श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीनरनारायणावतार
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्। देवीं सरस्वतीं चैव तातो जयमुदीरयेत्।। श्रीभागवत महापुराणाच्या प्रथम स्कंधाच्या द्वितीय अध्यायांत हा वरील श्लोक आला आहे. त्यात समस्त पातकांचे परिमार्जन ज्यांच्या स्मरणाने होते अशा नरनारायण या ऋषिद्वयांना पहिला नमस्कार केला आहे. त्यातले नारायण म्हणजे प्रत्यक्ष भगवान महाविष्णूच आणि दुसरा तो श्रेष्ठतम पुरुष नर. दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर नारायण हे विष्णू आणि नर हे शिव या तऱ्हेने जगातले द्वंद्व हे नरनारायण रूपाने प्रतीत होतात. महाभारत तथा अन्य पुराण संहितेमध्यें हा श्लोक मंगलाचरण म्हणून उद्धृत केलेंला आढळतो. त्याचे कारण असें की देव, ऋषीच नव्हे तर मनुष्याकडून काहीं पापकर्म घडले तर त्याचे परिमार्जन, शुद्धीकरिता नरनारायण ऋषींचे दर्शन वा स्मरण आवर्जुन करण्यास सांगितले आहे. म्हणून नारायण आणि नरोत्तम नर या दोघांना वंदन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे की ज्यांच्या आशीर्वादाने घेतलेले व्रत, कार्य निर्विघ्नपणे ध्येयापर्यंत जाते. किंबहुना भगवंताच्या या अवतार कार्याचा उद्देशच मुळांत दीनोद्धार व आत्मानुभूती करवून देणारा आहे. म्हणून सहस्रनामातील (१८४)...