श्रीविष्णुसहस्रनाम आणि अक्षय्यतृतीया
अक्षयीं तें झालें । आतां न मोडे रचिले।।
- श्रीतुकाराममहाराज
{ जी अक्षय गोष्ट मिळविण्यासाठी अट्टाहास केला ते रचलेलें केव्हाहीं मोडू नये.}
भगवान् श्रीकृष्ण आपल्या विभूतीतत्त्वांचा निर्देश करताना अर्जुनास अहमेवाक्षयः कालः अर्थात क्षय न झालेला काळ मी आहे असें म्हणाले. हा काळ केव्हा निर्माण झाला, वा भासमान झाला; तर जेव्हा मूळमाया (शक्ती) अष्टधाप्रकृती ब्रह्मापासून विस्तार पावून सृष्टी क्रमाक्रमाने आकारास आली तेव्हा. त्याविषयीं श्रीसमर्थ दासबोधात काळरूपनिरूपणांत म्हणतात, मूळमाया जगदीश्वर। पुढे अष्टधेचा विस्तार। सृष्टीक्रमें आकार। आकारला॥ हे अवघेंच नसतां निर्मळ। जैसे गगन अंतराळ। निराकारीं काळवेळ। काहींच नाहीं॥ उपाधीचा विस्तार जाला। येथे काळा दिसोन आला। येरवी पाहातां काळाला। ठावची नाहीं॥ (१२:८: १,२,३)
प्रकृती नसती तर जसे आकाशच सर्वत्र असते, त्याप्रमाणें निर्मळ ब्रह्म असते. म्हणून तेथे काळवेळ काहींच नसतो. अतः ब्रह्मांडाच्या उपाधीचा विस्तार जेव्हा झाला तेव्हा त्या ठिकाणी काळ दिसायला लागला.
पण हा उपाधिमिश्चित किंवा प्रकृतीरुपी काळ कल्पातीत नसून कल्पांती क्षय होणारा आहे. प्रलयावेळी ही सृष्टी परमात्मा स्वतःमध्यें सामावून घेतो.
जें जें जेथून निर्माण जालें। तें तें तेथेंची निमालें। येणेंचि न्यायें संव्हारलें। महाप्रळयी॥ (१२:६:१९)
येथे पुन्हा भगवंताच्या वचनाची आठवण होते; कालोऽस्मि लोकाक्षयकृत्प्रवृद्धे:। (गीता ११:३२) की, लोकांच्या नाशाकरीता प्रवृत्त झालेला 'महाकाळ' मी आहे. ज्या काळाला आरंभ किंवा अंत नाहीं तो सहस्रनामांत (४२) अनादिनिधनः आहे.
अक्षय/अक्षय्य काळाविषयी ही प्रस्तावना करण्याचे कारण असें की अक्षय आणि अक्षय्य या दोन शब्दांमध्ये अतिशय सूक्ष्म भेद आहे. नास्ति क्षयो यस्य अक्षय: म्हणजे ज्याचा नाश नाहीं ते अक्षय. आणि क्षेतुं (अ)शक्यं इति अक्षय्य. ज्याचा नाश होणे शक्यचच नाहीं ते अक्षय्य.
अतएव भगवंताचा काळ किंवा अक्षय्य ही संकल्पना ब्रह्मसूत्रांत सांगितल्याप्रमाणे अनादित्वात यामध्यें येते. जीव आणि त्याचे कर्म अनादी असल्याने ते अक्षय्य आहे. सृष्टीचा अंत होतो तेव्हा सगळे जीव त्यांच्या कर्मासह त्या महापुरुषांत ( परमात्म्यात) सामावून जातात. मात्र परममोक्ष प्राप्तीचे अधिकारी या चक्रात सापडत नाहींत. हा अक्षय्यकाळ (९४१) अनादि होय.
श्रीज्ञानेश्वरीमध्यें श्रीज्ञानोबा भगवंताच्या अनंत आणि अक्षय्य स्वरूपाचे दर्शन घडवताना म्हणतात, जाणे अजु मी अजरु। अक्षयो मी अक्षरु।
अपूर्व मी अपारु। आनंदु मी॥ (१८: ११९६) की, मी (परमात्मा) जन्मरहित, वार्धक्यरहित, नाशरहित असा अक्षय , अक्षर, अपूर्व तथा अनंत आनंदरुप होय.
सनातन हिंदुधर्म केवळ भोगवादीवृत्तीचा नसून आत्मोन्नती तथा पूर्वजांविषयी आपले दायित्व जपणारा आहे. म्हणूनच सांसारिक आणि परमार्थिक दोन्ही वाटचाल बरोबरीने व्हावी तेही सहज, याच करिता 'अक्षय्यतृतीया' या दिनविशेषाचा अंतर्भाव आपल्या ऋषिप्रणित संस्कृतीत झाला. 'अक्षय्यतृतीया' ही तिथी मुख्यतः पितरांच्या स्मरणार्थ राखीव असून या दिवशी पितरांच्या तृप्तीकरिता केलें जाणारे तर्पणादी दान हे कल्पांती, नवसृष्टी आरंभी सदैव अक्षय्य अर्थात ज्याचा लोप वा क्षय होणे शक्य नाहीं असें अबाधित राहते. 'कात्यायनस्मृतीत' श्राद्धप्रकरणात अक्षय्योदकदानम् असें आवर्जून सांगितले आहे.पितरांकरीता दान केलेलें उदक अक्षय्यरुपाने राहाते. या अक्षय्य पुण्याचा उपयोग पितर पुढल्या गतीसाठी करून घेतात असें शास्त्र आहे.
या प्रकरणाचा विषय अक्षय्यतृतीया या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला गेलेल्या पवित्र तिथीचे महात्म्य श्रीविष्णुसहस्रनामाद्वारें त्यातील साधर्म्य दाखविणारे आहे. यास्तव तीन मुद्द्यांच्या आधारे तिथी आणि सहस्रनाम याचे विश्लेषण करून भगवंताच्या विभूतीचे दर्शन काल, यज्ञ आणि दान या त्रयींतून जाणून घेऊ.
काल -: सहस्रनामांत चौथे नाम (४) भूतभव्यभवत्प्रभुः असें आहे, की जो झालेले म्हणजे भूत, भव्य म्हणजे भविष्यकाली आणि भवत् म्हणजे वर्तमानकाली घडणाऱ्या कालावर ज्याचे स्वामित्व असा कालरूपी परमेश्वर. म्हणूनच तो सर्वकाली स्थिर राहणारा (१२०) शाश्वतःस्थाणु असा अक्षय्य (४१८) काल आहे.
येथे श्रीभगवद्गीतेच्या श्लोकाचा अर्थ काहींसा लागतो. अहमेवाक्षयः कालः की जो सर्वकाळी विकाररहित, (५६) शाश्वत आहे.
प्रलयकाली सृष्टि लय पावून पुनः नव युगारंभ होतो. या अनादी अनंत कालापासून चाललेल्या कालचक्रास 'युगादि' ही संज्ञा आहे. सहस्रनामांत भगवंताने त्याच्याच लीलेची ही संज्ञा (३००) 'युगादिकृत्' या नामाने धारण केली, की जो युगांचा कर्ता वा प्रलयानंतरच्या सृष्टीचा कर्ता आहे असा. ही युगादीची क्रिया म्हणजे सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या चतुर्युगांच्या वारंवार आवर्तनांना (३०१) युगावर्त असे नाम असून भगवंताची विभूती अर्थात अस्तित्व आहे.
सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ वैशाख शुद्ध तृतीया या तिथीस अक्षय्यतृतीयेस झाला.
यज्ञसंस्था -: प्रत्येक युगांत विशिष्ट कर्मे किंवा भगवंताच्या भक्तीची साधने निश्चित केली आहेत. सत्ययुगांत ध्यानमार्गाद्वारे, द्वापरांत अर्चन-पूजनाद्वारे, कलियुगांत नामस्मरणाने आणि त्रेतायुगांत यज्ञादी हवनाद्वारें परमेश्वराची भक्ती, उपासना अनुस्यूत आहे.
त्रेतायुगाचा 'यज्ञ' हा मुख्य धर्म असून या यज्ञकर्माविषयीं अनेक नामें सहस्रांत आली आहेत. तत्संबंधी त्याचा भावार्थ नामावली स्वरूपांत जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
सहस्रनामांतील तिसरे नाम (३) वषट्कारः असें आहे. त्याचा अर्थ, यज्ञामध्यें ज्याला स्मरून 'वषट्' ही विशिष्ट क्रिया केली जाते आणि त्या देवतेला त्याद्वारे प्रसन्न वा त्यांचा हविर्भाग दिला जातो, ती विधीच स्वयमेव भगवंताचा अंश म्हणून तो वषट्कार.
भक्तांना त्यागपूर्ण जीवन जगायला शिकवणारा आणि नंतर एकाच समत्वभावाने त्यांना वागवणे हाच ज्याचा यज्ञ तो (३५८) समयज्ञ.
यज्ञांत अर्पण केलेली आहुती जो हरण करतो किंवा अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च। (गीता ९:२४) सगळ्या यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे, असा हा (३५९) हविर्हरिः.
मोठमोठ्याले अश्वमेध, वाजपेयादीसारखे यज्ञ ज्यामध्यें अर्पण केलेल्याचा निर्वाणरूपी फल प्राप्त करून देणारा भगवान् (४३९) महामख होय.
श्लोक क्र. ४८ -: यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतुः सत्रं सतांगतिः।
(४४५) यज्ञ -: तैत्तिरीयोपनिषदांत यज्ञौ वै विष्णुः। अशी श्रुती आहे की, यज्ञ हाच विष्णु होय. देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि ब्रह्मयज्ञ असें गृहस्थाने करावयाचे मुख्य पाच यज्ञ प्रकार. याव्यतिरिक्त प्रत्येक देवतेच्या उपासना विधीमध्यें विविध यज्ञांचे प्रकार आहेत. गणेशयाग, विष्णुयाग, नवचंडीयाग, रुद्रयाग इत्यादी. विशिष्ट कारणास्तव केले जाणारे यज्ञ म्हणजे विवाहयज्ञ, पर्जन्ययज्ञ, अश्वमेध, वाजपेय, सोमयज्ञ इत्यादी शेकडो यज्ञप्रकार आहेत. या सगळ्या यज्ञांचा स्वामी श्रीमहाविष्णु. देवतांच्या तुष्ट्यार्थ केली जाणारी धार्मिक क्रिया वा विधी 'यज्ञ' होय. अहं यज्ञः (गीता ९:१६) असें श्रीभगवद्गीतेत वचन आहे.
(४४६) इज्य -: यज्ञरूपी साधना ज्याला उद्देशून केली जाते तो विष्णुच इज्य होय.
(४४७) महेज्य -: यज्ञाद्वारें आराधना करण्यास जो सर्वोत्तम असा.
(४४८) क्रतु -: यज्ञ म्हणजे पंचमहायज्ञ, श्रौतादी अग्निहोम, पाकयज्ञ, सोमाभिषक ज्यात केला जातो तो अग्निष्टोम, इत्यादी या सगळ्याला क्रतुः म्हणतात. त्या क्रतुद्वारे भगवंताची आराधना केली जाते. अतः अहं क्रतुः (९:१६) असे भगवद्गीतेत भगवान् स्वयं क्रतुः म्हणजे आपणच अशी ग्वाही देतात.
(४४९) सत्रम् - अनेक दिवस चाललेल्या मोठ्या यज्ञसमारंभास सत्र म्हणतात. त्याचा कर्ता-धर्ता आणि पूर्णत्वास नेणारा भगवंतच होय.
(४५०) सतांगति -: सज्जनांना त्या यज्ञाचे यथायोग्य फल देणारा अथवा संतांना (यज्ञाद्वारे) जो प्राप्त करून घेण्यास सुलभ असा.
श्लोक क्र. ७२-: महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः।
(६७५) महाक्रतु -: मनुस्मृतिमध्यें यथाश्वमेधः क्रतुराट् म्हणजे यज्ञामध्यें अश्वमेध हा राजा आहे. अतः तो महान यज्ञ महान् क्रतु होय.
(६७६) महायज्वा -: यज्वा म्हणजे यज्ञ करणारा यजमान. भगवंतापेक्षा महान् यजमान कुणी असू शकतो का!
(६७६) महायज्ञ -: अश्वमेधादी प्रचंड यज्ञांचा अधिपती.
(६७८) महाहवि -: यज्ञामध्ये समिधा, घृत, तीलादी टाकली जाणारी अनेक द्रव्यें यास हवि म्हणतात. मोठ्या सत्रात चालणाऱ्या यज्ञात त्याचे प्रमाणही प्रचंड असते. या संकल्पनेला अनुसरून 'महाहविः' हे नाम आले आहे.
श्रीभगवद्गीतेत जे दोन 'महाहवि' 'महायज्ञांत' 'महायज्वाने' म्हणजेच श्रीकृष्णाने करण्यास सांगितले आहेत तेही उद्घृत करणे आवश्यक आहे.
ज्ञानयज्ञेन चाव्यन्ये यजन्तोमामुपासते॥ (९:१५) ज्ञानी लोक माझी ज्ञानयज्ञाद्वारे आराधना करतात आणि यज्ञानां जपयज्ञोऽस्मि (१०:२५) [कलियुगात] जप हाच यज्ञ समजावा, हीच माझी विभूती.
या अक्षय्यतृतीयेच्याच दिवशी भगवान् श्रीव्यासांनी श्रीगजाननाकरवी महाभारत रचण्यास सुरुवात केली. तेहे अक्षय वाङ्मय सहस्र वर्षे नव्हे अनेक कल्प अबाधित राहिले आहे.
(७५३) मेधज -: यज्ञामधून किंवा यज्ञात प्रकट होणारा तो मेधज. उदाहरणार्थ श्रीरामादी भावंडांचा जन्म यज्ञाच्या आशीर्वादाने झाला. त्याच प्रकारे श्रीपराशरभट्टांनी त्यांच्या भाष्यांत देवकीमातेने कामनारुपी व्रताचा यज्ञ केला त्याचे फल म्हणून भगवान् तिच्या पोटी अवतरीत झाले असा दाखला दिला आहे.
श्लोक क्र.१०४- यज्ञोयज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गोयज्ञवाहनः।
(९७१) यज्ञ - [आधी विवरण केले आहे.]
(९७२) यज्ञपति -: सगळ्या यज्ञांचा स्वामी.
(९७३) यज्वा -: यज्ञ करणारा. त्रेतायुगांत परशुराम, दशरथी रामांनी यज्ञ केल्याचे उल्लेख आहेत. श्रीवामनाचे बलिराजाकडे यज्ञ करत असतानाच येणे झाले होते.
(९७४) यज्ञाङ्ग -: यज्ञ करणे आणि त्याचे रक्षण करणे हे ज्याचे अंग वा कर्तव्य तो यज्ञाङ्ग. यज्ञापासून तो निराळा नव्हे.
(९७५) यज्ञवाहन -: यज्ञाद्वारे देवतांना त्यांचा हविर्भाग मिळतो किंवा भगवंताची भक्ती करणाऱ्यांना शक्ती प्रदान करून त्याचे निर्वाहन करणारा तो यज्ञवाहन.
श्लोक क्र.१०५ -: यज्ञभृद् यज्ञकृद् यज्ञी यज्ञभृग् यज्ञसाधनः।
यज्ञान्तकद् यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च॥
(९७६) यज्ञभृत् - यज्ञ धारण करणारा.
(९७७) यज्ञकृत् - यज्ञ करणारा.
(९७८) यज्ञी - समस्त यज्ञांचा स्वामी.
(९७९) यज्ञभृग् - यज्ञाचा उपभोग घेणारा.
(९८०) यज्ञसाधन - यज्ञासाठी लागणाऱ्या समिधादी वस्तूही भगवंताचेच एक रूप होय.
(९८१) यज्ञान्तकृत् - यज्ञाची पूर्तता करणारा. राक्षसांच्या उपद्रवामुळे विश्वामित्रांनी यज्ञांचे रक्षण करण्याकरिता श्रीराम लक्ष्मणांस आपल्यासमवेत नेले.
(९८२) यज्ञगुह्यम् - निष्काम वा ज्ञानयज्ञ हेही त्या परमेश्वराचेच स्वरूप. अतः तो यज्ञगुह्य होय.
हरिवंशपुराणामध्ये यज्ञाचे महत्व सांगताना श्लोक आला आहे, ये यजन्तिमखैः पुण्यैर्देवतादीन् पितृनपि। आत्मानमात्मना नित्यं विष्णुमेव यजन्ति ते॥ (३|४०|२७) जे लोक पवित्र यज्ञाद्वारें देवता तथा पितृआदींचे पूजन करतात ते सदैव आपल्यातल्या अंतस्थ आत्म्यात स्थित विष्णुचे यजन करतात.
द्वापारयुगांत यज्ञसंस्थेची महती वरील या निवडक नामांद्वारे आपल्यासमोर मांडली. देव आणि पितरांकरिताही याग किती महत्त्वाचा याचेही अनुमान लावता येईल.
दान - अक्षय्यतृतीयेला पितरांच्या तृप्तीकरिता केलेले दान विशेष मानले गेले आहे. पितरांच्या स्मरणार्थ मातीच्या कुंभात जल, वाळा इत्यादी घालून कुणा सत्पात्र ब्राह्मणास दान देण्याची प्रथा आहे. पळसाच्या पत्रावळीवर केलेले अन्नदान, तर्पणादी विधी हे अत्यंत पवित्र तथा पितरांच्या पुढच्या गतीसाठी आपण त्यांच्या प्रित्यर्थ केलेले हे श्रद्धापूर्वक दान उपयोगात येते. म्हणून यादिवशीचे कर्म अक्षय्य आहे.
महाभारतामध्यें दानाविषयीं अनुशासन पर्वात अनेक अध्याय येऊन पितामह भीष्मांनी युधिष्ठिरासमवेत प्रदीर्घ चर्चा केली आहे. त्यात विशेषतः अन्न आणि उदक दानाचे हे पितरांच्या तृप्तीसाठी महत्त्वाचे साधन असें वेळोवेळी विशद केले आहे.
यद्यदिष्टतमं लोकेयच्चास्यदयितं गृहे। तत्तद्गुणवते देयं तदेवाक्षयमिच्छता॥ (५९:७)
या लोकांत जें जें अत्यंत आवडणारे तथा (दान देणाऱ्या) माणसाला आवडणारे वस्तू जे त्याच्या घरी आहेत ते सत्पात्र पुरुषास द्यावे. त्याच वस्तू कधीही संपणार नाहीत म्हणजेच अक्षय्य पद्धतीने राहतील.
तथा जलदानासंबंधी भीष्म म्हणाले,
तोयदो मनुजव्याघ्र स्वर्गं गत्वा महाद्युते।
अक्षयान् समवाप्नोति लोकानित्य ब्रवीन्मनुः॥ (अनु.६७:१६)
श्रीमुनींनी म्हटले आहे की, जलाचे दान देणारा पुरुष स्वतः स्वर्गलोकांत जाऊन अक्षय लोक प्राप्त करून घेतो. याचा भावार्थ असा की, पितरांसाठी केलेले कार्य केव्हाही खंडित न होता ते अक्षय/अक्षय्य राहते. ते कर्म करणाऱ्यालाही अक्षय सुखाची प्राप्ती निश्चित आहे असे शास्त्राच आहे.
दानासंबंधी काहीं नामें सहस्रांत अंतर्भूत असून तत्संबंधी नाममहिमा भगवंताच्या अक्षय्यदातृत्वाच्या अनुषंगाने आपल्यापुढे मांडतो.
निर्माण करणारा तोच, देणाराही तोच आणि त्यानेच निर्मिलेल्याचे त्यालाच अर्पण असे चक्र अविरत सुरू आहे.
स्थूलस्वरूपांत समुद्रातले पाणी कितीही उपसले तरी तो जलधी कधी रिक्त होत नाहीं. मग या ब्रह्मांडाचा निर्माणकर्ता त्याच्या असीम ऐश्वर्याचा साठा कसा कमी होईल! सदगुणांचा, मांगल्याचा स्थावर दृश्यपदार्थांचाही साठा न संपणारा म्हणून तो (३०) निधिः अव्ययः.
तथा सर्व संपत्ती ज्याच्यापाशी तो (६०८) श्रीनिधी , न आटणारे वैभव आणि कृपा अक्षय होय.
रामायणामध्यें रामचंद्राने अश्वमेध यज्ञ केल्यानंतर पुष्कळ दक्षिणा दिली म्हणून तो (५०२) भूरिदक्षिणः या नामाने प्रसिद्ध आहे.
धन देणारा हेही भगवंताचे स्वरूप असा (५७०) द्रविणप्रद आणि (६०५)श्रीदः. अक्षय्यतृतीयेला जलयुक्त कुंभदानाचे विशेष महत्त्व मागे नमूद केलें आहे. सहस्रनामांत (६३५) कुम्भ असें भगवंताचे नाम असून सद्गुणादी सद्वस्तुंचा अमाप साठा या अर्थी हे नाम भगवंतास लागू पडते.
परशुरामावतारांत भगवंताने कश्यपांना भूमीदान केल्याच्या संदर्भाने त्यास (८०९) कुन्द म्हटले आहे. 'कु' म्हणजे भूमी, तिचे दन म्हणजे 'द'.
सौख्य, कल्याण, मंगल, परमानंद या अक्षय तथा (१७) अक्षर सद्वस्तुंची वृत्ती प्रदान करणारा भगवान् (९०१) स्वस्तिदः होय.
भगवंताची देयवृत्ती या दानविषयक काही नामांद्वारे आपल्या ध्यानांत आली असेल. म्हणजे त्याच्याजवळचे केव्हाही न संपणारे सुख, आनंद म्हणजेच त्याच्या (६१२) श्रेयस् या स्वरूपाची प्रचिती आहे. या वृत्तीचे चित्रण श्रीएकनाथ महाराजांनी भागवताच्या अर्ध्या चरणांत अतिशय समर्पक तथा मार्मिक शब्दांत केलें आहे. ते म्हणतात, भगवंताची ही देयवृत्ती कशी असते तर ज्याची अनावर दानस्थिती । (१६:२८८) याप्रकारे हीसुद्धा एक विभूतीच गणली आहे.
सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्यें या स्तोत्राचे लाभ कोणते हे सांगताना ऋषी, देव, पितर इत्यादी महाभुतें श्रीनारायणापासूनच उत्पन्न झालेले आहेत. हाच परमात्मा सर्वत्र व्यापून राहिला असून.... ज्याला आपले कल्याण साधावयाचे आहे त्याने हे दिव्य श्रीविष्णुसहस्रनाम अवश्य पठण करावे. अर्थात पितरांच्या पुढील गतिसाठी हे सहस्रनामस्तोत्र अत्यंत उपयुक्त होय असा स्पष्ट निर्देश केला आहे.
द्रौपदीकडे ज्याप्रकारे श्रीसूर्यनारायणाने दिलेली केव्हाही न संपणारी 'अक्षयस्थाली' होती की त्यात शिजवलेले (९८३) अन्न कमी होत नसे, तद्वत विचार केला तर परमेश्वराकडे कुठल्याही गोष्टीला क्षय नाही. मनुष्यास जशी देवांची कृपा लागते तसेंच पितरांचेही आशीर्वाद आवश्यक आहेत. म्हणून हा अक्षय्यतृतीयेचा दिवस पितरांकरिता आहे. त्यांच्याकडून लाभणाऱ्या आशीर्वादाचा क्षय न होण्याकरिता आणि त्यांना अक्षय्यगती लाभण्यासाठी काही कर्मे आणि सहस्रनाम प्रशस्त होय.
अतएव काल, यज्ञ आणि दान या 'त्रयी'च्या आधारे सहस्रनामस्तोत्र आणि अक्षय्यतृतीया यासंबंधीचे लेखन त्या (८०६) महानिधीच्या चरणी अर्पण.
✍🏻 अनिकेत घिवलीकर, मुंबई.

Comments