श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीमोहिनी अवतार
भक्ताचिया रक्षणा। नारी झालास नारायणा।
राहू-केतू सुधापाना। करूं पाहती देवांसह ॥
तेव्हां धरुनी अवतार। वधिला त्वां दुष्टासुरा।
तुला माझा नमस्कार। वारंवार असो हा॥
- श्रीदासगणुमहाराजकृत श्रीमोहिनीराज स्तोत्र
श्रीमद्भागवतामध्यें समुद्रमंथनाची कथा मोठ्या अद्भुत तथा भगवंताच्या रसपूर्ण लीलेने वर्णिली आहे. त्या एका कथेमध्यें परमेश्वराचे कूर्म, धन्वंतरी आणि मोहिनी हे प्रत्यक्ष अवतार, तसेंच रज्जू झालेला वासुकी सर्प, मंथनोद्भव ऐरावत, उच्चैश्रवादी भूतमात्रांत अंशाशंत्मरित्या भगवंत प्रविष्ट झालें. सगळ्या वस्तूंत जो व्यापून रहातो म्हणून त्यास (४६७) व्यापिन् असें म्हटले गेलें. समुद्रमंथनाचा मूळ उद्देश सत्त्वगुणांच्या वृद्धीसाठी होता हे कथारंभी देवादिकांनी श्रीविष्णुला केलेंल्या प्रार्थनेवरुन दिसतो. त्यातील भागवत पुराणात श्रीहरीने देवांना केलेंल्या उपदेशात मला भावलेलें दोन श्लोक मुद्दाम उधृत करतो ;
यत दानवदैतेयैस्तावत् सन्धिर्विधीयताम् ।
कालेनुगृहीतैस्तैर्यावद् वो भव आत्मन: ॥
अरयोऽपि हि सन्धेया: सति कार्यार्थगौरवे ।
अहिमूषिकवद् देवा ह्यर्थस्य पदवीं गतै: ॥ ( ८:६:१९,२०)
प्रतिकूल काळामध्यें सत्त्वगुणी लोकांनीही शत्रूंसमवेत कसें वागले पाहिजे याचा वस्तुपाठ भगवंताने घालून दिला आहे. ते म्हणतात, "देवांनो, तुम्ही दैत्यांकडे जाऊन तुमचा उत्कर्षकाळ येईपर्यंत त्यांच्याशी सोख्यपूर्ण संधी करा, चांगले संबंध प्रस्थापित करा, सध्या काळ त्याच्या बाजूनी आहे.शत्रूंबरोबर मैत्री करून एकदाका आपला कार्यभाग उरकला की सर्प-मूषकाप्रमाणें त्यांचा वध करा!"
छत्रपती श्रीशिवाजी महाराज किंवा क्रांतिकारकांनी अगदी हिच कूटनीती अवलंबित!! अस्तु.
समुद्रमंथनाची सज्जता झाली, देव दानवदैत्यांनी (११९) अमृत प्राप्तीकरीता प्रचंड उद्योग आरंभिला. कामधेनू, ऐरावत, वैजयंती, पारिजात इत्यादी रत्ने उत्पन्न झाली व पुढे भगवंताचा बारावा अवतार वैद्यकशास्त्रप्रवर्तक धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाला. तो अमृतकलश पाहताच दानवांनी त्याच्यापासून तो हिसकाविला.दानवांपासून त्याचे रक्षण व्हावें म्हणून भगवंत अद्भुत सुंदर स्त्रीरुपाने प्रकट होऊन तो अमृतकुंभ मोठ्या चातुर्याने आपल्या हाती घेतला. तो हा "श्रीमोहिनी अवतार" . परमेश्वराने मायावी लोकांवर आपल्या मायेचे आवरण घालीत साकारलेली लीला म्हणजेच (१७०) महामायः हे नाम होय. आणि राक्षसादी दैत्यांपासून अमृताचे रक्षण केल्यामुळे त्यास (५०४) अमृतपः हे नामाभिधान प्राप्त झालें व मिळालेली वस्तु आपल्याकडे सुरक्षित ठेवून देवांचे कल्याण करण्यासाठी तो (५९९) क्षेमकृत् झाला.आपल्या मायाशक्तिने आत्मज्ञानाची जागृती होऊ न देता दैत्यांना ग्लानीत ठेवले म्हणूनच तो (४६५) स्वापनः म्हणून ओळखला जातो.
सहस्त्रनामांतला ४९वा संपूर्ण श्लोकातील दहा नामें मोहिनी अवतार महिमा सांगणारी आहेत.
सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोष सुखदः सुहृत्।
मनोहरो जितक्रोधो वीरबाहुविदारणः॥
(४५५) सुव्रतः - समुद्रमंथन हे व्रतासारखे महाकार्य होते. अमृतप्राप्तीकरीता किती काळ जाणार हे देव तथा दानवांनाही ठाऊक नव्हते. शक्तीमर्यादा संपली तरी मंथन थांबवू नयें अशी भगवद्वाणी असून तसेंच आचरून आवश्यकतेनुसार भगवंताने त्यात सहाय्यही केलें. तेव्हा सुव्रत हे नाम या अवतारलीलेसंबंधी लागू होते.
(४५६) सुमुखः - श्रीविष्णुने आपल्या मायेने अवर्णनीय असें स्त्रीरूप धारण करुन मोहिनी वेषात प्रकट झाले. भागवतात त्या लोभस, अद्भूत रुपाचे वर्णन - "सुकपोलोन्तसाननम्" म्हणजे "गोंडस गालांचे आणि उंच नाकाचे" सुरेख मुखमंडल होते असें केलें आहे .
त्याव्यतिरिक्त तिचे हावभाव, चालणे, नेत्रकटाक्ष इत्यादी अतिशय आकर्षक होते म्हणूनच त्या स्वरुपांस (९४४) सुवीर हे नाम यथायोग्य होय.ती सौंदर्यमूर्ती नानाविध अलंकाराने अंकित असल्याचा उल्लेख ग्रथित केला आहे. त्याला साजेशी नामें स्तोत्रांत सापडतात. (५४१) कनकाङगदा, (९४५) रुचिराङगदः असें बाहुभूषणाने युक्त तसेंच कानामध्यें कुंडले धारण केली असल्यानें (९०७) कुण्लिन् इत्यादी अशी नामें शोभतात.
(४५७) सूक्ष्म: या मोहिनी अवताराचे मर्म केवळ देवांना माहित होतें.दैत्यांच्या इंद्रियमनबुद्धिच्या पलीकडची गोष्ट असल्याने तो अमृतकुंभ समुद्रातून बाहेर येऊन देव अमृतप्राशनकरेपर्यंत त्याविषयीं ते अगदीच अनभिज्ञ राहिले.म्हणून ही लीला सूक्ष्म समजली जाते.
(४५८) सुघोष: घोष म्हणजे शब्दोच्चार.जो समोरच्यास आकर्षित करुन घेतो तो सुघोष.दानवांनी हिसकावून घेतलेला अमृतकुंभ गोडीगुलाबीनेच परत मिळवावा लागेल यास्तव मोहिनी स्वरूपांतील भगवंताने त्यांच्याशी अत्यंत मधुर स्वरांत थट्टामस्करी करीत, ती सांगेल त्याप्रमाणें अमृताची वाटणी दैत्यांकडून मान्य करून आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो कुंभ तिचे स्वाधीन केला.
(४५९) सुखद: अतिशय शिताफीने मोहिनीने देवांना अमृतपान करविले आणि असूरांना त्यापासून दूर ठेवलें. "सुखद" हे नाम तसेंच आहे, जो जनांस सुखवितो किंवा सुखाचा विच्छेद करतो.
(४६०) सुहृद: सदैव परोपकार करणें हा ज्याचा सवभाव तो सुहृद.समुद्रमंथनाचा भगवंतास काय लाभ व्हायचा होता! जो स्वतःच (४९) अमरप्रभु आहे त्याला अमृतासारख्या द्रव्याची आवश्यकता नसून त्या लीलेमागे देवांना संकटमुक्त करणें हा हेतु होता.मंदरपर्वत फिरविण्यासाठी आपण दोरी म्हणून मदत करावीं यास्तव वासुकी सर्पाला देवदानवांनी विचारलें तेव्हा त्यासही अमृताचा काहीं भाग देण्याच्या वचनानंतर तो सहाय्यास तयार झाला.पण भगवान् मात्र अलिप्त.
(४६१) मनोहर: मन हरण करणारा तो मनोहर.मोहिनीराजाचे ते अनुपम रुप न्याहाळताच दैत्याची कामवासना उफाळून आली आणि तिस ते भुलले.पुढें भगवान् श्रीमहादेवाने नारायणाची ही लीला ऐकली तेव्हा ते मोहिनी रुप पाहण्याची इच्छा झाली.श्रीविष्णूंनी ते मनमोहक सौंदर्य पुनः प्रकट करताच शंकरही पूर्ण मोहवश झालेलें. (६१५,६१६) स्वक्ष, स्वड़्ग म्हणजे सुंदर डोळे नि अवयव ही दोन नामेंही यासंबंधी संयुक्त आहेत.
(९१५) पेशलः म्हणजे ज्याचे हावभाव, चालणे, बोलणे, शरीर सर्व हवेहवेसे वाटणारे असा या नामाचा भावर्थ प्रस्तुत अवताराशी जुळणारा आहे.
(४६२) जितक्रोध: परमेश्वर अत्यंत मायाळू असल्याने कुणावर क्रोधित होत नाहीं. दुष्टांच्या वधामागेही त्याचे अंतःकरण अपार करुणेने भरलेले असते.म्हणून तो "जितक्रोध" होय.मोहिनीरुपधारी नारायणानेही दैत्यदानवांचा देवांप्रती असलेला क्रोध आकृष्ट करून घेतला.ते दैत्य मोहिनीच्या सौंदर्याने इतके मोहित झाले की त्यांनी स्वतःच आम्ही दानव व देव कश्यपपुत्र असून या अमृतप्राप्तीकरीता अथक परिश्रम घेत आहोत.तेव्हा आम्हा परस्परांमध्यें लढा न होता सगळ्यांना अमृत मिळावे, अशी भाषा बोलू लागले! हा मोहिनीचा प्रभावच.
(४६३) वीरबाहू: देव-दानव समोरासमोर बसले आणि मोहिनी ते अमृत असूरांना वगळून देवांनाच देताहे हे राहूने पाहिले आणि तो देववेषांत येऊन त्यांच्या पंक्तित बसला.मोहिनीने ते अमृत वाढले, ते तो राहू प्राशन करणार तोच सूर्यचंद्राने त्याला ओळखून विष्णुला सुचविलें.काहीं निमिषमात्रांत आपल्या "बाहू पराक्रमाने" आपल्या (४१७) सुदर्शन नामक शस्त्राने त्याचा शिरच्छेद केला.म्हणून वीरबाहू तसेंच चक्र धरणारा म्हणून (९९५) चक्रिन् नाम प्राप्त झाले.
(४६४) विदारण: मोहिनीस्वरूपांतल्या श्रीनारायणाने क्षणार्धात त्या कपटी राहूचे शिर धडा वेगळे करुन विदीर्ण केलें. "विदारण" हे नाम भगवंताने दुष्टांचे निर्दाळण करण्याकरीता अनेकदा सार्थ करून दाखविले नि अनेक अवतार महात्म्यांत त्याचा अंतर्भाव अवश्य होतो हे पुराणप्रसिद्ध आहेच.
परमेश्वराची लीला किंवा माया विद्वानांच्याही बुद्धीला भोवऱ्याप्रमाणें फिरवून चक्रावून सोडणारी असून भगवान् (८३२) अचिन्त्य नि (५४४) गहन आहे.येथें तर्काचे काम नसून भक्तिमय यथार्थ ज्ञानाद्वारेंच त्याचे स्वरुप तथा कार्य जाणता येण्याचा संभव असल्याने तो (४९७) ज्ञानगम्यः असा (७३६) भक्तवत्सल होय.
श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्रामध्यें मोहिनी अवताराशी संलग्न अजून काहीं नामांचे भावार्थ भाविकांच्या दृष्टीस पडणे संभव आहे.परंतु कुठेतरी पुनरावृत्ती होऊन त्याचा दोष लागण्याचा संभव असल्याने येथें मर्यादा घालतो.
- अनिकेत घिवलीकर, मुंबई.

Comments