श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती : अंतिम भाग.
ज्ञान, कर्म तथा भक्तिमार्ग हें काही वेगळे काढता येत नाहींत. परंतु हा विषय येथें चर्चिला जाणें प्रस्तुत नव्हे. या एका विष्णुसहस्रनामस्तोत्राद्वरें अनायसें नवविधाभक्ती घडते. 'कुणी पठण करीत असेल अथवा ध्वनिमुद्रण लावले असेल तर भाविकाची श्रवणभक्ती साधते. जो स्तोत्र म्हणतो त्याची कीर्तनभक्ती होते. असंख्यलोक नित्य सहस्रनामाची आवर्तने करणारी आहेत, त्याची नामस्मरणभक्ती अखंड सुरू असते. आपल्या सद्गुरूंच्या चरणांशी किंवा देवालयात बसून सहस्राचा पाठ त्यांना समर्पित करीत तो पादसेवनभक्ती करतो. कुणी तुळशीदल, बिल्वदल, पुष्पांनी अथवा यज्ञात आहुतीद्वारें एकेका नामोच्चाराने भगवंताची पूजा करतो त्याची अर्चनभक्ती होते. प्रत्येक नामाआधी प्रणवोच्चार करून शेवटी नमः असें सहस्रवेळा नमस्कार करणे ही वंदनभक्ती. केव्हांही स्तोत्र पठण हे नित्य सेवेचे व्रत म्हणून आचरणारे दास्यभक्तीने आणि आपल्या आराध्यापासून कधीच दूर न होणारे साधक या स्तोत्राच्या साह्याने सख्यभक्तीच आचरीत असतात. आठही भक्ती प्रकार जेथे एकवटली जाते तेव्हा विनासायास होणाऱ्या सहस्रनामाच्या आवर्तनाला आत्मनिवेदनभक्तीच म्हणावी.'
१} श्रवणभक्ती:- श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीदासबोधामध्यें पूर्ण चौथा दशक नवविधाभक्ती साठी योजिला. श्रवणाचे माहात्म्य वर्णन करताना सुरुवातीस ते म्हणतात - "प्रथम भजन असें जाण। हरिकथा पुराण श्रवण। नाना अध्यात्मनिरुपण । ऐकत जावें ।।" देवकार्यामध्यें भगवंताचे सगुण चरित्र, अवतार कथा, पराक्रम गाथा नित्य ऐकावीं. ज्यायोगे परमेश्वराविषयीं श्रद्धा उत्पन्न होईल. विवेकी बुद्धीच्या सहाय्याने "उदंडाचे उदंड ऐकावे ।" हेही समर्थानी सांगून ठेवले आहे. आणि या श्रवणाचे पर्यवसान भगवंताच्या कीर्ती गायनामध्यें होते. म्हणजेच कीर्तन होय. असें मननयुक्त श्रवण। करितां वोसंडे हर्षपूर्ण । तेणें हर्षे हरिकीर्तन । करी आपण स्वानंदे ।। (ए.भा. २ : ५३६) विष्णुसहस्रनामांत भगवंताची श्रवणविषयक विभूती दर्शवणारी नामें तथा मोजक्या शब्दांत त्याचा भावार्थ मांडतो.
(११८) शुचिश्रवा : ज्याचे नाम श्रवणास अत्यंत पवित्र असा. भगवंताची अनंत नामें असून त्यातल्या कुठल्याही नामोच्चाराने भक्ताचे कानच नव्हे तर अंतर्मनही शुद्ध होऊन जाते.
(१४३) भोक्ता : भक्तांनी केलेल्या स्तुतीचा भोग / आस्वाद घेणारा.
(२८०) मंत्र : भक्ताने केलेल्या वेदऋचा, पुराण, स्तोत्रे जो श्रवण करतो.
(४९७) ज्ञानगम्य: ज्ञानाने ज्याला जाणता येते, म्हणजे श्रवणाने सुद्धा असाही एका अर्थ.
(६८०) स्वव्यप्रिय: स्वतःची स्तुति ज्याला आवडते, म्हणजेच भगवंत श्रवण प्रिय आहे.
(६८८) पुण्यकीर्ति: ज्याची पराक्रमी चरित्र कीर्ति ऐकण्यास पवित्र.
(७५२) सुमेधाः ज्याची धारण शक्ती उदंड आहे. असंख्य संतांनी असंख्य पद्धतीने ज्याची कीर्ती गायली, ती सर्व तो स्वतःमध्यें सांभाळतो.
(८१७) सुलभः साध्या भजनाद्वारेंही जो संतुष्ट होतो असा.
(८७८) सुरुचि : भगवंताची लीला श्रवण करण्यास अत्यंत सोपी असा.
(९१२) शब्दसह : शब्दांच्या पलीकडे असूनही केलेली स्तुती ज्याला मानवते अर्थात श्रवण करतो तो (९२२) पुण्यश्रवण [कीर्तन:] यातला पुण्यश्रवण पद म्हणजे ज्याच्या लीलांचे, चरित्राचे श्रवण पुण्यकारक आहे असा. जसे की फलश्रुतीमध्यें लिहिले आहे, "य इदं श्रृणुयान्नित्यं"... तस्य मानवः नाशुभं प्राप्नुयात् ।.
अशीही विष्णुसहस्रनामांतली श्रवणभक्ती.
२} कीर्तनभक्ती: "रंगी रंगे नारायण। उभा करितों कीर्तन || हातीं घेउनियां वीणा । कंठीं राहे नारायण॥ तुका म्हणे देवा । देईं कीर्तनाचा हेवा ।।" तुकोबा या अभंगात ते हाती वीणा घेवून कीर्तनास उभे राहिले की स्वतः भगवंत त्याचे चरित्र गाऊन घेतो" असा भावार्थ प्रकट करतात. देवाला कीर्तन अतिशय प्रिय असून ते नित्य करावे असें श्रीसमर्थ म्हणतात - सदासर्वदा हरिकीर्तन । ब्रह्मसुत करी आपण । तेणें नारद तोचि नारायण । बोलिजेत आहे ।। कीर्तन करणाराच नारायण म्हणून नारदांचा गौरव केला आहे. त्या भगवंताची कीर्तन भक्तीशी निगडी नामे पाहू.
(१८१) महास्वनः स्वन म्हणजे शब्द वा ध्वनी. वेद ज्याने गाईले वा प्रकट
केलें असा. भगवंतासाठी जो वेदांचे पठण करतो.
(१८८) गोविदांपति : उत्कृष्ट वाणी असणारा. आर्ततेने देवांची स्तुती करणाऱ्याची कीर्तनभक्ती.
(२१७) वाचस्पति (उदारधी) : वाणीचा स्वामी. ज्यावर सरस्वती प्रसन्न त्याचे कीर्तनही उत्कृष्ट.
(४५६) सुमुख: ज्याचे दिसणे तथा बोलणे सुंदर असा.
(१८७) गोविंद: आपल्या बोलण्याने ओळखला जातो.
(५७४) त्रिसाम: तीन सामांचे परमेश्वरासमोर जो गायन करतो.
(५७५) सामगः भगवान स्वतः सामवेदाचे गान करतो नि भक्तांना करावयास लावणारा.
(६७९ - ६८३) स्तव्य, स्तवप्रिय, स्तोत्रं, स्तुति, स्तोता - ज्याची स्तुती केली जाण्यास योग्य, स्वतः स्तुती ज्याला आवडते, ज्या सहाय्याने परमेशाची स्तुती केली जाते, स्तवनाची क्रिया म्हणजेच स्तुति, स्तवन करणारा.
या सगळ्याचे कारण आणि कारक भगवंताच होय. (६८८) पुण्यकीर्ती: पुण्यस्वरूप अशी लीला. (८१७) सुलभ: कीर्तनाने जो सुलभतेने प्राप्त होणारा.
(८४८) कथितः ज्याचे सामर्थ्य विद्वानांकडून कथन केले जाते असा. श्रीव्यास हे श्रीविष्णुचे अंशावतार आहेत आणि ते नित्य भगवंताचीच स्तुती गात असतात.
(९२२) पुण्य(श्रवण) कीर्तन: ज्याच्या लीलांचे वर्णन पुण्यकारक आहे. (८०२) सर्ववागीश्वरेश्वर - वाणीचा स्वामी. (८४४) स्वास्य - ज्याच्या सुंदर मुखातून वेदवाणी प्रकट झाली असा, पुरुषार्थ उपदेशिणारा (९८८) सामगायन: सामवेद गायन करणारा. (३१९) प्रथित: ज्याची कीर्ती सर्वत्र गाजते.
फलश्रुतीत "इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः। असेंच म्हटले आहे.
अशीही कीर्तनभक्ती सदृश्य नामें आणि त्याचे उच्चार करणारा भक्त दोन्ही भगवत्स्वरूप कीर्तनभक्ती या प्रकारात समाविष्टफलश्रुतीत
३} नामस्मरणभक्ती:- विष्णुसहस्रनाम स्तोत्र हे संपूर्णतः नामस्मरण वा नामभक्तीचा महार्णव आहे. तेव्हा त्यातले प्रत्यक नाम भगवंताच्या विभूतीतत्वाने मंत्रस्वरूपान विद्यमान असून अमुक काहीं नामांची निराळी यादी देणे शक्य नाहीं. जसे श्रीसमर्थ म्हणतात "सहस्रनामांमध्ये कोणी एक । म्हणतां होतसें सार्थक। नामस्मरता पुण्यश्लोक | होभिजे स्वयं ॥ (दा. ४ :३:२०) की, सहस्रनामातल्या कोणत्याही एका नामाचा जप केल्यास मनुष्याचे कोटकल्याण, अगदी तो प्रातःस्मरण होईल. अशी सिद्धी आहे. श्रीमद्भागवतामध्यें अकराव्या स्कंधांत पांचव्या अध्यायांत कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगांत कुठल्या नामांनी परमेश्वराचे स्मरण, पूजन केलें जाते अशा काहीं नामांची सूची दिली आहे. त्यातले बहुतांशी नामें सहस्रनामात विद्यमान आहेत. प्रास्ताविक श्लोकांत भीमाचार्यांनी "यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मन । ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ॥" या श्लोकाला दुजोरा देणारे आहे असें ध्यानांत आले .की, भगवंताची ही नामें विशेष गुणैश्वर्य सांगणारी असून पूर्वी ती ऋद्धींनी वेळोवेळी गायिली आहेत.
सहस्रनामांत आलेल्या प्रत्येक युगातली नामावली सांगून कलियुगांतल्या नाममहात्म्यासंबंधी विवरण करतो.
★ कृतयुग : "हंसः सुपर्ण वैकुण्ठी, धर्मो योणेश्वरोऽमल:। ईश्वरः पुरुषोऽव्यक्त: परमात्मेति गीयते ॥
सहस्रनामस्तोमात आलेली नामे -
(१९१) हंस : हंसरूपाने अवतार धारण करणारा. सनकादिकांना या अवतारांत उपदेश केला.
(१९२) सुपर्णा : सुंदर पंख असलेला गरुड. हे परमेश्वराचेच स्वरूप.
(४०५) वैकुण्ठ: वैकुंठ लोकीचा स्वामी, बंधने दूर सारणारा.
(४०३) धर्म - कर्तव्याचे मुर्तस्वरूप.
योगेश्वर: सहस्रनामांत योगेश्वर असें थेट नाम नसले तरी (८४९)योगी, (८५०)योगीश अशी नामे आहेत. ज्याचा अर्थ योगविद्येचा स्वामी असा आहे.
(६४) ईश्वर: सर्वसत्ताधिश, सामर्थ्यवान्.
(१४) पुरुष: शरीरांमध्यें ज्याचे अस्तित्व आहे.
(७२२) अव्यक्त: प्रकट नसणारा.
(११) परमात्मा: प्रत्येक वस्तुमानांत जो भरून आहे असा.
★ त्रेतायुग : "विष्णुर्यज्ञ: प्रश्निगर्भः सर्वदेव उरुक्रमः । वृषाकपिर्जयन्तश्च ऊरुगाय इतिर्यते ॥
सहस्रनामांत आलेली नामे -
(२) विष्णु: सर्वव्यापी
(४४५) यज्ञ : यज्ञ ज्याचे स्वरूप.
सर्वदेवः स्तोत्रात (२५) 'सर्व' हे निराळे नाम आणि (३७५) 'देव' निराळे आहे. परमेश्वराचे सर्वम अस्तित्व असा अर्थ घेऊ शकतो.
( १०१) वृषाकपि: सर्व इच्छा पूर्ण करणारा.
(७९८) जयन्त: शत्रूंना जिंकणारा.
★ व्यापारयुग: "नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च।
प्रद्युम्नायानिरुध्याय, तुभ्यं भगवते नमः ॥
नारायणाय ऋषये, पुरुषाय महात्मने।
विश्वेश्वराय विश्वाय, सर्वभूतात्मने नमः ॥
स्तोत्रात गायिलेली नामें -
(३३२) वासुदेवः स्वतःच्या मायेने जग व्यापणारा.
(५५२) संकर्षण: आकर्षणारा.
(६४०) प्रद्युम्न: विपुल धन असणारा.
(६३८) अनिरुद्ध: कुणीही अडवू शकत नाहीं असा.
(२४५) नारायण: जलामध्यें रहाणारा.
(१४) पुरुष: शरीरांत राहाणारा.
विश्वेश्वर हे सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्यें आले आहे, विश्वाचा नियंता असा अर्थ. (०१)विश्व आणि (३६) ईश्वर अशी दोन नामें स्तोत्रात आहेत.
(०१) विश्वम् : समस्त जगताचें कारणरूप. सर्वभूतात्मनः 'सर्व' हे नाम आधी आले आहे. (०८)भूतात्मा: सगळ्या जीवांचा स्वामी, आत्मा.
★ कलियुग:- "आवडे कीर्तन कलियुगीं कृष्णा।" (ए. भा)
कलियुगांमध्यें संतादिकांनी सदैव हरिभजनाचा, नामसंकीर्तन, नामजपाचा महिमा गायिला आहे. अितकेंच काय पण श्रीभगवद्गीतेन स्वतः भगवंतांनी "यज्ञानां जपयज्ञोऽस्मि ।" (१०:२५) असें म्हणून जपामध्येंही माझी विभूती आहे अशी ग्वाही देतात. मागच्या तीन युगांत ज्या नामावली दिल्या, त्याप्रकारें या कलियुगासंबंधी श्रीमद्भागवतादी पुराणांमध्यें अनेक ठिकाणी "कलौ संकीर्त्य केशवम्" असा उल्लेख आले आहेत. प्रत्येक वैदिक सांप्रदायांत त्यांचे नाममंत्र,नामघोष आहेत. ते उघडे मंत्र म्हणून ओळखले जातात. त्याची यादी थोडक्यात पाहू : वारकरी सांप्रदाय- रामकृष्णहरि, रामकृष्णगोविंद.
∆ रामानुजीय सांप्रदाय- जय श्रीमन्नारायण.
∆ माध्व सांप्रदाय- वायु सर्वोत्तम्, वायु जीवोत्तम् .
∆ रामदासी परंपरेत - श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.
∆ निंबार्क सांप्रदाय- राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण कृष्ण राधे राधे.
∆ पुष्टिमार्गी - जय श्रीकृष्ण, श्रीवल्लभ की जय.
∆ अन्यत्र - गोविंदा गोविंदा, कृष्णकृष्ण, अित्यादी.
ही नामें सहस्रनामांत आहेत. याप्रकारे नवविधाभक्तीतल्या नामस्मरणाशी साधर्म्य दर्शविणारा ही नामें.
नामस्मरण हे सतत केलें जाणे अपेक्षित असल्याने तसाच श्लोक फलश्रुतीत आहे. "स्तुवन्नामसहस्रेण नित्यं भक्तिसमन्वितः।।" की , 'भक्तीयुक्त होऊन परमेश्वराचे हे सहस्रनाम नित्य म्हणावे'.
या विषयाशी निगडी श्रीनामदेवरायांचा एक अभंगही आहे. "सर्वकाळ हरी जपा। हेचिं तपा माजी तप।।"
४} पादसेवनभक्ती :- श्रीभगवदीतेनुसार "तदिद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।" की, तत्त्ववेत्त्या ज्ञानी लोकांना नम्रपूर्वक नमस्कार करुन नंतर त्यांची सेवा केल्यानंतर ते ज्ञानदान करतात. याचा भावार्थ असा की मुमुक्षु, साधकांनी भगवंताच्या, सद्गुरुंच्या चरणसेवेत सर्वकाळ तत्पर राहिले पाहिजे. ती सेवा रमा म्हणजेच लक्ष्मीमाता सदैव भगवान् श्रीविष्णुंची करीत असते. सहस्रनामात भगवंताच्या चरणकमलासंबंधी नामे पाहू -
(८६) शरण : मूळ अर्थ "आत्मयस्थान". परंतु आपण 'शरण जाणे' याचा अर्थ चरणांशी लीन होणे या अर्थी अधिक उपयोगात आणतो.
(२२७) सहस्रपात - ज्याला सहस्रावधी पाय आहेत, जी पुरुषसुक्तातली संकल्पना आहे.
(५३०) त्रिविक्रम - वामनावतारांत तीन पाउले भूमी दानात मागून तिन्ही लोक व्यापणारा.
(५३४) त्रिपद- तीन पाय असलेला अग्नी, किंवा वामन.[वरील संकल्पना].
(५८६) शुभाङ्ग - ज्याचे अवयव सुंदर असा. अर्थात ज्याचे चरण काळाप्रमाणे कोमल आहेत.
(६१६) स्वाङ्ग- मागील प्रमाणे अर्थ.
(६७१) महाक्रम - ज्याने आपले पाउन महान कार्यासाठी पुढे केलें असा.
(७७२) एकपाद - एका पायातच संपूर्ण विश्व व्यापणारा.
(८५२) आश्रम - भगवंताचे चरण हेच सर्वांचे आश्रय, विश्रांत स्थान.
(९४३) लक्ष्मी - चरणसेवेत सदैव रत असणारे वैभव .
(८५५) सुपर्ण, (८५६) गरुडध्वज- भगवंताचे वाहन गरुडही नित्य चरणांपाशी सेवेसाठी सज्ज असतो, तोही या नामानें देवाच्या विभूतीमध्यें समाविष्ट होतो.
अशी सहस्रनामांतर्गत पादसेवनभक्ती. फलश्रुतीमध्यें सर्व पातकांपासून मुक्त होऊन कशाने शुद्ध होईल तरी "वासुदेवाश्रयोः ।" आश्रय हा चरणांपाशीच मिळविला जातो.
५} अर्चनभक्ती:- ज्या राजानें भगवंताची अर्चन भक्ती केलीं नि मुक्त झाला असा (४१०) पृथु राजा याचे नाम सहस्रनामांत थेट आले आहे. त्याचा अर्थ, विस्तृत, विश्वरूपाने विस्तारलेला. (६३४) अर्चित म्हणजे पूजलेला असंही नाम.
या प्रकरणांत मुख्यत्वे स्थूल अर्थाने भगवंताची अर्चन भक्तीशी नामे अपेक्षित असल्याने श्रीदासबोधाप्रमाणे "पांचवी भक्ति तें अर्चन । म्हणिजे देवतार्चन । शास्त्रोक्त पूजाविधान । केलें पाहिजे ।। असें म्हणून विविध देवतांचे विग्रह, उपचारविधि, कुळाचार अित्यादी श्रीसमर्थ विवरण करतात. त्या प्रमेयानुसार सहस्रनामांमध्ये भगवंताच्या स्थूल रचनेसहित पूजा मार्गाविषयीं जी नामें आली आहे ती पाहू. राम, केशव, कृष्ण, नृसिंह ही व्यक्ती विभूतीवाचक नामें तथा देवाच्या अर्चन वा पूजा कुठल्या पद्धती होते त्या नामांचा विचार करणार आहोत.
(अ) मुर्ती प्रकार: अनेक हातांचा - (१४०)चतुर्भुज, (२६५) सुभुज.
(९४५) रुचिराङ्गद.
(२२६) सहस्राक्ष, (२२७) सहस्रपात,
अनेक मुखांचा - (२२७) सहस्रमुर्धा, (११५) बहुशिरा, (१३८) चतुर्व्युह - यामध्यें (३३२)वासुदेव, (५५२) संकर्षण, (६४०) प्रद्युम्न, (१८५)अनिरुद्ध हे चार अवतार.
(१३९) चतुर्दंष्ट (२१) नारसिंहवपु. - नृसिंहावतार.
( ४१७)सुदर्शन - पुरीच्या जगन्नाथ मंदिरांत सुदर्शनचक्राची पूजा करतात.
(आ) यज्ञ/अग्नि: यज्ञातील अग्नीद्वारें देवतांना त्यांचा हर्विभाग मिळतो आणि त्याद्वारेंं भगवंताची आराधना वेदकालापासून आजपर्यंत चालत आली आहे. त्याविषयीं नामावली - (०३) वषट्कार - यज्ञामध्ये केलीं जाणारी 'वषट्'' ही क्रिया हे ज्याचे स्वरूप असा. अग्निवाचक नामें- (२९३) अनल,(२३३)वन्हि, (८२७)सप्तजिव्हा. (३०८) अिष्ट: अिष्टी असाही अर्थ आहे की, यज्ञाद्वारें ज्याचे पूजन केलें जाते. या अर्थाला समांतर - (४४६)इज्य, (४४७)महेज्य. (४४९) सत्र - दीर्घकाळ चालणारे यज्ञ हे ज्याचे स्वरूप.
(९७२)यज्ञपतिः यज्ञाचा अधिपती. (९७३) यज्वा - यजमानही भगवंतच, (९७४)यज्ञाङ्ग- यज्ञ हेच ज्याचे अंग. (९७५) यज्ञवाहन, (९७६)यज्ञभृत् - यज्ञाचे धारण करणारा, (९७७)यज्ञकृत् - यज्ञ करणारा, (९७८)यज्ञी, (९८१) यज्ञान्तकृत्: यज्ञपूर्तता करणारा, (९७९)यज्ञभुज् , (८८७)हुतभुग्, (९८०)यज्ञसाधन, (८२८) सप्तैद्या. ही नामें यज्ञचा भोग घेणारा, समिधा अित्यादी अिंधन, सातप्रकारच्या समिधा, (६७५)महाक्रतु, (६७६) महायज्वा, (६७७)महायज्ञ, (७५३)मेधज, (६७८)महाहवि या यज्ञाशी संबंधित नामें.
(इ) सूर्य: सूर्याची उपासना, प्रतिकात्मक पूजन या संबंधी नामें - (३९)आदित्य, (२८४)भानु, (३३३)बृहद्भानु, (४८३)सहस्रांशु, (४८६) गभस्तिनेमि, (५६४) ज्योतिरादित्य, (७५७) तेजोवृष, (७५८)धुतिधर, (७९५)अर्क, सहस्रार्चिस्, (८२९)सप्तवाहन, (८८१)रवि, (८८३)सूर्य, (८८४) सविता, (८८५) रविलोचन.
(ई) उदक: जलाचा तर्पणादी पूजा विधींमध्यें अंतर्भाव असतो. पाण्यासंबंधीं नामें (३२३) अपानिधि, (५१७)अम्भोनिधि, (५५३)वरुण, (८१०)पर्जन्य, (८०३) महाह्रद - विशाल सरोवर
(उ) ब्राह्मण: ब्राह्मणेषु च विद्धांसो विद्वत्सु कृतबुद्धयः ।
कृतबुद्धिषु कर्तारः कर्तृष ब्रह्मवेदिन: || (मनुस्मृति १:२७)
- ब्रह्मस्वरूप ओळखणारा तो ब्राह्मण असा वेदसंपन्न भगवंतस्वरूपच होय. त्याअर्थी- (६६७) ब्राह्मण, (६६८)ब्रह्मी, (६६५) ब्रह्मविवर्धन, (६६९) ब्रह्मज्ञ. तथा (६७०) ब्राह्मणप्रिय, (२४३) साधु, (१८४) संतांगति, (९२९) सन्त, (३५०)महर्षि.
(ऊ) वृक्ष / नदी: वृक्ष आणि नद्या भारतीयांना देवतेसमानच आहेत. त्या संबंधी नामें
वृक्ष : (८२२) न्यग्रोध - वड, (८२३) उदुम्बर-उंबर, (८२४) अश्वत्थ-पिंपळ, (७९४) अर्क - रुई.
(७०७) सुयामुन : ज्या बालकृष्णाची लीला यमुनेच्या तीरावर झालीजी यमुना नदी. (२४४) जह्नु:- गंगा.
अशा या परमेश्वराची मोठमोठ्या विद्वानांनी, संत-सज्जनांनी पूजा केलीं म्हणून तो (५२२)महार्ह. तसेंच आवाहनादी अर्घ्यपाद्य षोडशोपचारादी विविध प्रकारांनी पूजन करण्यास योग्य म्हणून तो (८७३) अर्ह होय. ही *अर्चनभक्ति.*
६} वंदनभक्ती : "इयें चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयातें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ।।" (ज्ञा. ११:५२६)
अर्जुनाच्या मनांतला भाव श्रीज्ञानोबांनी किती सुंदर वर्णन केला आहे, ते म्हणतात "सर्व स्थावर जंगम विश्वामध्यें एक परमात्मा भरून राहिल्याने तुम्हाला पुनः पुन्हा नमस्कार असो."
सहस्रनामाची संख्या पूर्ण झाल्यानंतर पुनः एकवार (१०००) सर्वप्रहरणाययुध हे नाम म्हणून त्याला जोडून "ॐ नमः" म्हटले जाते. श्रीशंकराचार्यांनी त्याच्या सहस्रनाम भाष्यामध्यें "ॐकारश्च मङ्गलार्थः" तथा "अन्ते नमः इत्युक्वा परिचरणं कृतवान्।" - की, - द्वीरुक्ती करणे हे समाप्तीचे लक्षण असून ॐकार मंगलचरण तथा नमः अर्थात नमस्कार हा शिष्टाचार मानतात.
भगवान् श्रीकृष्णाच्या चरणदर्शनाने, नमस्काराने ज्याचा उद्धार झाला तो (९१५)अक्रूर. त्याचेही नांव सहस्रनामांत निराळ्या पद्धतीने आले असले तरी वंदन भक्तीचा आदर्श म्हणून नामावलीत ते समाविष्ट आहे. अक्रूर याचा अर्थ क्रूररहित. भगवंत सदासर्वकाळ दयाळूच आहे.
परशुरामांनी दत्तात्रेयांना, रामचंद्रांनी वसिष्ठ- विश्वामित्र , श्रीकृष्णाने सांदिपनींना शिष्य या नात्याने वंदन केलें नि विद्या प्राप्त केली. स्वतः भगवताने केलेंली ही वंदन भक्तीच. आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी, अंतरिक्ष, नक्षत्रे, प्राणी, दिशा, वृक्ष, नद्या, समुद्र इत्यादी नरदेहासहित सगळ्यांना वंदन करणे कर्तव्य आहे. यासर्व विभूतींचा उल्लेख स्तोत्रात केलेला आहे.
७} दास्यभक्ती : दास्य म्हणजे आपुले सर्वस्व एखाद्या ठिकाणी अर्पण करणे. सहस्रामध्यें (७४७) "अमानी" हे नाम मानसन्मानाची अपेक्षा नसलेला असें नाम आहे.ते दास्यभक्तीला लागू होते असें मला वाटते. भगवंताच्या अिच्छेप्रमाणे सेवा करणे म्हणजेज स्वतःचे निराळे अस्तित्व विसरणे हे आहे.
"जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।" या मनाचे श्लोकातील चरणाचा अर्थ भगवंताच्या ठायीं अनन्यभक्ताने आपले कार्य अर्पण करून जीवन कृतकृत्य करून घेणे असा होय. भगवान् श्रीरामचंद्रांची अनन्य भावाने अतुलनीय सेवा, दास्य करून श्रीमारुतीरायाने भक्तीचा आदर्श घालून दिला. त्या श्रीहनुमंताच्या विभूतीचे दर्शन सहस्रनामांत होते.- (८९९) कपि, (५०९) कपीन्द्र, (८९८) कपिल . (६९०) मनोजव- रामरक्षास्तोत्रात या नामाचा उल्लेख हनुमंतरायाला उद्देशून आला आहे, ज्याचा अर्थ मनाप्रमाणे वेगवान् असलेला. (३५७) भीम, (९४९) भीमपराक्रमः - प्रचंड स्वरूप नि पराक्रम असणारा.
असें आपल्या भक्तामध्येंच आपले प्रतिबिंत भगवंत ठसवितो.
८} सख्यभक्ती : श्रीनामदेव महाराज म्हणतात, कृष्णाच्या प्रेमात गडून, रंगून गेल्यानंतर त्या भक्ताच्या अंतरंगात कृष्णप्रेमाचाचा बोध आपल्या हृदयात ठसून त्याचा जिवलग होता. " नामया स्वामी जिवींचा जिवलगू। कृष्णसुखाचा सुख बोधू अंतरंगु।।" कृष्णचरित्रांमधील त्याचा मित्र सुदामा, उद्धव, भाचा अर्जुन यांच्या परस्परांचा भाव मैत्रीच्याही पलिकडे जाऊन सख्यत्वात मिसळून गेले. याविषयी साधर्म्य असणारी नामें -
(८८९) सुखद: भक्तांना सुख देणारा. (४६०) सुहृद : सर्वकाळ सद्भावनेने सहाय्य करणारा. (४७१) वत्सल: स्नेहयुक्त, मायाळू, (६६०)धनञ्जय: कुंतीपुत्र अर्जुन हा श्रीकृष्णाचा भाचा यापेक्षा सखा अधिक होता. गीतेमध्येंही ही विभूती वर्णन केली आहे.
(७३६) भक्तवत्सलः भक्तांविषयीं स्नेहभाव असणारा. सख्याला मानापमानाची अपेक्षा नसते म्हणून तो (७४७) अमानी सुद्धा ठरतो. पण समोरच्या सख्याचा मात्र गौरव करणारा, मानदेणारा असा (७४८)मानद. प्रिय करणारा (८७४) प्रियकृत, प्रेम वाढवणारा (८७५) प्रीतिवर्धन होय.
हा संदर्भ उद्धवासही जुळणारा आहे.
९} आत्मनिवेदन : नवविधाभक्तीतला किंवा एकंदरीत भगवत्प्रातीचा अंतिम टप्पा म्हणजे "मी"पण सर्वस्वी देवाच्या पायाशी समर्पित करणे. जेथे द्वैतभावाची कल्पना समूळ गळून पडते तेथे आत्मनिवेदन प्रकट होते. 'तत्त्वें तत्त्व जेव्हां सरे। तेव्हां आपण कैंसा उरे। आत्मनिवेदन येणें प्रकारें। सहजचि झालें ॥" - इतका शुद्ध निर्वाळा श्रीसमर्थांनी दिला आहे. या भक्ती प्रकारात भक्ताच्या समर्पण भावासहित अद्वैत तत्वाचे लक्षण सहज ध्यानांत येईल.
संत सोयराबानी म्हटल्याप्रमाणे "मी तूं पण गेले वायां । पाहतां पंढरीच्या राया ॥ या संदर्भानें नामें पाहू-
(१२) मुक्तानां परमा गति - मुक्तीची अभिलाषा बाळगणाऱ्यांना परमेश्वर त्यांना जन्ममृत्युच बंधनातून कायमचा सोडवितो.
(८४) आत्मवान् : मन, बुद्धि, अहंकारावर नियंत्रण, अर्थात मुक्तीच.
(८६) शरण: भक्तांचे अंतिम आत्मयस्थान.
(९३) प्रत्ययः भक्तांना निर्धारित करणारा.
(१०७) समात्मा:- जीव आणि शीवाची एकरुपता .
(१५७) अतींद्रिय: इंद्रियांच्या पलिकडे अर्थात निर्गुणाचा विषय.
(१७७) अनिर्देश्यवपु: परमेश्वर कसा आहे हे त्या तत्वाशी अद्वैत साधल्याशिवाय जाणता येत नाहीं.
(१८४) सतांगति: अंतिम गंतव्य.
(५९७) निवृत्तात्माः सर्व बंधनापासून अलिप्त, विमुक्तात्माचा तरखाच अर्थ . (२३६) सुप्रसादः भगवदस्वरूप हाच परमोच्च लाभ प्रसन्नात्मा नित्य समाधानी.
(२७६) प्रकाशात्मा: अद्वैत स्थितीत स्थूल लक्षणांचा क्षय होतो नि अमूर्त चैतन्य पुरते.
(५२) तुष्ट:- अद्वैत हिच तृप्तीची स्थिती.
(४२४) विश्राम:. भागवताशी तादात्म्य हेच विश्रांती स्थान.
(५१५) मुकुंद:- मोक्ष देणारा.
(५२६) आनंद - आनंदस्वरूप स्थिती.
(५२७) नन्दन:- :- आनंदित करणारा.
(५६६) गतिसत्तम: मुक्ती स्वरूप.
वैराग्य बाणल्याशिवाय आत्मसमर्पणा होऊ शकत नाहीं म्हणून तो (५८०) संन्यासकृत.
सदैव शांत, प्रसन्नतो (५८१) शम.
क्षोभ पावत नाहीं असा (५८२) शांत.
त्यामुळे अखंड (५८४) शान्ति आणि जेथून पुनरावृत्ति नाहीं ते (५८५) परायणम्.
(६९९) सद्गति:- मोक्ष देणारा (७२५) एक:- परमात्मा आणि जीवाचे ऐक्य .
(८१२) अनिल:- अज्ञानरहित. अनन्यभक्तीने जो मिळविण्यास सोपा तो (८१७) सुलभ. (८४०) निर्गुण:- त्रिगुणातीत, आकाररहित.
(८७१) अभिप्राय:- सर्वस्व अर्पण करण्यासाठी तयार.
(८७२) प्रियार्ह:.- प्रियवस्तु म्हणजे भक्ती ज्याच्या पायाशी अर्पण करण्यायोग्य ठिकाण.
(९२३) उत्तारण:- भवसागरातून तारून नेणारा, (९६६) जन्ममृत्युजरातिगः- जन्म, मृत्यु, वार्धक्याच्या पार.
अशीही *आत्मनिवेदन* पर नामावली.
समारोप:-
"तुका म्हणे नवविधा । भक्ति जाणे तोचि शुद्ध ।।"
नवविधा भक्ती प्रकाराशी निगडीत श्रीविष्णुसहस्रनामांतल्या काहीं ठराविक नामांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न केला. तथापि प्रस्तुत लेखामध्यें दिलेल्या त्या नामार्थातून केवळ तितकाच भाव प्रकट होतो असे नाहीं. भगवंताचे गुणैश्वर्य अमर्याद आहे, अनंत आहे. खरे म्हणजे मर्यादा हा शब्द देखिल अप्रस्तुत होय. श्रीतुकोबांच्या वचना आधारे सांगायचे तर "जें जें बोलें तेते साजे या विठ्ठला ।" असें हे विभूती दर्शन आहे. समस्त भाष्यकारांनी एकेका नामांचे अनेक भावार्थ निरुपिले आहेत. त्यातल्या नवविधाभक्तीच्या कक्षेत बसतील असें अर्थ घेऊन हे प्रकरण लिहिले. हे सहस्रनामस्तोत्र अितके सर्वसमावेशक आणि भव्य आहे की दूध घेतल्याने आपल्याला पूर्णान्न सेवनासमान पुष्टिलाभते, तद्वत या स्तोत्रिच्या श्रवणादी पठणाने "श्रेयः प्राप्तुं सुखानिच।" अशी फलश्रुति सांगितली आहे.
प्रत्येक भक्ती प्रकारांती भगवंताशी एकरूपता साधणे हिच अखेरची पायरी मानली आहे. "ऐसी हे नवविधा भक्ती । केल्या पाविजे सायुज्यमुक्ती । सायुज्यमुक्तीस कल्पांती । चिळण नाहीं ।।" असा श्रीसमर्थांनी नवविधाभक्ती दशकात शेवटी निर्वाळा दिला आहे. अनन्यभावाने केलेल्या भक्तीने भक्त सायुज्य मुक्तीचा अधिकारी होतो. ही सायुज्यमुक्ती म्हणजे जरी ब्रह्मांडाचा लय झाला तरी निर्गुण भक्तीही शाश्वत स्थिती परमेश्वरापाशी सदैव तशीच राहाते, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग यापेक्षा भक्तिमार्ग हा भक्ताला वा साधकाला भगवंताकडे निर्विघ्नपणे पोहचवितो असें पुराणांपासून संतांनी एकमुखाने प्रतिपादन केलें आहे.
"संसार तारावयालागीं । अनेक साधने अनेगीं । बोलिली ती जाण वाउगीं। अत्तम प्रयोगी मद्भक्ती || (ए.भा ११: १५२९)
श्रीविष्णुसहस्रनाम हे भक्तिकोशस्तोत्रात नवरत्नांसारख्या नवविधाभक्तीचे महात्म्य वर्णावे तितके कमी. श्रीज्ञानोबांनी नवविधाभक्तीच्या आश्रयाने काय प्राप्त झाले हे स्वानुभवातून अभंगाद्वारें म्हणतात: " मन हें राम जालें मन हें राम जालें। प्रवृत्ति ग्रासुनी कैसें निवृत्तीसी आलें।। श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें।।" - सांसारिक जगापासून हे प्रवृत्तीपर विषयांचे निरसन होऊन निवृत्ती प्राप्त झाली आणि मन रामचिंतनात रममाण झाले. त्याचे कारण श्रवण, कीर्तन, नामस्मरण, चरणसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या भक्ती प्रकारांच्या आश्रयामुळे. पुढे ज्ञानोबा " बाप रखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हरपलें।।" असें म्हणतात. याचा अर्थ असा की भक्तीच्या कुठल्याही प्रकाराने भगवंताची आराधना केली तरी अंतिमतः "तो" आणि "मी" हे निराळे न रहाता एकरूप होऊन अद्वैतस्थिती साधते.
या लेखाच्या सुरुवातीला रामचरितमानस या ग्रंथातील एका चौपाईतील एका चरणात उद्धृत केला आहे. प्रभू श्रीरामचंद्र माता शबरीला नवविधाभक्ती कथन करतात. गोस्वामी श्रीतुलसीदास यांनी मानसमध्यें नमूद केलेल्या ज्या नऊ भक्ती त्या भागवतापेक्षा निराळ्या आहेत. तथापि रामचंद्रांनी शबरीला नवविधा भक्तीचा उपदेश देऊन त्याचा जो समारोप केला तो मात्र प्रस्तुत लेखाला सुद्धा अनुकूलच आहे. ते म्हणतात: "नव महुॅं एकहु चिन्ह के होई। नारि पुरुष सचराचर कोई।। सोइ अतिसय प्रिय भामिनी मोरें। सकल प्रकार भगति दृढ तोरेस।। जोगि बृंद दुरलभ गति जोई। तो कहुॅं आजु सुलभ भई सोई।। {अरण्यकाण्ड} की, या नऊपैकी कुठलीही एक भक्ती ज्या भक्ताला प्राप्त असते तो स्त्री किंवा पुरुष अथवा जड चेतन कुणीही असो तो मला प्रिय आहे आणि हे भामिनी तुझ्यात सर्व भक्ती मला दृढ दिसतात म्हणून योग्यांनाही जी गती दुर्लभ आहे ती तुला आज सुलभ झाली आहे."
- अनिकेत घिवलीकर,
आळंदी

Comments