श्रीज्ञानदेवांचे श्रीविष्णुसहस्रनाम चिंतन : भाग २
{भाग २रा. अंतिम} अभंग-३) कुंचे पताका झळकती टाळ मृदंग वाजती । आनंदें प्रेमें गर्जती भद्रजाती विठ्ठलाचें।। आले हरीचे विनट । वीर विठ्ठलाचे सुमट। भेणें जाहले दिक्पट। पिळती थाट दोषांचे ॥ तुळसीमाला शोभतीं कंठी । गोपीचंदनाच्या उटी । सहस्र विघ्ने लक्ष कोटी | बारा वाट पळताती ॥ सतत कृष्णमूर्ति सांवळी | खेळ ज्याचे हृदयकमळीं | शांति क्षमा तया जवळी। जीवें भावें अनुसरल्या ॥ सहस्र नामांचें हातियार | शंखचक्राचे शृंगार । अति बळ वैराग्याचें थोर । केला मार षड्वर्गां।। ऐसें एकांग वीर। विठ्ठलाचें डिंगर। बाप रखुमादेविवर | तीहीं निर्धारीं जोडिला ।। भावार्थ: हा अभंग "वैष्णववीरांचे पद" या सदरांत मोडणारा आहे. देवांचे भक्त आपत्कालामध्यें प्रसंगाला कसें धीटपणे सामोरे जातात, त्यांची लक्षणे कोणती याविषयीं श्रीज्ञानोबा वर्णन करतात. श्रीपांडुरंगाचे भक्त आपल्या खांद्यावर उंच भगवी पताका घेऊन, टाळ मृदंगाचा नाद घुमवीत आनंदाने, प्रेमाने नामाचा घोष करीतात. त्या श्रीविठ्ठल भक्तीत नटलेले विठ्ठलाच्या वीरांचे आगमन होताच दोषांचे समुह दहा दिशांना पळत सुटले. या वै...