श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १
आपल्या बाल्यावस्थेतल्या अभंगात लिहिताना नामदेवराय म्हणतात : "माता वाट पाहे नामा अजून कां नये । देखोन विठ्ठल काय भुलला तेथें । एसें मज पाहता हेंचि घडे साचें । विठ्ठलीं मन त्याचे गुंतले असें । काय सांगो माय जान देवळासी | जपतो अहर्निशीं विठ्ठलनाम ।।" - नामदेवरायांच्या मातोश्री गोणाई देवळात गेलेल्या नामदेवास बराच उशीर होऊन अजून येत कसा नाहीं म्हणून वाट पहात आहे. तिच्या मनांत असा विचार आला की विठ्ठलाला पाहून तो भुलून त्याच्या रूपाला पाहून तो गुंतून गेला आहे. बायांनो! काय सांगावे तुम्हाला, हा नामदेव सदैव देवळात बसून विठ्ठल विठ्ठल या नामाचा रात्रंदिवस जप करीत असतो. "विठ्ठल विठ्ठल हेचि पैं चिंतन। विटेसहित चरण धरियेले ॥" या नाम प्रेमाचे बाळकडू नामदेवांना वयाच्या पांचव्या वर्षापासून प्राप्त झाले. "पंचवरुषी नामा जाहला। छंद विठूचा लागला ।।" असें चरित्रगान श्रीएकनाथ महाराजांनी केलें आहे.
नामदेवरायांची नामभक्ती ही जन्मजात उत्पन्न झालेली. त्यांच्या अभंगात त्यांनी तसे लिहून ठेवलें आहे "..... शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा । नाममंत्र खुणा वाचुनि पाहे || ऐशी आयुष्य पत्रिका प्रमाण। नामसंकीर्तन नामया वृद्धि।।" : नामभक्तीने परिपूर्ण असे शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा करून नामदेवरायांच्या प्रत्येक रचनेमध्यें त्याचे प्रतिबिंब आपल्याला वाचताना भावते. ऐशी वर्षाच्या आयुष्यांत भगवंताच्या नामसंकीर्तनाद्वरें भगवद्भक्तीचा प्रसार हेच जीवित कार्य असणार असें नामदेवरायांनी म्हटले आहे.
नाममहिमा कथन करताना नामदेवराय म्हणतात, ब्रह्मदेवाने सृष्टिनिर्मिली पण त्यासही नामाची महती कळाली नाहीं. कर्म, धर्म, वर्म सगळे एका नामातच सामाविलेले आहे. नामातच
स्नान, संध्या, वेद असून आचमनाच्याही आधी नामच घेतले जाते.
लग्न असो वा प्रायश्चित वा श्राद्धात "एको विष्णु:" असेच नाम उच्चारावे लागते. "नामें होय गति नामे होय मुक्ती । नामयाचे चित्ती रामनाम ॥"
जन्मजन्मांतरीची पुण्याई एकवटते तेव्हां मुखामध्यें रामनाम येते. त्या परम मंगल शस्त्राने "नामचेनि बळें अडविली साधनें । तोडिली बंधने संसाराची ।।" त्या रामनामाच्या प्रतापाने "समुद्री पाषाण तारीयेले।" अतः "नामा म्हणे असें सांगो आतां किती । नामापाशी मुक्ति उभी असे।।"
जे जे म्हणून पदार्थ आकारास येतात ते नष्ट होणे प्राप्त आहे. मात्र नाम ही अशी वस्तु आहे जी केव्हांही नाश पावणार नाहीं, असें सकल संतजनांनी प्रचितीपूर्वक म्हटले आहे. त्यांच्या वचनाला नामदेवराय प्रमाण मानतात: "नामदेव म्हणे संतांचिया कृपे। माजी नाम सोपे नांदतसे ||" या हरिनामाच्या बळाने अिहलोकी उध्दार निश्चित आहे असें नामदेवराय विश्वासाने सांगतात.
नामदेवराय नाममहती विशाद करताना नामस्मरणाने मनुष्यदेहाचे सार्थक होते हे निरनिराळ्या तऱ्हेने बिंबवतात, त्याच प्रकारे त्यांच्या मूळ कोमल स्वभावानुसार लडिवाळ पद्धतीने भगवंताची स्तुती करताना म्हणतात : अमृताहून गोड। नाम तुझें देवा ॥ सर्वाहून मधूर नामामुळें भगवद्भक्तांचे परमेश्वर कसा सांभाळ करतो याचे वर्णन करताना लिहितात, जळत्या अग्नीच्या कठीण प्रसंगातून पांडव वाचले, हनुमंताला इजा झाली नाहीं, प्रल्हाद तरला, सीतामाई, गोपाळ, बिभिषण यांचे रक्षण झाले अशी भावविभोर अभंगरचना आहे.
"नामाचे चरित्र सदा अति गोड । तीर्थे काय चाड नाममात्रें ॥"कापराचा अग्निशी मेळ झाला की जसा कापूर अग्नीत एकरूप होतो, तद्वत नामाग्निने प्रज्वलित झालेला नरदेह नामातच समरस होतो. मग नाम आणि नामी यात द्वैत न राहता : "नामदेव म्हणे अनामतें नाम । नाना नामभ्रम तेंथे दुजा ||" नाम हे काहीं निराळे नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे. जरी नाम अथवा अक्षर भेदाने ते निराळे दिसले तरी तो भ्रम असून त्यात भिन्नत्व नाहीं.
अशा नामदेवरायांच्या पराकोटीच्या नामस्मरण भक्तीमुळे श्रीपांडुरंग त्यांचे अंकित झाले. नामें पंढरीनाथा भेटविले ॥ अशी अलौकिकता काव्यातून अकराली.
नामदेवराय नामस्मरण भक्तीने काय प्राप्त आहे हे सांगताना म्हणतात: "नामा म्हणे नको उदंड सायास । तोडी भवपाश रामनामें ॥" राम, कृष्ण, अच्युत, अनंत अशी नामे त्वरेनें स्मरण करा म्हणताच पुढल्या चरणांत साही अवधड साधने करण्यापेक्षा एक रामनामाचा जप भवपाश मोडून टाकतो अशी आर्त साद घालतात.
नामदेवरायांची नामस्मरणभक्ती वाढत वाढत भगवंताच्या गुणैश्वर्याचे संकीर्तन करण्यापर्यंत येऊन ठेपली. बालवयात नामदेव जसें विठ्ठलाच्या देवालयांत नामस्मरणकरीत तासंतास बसत असत असा उलेख आहे, त्याप्रमाणे त्यांनी कीर्तन सेवेला नेमकी कधी सुरुवात केली याचा थांग लागत नाहीं. आत्मचरित्रपर अभंगात आई गोणाईंना उद्देशून असलेल्या अभंगात ओइतरता उल्लेख सांपडतो - "टाळ दिंडी घेऊनि नाचतो रंगणी । तेणें माझ्या मनीं सुख वाटे ॥" ही लहानपणीची आठवण ते सांगतात. परंतु कीर्तनाचा स्पष्ट उल्लेख नाही. तथापि, महाराष्ट्र वैष्णव सांप्रदायात कीर्तन परंपरेचे गुरु हे नामदेव महाराज होय. नामभक्तीच्या प्रसाराकरीता, भागवत धर्माचा ध्वज सर्वत्र फडकविण्यासाठी बुवांनी कीर्तनाचे प्रभावीं माध्यम निवडले. "आम्हां कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं मुदीम जोडी ॥" - कीर्तनाद्वारें भगवंताचे नामस्मरण, दिव्यलीला वर्णन करणे हेच जीवितकार्य असून लौकिक व्यवहारात (माझे) मन रमत नाहीं, असें नामदेवराय म्हणतात, त्याचा परिपाक "नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी।।" अशी सद्गुरुकृपेनें व्यापक भूमिकेतून भगवताचे कथागान करीन कीर्तनाव्दारे नामामध्यें तल्लीन होत्साता समाजात ज्ञानदीप प्रज्वलित करण्याचे व्रत नामदेवरायांनी आजन्म घेतले.
परमेश्वराला शरण गेल्याखेरीज शाखत सुखाचा लाभ होणे नाहीं "ऐकता कीर्तन होती जीवन्मुक्त । दाविसी अनंत नाममानें ॥" कीर्तनाच्या श्रवणाने मनुष्य आत्मज्ञानी होऊन संसाराच्या तापत्त्रयापासून विलग होत्साता मुक्तीचा परमानंद भोगतो नि नामचिंतनाने प्रत्यक्ष भगवद्दर्शन घडते. हे नामदेवरायांचे अनुभवाचे वचन आहेत. ज्यांच्या कीर्तनात स्वतः पांडुरंग नाचत असे, त्या नामदेवरायांचे भक्तीऐश्वऱ्याची मोजमाप कुठल्या तऱ्हेने करावी! "कीर्तनाच्या सुख होतो देव। कोणते वैभव वाणी आतां ॥" हे "सुखाचे सुख" त्यांनी लिहून ठेवले आहे. संकीर्तनामुळे मृत्युचेही भय उरत नाहीं आणि भय उरत नाहीं आणि अनायसे नामांत जीव रममाण होतो. नामस्मरण आणि नामसंकीर्तनाचा मेळ आहे तो असा: "करू हरिकथा कीर्तन । तोडूं यमाचें बंधना एवढा प्रताप नामाचा । रीघ नव्हे काळीकाळाचा ।।" असें म्हणत नामदेवराय थेट पंजाबपर्यंत कीर्तन परंपरा घेऊन गेले.
आषाढी आणि कार्तिकी यात्रा म्हणजे वारकऱ्यांसाठी पर्वणी काळ. नामघोष, कीर्तन याने पंढरपूराचे दशदिशा अक्षरश: दुमदुमत विठ्ठलमय झालेलें असतात. अशावेळी नामदेवराय म्हणतात, संत दर्शन तथा आलिंगनाने चित्त शांत होते हे नवल नसून जीवाला ब्रह्मानंदाचा लाभ होणे हे विशेष होय, त्याचे कारण - "आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी । शोभा पांडुरंगी धनवटे ।।"
भक्तीरसांत आकंठ बुडालेले नामदेवरायांचे कोमल हृदय अशावेळी भावूक होते. ते हळुच पांडुरंगाला आपल्या मनीचे गुज निवेदन करताना आर्ततेने सांगतात : "आषाढी कार्तिकी विसरू नका मन । सांगतसे गुज पांडुरंग ।।" नामदेवरायांच्या नामसंकीर्तन भक्तीचे मर्म या चरणांत एकवटलेले दिसते. त्यांची पांडुरंगाशी असलेल्या सख्यभक्तीचा हा परमोच्च आविष्कारच म्हणावा लागेल.
प्रस्तुत विषय नामदेवरायांचा सहस्रनाम चिंतन असला तरी नामस्मरण आणि नामसंकीर्तन याचा उहापोह म्हणजे नमनाला घडाभर तेल असे नसून त्यामागे प्रयोजन त्यांची नाम आणि कीर्तन यावर असलेली संवेदनात्म श्रध्दा. ती त्यांच्याच वचनाद्वारें आपल्याला काहींशी उमगू शकेल आणि पुढच्या विषयाकरीता पार्श्वभूमी तयार होण्यासाठी आवश्यक म्हणून हा खटाटोप. त्यावर माझ्यासारख्या सामान्याने विश्लेषण करावें हे अत्यंत बाळबोधच होय. नामदेवरायांच्या शब्दांना दैवी स्पर्श आहे. त्यामुळे नामदेवरायांच्या अभंगातली वचने जसेच्या तसे घेऊन त्यातला भावार्थ माझ्या अल्पस्वल्प बुद्धीने उलगडण्याचा प्रयत्न हा केवळ त्यांच्या कृपेचा प्रसाद आहे.
मागे उलेख केल्याप्रमाणें वारकरी सांप्रदायांत पंचदशी सिद्धांतामध्यें महाभारतांतर्गत श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र महत्त्वाचे साधन असल्याने प्रत्येक संतांनी या स्तोत्राची उपासना निश्चित केलीं असणार असें त्यांनी केलेल्या अभंगांवरून लक्षांत येते.
"विष्णुसहस्रनाम भगवंताच्या गुणांची नामावलीच आहे. महाभारतामध्यें शांतिपर्वात अर्जुन भगवंतास निवेदन करतो, "न ह्यन्यो वर्तयेन् नाम्नां निरुक्तं त्वामृते प्रभो।।(३४१) की भगवंता तुझ्यावांचून दुसरा कुणी तुझ्या "नामाम् -" "नामवलीचा"
स्पष्टार्थ सांगू शकेल असें मला वाटत नाहीं - ह्यातही नामावली म्हणजे अनेक नामें असा अर्थ आहे. कारण नंतर भगवान् श्रीकृष्णाने त्या निरनिराळ्या नामांचा अर्थ अर्जुनास सांगितला आहे.
"सत्वर सत्वाचे जपती नामावळी । नित्यति आंघोळी घडे रया।। " की, सत्वगुणाचे भाविकजन त्वरेने नामावळीचा जप करतात, ते भगवंताच्या कृपेने नित्य सुस्नात होतात. श्रीतुकोबांचे असे वचत आहे. "धन्य धन्य भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेतां जीं दुबळी । ती आगळीं सदैव ॥" या भूमीची धन्यता आहे की जिथे भगवताची नामावळी प्रकट झाली. ज्यायोगे दीनदुबळे या नामावलीच्या साह्याने भाग्यवंत होत.
श्रीएकनाथ महाराजांनी म्हटले, "सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी।। पातकांची होळी । होत तेगें केली ये ।" ज्याच्या मुखी सतत नामावळी असून त्याची जिव्हां सदैव नामांत रत असते, त्याच्या पातकांची होळी होते.
कर्मयोगी श्री सांवतामाळींनी म्हटले आहे: "सावता म्हणे कांते, जये नामावळी । हृदयकमळी पांडुरंग ॥" , सतत नामावळीचा जप करीत मनांमध्ये पांडुरंगाचे ध्यान करावे असें आपल्या पत्नीला सांगतात.
नित्य नामावळीचा जप करणाऱ्यांना त्या हरिनामस्मरण, नामचिंतनाचे फल ; नामदेवराय सांगतात : "नाम जपे नामावळी। अखंड तप हेंचि सदा काळीं । हरिनामें पिटोनि टाकी। हाचि तरणोपाय सकळांचा ॥"
या निवडक वचनांमध्ये "नामावळी" हा शब्द एकेसारखा आहे, तो मुद्दाम उद्धृत केला. याचे कारण, या नामावळी किंवा नामावली अर्थ दोन अर्थानं होऊ शकतो. पहिला तर्क एकांच नामाचा माळेवर करतात तसा जप किंवा स्मरण. उदा. रामरामरामराम याचा निरंतर जप. किंवा दुसरा तर्क सहस्रनामासारखा भगवंताच्या अनंत गुणांचे दर्शन घडविणारे सहस्र या संखेत एखाद्या वेलीममाणे गुंफलेली "नामवल्ली". प्रस्तुत लेखाचा विषय सहस्रनामचिंतन असल्याने माझ्या दृष्टीला नामावळी" या शब्दाचा अर्थ भगवंताच्या असंख्य नामांची साखळी असा प्रतित होतो. सहस्रनामस्तोत्रासारखा. आणि जर एकच नाम म्हणजेच नामावळी या अर्थाने जरी शब्द घेतला तरी त्या एका नामाचे शंभर अर्थ निघू शकतात. श्रीमद्मध्वाचार्यांनी वचन सांगितले आहे. 'विष्णो सहस्रनामापि निरंतरशतार्थकम् ।" अतः एकानामाचे अनेक अर्थ विस्तार होतात. तीच नामावली. किंवा भगवंताच्या
अनंत लीला वेगवेगळ्या नामांनी वर्णन केल्यामुळे त्यास नामावली म्हणता येथील. नामें भगवत्महात्म्याचे विशेष गुणसंकीर्तन करणारी असून ऋषींनी ती गायिली आहे असें विष्णुसहस्राच्या प्रास्ताविक श्लोकांत म्हटले आहे.
"यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मन: । ऋषिभिः परिगीतानि..."
येथे तात्पर्य अितथाच की 'नामावळी' या शब्दाचा अर्थ एका किंवा अनेक नामांचा जप सतत करणे असा अर्थ संतांना अभिप्रेत असावा.
अशा या भूवैकुंठ पंढरपुरामध्यें भगवंताच्या नामस्मरणात, नामघोषात, नामसंकीर्तनात अखंड तल्लीन झालेल्या विठ्ठलभक्तांची मिरास वैकुंठीच्या सुखापेक्षा अधिक असल्यास आश्चर्य नाहीं. म्हणूनच देवही भूतलावर जन्म घेऊन हरिभक्ती करता. येथील या प्रयत्नांत असतात. नामदेवरायांचे सहस्रनामाविषयी प्रत्यक्ष स्वरूपांत केवळ पांच ते सहा अभंग गाथेमध्यें सांपडतात, अन्य असण्याचा संभव नाकारता येत नाहीं. काहीं ठिकाणी 'सहस्र' असा उल्लेख आला असला तरी संपूर्ण अभंग सहस्रनामाभोवती फिरत नसल्याने स्वतंत्र विश्लेषण न करता विवरणासाठी घेतलोल्या अभंगातच त्याचा समावेश करणे प्राप्त आहे.
- अनिकेत घिवलीकर, मुंबई.

Comments