापुराणाची निर्मिती झाली. भागवताने ज्ञानाला भक्तीचे हृदय दिले आणि भक्तीला तत्त्वज्ञानाचा पाया दिला. 

श्रीव्यास जसें तत्ववेत्ते, संकलनकार, ग्रंथकार हे आहेत, तसेच ते गुरुही आहेत. पुत्र शुकमुनी, पैल, जैमिनी, वैशंपायन, सुमंत, रोमहर्षण असें अनेक शिष्य श्रीव्यासांनीतयार केलें. ते केवळ शिष्य नाहींत तर धर्मपरंपरेचे समर्थ वाहक होय. ज्ञानदान हीच व्यासांची तपश्चर्या. स्वतःसाठी काहीहीं राखून न ठेवता सढळ हस्ते जगतकल्याणाकरीता सर्व अर्पण केलें. नदी प्रवाही राहिली तरच ती शुद्ध राहून समस्त भूतमात्रांना तृप्त करते. त्याच प्रकारे व्यासांचे कार्य अखंड प्रवाही आहे.  
श्रीदासबोधामध्यें श्रीसमर्थ गुरुतत्त्वाविषयीं म्हणतात: "कां सरिता गंगेसी मिळाली। मिळणी होतां गंगा जाली। मग जरी वेगळी केली। तरी होणार नाहीं सर्वथा।। (१:४:१३) की, "एखादी नदी गंगेला मिळाली म्हणजे ती जशी गंगाच होते, मग तिला गंगेपासून वेगळे करायचे म्हटले तरी तिला वेगळी करता येत नाहीं" हाच भाव परमात्म्यापासून आलेल्या ज्ञानगंगेविषयीं आहे. 

महर्षी व्यासांचे कार्य कुठल्यातरी एका युगापर्यंत मर्यादित राहिले नाहीं.जसे ते स्वतः चिरंजीवपदाला पोहोचलेलें आहेत, त्याच प्रमाणें त्यांचे वाङ्मय सुद्धा कालातीत आहे. वेदांचे संकलन, महाभारताचीनिर्मिती, ब्रह्मसूत्रांची रचना, पुराणांचे लेखन, भगवद्गीता तथा विष्णुसहस्रनामाचा प्रचार, भागवताची निर्मिती, शुकदेवादि शिष्योत्तमांची मांदियाळी या संपूर्ण कार्याचा आढावा घेणे केवळ अशक्य आहे. म्हणून भारतीय सनातन संस्कृतीमध्यें आषाढ पौर्णिमेला 'व्यास अथवा गुरुपौर्णिमा' हा दिवस कृतज्ञता म्हणून साजरा करण्यात येतो. 

सहस्रनामामध्यें महर्षी व्यासांच्या वेद संकलनाचे, धर्मोपदेशकाचे, ज्ञानमूर्तीस्वरूपाचे, शास्त्रकार या नात्याने काहीं नामें सहस्रात पाहता येतात. श्रीव्यासांविषयीं सर्वांत अग्रक्रमाने सांगणारे मला भावले नाम, ज्यामध्यें त्यांच्या संपूर्ण विभूतीमत्त्वावर प्रकाश पडतो ते (१४२) सर्वदृग्व्यासः. ज्याचा भावार्थ असा की, जे सर्व प्रकारच्या ज्ञानपरंपरेच्या प्रचंड विस्तार तथा वेदांचे वर्गवार विभागांद्वारे, वेदांच्या शाखा निर्माण करणारे होय. व्यास हे भगवंताचेच व्यासरूप असल्याने सर्वज्ञत्व आणि सर्वदृग् हे व्यासांचे समर्पक विशेषण आहे. ज्या दैवीवाङ्मयाच्या अभ्यास करण्यासाठी मानवी एक जन्म अपूर्ण आहे असे अजोड वाङ्मय निर्माण करणारे केवळ (१७३) महाबुद्धिः विभूती. संपूर्ण वैदिक वाङ्मयाचे अनंत काळापर्यंत आदर्श मांडणी करणारे श्रीव्यास अद्भुत आध्यात्मिक सामर्थ्याचे म्हणूनच ते (१७४) महावीर्यः. नारदांकडून मिळालेल्या उपदेशाचे जे सदैव स्मरण करतात ते (१७५) कृतज्ञः. धर्मतत्वाचे स्पष्ट प्रसंगी कठोरतेने सांगणारे (१२५) धर्माध्यक्ष तथा (५४६) दुरतिक्रम. सत्कर्म आणि अकर्माचे रहस्य जे महाभारतातून निवेदन करणारे (१३६) कृताकृतः. सर्व लोकांसाठी धर्माचा मार्ग कथन करणारे (४३४) लोकनाथ, शिष्यांना मार्गदर्शन करणारे (६६४) नियन्ता, धर्माचे मर्म दाखवणारे (३८८) नय, तथा धर्म जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ ते (२०४) धर्मविदुत्तमः. असें महर्षी श्रीव्यासमुनी सनातन परंपरेत सर्वत्र व्यापून असल्याने ते (१३) व्याप्त आहेत.
अशी त्यांच्या गुरुतत्त्वाची संगती सहस्रनामातील काहीं नामांशी जोडता येते. 
                                                                          
सहस्रनामामध्यें सांख्यमताची स्थापना करणाऱ्या महान ऋषि कपिलाचार्य यांचे नाम विशेषत्वाने उद्धृत केलें आहे (५११) महर्षि कपिलाचार्यः. भगवद्‌गीनेही भगवान् त्यांची विभूती वर्णन करताना "सिद्धानां कपिलो मुनि: (१०:२६) असें म्हणले आहेत. 

महर्षी श्रेयस यांचे जीवन किंबहुना चिरंजीवी पद हे गुरुतत्त्वाचे गुरुस्वरूप आहे. त्यांचे प्रत्येक वाङ्मय हे सनातन भारतीय संस्कृतीचा दीपस्तंभ असून त्याचा प्रकाश अखिल मनुष्याला प्रकाशित करणारा आहे यात तिळमात्र शंका नाहीं. श्रीव्यासांनी प्रज्वलित केलेल्या ज्ञानदीपचा प्रकाश गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून उजळून निघाला. 
महाभारताच्या युद्धानंतर काहीं सहस्त्र वर्षानंतर श्रीमदाद्यशंकराचार्यांनी प्रथानत्रयींवर भाष्य लिहून संपूर्ण हिंदुस्तानात धर्म कार्याला वाहून घेणारा आपला शिष्य समुदाय तयार केला नि सनातन हिंदू धर्माचे त्यांनी पुनरुत्थान केलें. त्यानंतर श्रीरामानुजाचार्य, श्रीवल्लभाचार्य, श्रीआनंदतीर्थ यांनीहि व्यास महर्षी प्रणित वेदांताचे त्यांच्या त्यांच्या मतांनुसार प्रतिपादन करून लोकांभिमुख केलें. ती परंपराही थेट परमात्मा श्रीनारायणाकडेच जाते. 

याच प्रकारे सनातन संस्कृतीमध्यें गुरुपरंपरेचा उगम भगवान श्रीनारायणापासून ब्रह्मदेव, श्री नारदमुनी तद्नंतर श्री व्यास यांच्याकडून आजतागायत निरनिराळ्या आचार्य - संतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला आहे. असंख्य संत आणि त्यांची अनेक मते, पंथ, भाषा, उपासना पद्धती वेगळ्या असल्या तरी त्यांच्या कार्याचा आत्मा परम ज्ञान, धर्मसंवर्धन, आत्मकल्याण तथा लोककल्याण हाच आहे. 
असें हे गुरु वेदाची शास्त्रांचे अनुशासन करणारे (२०६) शास्ता, धर्मयुक्त असें (४७७) धर्मी, अतुलनीय धारणशक्तीयुक्त (७५३) सुमेधा, ज्ञान-वैराग्ययुक्त (५२९) सत्यधर्म, वाणी स्वामी (५७३) वाचस्पति (अयोनिज), जे विद्येचे यथार्थ स्वरूप जाणतात ते (२१७) वाचस्पतिः उदारधीः. (५७५) सामवेदाचे गायन करणारे (५७५) सामगः, शांती प्रदान करणारे (५८७) शान्तिदः, कुठलेही संशय नसणारे (६२३)छिन्नसंशयः .अशी अनेक नामें या सहस्रनामामध्यें गुरुतत्त्वाचे अधिष्ठान प्रतिपाद करतात.

प्रत्येक सद्गुरूमध्यें आदिगुरू भगवान् श्री महाविष्णूंचे गुरुतत्व अंतर्भूत आहे. सद्गुरू हे ज्ञानाचे माध्यम असून त्या ज्ञानाचा स्त्रोत भगवान आहेत. म्हणून गुरुभक्ती, शास्त्र श्रद्धा आणि भगवद्भक्ती याविषयी भगवद्गीतेत वचन आहे की, "तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥ (४:३४)" हाच विष्णुसहस्रनामातील गुरुतत्त्वाचा उपदेश होय.

✍🏻©️अनिकेत घिवलीकर

Comments

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १