ब्लॉग लिखाणाची वर्षपूर्ती
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आज २४ जून.गेल्यावर्षी याच दिवशी मी माझ्या लेख *स्वभावस्तु प्रवर्तते* या नांवाने blogspotवर पोस्ट करण्यास सुरुवात केली, त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. मी काहीं लेखक नाहीं.जे जे मनाला भावले ते कागदावर लिहून... होय संपूर्ण लेख आधी लिहून मग तो टाईप करतो; ते उतरवीत गेलो.कुणाला आवडले असेल, कुणाला ठीकठाक वाटले असेल तर कुणी वाचलेहे नसेल! पण थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने चुका सुधारीत निदान काहींतरी बरं लिहू शकतो असा त्यांनी आत्मविश्वास दिला, आणि करूनही घेतले. माझे विषय सगळ्यांच्या पसंतीचे नाहींत याची पूर्ण कल्पना आहे.काहींची अशी तक्रारही केली मी फार बोजड लिहितो, परत वाचावे लागते.मला मग प्रश्न पडतो की मी कुणी विद्वान अथवा प्राध्यापक, पंडित नाहीं की माझं लिखाण वाचायला अवघड जाईल. पण तसं का होतं याचेही आकलन झाले.जमेल तितके सोपे करण्याचा प्रयत्न करतो.पण तो जर सहज झाला तरच मजा.नाहीं तर माझी जी काहीं "स्टाईल" (शब्द मोठा आहे, तरी. असो.) ती त्यात न रहाता अगदी साधारण बाळबोध मला स्वतःलाच पटायचे नाहीं.येणारही नाहीं.पुढें कधी जमलेच तर गोष्ट निराळी....