ब्लॉग लिखाणाची वर्षपूर्ती


सप्रेम नमस्कार,  

विनंती विशेष.

आज २४ जून.गेल्यावर्षी याच दिवशी मी माझ्या लेख *स्वभावस्तु प्रवर्तते* या नांवाने blogspotवर पोस्ट करण्यास सुरुवात केली, त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले.

मी काहीं लेखक नाहीं.जे जे मनाला भावले ते कागदावर लिहून... होय संपूर्ण लेख आधी लिहून मग तो टाईप करतो; ते उतरवीत गेलो.कुणाला आवडले असेल, कुणाला ठीकठाक वाटले असेल तर कुणी वाचलेहे नसेल! पण थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने चुका सुधारीत निदान काहींतरी बरं लिहू शकतो असा त्यांनी आत्मविश्वास दिला, आणि करूनही घेतले. 

माझे विषय सगळ्यांच्या पसंतीचे नाहींत याची पूर्ण कल्पना आहे.काहींची अशी तक्रारही केली मी फार बोजड लिहितो, परत वाचावे लागते.मला मग प्रश्न पडतो की मी कुणी विद्वान अथवा प्राध्यापक, पंडित नाहीं की माझं लिखाण वाचायला अवघड जाईल. पण तसं का होतं याचेही आकलन झाले.जमेल तितके सोपे करण्याचा प्रयत्न करतो.पण तो जर सहज झाला तरच मजा.नाहीं तर माझी जी काहीं "स्टाईल" (शब्द मोठा आहे, तरी. असो.) ती त्यात न रहाता अगदी साधारण बाळबोध मला स्वतःलाच पटायचे नाहीं.येणारही नाहीं.पुढें कधी जमलेच तर गोष्ट निराळी. 

आजच्या तारखेला ब्लाॅगवर ३० लेख आणि  ६३३८ लोकांपर्यंत माझा ब्लॉग किंवा लेख पोहचल्याची नोंद आहे.आनंद झालाय.खरंच.आणि तो तुम्हा सगळ्या हितचिंतकांमुळे.वेळोवेळी माझ्या काहीं मित्रांनी सुधारणा सांगितल्या.माझ्या जोशीबाईंनी दुरुस्त्या करून घेतल्या.माझी बायको लेखांची पहिली श्रोता असते.तसेंच ख्यातनाम व्याख्याते तथा प्रवचनकार श्री.सच्चिदानंद शेवडे गुरुजींनी तुकोबांच्या लेखाचे फोनवरून कौतुक केलें तो भाग्याचा क्षण होता. घरच्या सगळ्या सदस्यांनीही नेहमीच कौतुक केलें त्यामुळे लिहिण्याचा हुरूप वाढला. 

मी फार काहीं लिहित नाहीं.पण जे काहीं लिहायचे ते शत प्रतिशत सत्य आणि संदर्भासहित असा माझा आग्रह.माहिती कमी पडत असेल तर वेळ लागला तरी चालेल पण चुकीचे काहीं जायला नको हे धोरण अगदी अगत्याने पाळतो.तरूण भारत वृत्तपत्रामध्येही काहीं लेख प्रसिद्ध झाले.तेव्हा काहीं वाचकांनी फोन करून लेख, विषय आवडल्याची पावती दिली. त्यावेळी आपण जे काहीं थोडंफार करीत आहोत ते योग्य दिशेने चालले आहे याविषयीं खात्री झाली.

आपण सगळ्यांनीही कधी अंगठे, बदाम, नमस्कार इत्यादी चिन्हं पाठवून किंवा काहीं जणांचा लेख वाचल्यावर लहानसा मेसेज धाडून आपल्या भावना पोहचवीत असतात त्याचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद, आभार याला अणखी कुठला प्रभावी शब्द नसल्याने हेच वापरतो.पण त्या कोरडे नसून प्रेम, आपूलकीपूर्वकच आहेत. 


असो. आभार (प्रदर्शन ऐवजी दुसरा शब्द वापरतो) सद्दर्शनाचा सोहळा लांबला याची जाणीव आहे.तो आवरता घेतो.नाहींतर परत उद्या निवृत्तीनाथांवरचा लेख लवकर वाचणार नाहींत! 

असाच लोभ असूद्या आणि या माध्यमातून सनातन हिंदुधर्म-संस्कृतीचा प्रचार, प्रसार व्हावा हीच मनोकामना व्यक्त करतो.🙏🏻

शेवटी एकच मागणं आहे, 

                         अहंकाराचा वारा न लागो राजस ।

                          माझ्या विष्णुदासा भाविकांसी॥


आपला,

✍अनिकेत घिवलीकर. २४ जून २०२२.

Comments

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १