श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, अंतिम भाग.
अभंग : ३ सांडोनि नित्य नेम कर्म । बोलती कलिकाळाचे वर्म ॥ नामधारक नामाचे । झाले डिंगर केशवाचें ॥ टाळ मृदंग वाजती । टके पताका शोभूती ॥ कंठी तुलसींच्या माळा । वज्र पंजराचा टिळा ॥ शंख चक्र मुद्रा धरणे। अंगी मिरवती भूषणे ॥ संतरज उधळले । तेणें सर्वांग डवरलें ॥ सहस्रनामें गर्जित । तेणें पळाले यमदूत ।। नामा म्हणे ने माझे सखे। स्वामी विठोबासारिखे ॥ भावार्थ: संत आपल्या नित्यनेम कर्माचा त्याग करून नामस्मरणाचे वर्म सांगतात. नामसाधक मंडळी नामाच्या बळावर केशवराजाचे भक्त झाले आहेत. टाळ-मृदंगाचा गजर करीत ध्वज पताका घेतले आहेत. त्यांनी कंठी तुलसीमाला धारण केली आहे, मस्तकावर उर्ध्वपुंड्र- चंदनाचा टिळा लावला आहे, शंखचक्रांच्या मुद्रा अंगावर धारण केल्या नि त्यांचे सर्वांग संतचरणरजाने माखून गेले आहे. त्यांनी विष्णुसहस्रनामाचा उच्चरवाने घोष केल्यामुळें यमदूनही पळून गेले. नामदेव महाराज म्हणतात असें दयाळू अंतःकरणाचे माझे सखे मला विठ्ठलासारखे प्रिय आहेत. विवरण : सदर अभंग नामदेवरायांच्या गाथेत "संतमहिमा" या प्रकरणांत अंतर्भूत केला आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणांत आकंठ न्हाह...