अगाध श्रीहरिचा महिमा । त्याचा पार नेणे ब्रह्मा ||
- श्रीएकनाथ महाराज.
भगवान् श्रीमहाविष्णूंच्या श्रीकृष्णावतार धारणामधील अनेक प्रयोजनापैकी एक म्हणजे जड-जीवांचा उद्धार हा आहे. जो मूळांत अजन्मा आहे, त्यांची जयंती ही निश्चित कुठल्याना कुठल्या बृहद्लीलेकरीता घडलेली किंबहुना घडवून आणलेली क्रीडा असते. ती कारणविरहित असणे शक्य नाहीं. श्रीभागवतकार लिहितात : "कलौ जनिष्यमाणानां दुःखशोकतमोनुदम् । अनुग्रहाय भक्तानां सुपुण्यं व्यतनोद यशः ॥" ( ९:२४:६१) कलियुगामध्यें जन्माला येणाऱ्या भक्तांचे दुःख, उद्वेग, अज्ञान, अगदी पापेही नष्ट करून त्यांच्यावर अखंड कृपा करावी, अनुग्रह करावा असें भगवंताने अत्यंत पुण्यकारक यशस्वी चरित्र करून दाखविले, असा या श्लोकाचा भावार्थ आहे. श्रीभगवद्गीतेतही भगवंत वचन देतात "अपिचेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्। साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हिसः ॥" ( ९:३०) 'अत्यंत दुर्वर्तनी मनुष्य देखील जर अनन्य भक्तीने माझी उपासना करील, तर त्यासही सज्जनच समजावे. कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय ईश्वरभक्ती शिवाय अन्य काहीं नाहीं असा झालेला असतो.' आणि एकदा का तो भगवंताचा अनन्य भक्त झाला की अंबरिषाच्या कथेत भगवंतच त्याच्याविषयीं म्हणतात तसे : "अहं भक्तपराधीन: ।" होय (९:४:६४) या वचनावर श्रीएकनाथ महाराज आपल्या भागवताच्या एकादश स्कंधटीकेमध्यें विस्तार करताना म्हणतातः "वनचर वानर नेणों किती । उद्धरले भगवद्भक्तीं । अस्वलें तारावया निश्चितीं । विवरी जांबवती भक्तीस्तव वारिली || जाण पां अविवेकी केवळ । गौळी गोधनें गोपाळ । तेही उद्धरिले सकळ । श्रीकृष्ण सखे प्रबळ अनन्यप्रीती ।। शास्त्रविरुद्ध अविवेक स्थिती । जार भाव श्रीकृष्णप्रीती । गोपी उध्यरिल्या नेणों किती । अनन्य भक्ति सख्यत्वें ॥ न करितां नाना व्युत्पत्ती । सुगमोपायें ब्रह्मप्राप्ती । अबळें तरावया निश्चितीं । भगवंते निजभक्ति प्रगट केलीं ।।" (ए. भा. २:३१४-३१७)
'या भगवद्भक्तीच्या आश्रयामुळे वनचर, वानर किती जण तरले कोण जाणे, अस्वलांचा उध्दार व्हावा म्हणून विवरांत जानून जांबवतीशी पाणीग्रहण केलें, अविवेकी गौळी, गायीं, गोपपुत्र जे कृष्णाचे सवंगडी ते सगळे कृष्णावरच्या अनन्य प्रेमामुळेच उद्धरिले. शास्त्रविरुद्ध असूनही किती गोपींचा उध्दार कृष्णाने केला त्याचा गणत नाहीं. ते केवल अनन्य भक्तीप्रेमाद्वारेंच. अनेक प्रकारचे शास्त्रादी ग्रंथन न पढताही सुलभपणे ब्रह्मप्रप्ती व्हावी नि दुबकेही भवार्णव निश्चितपणे तरून जावे याकरीताच भगवंताने भक्ती प्रकट केली'.
श्रीतुकाराममहाराज भगवंताच्या अवतारकार्याची मीमांसा करताना म्हणतात: "आपुलिया लाजा। धांवे भक्तांचिया काजा || नाम धरिलें दिनानाथ। सत्य करावया व्रत ॥" - 'भक्तांच्या कार्यात कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून भगवंत आपल्या नामाची सार्थकता साधण्याकरीता आपले दिनानाथ हे नाम व्रतासारखे जपतो.' या वचनामध्यें गीतेतील आपल्या भक्तांचा "योगक्षेम वहाम्यहम", परंतु तत् कदा? "अनन्याश्चिन्तयन्तो मां" (९:३३) हे महत्वाचे गमक आहे. श्रीतुकोबांच्या दुसऱ्या एका अभंगात "शरण येती त्याचे ना विचारिसी दोषा । न मागतां त्यांस अढळ देसी । दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाठी हरि आपुलिया ||" तुकोबांनी भगवंताच्या अवताराचे एके प्रयोजन अगदी स्पष्ट नि नेमके लिहून ठेवले. भगवंतांनी अर्जुनास उपदेश करताना गीतेत सांगितलेल्या "परित्राणाय साधूनां" (४:७) याचे जणू मर्म होय.
विष्णुसहस्रनामस्तोत्राचे चिंतन नि मनन करण्यास्तव भगवंताची लीला, अवतारकार्य सुद्धा जाणून घेणे हे उपासनेकरीता पोषक तथा भक्ती वृद्धिंगत होण्यासाठी प्रभावी साधन आहे असें माझे मत आहे. नाम हे भगवद्लीलेचे सार आहे.
⭐ कालिंदीतरीचा "काला" ⭐
भगवान् गोपाळकृष्ण "क्वचिद वनाशाय मनोदधद्व्रजात प्रातः समुत्याय वयस्यवत्स्पान्।" (भा० १०:१२:१) , एके दिवशी वनभोजन करावें असें मनात आल्यामुळे कृष्ण पहाटे उठला नि "बैसोनि कळंबातळी । गडी मिळाले सकळी। । मिळोनी गोपाळी । करती काला ॥" असें श्रीनाथमहाराज लिहितात, की कृष्णाने आपल्या सवंगड्यांसह कळंब म्हणजे कदंब वृक्षाखाली बसून काला केला.
तत्पूर्वी यमुनेकाठी गोपालांसोबत कृष्ण परमात्मा दिवसभर खेळतो नि बराच वेळ गेल्यानंतर सगळ्यांनी घरातून आणलेल्या शिदोऱ्या सोडून कृष्णाभोवती वर्तुळाकार बसून भोजनपात्रे मांडतात नि "सर्वे मिथो दर्शयन्तः स्वस्व भोज्यरुचिं पृथक्। हसन्तो हासयन्तश्चाभ्यवजह्उ सर्वेश्वरा:।" (भा. १०:१३:१०) "भगवान् कृष्णासह गोपबालक आपण आणलेल्या भोजनाची चव अितरांना दाखवीत हास्यविनोद करीत आनंदाने भोजन करीत होते." एकोबा या प्रसंगाचे भावदर्शन घडविताना लिहितात: "लोणचेने नानापरी। वाढिताती कुवरी। सर्व वाढीले निर्धारीं। परिपूर्ण अवघीया ॥ एका जनार्दनी म्हणे । कवळ तूं घेणें । गडियांसी देव म्हणे । तुम्ही घ्यावा आधीं ||" , विविध प्रकारची लोणची, पक्वान्ने, दहीभात इत्यादी अन्न पदार्थ एकत्र करून तो "काला" सगळ्यांना वाढला नि गोपसवंगडी कृष्णाला म्हणतात याचा पहिला घास तू घे आणि कृष्ण त्याच्या मित्रांना म्हणतो तुम्ही आधी घ्या! श्रीकृष्णानेच केलेला हा काला प्रत्यक्ष कृष्णानेच त्या गोपाळांना भरविला !! नि "तयांची उच्छिष्ट शिते । घालितसे मुखी ॥"
आई जसे आपल्या बाळाला जेवू घालून मग त्याच ताटामध्यें स्वतः जवते. तसंच ही जगत् माऊली कृष्ण त्याने हिच क्रिया आपल्या गोपमित्रांसोबत केली तर त्यात नवल नसून आपल्या बुद्धिपलीकडची लीला आहे. सहस्रांतल्या (०६) भूतभृत् या नामाचा भावार्थ, जो सवांचे भरणपोषण करतो तो, या नामाची सार्थकता म्हणावी की या लीले वरून हे नाम त्यास अर्पण करावे हा पेच निर्माण व्हावा !
यमुनातीरी गोकुळात झालेला हा गोपाळकाला होय. अनंतकोटी ब्रह्मांडनायक परमात्मा श्रीकृष्ण गोपबालकांसोबत नाचतो, खेळतो त्यांच्या बरोबर केवल भोजन करतो असे नव्हे तर, त्यांना जेवू घालतो. हा परमानंद सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी देवही मुकतात. ब्रह्मदेव कृष्णाची स्तुती करताना म्हणतो: गोकुळातल्या गायी आणि गोपजन किती भाग्यवान् की आतापर्यंत सहस्रावधी यज्ञाद्वारें दिलेल्या हविर्भागाने जो तृप्त झाला नाहीं, तो वासरांच्या आणि गोपबालकांच्या रूपाने गाईंच्या स्तनातील आणि गोपींच्या घरातील अमृततुल्य दूध प्राशन करून संतुष्ट झाला!
"अनंत ब्रह्मांडे उदरी। हरि हा बालक नंदा घरी ॥" असें तुकोबा म्हणतात ते यथार्थ आहे. म्हणून की काय सहस्रनामांत भगवंताला (४५) गोपति म्हटले आहे. "अहो भाग्य महोभाग्यं नन्दगोपवजौकसाम् |" (भा. १०.१४.३२) 'असा हा परमानंद स्वरूप श्रीकृष्ण ज्या नंदाचा पुत्र नि गोपांचा मित्र तथा सगळ्या गोपवासीयांचा होऊन राहिला त्यांचे केवढे महद्भाग्य ! खरोखरी ते धन्य होय.' "अगम्य तुझा खेळ न कले अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथे आम्हा कैचें बाळ।।" अगम्य अशा भगवंताच्या खेळाचे मर्म जेथे ब्रह्मादिकांना उलगडता आले नाहीं तेथे आम्हांसारख्यांची मती कुठवर चालावी, त्याला कुठे बळ? असें नाथमहाराज म्हणतात.
भूवैकुंठामध्ये चाललेल्या या स्वर्गीय' वनभोजनाचा उत्सव पाहून स्वर्गस्थ देवतांनाही हेवा वाटला. परमात्म्याची कृष्ण स्वरूपातील बाललीलेचे कौतुक वाटत होते. तसेच आपल्यालाही त्या वनभोजनामध्यें भगवताचे उष्टे प्रसाद म्हणून मिळावे याकरीता त्यांची गुप्तपणे त्या स्थली येण्याची योजना चाललेली. तुकोबा या प्रसंगाचे वर्णन करतात: "काल्याचिये आसे । देव जळी झाले मासे । पुसोनियां हांसे । दिरी सांगातें हात ।। ते घ्यारे सावकाशें । जया फावेल तें तैसें । तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदे ||" : काल्याचा प्रसाद मिळावा म्हणून गोपबालक जेव्हां हात धुण्यास यमुनेत येतील तेव्हा माशांच्या रूपांत असले देव ते उष्टे शिते भक्षण करतील, ही देवांची विनासायास प्रसाद प्राप्त करण्याची युक्ती कृष्णाने तत्क्षणी ओळखली नि सवंगड्यांना हात न धुता तसेच खरकटे हात आपापल्या लंगोटीला पुसायला सांगून देवांची फजीती पहात हसले. ज्याच्या वाट्याला जितके भाग्य लिहिले आहे ते सावकाश घ्यावे, त्याचा स्वस्थपणे उपभोग घ्यावा आणि श्रीहरिच्या प्रेमरसात आनंदान राहावे.
श्रीमद्भागवत माहात्म्यामध्यें असें वर्णन आहे की, देव अमृतकुंभ घेऊन श्रीशुकमुनींकडे येतात नि राजा परीक्षिताला तो कुंभ देवून त्या मोबतल्यात भागवत कथामृताचे दान मागतात. तेव्हा शुकमुनी देवांना "क्व सुधा क्व कथां" : कुठे अमृत कुठे कथा! असें उपहासाने म्हणून संसारांत काच आणि मौल्यवान रत्न यांची तुलना होत नाहीं. असे उत्तर देभून देवांना परतवून लावतात. "श्रीमद्भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभा". तीच गोष्ट नामाची आहे.
मला असें वाटते की, आपल्यासारख्या सामान्य मनुष्याचीही अशी कथा नव्हे काय? अध्यात्मासारखी विद्या ही सुद्धा बसल्या ठिकाणी विनासायास मिळावी म्हणून 'यथाशक्ती" या शब्दाचा विपरीत अर्थ काढून काहींच कष्ट न करता भगवंताची कृपा लाभावी अशी अभिलाषा बाळगतो. अमुक पादुका घरी आले, ध्यानीमनी नसताना कुठलासा प्रसाद मिळाला, अजाणतेपणी तीर्थाटन झाले, इत्यादी. हे सगळे ठिकच आहे.त्यालाही मान्यता आहे. पण यामाध्ये धन्य धन्यता वाटून आपला स्वाध्यायाने आत्मोद्धाराचा प्रयत्न थांबवित तर नाहीं ना? की संतांच्या अथवा कुणा महाराजांच्या नांवाने ' आम्ही संध्या, पूजा इत्यादी करीत नाहीं. आम्हाला ते न करताही कृपा होते, आशीर्वाद मिळतो' असल्या पळवाटा मुद्दाम शोधून स्वस्त रहातात. "ठेविलें अनंते" चा हा विपरीत अर्थ झाला. आणि पुढे त्या सद्वस्तु विषयीची अनन्यता तरी टिकते का? दूध, पाणी, पुष्प, अर्पण करुन देवाचा अनुग्रह प्राप्त व्हावा म्हणून देवांनी जसा शुकमुनींकडे येऊन विनिमय केला त्या धर्तीवर आपण करीत नाहीं ना! त्यासंबंधी भागवतातील प्रत्यक्ष प्रमाण कथा वर संक्षेपाने दिली.
म्हणून सतत नामस्मरण, चिंतन, मनन या गोष्टी संतांनी आजन्म करण्याचा उपदेश केला. ते विहित कर्मच होय.
⭐ काला आणि नाम ⭐
ही शिदोरी किंबहुना काला केवळ अन्नपदार्थांचा होता? ज्याकरीता मनुष्य तर सोडाच, देवांनाही तो येनकेनप्रकारेण पाहिजे होता ? यामध्ये एक गोम अशी आहे की गोपसख्यांना जो काला मिळाला तो अन्नासोबत भगवंताच्या प्रेमाचा नि देवांना प्राप्त करून घ्यायचा होता तो त्यांच्या स्वार्थासाठी. गोपबालकांच्या निस्सीम कृष्णभक्तीचा लवलेश देवांपाशी नव्हता. म्हणून कृष्णाने तो त्यांना मिळू न देण्याची लीला केली.
या प्रसंगावरील नाथ महाराजांनी एका अभंगात अतिमहत्त्वाचा दृष्टांत देऊन "काल्याचे मर्म" सांगून कलियुगातल्या काल्या संबंधी अनिवार्यता दर्शविली आहे. एकोबा म्हणतातः "पूर्वसंचित खाली पत्रावळी । वाढती भक्तिभावाची पुरणपोळी | नामस्मरणाची सुधा पोटी आगळी । तेणें तृप्ती होय सहजी सकळीं ।।" मनुष्याच्या जीवनाची सार्थकता कुठल्याही ऐहिक मौजेत नसून केवळ ईश्वरी कृपमध्येंच आहे. तथापि ती कृपा प्राप्त होण्यासाठी अथवा कृपेचे पात्र होण्याकरीता पूर्वसुकृत असावे लागते. ते सुकृत संचित रुपाने क्रियमाण स्वरूपांत दैवाने (नशीबाने) या जन्मात ओघाने जोडले जाते. ते बरें वा वाईट काहीहीं असूनही, जसें आहे तसे ते स्वीकारून भगवद्भक्तीची कास धरणे ही अतिकर्तव्यता होय. या दैववशात असलेल्या जीवनाला नाथमहाराज 'पूर्वसंचिताची पत्रावळी' म्हणतात. ती पत्रावळ सामान्य जरी असली तरी त्यावर भावभक्तीरुपी गोड पुरणपोळी वाढली की त्याचे महत्त्व वाढिस लागते. ती पुरणपोळी भवनामाची होय. ते नाम गुळाच्या गोडी प्रमाण भरले आहे. ती खाऊन मानवाला सुखाची, तृप्ततेची, तसेंच आत्मानंदाची अनुभूती येते.
बाळगोपाळांना खेळ खेळून भूक लागली, ती नामस्मरणाची, नामसंकीर्तनाची. जीव जसा चौऱ्यांश लक्ष योनी भटकून, थकून मानव वंशात येतो तेव्हा त्याचा क्षीण निवारण्यासाठी परमेश्वराच्या नामाची वटी देणे प्राप्त आहे. ते दिव्य औषध तयार करणारा नि देणारा भगवंताच आहे! कारण तो परम चिकित्सक (१६४) वैद्य आहे. "पोटभर नामस्मरण" ही संज्ञा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज वापरीत. नामाची गोडी लागून ते नाम पोटभर घेतल्यानंतर आत्म तृप्ती होते.
"ऐसें तृप्त जाहले परमानंद। कवळ कवळचे निजछंदे । एका जनार्दनीं अभेदे। सेवूं जाणती ते प्रेमळ ।।" नाथ महाराज म्हणतात. "या काल्याच्या सेवनाने तृप्त होत्साता परमानंद प्राप्त झाला. नामस्मरणरूपी प्रत्येक घासाचे निजछंद म्हणजे कृष्ण कृष्ण' हे स्वर-लयबद्ध नाम घेत त्याच्याशी तादाम्य होऊन तो शुद्ध भक्तीपूर्णज्ञानरूप काला प्रेमानंदाने भक्षिला. "
दुसऱ्या एका अभंगात एकोबा म्हणतात : "अनंत नामाचा हा काला । पुराणे म्हणती पाहू चला || हरिनामाचा कवळु घेतां । तेणें घालो पै सर्वथा ॥" - "हा काला भगवंताच्या अनंत नामांचा आहे. ती नामे नि त्यानुशंगाने त्याचे लीला चरित्र हे पुराणांद्वारें पाहता येईल. हरिनामरुपी घास घेताच जीवाची सर्वार्थाने तृप्त झाली".
श्रीतुकोबा म्हणतात: "आता हेंचि जेवूं । सवें धेऊं सिदोरीं ।। हरिनामाचा खिचडा काला। प्रेमें मोहिला साधनें ।। चवीं चवीं घेऊं घास। ब्रह्मरस आवडी ।। तुका म्हणे गोड लागे। तो तों मागे रसना ॥" या अभंगाचा भावार्थ असा की, या काल्यामधील एक एक घास ब्रह्मरसाने ओथंबलेला आहे कारण त्यात हरिनामाचे मोहन मिसळले आहे. नि त्यामुळे तो अधिक गोड लागून जिव्हां अधिक चटावली, ती नामाला ! "एके ठायीं काला | तुका म्हणे भाविकाला ॥" जसा हा काला एके ठिकाणी केला, म्हणजे गोकुळात , तसा तुम्हीही करा.
समस्त संतांना वर्णन केलेला काला म्हणजे नामस्मरण. नि तो भगवंताने स्वतः प्रदान केला. संत श्रीभानुदास महाराजांच्या अभंगात चरण आहे: " घ्या रे घ्या रे दहीभात । आम्हा देतो पंढरीनाथ ॥" यामध्यें दहीभात म्हणजे अन्नपदार्थ एवढाच अर्थ अपेक्षित नाहीं. तो दहीभात नामचिंतनाचा, नामस्मरणाचा आहे.
ज्या स्तोत्राविषयीं आपण चर्चा करीत आहोत ते "श्रीविष्णुसहस्रनाम भगवंताच्या अनंत गुणांचा, सामर्थ्याचा, ऐश्वर्याचा नामरुपी ब्रह्मरसपूर्ण काला होय!"
अन्नपदार्थ एकत्र करून तयार झालेला हा काला जीभेच्या चवीसाठी मूळीच नाहीं. अध्यात्मात प्रगती साधण्यासाठी उपवासाचे अनन्य महत्त्व आहे. जीभेचे चोचले पूर्णपणे बंद केल्याखेरीज परमार्थामध्यें ऊन्नत्ती नाहीं. "युक्त आहार विहार । नेम इंद्रियासी सार।" असें तुकोबांचे वचन आहे. म्हणून विषय निवृत्ती साधण्यासाठी रसना जिंकणे क्रमप्राप्त आहे. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात - "रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते।" (२:५८) "ब्रह्मानंदाचा अनुभव घेणाऱ्या स्थितप्रज्ञ पुरुषाची विषयांवरील आसक्ती नाहींशी होते. " येथे रस ही संज्ञा स्वाद अथवा रसनेंद्रिय याचे चोचले या दृष्टीने घेतली आहे.
उच्च उदिष्ट प्राप्त करण्यावारीता सामान्य विषयांचा त्याग हाच काल्यामधील उद्देश आहे. तो कसा ? दही, भात, लोणची, फळे, भाज्या, भाकऱ्या, इत्यादी जे जे पदार्थ एकम करून जो खिचडा कोला जातो त्याची निराळी चव न राहता भलतीच चव निर्माण होते. आणि त्याला प्रसादाचे स्वरूप आल्यामुळे तो प्रसाद इंद्रियतृप्ती पूर्तीसाठी न राहता मनावर संस्कार घडण्यास कारणीभूत होतो. या संस्कारामूळे मनःशद्धी होते नि परमेश्वराविषयीं भक्ती निर्माण होते. हिंदीभाषेत एक उक्ती आहे: जैसा अन्न वैसा मन. तो हा काला प्रत्यक्ष भगवंतांनी गोपबालकांना खाऊ घातला आणि संतांनी आपल्याला.
जसा अन्न आणि नामस्मरणरूपी काला याचा भावार्थ आपण पहिला, त्या काल्याचा अजून एके कंगोरा पुढ पाहूया.
⭐ ब्रह्मदेव गर्वहरण- काळ - काला ⭐
देवांनाही परमात्म्याची कृपा प्राप्त होण्याकरीता भाग्य लागते. ही कल्पना आपल्या सामान्य बुद्धीच्या पलिकडे आहे. पण अशी कथा गोकुळात घडली.
श्रीनाथमहाराज आपल्या भागवतटीकाग्रंथात म्हणतात: "त्रिभुवन वैभवाचे मायां । ब्रह्मपदाची समर्थता । तो ब्रह्याही निजस्वार्था । होय गिवसिता हरिचरण।। त्यागोनि ब्रह्मवैभवसंपत्ती । ब्रह्मा बैसोनि एकांतीं । अहर्निशीं हरिचरण चिंती । तरी त्या प्राप्ति सहसा नव्हे || सहसा न पवे हरिचरण। यालागी ब्रह्मा साभिमान । तेणें अभिमानेंचि जाण। नेलीं चोरून गोपाल-वत्सें ॥ तेथें न कष्टतां आपण । न मोडतां कृष्णपण । गोपाल-वत्सें जाहला संपूर्ण । पूर्णत्वें पूर्ण स्वलीला ।। अगाध हरिलाला पूर्ण । पाहतां वेडावलें ब्रह्मपण । तेव्हां सांडोनि पदाभिमान। अनन्य शरण हरिचरणीं ।।" (ए.भा. २ : ७५० - ७५४) : "जो समस्त जगताची उत्पत्ती करणारा पितामह ब्रह्मदेव, ज्याच्या ब्रह्मांडरूपी अंगणात त्रैलोक्याचे वैभव लोळत असते, असा तो ब्रह्मदेवही त्या ब्रह्मलोकीचे वैभव झुगारून स्वसुखार्थ प्राप्तीकरीता एकांतात बसून अहर्निशीं श्रीहरिचरणांचे चिंतन करीत असतो. तथापि त्या चरणांचा सहवास सहजासहजी त्यास लाभत नाहीं. तो परमानंद न मिळाल्याने त्यास गर्व निर्माण झाला आणि त्या अभिमानामुळे किंवा कृष्णलीला अनुभवावी म्हणून यमुनेकाठी खेळायला गेलेल्या गोपबालक आणि चरत असणारे वासरे यांना चोरून आपल्या मायेने गुप्त झाला. कृष्णाने ब्रह्मदेवाने केलेलें हे कृत्य ओळखून आपल्या मायेने त्याच गुप्त झालेल्या गोपाळ आणि वासरांचे रूप धारण करून गोकुळात परत गेले. त्यावेळी भगवंत रुष्ट न होता नि आपले कृष्णपणही न मोडता पूर्वत्वाने ही लीला घडवून आणली." हा या ओवींचा भावार्थ.
भगवंताने आपले (५९१) गोहित म्हणजे गोप-गाईंचे हित करणारे हे नाम साथ केलें.
जो अखिल ब्रह्मांडाचा निर्माता, त्यास गोप आणि गायींचे तसेच रूप धारण करून गोकुळांत वावरण्यास अवघड ते काय? "सर्वं विष्णुमय जगत्" ही वेदवाणीच आहे. श्रीहरिची ही अद्भुत लीला पाहून ब्रह्मदेव खजिल झाला. तेव्हा आपल्या ब्रह्मपदाचा अभिमान सोडून साश्रुनयनांनी तो परमात्मा गोपाल कृष्णाच्या चरणी लीन झाला नि आपल्या चारही मुकुटांच्या अग्रभागाचा स्पर्श त्या चरणकमलांना करीत आनंदाश्रुंनी अभिषेक घातला.
या ब्रह्मदेवगर्वहरण लीलचा आणि काल्याचा संबंध कसा तो पहा :
वनभोजन करताना वासरे वनांत दिसेनाशी हे बाल गोपाळांच्या सांगण्यावरून कृष्ण हातात दहीभाताची उंडी घेवून तसाच वासरांना शोधित हिंडत होता. ती वेळ साधून ब्रह्मदेवाने माया घडवून वासरांसह मुलांना गुप्त करून तो अंतर्धान पावला. तोच "त्रुट्यनेहस्" म्हणजे काळ, जो कमळाच्या पाकळीस सुअीने छिद्र पाडण्यास जितका वेळ लागेल तितक्यातच कमी वेळात ब्रह्मदेव परत व्रजात आला.
तो पर्यंत पृथ्वीवर मानवी एक वर्ष भरण्यास काहीं दिवस शिल्लक होते. त्या वर्षात तिच बालके, वासरे गोकुळात नांदताना पाहून ब्रह्मदेव चक्रावून गेला. कृष्णानेच ती रूपे धारण केल्याचे ब्रह्मदेवाला उमगले आणि त्याचा मनोदय लयास गेला. परंतु भागवतात ही लीला सुद्धा "तन्मातृणांच 'कस्य' च मुदं कर्तुम्" म्हणजे गोपबालकांच्या मातांना आणि 'ब्रह्मदेवालाही' ('क' याचा अर्थ ब्रह्मदेव. वि.स मध्यें ७२८ वे नाम 'क' आहे) आनंद देण्यासाठी कृष्णानेच ही दोन्ही रूपे घेतली. कारण तोच "विश्वकृदीश्वर" (भा. १०:१३:१८) आहे. येथे सहस्रनामातील (४७२) वत्सी म्हणजे वासरांचे, बालकांचे नि प्रजेचे पालन करणारा, तथा (५९३) गोप्ता म्हणजे स्वतःच निर्माण केलेल्या मायेने स्वतःचे स्वरूप झाकून घेणारा आणि रक्षण करणारा अशा या नामांचा भावार्थ ध्यानांत येतो.
ही माया कोणती ? ब्रह्मदेवाने केलेल्या मायेवर कृष्णाने आपली त्याच्या वरचढ माया घडविली. तोच सहस्रांतला (१७०) महामाय:. कृष्ण त्या वेषात राहिला. त्या एक वर्षाच्या लीला नाट्यावरून की काय भगवंताला (४७०) वत्सर: म्हणजे एक वर्ष रूपाने काळ स्वरूपांत असलेला, म्हणून हे नाम योजिले! "ब्रह्मदेवाने आखलेल्या काळावर गोपाळकृष्णाने आपले मोहजाल पसरवून "काला" घडविला".
गोपपुत्रांनी आणलेल्या शिदोऱ्यांचा एकत्र केलेला काला आणि ब्रह्मदेवाच्या 'त्रुट्यनेहस्' या काळावरही ज्याने मात केली, त्याचा 'काला' केला ह्यांत भेद काय? जो स्वयमेव (४१८) काल असून कालातीत आहे, त्याला ब्रह्मदेवाच्या काळाला भ्रमित करणे शक्य नव्हे काय !!
भगवान् गोपाळ कृष्णान या "काळाचा काला करून, जो संसारचक्र फिरवतो असें आपले (२२८) आवर्तन हे नामाभिधान सिद्ध केलें."
⭐ नाम महती ⭐
वनभोजनाच्या निमित्ताने केलेला काला हा संतांच्या भावविश्वातला नामस्मरणरूपी काला असून त्याद्वारें भगवंताच्या प्रेमाने व भक्तीने साधकांचे भरणपोषण होते. हे मागे निवेदन केलें आहे. श्रीतुकोबा म्हणतातः "कंठी धरिला कृष्णमणी। अवघा जनीं प्रकाश। काला वांटू एकमेकां । वैष्णव निका संभ्रम।। वाकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोकां दाखवूं | तुका म्हणे भूमंडळी । आम्हीं बळी वीर गाढे।।" या अभंगाचा भावार्थ असा की, कंठी कृष्णमणी धारण केला म्हणजे मध्यमा वाणीद्वारें सतत कृष्णनामाचा जप सुरू असल्यामुळे त्याच्या प्रभावाने अवघे जग प्रकाशमान भासू लागले. हा प्रकाश ज्ञानाचा, भक्तीचा, भगवद्प्रेमाचा होय. याविषयीं श्रीतुकोबाचेंच चरित्र पाहिले तर या वचनाचा नेमका अर्थ समजू शकतो. 'काला वाटू एकमेका', हा काला नामाचा होय. भगवन्नामाचा प्रसार, त्याचा उद्घोष हे वैष्णवांचे कर्तव्य तथा एका उच्च समारंभासारखे आहे. ब्रह्मलोक इत्यादी जे उत्तम लोक आहेत तिथे स्थित देवांना हा काला दाखवून लहान पोरांसारखे 'टुकटुक' करू! याविषयीं आधी लिहिले आहे. तुकोबा म्हणतात या भूमंडळी आम्ही वैष्णव अत्यंत बलवान् आहोत. कशाच्या जोरावर ? नामस्मरण, नामसंकीर्तनाच्या होय.
भगवन्नाम ही भगवंताची अमूर्त शक्ती त्या भक्तासमवेत नित्य असून भवसागर तारून जाण्याकरीता सक्षम असते. हाच आशय या अभंगातून प्रकट होतो.
श्रीतुकोबा नामसंकीर्तनाचा काला वाटून त्या माध्यमातून वैष्णव पुष्ट होतात असें वर्णन करतात, त्याच प्रकारें भगवच्चिंतनाचा महिमा श्रीएकोबा विशद करताना म्हणतात : "हरे भवभय व्यथा चिंतने। दूर पळती नानाविघ्ने । कली कल्मल बंधने । न बाधते चिंतने ॥ करा करा म्हणोनि लाहो। चिंतनाचा निर्वाहो । काळाचा तो बिहो । दुर पळे चिंतने ।। हीच माझी विनवणी । चिंतन करा रात्रंदिनीं । शरण एका जनार्दनीं। रामनाम चिंतावे ॥" : अनेक प्रकारची विघ्ने कुठल्या एका चिंतनाद्वारें पळत सुटतात तर ते केवळ हरिस्मरणाने, सांसारीक भयापासून कलियुगातील बंधने त्यास बाधा येत नाहीं. म्हणून सज्जन हो त्वरा करा, हरिचिंतनाची कास धरून काळाची भीती दूर होऊन सत्कार्य सिद्धीस जाते.
संत त्यांच्या उपदेशातून लोकांना विनवणी करून त्यांचे हित कशात आहे ते स्पष्ट करून सांगतात. "एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृपे त्याचा नाश झाला ||" नाथमहाराज म्हणतात हरिचे चिंतन रात्रंदिवस करून रामनामाचे अखंड चिंतन करावे. यानामचिंतनाने अथवा नामपाठामुळे काय लाभ होतो? "नामे जोडे ब्रह्मज्ञान । भुक्ती मुक्ती नामे जाण। एका जनार्दनीं सार । ब्रह्मज्ञानाचे हे घर ||" नामसाधनेमुळे ब्रह्मज्ञान प्राप्त होते? होय. येथे कसे, काय, हे प्रश्न अप्रस्तुत आहे, संपूर्ण शरणागती पतकरल्याशिवाय अध्यात्मात एक पाऊल ठेवता येत नाहीं. विकल्पाला येथें स्थान नाहीं.
परंतु याचे आतां आतां होऊन गेलेलें सर्वोत्तम उदाहरण श्रीगोंदवलेकर महाराज हे होय. नामामध्यें भगवंताची अवतारलीला आहे, गुणवर्णन आहे, तत्त्वज्ञान आहे. नामस्मरण, चिंतन, मनन, संकीर्तनाने देहबुद्धी शुद्ध होत. पुढे सद्गुरू म्हणा वा परमेश्वर म्हणा त्याच्या कृपेचा वर्षाव म्हणजे ब्रम्हज्ञान प्राप्ती! मागच्या अभंगामध्ये "हरे भवभय व्यथा चिंतने। दूर पळती नानाविधने ॥" म्हणजेच 'मी'पणाचा लय होतो. तो क्षण आत्मसाक्षात्काराचा होय. तोच "अहं ब्रह्मास्मि" चा बोध. तेव्हां नामचिंतनाने मनुष्यास "हरिनामाचा सुखसुरवाड । ज्याचे मुखीं लागला गोड। त्याचें मजपाशी सरतें' तोंड। मी अखंड त्या जवळी ||" (ए. भा. ११:१२२१) एकोबांच्या भागवतटीकेमधील ही ओवी 'ब्रह्मज्ञानाचे घर' या वचनाचे मर्म सांगणारी आहे. ज्या मनुष्याच्या मुखी हरिनामाचा ऊच्चार होत आहे, त्यास होणारा आनंद त्याच्या मुखाला गोड लागतो नि त्या मानवाचे तोंड नेहमी माझ्याकडे म्हणजे परमेश्वरासन्मुख असते. त्यायोगे परमेश्वर सदैव त्याच्या जवळ असतो. नाम हे ब्रह्मज्ञानाचे सार असून, तेच अंती परमानंदपद लाभून देणारे आहे.
तद्वत विष्णुसहस्रनामामध्ये भगवंताचे एक सहस्र गुणवर्णन करणारी नामें मुमुक्षुंजनांस ब्रह्मानंदापर्यंत घेऊन जाणारे आहे.
"नामे प्राप्त ब्रह्मपद । नामे देह होय गोविंद ॥" असें एकोबा नामाचे महात्म्याचे वर्णन करतात.
लेखाच्या प्रस्तावनेत वनभोजन, ब्रह्मगर्वहरण आणि काला प्रसंगांचा श्रीएकनाथमहाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन या विषयाशी संबंध काय ? तर याचे उत्तर नाथांच्या अभंगाच्या आधारे आपल्या समोर मांडतो. "देवभक्त दोनी करिताती काला। तयाच्या सुखाला वर्णी कवण ॥" भगवंताने आणि त्याच्या सवंगड्यांनी केलेल्या सुखदायक काल्याचे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे?
मला असें वाटते की, "सहस्रनाम चिंतनाचा विषय म्हणजेच हे स्तोत्र भगवंताचे अनंत गुण जे मुनींनी, संतांनी नामांद्वारें वर्णिलेली आहेत, हा सगळा नामावली रुपात कालाच असून, त्या नामावलीतील प्रत्येक नाम हे कवळ होय. तो नामरुपी घास भगवंतानेच आपल्या मुखांत घातला, जेणेकरून आपलाच उद्धार व्हावा!" त्या नामभक्तीमुळे आवडीच्या सद्वस्तुविषयीं गोडी नित्यनुतन पद्धतीने वृद्धिंगत होते. "एका जनार्दनी भक्तीची आवडी | वाढवीत गाडी नित्यनवी ।। पण त्यासाठी अंतःकरणामध्यें अभिमान असता कामा नये. केवळ प्रेम आणि भक्तीनेच त्या नामाची सार्थकता साधता येते.
श्रीएकोबांनी विष्णुसहस्रावर थेट अभंगरचना केल्याचे मला अजून आढळले नाहीं. तथापि केवळ तीन अभंगामध्यें अप्रत्यक्षरित्या मला सहस्रनामाचा उल्लेख सांपडला. त्यानुषंगाने प्रस्तुत अभंगावर निवरण करण्याचा पुढे प्रयत्न केला आहे.
क्रमशः
- अनिकेत घिवलीकर, मुंबई.
Comments
खूप सुंदर 🙏🏻
शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः
🙏 भानुदास एकनाथ 🙏