श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

 


नवधा भगति कहऊँ तोहि पाहीँ। सावधान सुनु धरु मन माहीँ॥
- श्रीतुलसीरामायण

श्रीभगवंताविषयीं आत्यंतिक श्रद्धा, निष्ठा, उत्कट समर्पणभाव तथा अनन्यत्व म्हणजे भक्ती. अध्यात्मक्षेत्रांत उच्च प्रेमाच्या आविष्काराची परिणीती भक्तीमध्यें होते. प्रेम किंवा आपुलकी ही मनुष्याची स्वाभाविक वृत्ती आहे. पृथ्वीवरील सगळ्या प्राणिमात्रांमध्यें माणूस वगळता जगायचे कसें हे शिकवावे लागत नाहीं. लहान बाळापासून वृद्धावस्थेत जाईपर्यंत मनुष्याला किती नि काय शिकवावे लागते याची यादी देण्याची आवश्यकता नाहीं किंबहुना करताही येणार नाहीं. ते प्राण्यांबाबतीत नाहीं. महाभारतामध्यें शांतीपर्वात एक श्लोक आहे, "आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् |" आहार, निद्रा, आपत्तीचे भय आणि कामवासना ह्या गोष्टी मनुष्यासारख्या प्राण्यांच्याही समान आहेत. यापलीकडे परमेश्वराने "ब्रह्माचे गुढ" उकलण्यासाठी माणसाच्या अंतरंगामध्यें बुध्दी नामक पदार्थ देऊन त्याद्वारें तो इतर प्राण्यांपासून निराळा झाला. माणूस ही परमेश्वराची परमोच्च निर्मिती आहे, याची ग्वाही स्वतः श्रीभागवतामध्यें मिळते. "सृष्ट्वा पुराणि विविधान्यजयाऽऽत्मशक्या, वृक्षान्- सरीसृपपशून खगदंशमत्म्यान् । तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय, "ब्रह्मावलोकधिषणं मुदमाप देव:॥ (भा. ११:९:२८) भगवंताने आपल्या मायेनें असंख्य जीवांना उत्पन्न केलें. त्यात वृक्ष, सरपटणारे किटक, प्राणी, सर्प, पक्षी, दाढा असणारे प्राणी वगैरे उत्पन्न करुनही भगवान् संतुष्ट झाला नाहीं. तेव्हा त्याने मनुष्यास जन्मास घातले आणि त्याला ब्रह्मावलोकन करण्याची बुद्धी, प्रेरणा देता झाला तेव्हा परमेश्वरास समाधान झालें. म्हणून प्रेम वा भक्ती स्वाभाविक प्रेरणा असली तरी त्याला कुणाच्या ठायीं ती समर्पित करायची याकरीता मार्गदर्शन लागतेच.भौतिक व्यवहारात अनेक प्रकारच्या खटपटी करुनही माणसाला आपण पूर्ण समाधानी झालो, असें तो मान्य करो वा न करो, वाटत नाहीं. ती पूर्णता परमेश्वराला शरण झाल्यामध्यें आहे आणि वेळ येताच एखाद्या नाठाळ माणसालाही ती उमगते. श्रीज्ञानेश्वर महाराजांची ओवी यासाठीच समर्पक आहे  "देखे मनुष्यजात सकळ। हें स्वभावता भजनशीळ। जाहले असे केवळ। माझ्याचि ठायीं ॥" (ज्ञा. ४:६७)


नारदभक्तिसूत्रांत भक्ती ही "परमप्रेमरुपा", "अमृतस्वरुपा" अशी वर्णिली आहे. हा परमप्रेमाचा भाव भगवंताच्या चरणी भक्तीत रुपांतरीत होतो. अथवा भगवंताची उत्कट भक्ती हाच परमार्थ. त्या भक्तीमध्यें इतके सामर्थ्य आहे की सगळी सुखं भगवंताच्या पायाशी लोळण घेतात. एका अभंगात श्रीतुकोबा म्हणतात, "भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी। ब्रह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥" या भक्तीच्या पोटात ब्रह्मादी सर्व मौल्यवान रत्नांच्या खाणी आहेत. याचा भावार्थ असा की, भक्तीसारखी श्रेष्ठ वस्तु ब्रह्मापेक्षाही वरचढ आहे.


श्रीमद्भागवतामध्यें या भक्तिशास्त्राचा विस्तार किंवा त्याचे कंगोरे "नवविधाभक्ती" या संकल्पनेत होऊन, "वासुदेवे भगवति यस्य नैसर्गिकी रतिः।" (७:४:३६) म्हणजे, भगवान् श्रीवासुदेवाच्या ठिकाणी (त्याची-प्रल्हादाची) स्वाभाविक प्रीती जडली होती असा उल्लेख आहे. भगवद्भक्त प्रल्हादाच्या तोंडूनच नवविधाभक्ती म्हणजे काय याचा सूत्ररुपांत  - "श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं। अर्चनं वदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं ॥ इति पुंसाऽर्पिताविष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा। क्रियेत भगवत्यध्दा तन्मन्येऽधीतमुत्तमम्॥" (७:५:२३,२४) श्रीविष्णुच्या लीलेचे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, चरणसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन ह्या नऊ लक्षणांनी युक्त अशी भक्ती, ज्याच्या योगाने साक्षात उत्पन्न होते, तेच अध्ययन असें (मी-प्रल्हाद) समजतो. असा श्लोक आहे.हे भाषण प्रल्हादाने आपला पिता हिरण्यकश्यपू याच्या समोरच केलें. अत्यंत जढमूढ बुद्धीला प्रल्हादाने भगवत्सेवेचे नऊ उपाय सांगितलें असाच त्याचा अर्थ होय.

भगवंताच्या चरित्राचे श्रवण, त्याच्या दिव्य गुणैश्वर्याचे कीर्तन, सतत नामस्मरण, पादुकांची सेवा, मूर्तिपूजा, नमस्कार, सेवेसी तत्पर, सख्यत्व आणि सर्वस्व अर्पण करणें या सगळया मार्गांची जननी 'भक्ती' आहे नि अंतिम गंतव्य 'मुक्ती'.


श्री एकनाथ महाराजांनी रचलेल्या नवविधाभक्तीपर अभंगाच्या ध्रुवपदांत भक्तीचे मुख्य लक्षण काय आहे याचे नेमके दिग्दर्शन करताना ते म्हणतात 

"नवविधा भक्ति नवविधा व्यक्ति अवघिया एकची प्राप्ती ।एका जनार्दनीं अखंडता मुक्तीची फिटे भ्रांती रया ॥"  याचा अर्थ असा की, नऊ प्रकारचे भक्ती मार्ग तसेंच नऊ प्रकारच्या व्यक्ती असल्या तरी संपूर्णतः मुक्तीची प्राप्ती सगळ्यांनाच आहे हे निःसंशय.


अशा या नवविधा भक्तीद्वारें ज्यांनी परमेश्वराची पूर्ण कृपा प्राप्त केली किंवा भगवद्स्वरुपच झालें अशा भगवदोत्तमांचे वर्णन करणारा एक श्लोक आहे -"अभिमन्युसुतो मुक्तिं गतः श्रवणनोहरेः। शुकस्तु कीर्तनादेव प्रल्हाद स्मरणेन च। पादसेवनतो लक्ष्मीः पृथुः पूजनमायतः। अभिवंदनतोऽक्रूरो दास्येनांजानिकासुतः॥ सख्यत्वेनार्जुनो राजा बलिस्त्वात्मनिवेदनात्।" 

श्रवणभक्तीने परीक्षित राजाचा उद्धार, शुकाचार्यांनी सर्वकाळ कीर्तनाद्वारे, नामस्मरण करीत प्रल्हाद, नित्य पादसेवेसी लक्ष्मी, पूजनाने पृथुराजा, केवळ नमस्काराने अक्रूर, दास्यत्वाने हनुमंत, सख्यत्वाने अर्जुन आणि आत्मनिवेदनाने राजा बली मुक्तीचे अधिकारी झालें. या श्लोकांप्रमाणे त्या त्या भक्त श्रेष्ठांचा महिमा श्रीएकनाथ महाराजांच्या अभंगाचा आधार घेत थोडक्यात कथन करतो.


१) राजा परीक्षित :- "हरीकथाश्रवण परीक्षितीसुजाण ऐकतां आपण अंगे होय।"

कुंतीपुत्र अर्जुनाचा नातू, अभिमन्यु त्याचा मुलगा परीक्षित. तो उत्तरेच्या गर्भात असताना अश्वत्थाम्याच्या अस्त्रापासून भगवान् श्रीकृष्णाने त्याचे रक्षण केलें. या परीक्षिताने  ब्रह्मर्षी शमीक समाधी अवस्थेत असताना एक मृत साप त्यांच्या गळ्यात टाकला नि अपराधास कारणीभूत झाला. ब्रह्मर्षींच्या मुलाला हे वृत्तांत समजताच तो परीक्षितास शाप देतो की, आजपासून सातव्या दिवशी तक्षक नागाच्या दंशाने मरण पावेल. पश्चाताप होऊन राजाला तीव्र वैराग्य येते नि तो गंगेकाठी प्रायोपवेशनास बसला असता तिथे श्रीव्यासपुत्र श्रीशुक मुनींचे आगमन होते नि तोंड त्यांना "भागवत" सांगण्याची विनंती करतो. भगवान् श्रीनारायणाचे ते दिव्य चरित्रश्रवण करून परीक्षित भगवद्स्वरुपच होऊन आपला देह परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. श्रवणसमाधीने तो ब्रह्मस्वरुप म्हणजे मुक्त झाला. ही *श्रवणभक्ती *होय. 


२) शुकाचार्य आणि नारद :- "हरिच्या कीर्तने शुक आणि नारद छेदिती अभिमानाचा कंदु।"

श्रीव्यासांचे पुत्र शुक जन्मजात वैराग्यवृत्तीचे. अत्यंत तेजःपुंज कांतीचे शुकाचार्य नित्य हरिकीर्तनांत दंग असत. त्यांनीच परीक्षित राजाला भागवत कथा सांगितली. श्रीनारदांच्या अवतारकार्याला पूर्वजन्मीची जोड आहे. तथापि मागच्या जन्मात श्रीनारायणाच्या भक्तीचे विस्मरण पुढल्या जन्मात झालें नाहीं. त्याचे फळ म्हणून ब्रह्मचारी नारदमुनी त्रैलोक्यात कुठेही संचार करीत नित्य नामस्मरण, हरिकथेत मग्न असत. 'आहूत इव मे शीघ्रं दर्शनं याति चेतसि।' म्हणजे, भगवंताला बोलाविले की तो तात्काळ दर्शन देत, अशी शुकमुनी आणि नारदांची *कीर्तनभक्ती* होय.


३) प्रल्हाद :- 'हरिचेनि स्मरणे द्वंद्व दुःख नाहीं हे भक्ति प्रल्हाद ठायीं।'

आपला पिता हिरण्यकश्यपू भगवान् श्रीविष्णुंचा पराकोटीचा द्वेष करीत असताना त्याच्याच समोर अखंड नामस्मरण, हरिचे गुणगान करणे आणि त्याद्वारें विदेह स्थितीत पोहोचणे हा नामस्मरणभक्तीचा आदर्श प्रल्हादाने घालून दिला. श्रीनामदेवरायांच्या अभंगातून प्रल्हादाचा भाव नेमका समजेल.

'देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो॥ चरण न सोडीं सर्वथा। आण तुझी पंढरीनाथा॥ वदवीं तुझे मंगलनाम। हृदयीं अखंडित प्रेम॥ नामा म्हणे केशवराजा। केला पण हा चालवीं माझा॥" याहून उत्कट भावशब्द सामन्यांकडे कुठले! अशी भक्तराज प्रल्हादाची *नामभक्ती* होय.


४) रमा :- 'हरिचरणामृत गोड मायेसी उठी चाड लाहे जाली रमा।'

समुद्रमंथनातून चौदा रत्नांपैकी श्रीलक्ष्मी उत्पन्न होताच त्याच क्षणी तिने श्रीविष्णुला वरले. तिचे स्थान नित्य परमेश्वराच्या चरणांपाशी असल्यानें द्वंद्वभावाची निवृत्ती होऊन मूकपणें सेवेंत रत झाली. एक लाक्षणिक अर्थ असा की, संपत्ती, धन, वैभव याचे स्थान भगवंताच्या पायाशीच आहे. श्रीरामावतारात अहल्या केवळ भगवंताच्या चरणस्पर्शाने ती उद्धरून गेली. हीच *पादसेवनभक्ती*. पादसेवन भक्तीमध्ये गरुडाचाही समावेश होतो. 


५) पृथुराजा:- "शिव शिव यजिजे वेदांचे वचन पृथुराया बाणलें पूर्ण ।"

ज्याच्या अतुल पराक्रमामुळे या धरणीला पृथ्वी म्हणतात, ते या पृथुराजामुळे. श्रीनारायणाच्या पूजनाने पृथु अितका एकरूप झाला की पूज्य - पूजन - पूजक ह्या त्रिपुटीचा लय होऊन श्रीहरिच्या अनुग्रहास पात्र झाला. अनन्यभावाने केलेंल्या पूजेचे फल म्हणून त्या *अर्चनभक्ती* द्वारें तो परमेश्वराचा अंकित झाला.


६) अक्रूर: "हरिचरण रजरेणू वंदूनियां पावन जाला अक्रूर।"

श्रीकृष्ण आणि बलराम यांना मथुरेला घेऊन येण्याकरीता कंसाने अक्रूरास गोकुळात पाठविले, तो त्याच्यासाठी अनुग्रहा अितका सुयोग जुळून आला होता, असें स्वतः अक्रूरानेच म्हटले आहे. कारण ज्या कृष्णाप्रती त्याची भक्ती होती, तो भगवान् प्रत्यक्ष पाहता येणार होता. बाळकृष्ण आपल्या गायींसह गांवात जात होता त्या वाटेवर भगवंताची पद्म, अंकुशादी शुभ चिन्हयुक्त पाउले उमटलेली. ती चरणधूळ अक्रूराने आपल्या मस्तकावर धारण केली नि केवल अनन्यभावनेने नमस्कार करताच परमात्मा कृष्णाने त्याचा उद्धार केला. अशी अक्रूराची *वंदनभक्ती* होय.


७) हनुमंत: " जीव जावो जिणे परि वचन नुलंघणे सेवेचा मुख्य हा हेतु।" मारुतीरायाच्या रामभक्ती विषयीं साधारण शब्दांत वर्णन करणे महाकठीण काम आहे. आपल्या स्वामीची इच्छा किंवा आज्ञा तत्परतेने तडीस नेण्यास जो दास्यभाव अपेक्षित आहे, तो हनुमंतरायासारख्या क्वचित कुणामध्यें सापडेल. तुकोबांच्या शब्दात सांगणे अधिक प्रशस्त: "काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा । शूर आणि धीर। स्वामिकाजीं तूं सादर ||" म्हणून *दास्यभक्ती*चा महामेरुमध्यें मारुतीरायाचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो.


८) अर्जुन आणि उद्धवः "सख्यत्वें परपार पावला अर्जुन त्यासी न पुसत दे ब्रह्मज्ञान।"

श्रीकृष्णार्जुनाचे नाते मामा-भाच्याचे एवढेच मर्यादित नसून मैत्रीच्याही पलिकडे ऊच्च पातळीवर "सखा" यात रूपांतर झालें, हे अर्जुनाचे किती भाग्य म्हणायचे! भगवान् त्याचे सद्गुरूही झाले तरी सख्यत्वाची भावना गीतोपदेशा समयीही तशीच ठेवली. श्रीज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायांत पार्थाची थोरवी वर्णन करताना ज्ञानोबांनी सुंदर ओवी घातली आहे, "हो कां आत्मनिवेदनातळींची। जे पीठिका होय सख्याची। पार्थ अधिष्ठात्री तेथिंची। मातृका गा।। (१२७) - की, "आत्मनिवेदनरूपी भक्तीच्या पायरीखाली जी 'सख्यभक्ती' (मैत्री) असते, त्या सख्यभक्तीची मुख्य अधिष्ठात्री देवता किंवा पाया (पीठिका) अर्जुन हाच आहे." 

अर्जुनाला 'अर्जुन मैत्रियेचा कुवासां।।" म्हणजे मैत्रीचे आधारस्थान असें ज्ञानोबांनी म्हटले आहे. 

याचे एकच उदाहरण द्यायचे झाले तर गीतेचा शेवटचा अर्धा श्लोक पुरेसा आहे. "यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्यो धनुर्धरः।" - जिथे भगवान् योगेश्वर कृष्ण आहे तिथे शिष्योत्तम सखा धनुर्धर अर्जुन आहेच. त्या अर्जुनाने आपले सर्वस्व वासुदेवाच्या चरणांशी अर्पण करून सख्य भक्तीचा कळस गाठला. ह्यात गोम अशी आहे की कृष्णाचाही अर्जुनाप्रति तोच भाव होता, त्याशिवाय का त्याच्या रथाचे सारथ्य केलें! 

उद्धवाचीही कथा तशीच आहे. उद्धवाला कृष्णाशिवाय दुसरा ध्यासच नव्हता. यादववशांचा होणारा ऱ्हास आणि माझे वैकुंठगमन तूला सहन होणार नाहीं असें कृष्णाने उद्धवास सांगून त्यास हिमालयात जावयास सांगितले, तेव्हां उद्धव "तूं गेल्यावर मढें असें मी बोधूं काय जनासी । आम्हीं वागतों तव शक्तीनें तूं झालास उदासी ।" (श्रीकृष्णकथामृत - अ.दा. आठवले) असें कळकळीने म्हणतो. "सख्य देवाचें तुटेना | भीती देवाची विटेना । देव कदा पालटेना। शरणागतांसी ।।" (दा.४:९:३०) हिच *सख्यभक्ती* होय. 


९) राजाबळी : "बळीची दानदीक्षा कैसी जीव देऊनी सर्वस्वेंसी निजबलें बांधी देवासी।" 

दैत्यकुळत जन्मलेल्या भक्तराज प्रल्हादाचा नातू बली यानें वामनावतारात भगवंताने त्रिपाद भूमी दान मागताच आपल्या गुरूंची म्हणजे शुक्राचार्यांचीही आज्ञा झुगारून वचनपूर्तीसाठी संकल्प सोडता झाला. बटुवेषधारी श्रीवामनाने पहिल्या पाउलात पृथ्वी, आकाश नि दिशा व्यापून टाकल्या. दुसऱ्या पाऊलांत स्वर्गादी सप्तलोक आणि तिसरा पाय ठेवण्यास बलीने नम्र होऊन आपले मस्तक पुढे करून त्यावर देवाने आपले चरण ठेवून प्रतिज्ञा पूर्ण करण्यास विनंती केली. बलीने त्या दानासमवेत आत्मसमर्पणच भगवंताच्या चरणांशी केलें नि त्यावर प्रसन्न होऊन बलीला सूतल नरकांत जाण्याची आज्ञा करून स्वतः द्वारपाल म्हणून सदैव उभा राहाण्याचे आश्वासन श्रीविष्णूंनी दिले. "तरी भावबळे बळी प्रबळु। तेणें देवो केला द्वारपाळ।। (ए.भा.) अशा तऱ्हेने राजा बलीने "आत्मनिवेदनभक्ती * करून मुक्ती साधली.


असा स्थिर बुद्धिचा भक्त भगवंतास अत्यंत प्रिय असतो या विषयी श्रीज्ञानोबांची ओवी अगदी यथार्थ बसते : "मग याहीवरी पार्था । माझ्या भजनी आस्था । तरी तयातें मी माथा । मुगुटकरी ॥ (ज्ञा० १२:२१४) 


या प्रमुख भवद्भक्तांनी नऊ निरनिराळ्या प्रकारची भक्तीसाधनेचे अवलंबन करून मुक्तीचे अधिकारी झाले. श्रवण, कीर्तन, नामस्मरण इत्यादी नऊ अमुल्य रत्ने सोन्याच्या तारेत गुफूंन ती रत्नजडित माला अनेक भक्तांनी परमेश्वरास अर्पण करून अिहपरलोकी कल्याण करून मुक्त झालें. "अनन्य भक्ती" हे यासगळ्याचे मुख्य सुत्र आहे. पापातला पापी मनुष्यही या भवसागरातून तारून जातो तो भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेल्या निस्सीम भक्तीमुळेच. "अपिचेत्सु दुराचारो भजते मामनन्यभाक् ।(भगवदीता ९ : ३७) या श्लोकावर भाष्य करताना श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी म्हटले, "यालागीं दुष्कृती जऱ्ही जाहला। तरी अनुतापतीर्थी न्हाला। होऊनि मज आंतु आला। सर्वभावें।। "- यातला अनुताप म्हणजे पश्चातापाने दुष्कर्म सोडून भक्ती मार्गाला लागताच भगवान् त्याचा हात धरतात, कारण तो भगवंत "भक्त्याहमेकया ग्राह्यः।" (भा. ११:१४:२१) की, (भगवान्) केवळ निर्मळ भक्तीने वश होणारा आहे.


हा विषय झाला नवविधा भक्ती आणि प्रमुख भक्तांनी केलेल्या प्रस्तुत उपासनेच्या जोरावर साधलेली सायुज्यमुक्ती. त्याचा पाया मात्र "सगुणचेनि आधारें। निर्गुण पाविजे निर्धारे ।।" (दा. ६:६ : ५५) ह्या पद्धतीने घातला होय.

अनेक आचार्य, संत-महंतांनी ज्या एका स्तोत्राच्या दिव्यतेबद्दल अपार स्तुती केलीं ते महाभारतांतर्गत श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र होय. भगवंताचे अनंत गुणैश्वर्याचे वर्णन सहस्र संख्याने नटविले आहे. भारतीयुद्धानंतर युधिष्ठिर राज्यावर आरुढ झाला तरी घडलेला संहार त्यांस अस्वस्थ करीत होता. तेव्हा श्रीकृष्णांच्या आज्ञेने द्रौपदीसह पांडव पितामह भीष्मांकडून उपदेश घेण्यास आणि त्यांची प्रतिज्ञापूर्तीसाठी युद्धभूमीवर आले. तेव्हां सगळ्या पातकांपासून मुक्त होणारे, कुणाच्या तथा कुठल्या स्तवनाने, पूजनाने मानवाचे कल्याण होईल असा प्रश्न युधिष्ठिराने शरपंजरी पडलेल्या भीष्मांना विचारला. त्याला उत्तर देताना भीष्म म्हणतात: "विष्णुर्नामसहस्रं मे श्रृणु पापभयापहम् ॥" समस्त पाप दूर करणारे सहस्रनाम माझ्याकडून ऐक असें म्हणून प्रत्यक्ष भगवंताच्या उपस्थितीत आणि आशीर्वादात्मक अनुमोदनाने हे "विष्णुसहस्रनाम" सांगितले. या स्तोत्राच्या प्रास्ताविकामध्यें सहस्रनामाची भूमिका व महती या विषयीं भीष्म सांगतात. विस्तारभयास्तव ते सगळे अिथें या देणे शक्य नाहीं. तो विषय आधी लिहिला गेला आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, लोकमान्य टिळकांनी सहस्रनामास "भक्तिकोश" म्हणून जे संबोधन योजले ते किती यथार्थ आहे हे ते वाचतान आणि भावार्थ समजून घेतल्यावर घ्यानांत येते. प्रत्येक नाम भक्तीच्या सुगंधाने परिपूर्ण आहे हे नि:शंक. आद्यशंकराचार्य तसेंच अितर सांप्रदायांच्या आचार्यांनी सहस्रनामावर भाष्ये रचिली. आपल्या संतांनीही साधकावस्थेत असताना त्याची उपासना केलीं. श्रीतुकाराम महाराजांनी सहस्रनामाची एक लक्ष पारायणे केलीं अशी वारकरी सांप्रदायांत श्रध्दा आहे. त्यांनी स्तोत्रावर अनेक अभंगही लिहिले आहेत. "नाव धड करा सहस्रनामांची। जे भवसिंधूची थडी पावे।।" अशी महती ते विवरण करतात. श्रीज्ञानेश्वरी, श्रीदासबोध, नामदेवांचा अभंग यांतही सहस्रानामस्तोत्राचा उल्लेख आला आहे. ती परंपरा आता आता होऊन गेलेल्या संतकवि श्रीदासगणू महाराज, आचार्य विनोबा भावे यासारख्या ज्ञानी पुरुषांपर्यंत आली आहे. श्रीटेम्बेस्वामी, श्रीसांईबाबा, स्वामी वरदानंद भारती इत्यादी सत्पुरुषांनी जनसामान्यांना नित्य उपासने करीता या सहस्रनामस्तोत्राचे पठण आवर्जुन करण्यास सांगितले. असो.


हे स्तोत्र उपासेनेसोबत भक्तीचा विषय का न व्हावा! अर्थात उपासना भक्तीनेच होते आणि म्हणूनच नवविधाभक्तीचे दर्शन या सहस्रनामांत होते. नवविधा भक्तीपैकी नामस्मरण भक्ती प्रकार या स्तोत्रांत अध्याहृत आहेच. फलश्रुतीत म्हटल्याप्रमाणे "य इदं श्रृणुयान्नित्यं यश्चापि परिकीर्तयेत् ।" या न्यायानें श्रवण आणि कीर्तन या विषयांचा अंतर्भाव होतो. पण अर्चन, दास्य, सख्य या अितर भक्ती प्रकारांचा समावेश कसा करता येथील? खालील श्लोकामध्यें त्याचे उत्तर गवसले, "अिति पुंसाऽर्पिता विष्णो भक्तिश्चेन्नवलक्षणा । क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम् ॥" की, नवलक्षणयुक्त विष्णुभक्ती ज्यायोगे घडते ते अध्ययन उत्तम". या श्लोकार्थाचा विचार करता, सहस्रनामस्तोत्र या भक्तिकोशात नवविधाभक्ती अंतर्भुत आहे याची खात्री पटते. 


नवविधाभक्ती आणि सहस्रनामाची सांगड घालण्याचा प्रयत्न या लेखात कुठल्या स्वरूपात होणार आहे हे स्पष्ट करतो. सहस्रनामांत काहीं नामें थेट ज्यांनी नवविधाभक्तीचा अवलंब केला त्या मागे उल्लेखलेल्या व्यक्तीशी निगडीत आहेत. उदाहणार्थ सख्यभक्ती करणारा अर्जुन, याचे दुसरे नांव "धनंजय" असेंही आहे, ते सहनामांत पहावयास मिळते. पादसेवनभक्तीचा आदर्श लक्ष्मी, अर्चनभक्ती करणारा पृथु ही थेट नामें स्तोत्रात आहेत. हि नामें भगवताची विभूती असून जो त्या त्या प्रकारची उपासना करणारा तो भगवन्मय अशी कीर्तनभक्तीच्या कक्षेत येणारे नाम आहेत. याला आधार श्रीएकनाथी भागवतात मिळतो. "भक्तु कीर्तन करी जेणें ध्यानें। ते ध्यान दृढ ठसावें मनें । तेव्हा देवाची निजचिन्हें । भक्ते पावणें संपूर्ण || (९.४३१) की, ज्या प्रकारचा भाव ठेवून भक्त भगवंताचे भजन करतो, मनामध्यें ठासवतो, तेव्हां त्या देवाची रूपलक्षणे भक्ताला प्राप्त होतात. 

भगवद्गीतेमधला विभूती योग याच प्रकारे वर्णिला आहे. "यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा | तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोऽशसम्भवम् ।। (१०:४१) भगवंताने आपल्या तेजाच्या अंशाचे वर्णन केलें आहे. अर्थात "भगवंत - भजन - भक्त" या त्रिपुटीचा संगम विष्णुसहस्रनाम स्तोत्रात प्रकट होतो . "शुद्ध झालिया स्वरुपप्राप्ती । म्हणशी भजन कैशा रीतीं । देवभक्त तेचि ते होती । मी होऊन भजती मजमाजीं ॥" (ए.भा ११:११३१) - "शुद्ध स्वरूपाची प्राप्ती झाल्यावर भजन कसें करावयाचें ? कारण, देव व भक्त दोन्ही तेच होऊन सत्स्वरूप होत्साते माझ्यामध्येंच माझेंच भजन करतात." असें नाथमहाराज सांगतात. 

 थोडक्यात, श्रवणादी भक्ती प्रकारांच्या संबंधी भगवंताच्या विभूती सहस्रनामांत कुठल्या संदर्भात आल्या आहेत याचे विवेचन पुढील भागात होईल. 


                                                   ©️अनिकेत घिवलीकर.



Comments

Anonymous said…
खूपच छान 🤗👍🏻👍🏻

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १