श्रीगंगामाई आणि माझा अनुभव
देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे।
- श्रीशंकराचार्य
{देवांनाही पूज्य असणाऱ्या हे भगवति गंगे! तुझ्या चंचल लाटांनी तू त्रिभुवनांना तारणारी आहेस.}ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी हा गंगा दशहरा उत्सव गंगेच्या काठी मोठ्या प्रमाणात केला जातो. गंगामैय्या दहा पापांचा नाश करणारी म्हणून तिला दशहरा असें म्हणतात.
हिमालय आणि गंगोत्री ही क्षेत्रे हिदूंसाठी केवळ पर्यटन स्थळ नसून अनादी काळापासून ते आतापर्यंत अविरत वाहणारी सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि धार्मिक दैवी संपत्ती आहे.
श्रीभगवद्गीतेत या दोन्हीमध्ये परमेश्वरी अंश असल्याची ग्वाही स्वतः भगवंतांनी दिली आहे. स्थावराणां हिमालयः। -स्थिर वस्तूपैकी हिमालय मी आहे आणि स्त्रोतसामस्मि जाह्नवी। - नद्यांमध्यें गंगा मी आहे.
सश्रद्ध अंतःकरणाने गंगेच्या सान्निध्यात काहीं अनुभव आल्याखेरिज रहात नाहीं.तो अनुभव सुप्तही असेल.तिच्या संथ अथवा खळखळणाऱ्या जलौघात जी स्पंदने जाणवतात ती शब्दांत मांडणे कदाचित कठीण.त्यासाठी श्रीशंकराचार्य आणि जगन्नाथ पंडितच समर्थ होय.
मी गंगे मातेचे पहिले दर्शन घेतले ते तिच्या चरणांचे कोलकाता येथील दक्षिणेश्वर कालीदेवीच्या मंदिराकाठी.ते विस्तिर्ण पात्र पाहून काहीं विचार येण्या आधीच नम्रतेने हात जोडले गेले.
त्यानंतर अनेक वर्षांनी हरिद्वारला जाण्याचा योग आला. २०१६च्या डिसेंबरमध्यें थंडीतही गंगा स्नानाचा आनंद उर्जा देणारा होता.
गंगा पापक्षालन करते, पापं धुवायला गंगेत जा .. ही वाक्ये सर्रास कुणाच्याही तोंडी आपण ऐकून त्यास थट्टेची नि अंधश्रद्धेची जोड देण्याचा प्रयत्न केला जातो. गंगेच्या पाण्यात अनेक बॅक्टेरिया घटक असल्यानें पाण्याची शुद्धता राखण्यास हिताचे ठरते. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तें सिद्धही केले आहे.बरं असं सांगितलं तरी तेथे तुच्छतेने पाहाणें "इंग्रजाळलेल्यांना" भूषण वाटते.असो.
पण मला अनुभव आला तो माझ्यासाठी नवीन आणि आश्चर्यकारक होता.
हरिद्वारला रात्रीच्या निरव शांततेत खळाळत चाललेल्या गंगेच्या प्रवाह लगत बसून एकाग्र दृष्टी ठेवता मनांत त्या वेळी कुठलेहीं कुविचार आले नाहींत.तिच्या प्रवाहाबरोबर मन निर्मळ होत असल्याचे लक्षात येत होते. हे करायलाही कुठला प्रयास झाला नाहीं.अपोआप झाल्यासारखे होते. असा हा पहिलाच अनुभव असल्यानें आस्था अजूनच दृढ झाली.
तरङ्ग प्रोत्तुंगा दुरितभयभंगाय भवताम्॥ ह्याचा अक्षरशः अनुभव आला.
तेव्हां असं लक्षात आलं कीं गंगा मलिन देहच स्वच्छ करीनाहींत ,तर मनही विशुद्ध करणारी जननी आहे. पाप धुवून काढते म्हणजे काय ते त्या दिवशी उमजले.
२०१७ साली मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात श्रीदत्त जयंतीला पहिल्यांदा काशीक्षेत्री गेलो.त्या भूमीवर पाउल ठेवताच श्रद्धेनें मन उचंबळून आलं.
मणिकर्णिका घाटावर दत्त पादुंकांचे दर्शन घ्याचे ठरवून वाराणसीच्या गल्ल्या पार करत गंगेच्या दिशेने चालता चालता एकदम समोर गंगामैय्याचे पवित्र पात्र दिसले.मन आनंदाने प्रफुल्लित झालें.झारीमध्यें गंगाजळ घेऊन दत्तपादुंकांवर आणि नंतर श्रीविश्वेश्वराला अभिषेक केला.
काशीच्या प्रत्येक घाटाचे निराळे महत्त्व आहे. तिथल्या स्नानाचा अनुभव सुखदायीच.आणि त्यासाठी एक स्वतंत्र लेखही होईल.
त्यानंतर २०१९ मध्यें गणपती उत्सवात पुन्हा वाराणसीला सतारीच्या कार्यक्रमासाठी जाण्याचा योग आला.
पहाटे गंगेकिनारी सतारवादक करणं हा अविस्मरणीय अनुभव होता. तेव्हा गंगेचे खवळलेले रूपही पाहिले!त्यावेळी वेगाने वाहणाऱ्या तिच्या प्रवाहात स्नान करणे शक्य नव्हते,तरी मी आणि राजीवने कसे बसे प्रोक्षण केल्यासारखे पाणी अंगावर घेतले..पुनः योग कधी येईल...माहित नाहीं...
गंगेत झालेले पराकोटीचे प्रदूषण हा एक भयंकर विषय आहे. स्वार्थी हेतुने आणि त्याचा निसर्गावर काय परिणाम होईल याचा अजिबात विचार न करता कारखान्यातले घातक रसायन आणि शहरांची संपूर्ण घाण नदीत सोडून जी गंगा हरिद्वारपर्यंत अमृततुल्य असते ती पुढें बिठूर, कानपूर, काशी, गाझीपूर, पटणा, गंगासागरात जाई तोवर ती विषमय झालेली असते.
कोरोना महामारी काळात नदी आणि एकंदरीत निसर्गाचे आश्चर्यकारक निर्मळ रुप आपण पाहिले.आश्चर्यकारक एवढ्यासाठी कीं आपणंच केलेंली निसर्गाची दयनीय अवस्था त्याच निसर्गाने पूर्वपदावर आणली! नद्यांमधले पाणी स्वच्छ झालें,हवा प्रदुषणातून काहीं अंशी मुक्त झालीं. पण हे टिकवून ठेवायचं की "ये रे माझ्या मागल्या!"
आपण हिंदु ज्या नदीला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानतो,देवांनाही पूज्य असणारी, त्यावर वसलेल्या गांवांची जीवनदायिनी, तिचे हें निर्दयी शोषण करुन आपलीच अपरिमीत हानी कसे करुन घेतो!
गंगेप्रमाणे यमुना,गोदावरी,नर्मदा,अशा मोठ्या नद्यांची हीच व्यथा आहे. कांही नद्यांचे पूर्ण पाणी आटून केवळ वाळवंट राहून ते दृश्य भीषण आहे.
तथापि काहीं वर्षात वाराणसी क्षेत्रात व इतर ठिकाणी गंगा स्वच्छतेची मोहीम कांहीं टक्के फलद्रुप होताना मी स्वतः पाहिले.शासनाच्या प्रयत्नांना सकल प्रजेचे पूर्ण सहकार्य पाहिजेच,तरच पुढची पिढी खऱ्या अर्थाने गंगामहती गाऊ शकेल.नाहींतर ती आपल्याला क्षमा करणार नाहीं.
गंगा मातेची महानता वर्णन करावयाची तर भारतातल्या मोठ्या नदीला 'गंगा'असेंच संबोधिले जाते. यातच गंगा महात्म्य सामावले आहे.
ज्या महान् नदी तीरी ऋषी,आचार्यादी संतांनी आपल्या अमुल्य जीवनाचा कालखंड समर्पण केला त्या गंगामैय्याच्या दर्शनाचा योग पुन्हा लवकर यावा अशी प्रार्थना करतो.
भगवान् विष्णुच्या चरणांतून गंगा प्रकट होते अशी कथा आहे. श्रीतुकोबांनी गंगा आणि विठ्ठलाचे चरणकमल यावर श्लेषात्मक "चरण" एका अभंगात छान निवेदिला आहे
तुका म्हणे गंगे वास । बहु त्या आस स्थळाची॥
✍ अनिकेत घिवलीकर, मुंबई. २०१९

Comments