श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत कूर्मावतार
तेणेंचिं कमठावतारा । स्वपृष्ठीं धरुनि गिरिवरा । मंथोनियां क्षीरसागरा । अमृत सुरवरां अर्पिले ॥ - श्रीनाथभागवत, ४:२१७. विश्वाचा आदिकारण जो परमेश्वर त्याच्यापाशी द्वैतभाव नावाची वस्तुच नसल्याने अमुकांना तारणार आणि तमुकांचा नाश करणार, एकाचे रक्षण दुसर्याचा वध असा पक्षपातीपणा नाहीं. कारण तोच जर सगळ्यांचा (६९) प्रजापती आहे तर दुजाभाव कसा ठेवेल ! तथापि जसा तो उत्पत्तीकारक नि पालक आहे तसाच लयाचाही अधिपती आहेच. सूक्ष्मातून स्थूलांत संक्रमण झालें की सत्त्व-रज- तम या गुणांचा अंतर्भाव होऊन उपाधीव्याप्त होतो. म्हणूनच 'संभवामि युगे युगे' हे त्याचे वचन दुष्टांच्या विनाशाकरीता आणि सुष्टांच्या रक्षणार्थ असल्याने पुन्हा पुन्हा अवतार धारण करून आणि तेही निरनिराळ्या स्वरुपांत घ्यावा लागतो. यास्तवच भगवंत सगळ्या मोजमापाच्या पलीकडे असा (१०२) अमेयात्मा असून साकार प्रकट होणारा (३०५) व्यक्तरुपः असाही आहे. देवदानवांच्या युद्धांत दैत्यांचे वाढत्या बळामुळें देवांपुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला. निस्तेज झालेल्या देवांना संजीवनी मिळेल असा ठोस उपाय हाती असणें आवश्यक होते आणि ते...