न मातुः परं दैवतम् ।
मम्मा बद्दल काहींतरी लिहावं, तिच्याबद्दलच्या भावना कागदावर उतरवून काढाव्यात असं खूप दिवसांपासून वाटत होत, पण प्रत्यक्ष लिहायला घेतल्यावर आपण एका खूप मोठ्या विषयाला हात घालताहोत याची जाणीव झाली.पण निश्चय केला की लिहायचं, जें काहीं तोडकं-मोडकं असेल तसं.त्याचं कारणही तसंच होतं, मम्माचा ६०वा वाढदिवस! खरं सांगू, मनामध्यें तिच्याविषयीं असंख्य आठवणींचा कल्लोळ उसळला आहे आणि त्या आनंदानें डोळेही पाणावले आहेत. "आई" या दैवी रसायनाबद्दल आपण काय लिहिणार, काय बोलणार?जेथें भगवंतही मातेच्या प्रेमाची भूक शमविण्याकरीता गर्भवास सोसतो नि वारंवार जन्म घेतो, त्याची महती निराळी ती काय वर्णावी! " गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथेचा जिव्हाळा तेथें बिंबे॥ होय, तो जिव्हाळा, ते प्रेम हे ती आई आणि तिचा पुत्रच जाणू शकतो. मम्माचा चेहरा डोळ्यासमोर आल्यावर कुठल्या कुठल्या गोष्टींची आठवण होते याची यादीच तयार होईल.प्रेम, वात्सल्य, संस्कार, खरेपणा, प्रेरणा, मार, ओरडा, त्याग, निःस्वार्थपाणे केलेले अनंत उपकार (उपकार हा शब्द मातेच्याठायी अस्तित्वात नाहींच) आणि खूप काहीं जे शब्दात मांडता येत नाहीं.. नर्...