श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीसनत्कुमारावतार
नैष्ठिक ब्रह्मचारी निश्चितीं । ज्यासी स्वप्नीं नाहीं वीर्यच्युति तयालागीं कुमार म्हणती । अवतारमुर्ति सनकादिक।। - श्रीएकनाथी भागवत परमेश्वराने लोककल्याणास्तव व केवळ धर्मोपदेशकाच्या भूमिकेतून काहीं अवतार धारण केलें. त्यातील श्रीसनकादिक ऋषींचे प्राकट्य हा ब्रह्मदेवाच्या मनाद्वारें निर्माण झालेला भगवान् श्रीविष्णूंचा पहिला अंशावतार. भगवंताने ब्रह्मदेवास पुनःसृष्टी रचिण्यासाठी आज्ञा देऊन त्याने प्राकृत व वैकृत सर्ग म्हणजे स्वयंसिद्ध चेतन अशा स्वाभाविक, सात्विक एका (वयाच्या) स्थितीत (बालरूपात) राहणारा दिव्य देह उत्पन्न केला. ज्यांची गती देवलोक आणि मनुष्य लोकातही आहे अशा श्रीसनत्कुमारांना ब्रह्मदेवाने निर्मिले. या सनकादिक मुनींविषयीं समस्त संत मंडळींनी त्यांच्या वाङ्मयांत भगवद्भक्त, ब्रह्मनिष्ठ, गुरुवर्य या प्रकारच...