श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, अंतिम भाग.

 


-: सहस्रनाम अभंग विवरण :- 

अभंग १: 
नामपाठे भीष्में कामातें जिंकीलें । सार्थक पै केलें विहिताचे ।। 
आदरे आवडी नामपाठ गावें । सर्वांवरी होय सत्ता त्याची ।। जनार्दनाचा एका होऊनी शरण । घाली लोटांगण संत चरणी ।।

भावार्थ: पितामह भीष्मांनी भगवंताच्या नामोच्चाराद्वारें भौतिक विषयांवर विजय मिळविला आणि आपल्या जीवनाचे सार्थक केलें. जो आदराने, आवडीने नामाचे पठण करतो त्याची सर्वांवर सत्ता चालते. नाथमहाराज म्हणतात, मी स्वामी जनार्दन महाराजांचा शिष्य अशा संतांना शरण जाऊन त्यांच्या चरणावर लोटांगण घालतो.

विवरण: श्रीमन्महाभारतातील दोन उत्तुंग विभूतीमत्व म्हणजे भगवान् श्रीकृष्ण आणि गंगापुत्र देवव्रत भीष्माचार्य. श्रीविष्णुसहस्रनामाचे उद्गाते हे भीष्मराज आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यातही हे स्तोत्र वा नामावली प्रत्यक्ष भगवंत सम्मुख असताना राजा युधिष्ठिरास सांगितले, हेही आपल्याला ज्ञात आहे. महाभारताच्या अनुशासनपर्वामध्यें महर्षी श्रीव्यासांनी संकलित केलेलें हे नामसहस्रस्तोत्र भगवंताच्या सहस्रावधी विशेष गुणांचे नामरूपाच्या आधारे केलेली स्तुती असून, ती भीष्मांनी शरपंजरी पडले असताना केलीं आहे.

भीमाचार्यांनी भगवंताची असें स्तुती गान प्रथमच केलें नसून महाभारताच्या सभापर्वमध्यें धर्मराज युधिष्ठिर राजसूय यज्ञांती अग्रपूजा कुणाची करावी असा भीषांना प्रश्न करतो, त्या वेळी त्यांनी सुयोग्य विचार करून निर्णय दिला: "वार्षेयं मन्यते कृष्णमर्हणीयतमं भुवि ॥ एष ह्येषां समेतानां तेजोबलपराक्रमैः। मध्ये तपन्निवाभाति ज्योतिषामिव भास्करः॥ असूर्यमित्र सूर्येण निवातमिव वायुना। भासितं ह्लादितं चैव कृष्णेनेदं सदो हिनः ।।" (अर्घाभिहरणपर्व-अ. ३६:२७ -२९) - वृष्णिकुलोत्पन्न श्रीकृष्ण हाच ह्या सर्वभूतलावर पूज्यतम आहे. (येथे असलेल्या) सर्व (राजा) मध्यें एक सुद्धा तेज, बल, आणि पराक्रम या गुणांनी श्रीकृष्णाची बरोबरी करणार नाहीं. नक्षत्रांमध्यें जसा सूर्य, तसा या सर्व लोकांमध्ये श्रीकृष्ण होय. सूर्याचा प्रकाश अंधःकार प्रदेशावर पडावा किंवा निर्वात जागी वाऱ्याची झुळूक वाहवी तद्वत ह्या यज्ञमंडपात श्रीकृष्णरूप सूर्याचा प्रकाश पडला आहे किंवा वाऱ्याची झुळूक वाहत आहे". अशी यथोचित प्रशंसा करून भीष्मांनी श्रीकृष्णांना अग्रपूजेचा मान देण्यास धर्मराजास आज्ञा केली.

अनुशासनपर्वामध्यें दानधर्मपर्वात श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राच्या आधीच्या अध्यायांत म्हणजे एकशे अठ्ठेचाळीसाव्यांत भीष्म युधिष्ठिरास श्रीकृष्ण महिमेची व्याख्या सांगतात. यामधील श्लोकांतही भगवंताची अनेक नामें असून ती सहस्रांहून निराळी दिली आहेत. त्यातील भीमांनी युधिष्ठिरांस केलेला उपदेशही महत्त्वाचा आहे. ते म्हणतात: "धारयिष्यति यश्चैनं महापुरुषसम्भवम् । श्रृणुयात् कथयेद् वाय: स श्रेयो लभते परम् ।।" : जो महापुरुष श्रीकृष्णाचे पराक्रम श्रवण, चिंतन करतो, त्याला परम कल्याण परम श्रेय प्राप्त होते". मग पुढे नामसहस्रस्तोत्र प्रारंभ होते.

स्तोत्राच्या प्रास्ताविकेत भीष्म युधिष्ठिरास मनुष्यजन्माचे परम कल्याण कशात आहे : "को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः।" , की पितामह, आपल्या दृष्टीने सर्वधर्मत श्रेष्ठ धर्म कोणता? असा प्रश्न केला. कारण या सहस्रनाम उपदेशाआधी भीष्मांनी युधिष्ठिरास राजधर्म, दान धर्म, स्त्रीधर्म, देव-पितृरहस्य, मोक्षधर्म, चतुर्थपुरुषार्थ अशी अनेक कर्तव्ये, उपाख्याने, इतिहास याचे मार्मिक मार्गदर्शन केलें होते. त्यानंतर हा वरील प्रश्न केला गेला. याचे उत्तर देताना ते स्पष्ट सांगतात: "एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः। यद्भक्त्य पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा।।" की '(आतापर्यंत तुला, राजधर्म, नीती, दान अित्यादी सांगितलेल्या) संपूर्ण धर्ममध्यें या एका धर्माला मी अधिक श्रेयस्कर मानतो. की जो मनुष्य कमलाक्ष भगवान् वासुदेवाचे भक्तिपूर्वक गुणसंकीर्तनरूप स्तुती करून अर्चन करतो!' असा या श्लोकाचा भावार्थ असून हाच 'विहितधर्म' भीष्मांनी आजन्म पाळला, त्याचे वहन केलें. 
नामावली पूर्ण झाल्यानंतर शेवटी फलश्रुतीमध्येंही ते म्हणतात : "वासुदेवाश्रयो मर्त्यो वासुदेवपरायणः। सर्वपापविशुद्धात्मा याति ब्रह्म सनातनम्।।" ( (वि.स) :' जो मनुष्य अनन्य होत्साता वासुदेवाचा आश्रय घेतो तो समस्त पातकांपासून मुक्त होऊन शुद्ध अंतःकरणाचा बनून सनातन ब्रह्मपदाला प्राप्त होतो' म्हणजेच नामस्मरणाच्या आधारे मानवदेहाचे सार्थक होय. 

विष्णुसहस्राचा उपदेश केल्यानंतर पुढल्या अध्यायांत युधिष्ठिराने भीष्मांना "किं जप्य जपतो नित्यं भवेद् धर्मफलं महत् ॥" असा पुनः प्रश्न केला की, प्रतिदिनी कुठल्या स्तोत्राचा वा मंत्राचा जप करण्याने धर्माचे महत् फल प्राप्त होते ? " तेव्हां भीष्मांनी एक दिव्य मंत्र सांगितला "नमो वसिष्ठाय महाव्रताय पराशरं वेदनिधिं नमस्ये । नमोऽस्त्वन्ताय महोरगाय नमोऽस्तु सिद्धेभ्य इहाक्षयेभ्यः ॥ नमोऽस्त्वृषिभ्यः परमं परेषां देवेषु देवं वरदं वराणाम्। सहस्रशीर्षाय नमः शिवाय सहस्रनामाय जनार्दनाय ।" : 'महान् व्रतधारी वसिष्ठ, वेदनिधि पराशर, विशाल सर्प अनंत, अक्षय सिद्धगण, ऋषिवृंद, परात्पर, देवाधिदेव, वरदाता परमेश्वर तथा सहस्रशीर्षधारी शंकर आणि "सहस्रनामधारी जनार्दन" यांना नमस्कार असो' अशीही स्तुती आहे. त्यात 'सहस्रनामाय जनार्दनाय' हे पुन: विष्णुसहस्रनामाचे स्मरण देणारे आहे.

यानंतर भीष्म श्रीकृष्ण महिमेचे वर्णन करतात: "शुभाशुभं स्थावरं जङ्गमंच विश्वक्सेनात् सर्वमेतत् प्रतीहि । यद् वतने यच्च भविष्यतीह सर्व होतत् केशवं त्वं प्रतीहि ।। (अनु. १५८ : ४३). "शुभाशुभ, स्थावर-जंगम रूप हे श्रीकृष्णापासूनच उत्पन्न झाले आहे यावर विश्वास ठेव. भूत, वर्तमान, भविष्य हेही श्रीकृष्णाचेच रूप आहे हे तुला योग्यरित्या समजले पाहिजे". भीष्मांनी युधिष्ठिराला हे पुन: का सांगितले असावें? कारण नामसहस्राध्यें भगवंताची त्या त्या गुणांनुसार नामे आली आहेतच, परंतु द्विरुक्तीमुळे आधी सांगितल्याची तीव्रता जाणून प्रस्तुत गोष्टी अजून प्रभावीत होते.
 
वरील श्लोकाआधी सुद्धा भीष्मांनी विविध गुण युक्त नामांनी भगवंताचे विभूतीमत्व वर्णिले. श्रीकृष्णाचे चिंतन भीष्मांनी वेळोवेळी, सतत केलें आहे. हाच संदर्भ एकोबांच्या "नामपाठे भीम" या वचनाला पुष्टी देतो. 

भारती युद्ध समाप्तीनंतर नि हस्तिनापूराच्या राज्याची व्यवस्था लागल्याचे ऐकून अठ्ठावन्न दिवस शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांनी उत्तरायण लागताच त्यांच्या देहाचे सार्थक होण्यादृष्टीने तो विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली, अनुमोदन मागितले आणि अनेक नामांचा उच्चार करीत ते म्हणाले: "त्रायस्व पुण्डरीकाक्ष पुरुषोत्तम नित्यशः । अनुजानीहि मां कृष्ण वैकुण्ठ पुरुषोत्तम ॥" 'हे कमलाक्ष वैकुण्ठा ! श्रीकृष्णा ! आपण सदैव माझा उद्धार करावा, आतां मला जाण्याची आज्ञा द्यावी.' भगवान् श्रीकृष्ण हे परमात्म्य स्वरूप असून मानवदेह धारण करून भूतलावर वावरत आहेत हे भीष्म जाणून होते. पुढे ते म्हणतातः "देवा! मी आपल्याला जाणतो, आपण पुरातन ऋषी नारायण असून नरासमवेत बद्रीकाश्रमांत निवास करीत असत." असें हे भगवंताचे अनादित्व भीमांना ज्ञात होते म्हणूनच पुढे ते कृष्णास म्हणाले: "स मां त्वमनुजानीहि कृष्ण मोक्ष्ये कलेवरम्। त्वयाहं समनुज्ञातो गच्छेयं परमां गतिम् ||", 'श्रीकृष्णा! आता आपण मला आज्ञा द्यावी, की मी या शरीराचा त्याग करू. आपली आज्ञा मिळताच मला परमगति प्राप्त होईल.'
भीष्मांना भगवान् श्रीकृष्णावर पूर्ण श्रद्धा होती. कारण "यतः कृष्णस्ततो धर्म: ।" जेथे कृष्ण तेथे धर्म ही त्यांची व्याख्या खूप आधीपासून स्पष्ट होती. म्हणूनच श्रीएकोबा प्रस्तुत अभंगात "सार्थ पै केलें विहिताचे" म्हणतात त्याची वरील उद्धृत केलेल्या प्रसंगावरून आपल्याला साक्ष पटते.

परंतु ही सार्थकता सिद्ध झाली जेव्हां प्रत्यक्ष वासुदेव कृष्णाने भीष्मांना अभिवचन दिले. 'अनुजानामि भीष्मं त्वां वसून प्राप्नुहि पार्थिव । न तेऽस्ति वृजिनं किंचिदिह लोके महाद्युते ।। पितृभक्तोऽसि राजर्षे मार्कण्डेय इवापरः । तेन मृत्युस्तव वशे स्थितो भृत्य इवानतः ।।" - श्रीकृष्ण भगवान् म्हणाले, 'हे पृथ्वीपालक महातेजस्वी भीष्मा ! मी आपणांस सहर्ष आज्ञा देतो की आपण आपल्या वसुलोकामध्यें जावे, ह्यालोकी तुमच्याकडून यत्किंचितही पाप घडलेलें नाहीं. आपण महान् पितृभक्त मार्कण्डेयासारखे आहात. त्यामुळे हा मृत्यु नम्रपणे, आपल्या सेवका प्रमाणे आपला अधीन झाला आहे.'

आपण जाणताच पितामह भीष्म हे राजा शान्तनु आणि गंगा यांचा पुत्र देवव्रत या नामाने जन्मले. ते पूर्वजन्मातील प्रभास या अष्टवसूपैकी होते . आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालक आणि निष्ठेने हस्तिनापूर नगरीचे संरक्षक, हितचिंतक म्हणून त्रिखंडात लौकिक होता. महत्त्वाचे म्हणजे ते इच्छामरणी होते. म्हणून अठ्ठावन्न दिवस संपूर्ण देहे अर्जुनाच्या बाणांनी विदिर्ण झालेला तरी त्यांनी प्राण सोडले नव्हते. प्रत्यक्ष भगवान् श्रीकृष्णाने त्यांच्या चारित्र्याविषयी निष्कलंक, म्हणून उद्घोष करीत त्यांचा अंतकाळ साधून उत्तम गति द्यावीं हे भीष्माचार्याच्या जीविताचे परम भाग्यच नव्हे काय !

धर्मराज युधिष्ठिरास नामसहस्राचा उपदेश करतेवेळी भीष्मांचे अष्टसात्विक तेज दाटून आलेले. हे तेव्हाच घडते जेव्हा मनुष्य पूर्णपणे अनासक्त होतो. नि त्याकरीता भगवत्कृपाच लागते. म्हणून वेदश्रुतीप्रमाणे या नामावलीला दिव्यत्व प्राप्त आहे. एकोबांनी म्हटल्याप्रमाणे भीष्मांनी "कामांतें जिंकिलें" याचा अर्थ स्पष्ट होतो की, ज्यानें अंतर्बाह्य विषयांवर विजय प्राप्त केला त्याद्वारें ही अपौरूषेय वाणी प्रकट होऊ शकते. त्यांच्या मुखातून निर्माण झालेली भगवंताची स्तुती अर्थातच वेदवाणीच होय. भीष्मांनी 'योगयुक्त' होऊन म्हणजे यौगिक क्रियेद्वारें पुढे आपला प्राण सोडला असें महाभारतकार लिहितात. 

महाभारतातील या वर्णनासहित श्रीभागवतमहापुराणातील भीष्मकृत श्रीकृष्णस्तुती येथे उद्धृत करण्याचा मोह होतो. एकोबांच्या प्रस्तुत अभंगातील पहिल्या चरणाला अधिक पुष्टी मिळून त्या स्तुतीमधील काही श्लोक देऊन संपूर्ण स्तोत्राचा सरळ भाषेत सारांश देत आहे.

भागवतकार वर्णन करतात : 
"विशुद्ध धारणयाहताशुभस्तदीक्षायैवाशु गतायुधव्ययः निवृत्तसर्वेन्द्रियवृत्ति विभ्रमस्तुष्टाव जन्यं विसृजञ्जनार्दनम् ||" 
याचा भावार्थ असा की, 'भीम्ष्मांना लागलेल्या बाणांच्या वेदना भगवंताच्या दर्शनाने तत्काळ नाहीशा झाल्या. भीष्मांनी शरीर त्याग करण्याआधी आपली सर्व इंद्रिये वृत्तीच्या ठायी रोखून मोठ्या आनंदाने भगवत्स्तुती करण्यास सुरुवात केली.'
ही स्थिती, प्रेरणा, आवेग, सद्भावना निर्माण झाल्या त्या केवळ परमेश्वरी कृपेमुळेच.
या नंतर भीष्म भगवान् श्रीकृष्णाची विविध नामांनी आणि अवतार कार्याची स्तुती करतात. "इति मतिरूपकल्पिता वितृष्णा भगवति सात्वतपुङ्गवे विभून्मि । ..." माझी अत्यंत शुद्ध नि विषाय-कामनाविरहित झालेली बुद्धी मी मृत्युसमयीं यदुवंश शिरोमणी भगवान् श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करतो. श्रीकृष्णाच्या सगुण रुपाचे वर्णन करीत भीष्म म्हणतात: " विजयसरखे रतिरस्तु मेऽनवद्या ।" - अर्जुनसखा श्रीकृष्णावर माझे निष्काम प्रेम असते, "विलसत्कवचेऽस्तु कृष्ण आत्मा ॥" - सुंदर कवच धारण करणाऱ्या श्रीकृष्णा ठिकाणी माझे मन रममाण होवो, रणांगणावर केवळ आपल्या दृष्टीने शत्रुपक्षाचे प्राण हरण करणाऱ्या "पार्थसखे रतिर्ममास्तु" , अर्जुनाला गीतामृताचे पान करवीणाऱ्या श्रीकृष्णाच्या "चरणरति परमस्य तस्य मेऽस्तु", भक्तासाठी स्वतःची प्रतिज्ञा मोडून माझ्याकडे चक्र घेऊन धावणाऱ्या, मला मारण्याकरीता येणाऱ्या श्रीकृष्णास "स भवतु मे भगवान् गतिर्मुकुंद", युद्धात मरणारे वीर त्याच्या दर्शनाने सारूप्य मोक्षाला प्राप्त झाले , ज्याच्या अलौकिक सौंदर्याला पाहून गोपी धुंध झाल्या, तन्मय होऊन गेल्या, युधिष्ठिराच्या राजसूय यावेळी अग्रपूजेचा अधिकारी तो "मम दृशिगोचर एष आविरात्मा", प्रत्यक्षात एक असून अनेक रुपांत भासणारा श्रीकृष्ण याला "समधिगतोऽस्मि विधूतभेदमोहः।।" - ' मी भेद भ्रमाने रहित होऊन कृष्णांना प्राप्त झालो आहे.' अशी अत्यंत भावविभोर उत्कर स्तुती केल्यानंतर पितामहांनी प्राण श्रीकृष्णार्पण केले.

महाभारत, भागवत यातील ही उदाहरणे म्हणून घेतली वचने, श्लोक यातून एकेच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे भीष्माचार्यांनी केलेली श्रीनारायणावरची भक्ती. ती स्मरणाने, चिंतनाने आणि त्यांनी केलेल्या या निष्काम भक्तीचे फळ म्हणूनच अिंतरांवर त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप पडे. भीष्मांच्या आज्ञेबाहेर ते जात नसत. आता दुर्योधनासारखा अपवाद वगळता भीष्मांची अवज्ञा कुणी केली नाहीं. तथापि कौरवसेनेचे सेनापतीपद दुर्योधनाला निरुपायाने का होईना भीष्मांनाच यावे लागले. आणि त्यांची योग्यता तो जाणत होता म्हणूनच भगवद्गीतेतही श्लोक आला आहे, "अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्।" : की सर्व प्रकाराने अजिंक्य केलेले सैन्य भीष्मांमुळे आहे. अतः "भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि।।" : सर्वांनी सगळ्या बाजूंनी भीष्मांचे रक्षण करा.' हे सांगावे लागले. हेच 'सर्वावरी होय सत्ता त्याची !'
एकोबा म्हणतात अशा संतांच्या चरणी हा स्वामी जनार्दनाचा शिष्य अक्षरक्षः लोटांगण घालतो. 

श्रीनाथांनी या अभंगांमध्यें भीष्मांच्या जीवनाची इतिश्री भगवन्नामांच्या पठणाने झाली असें म्हटले आहे .आणि अर्थातच ते विष्णुसहस्रनामाच्या अनुषंगाने आहे हे वरील विवरणात अधोरेखित केलें. सहस्रातील (१२) "मुक्तानां परमा गति" हे नाम स्वतः भीष्मांसाठी लागू पडते. की जे जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त झाले आणि त्यांना उत्तम गतिही लाभली असे. एकोबांच्या अभंगगाथेमध्यें नामस्मरणाद्वारें अगदी पुराणपुरुषांपासून ते संतानांपर्यंत त्याचे कशाप्रकारे फल प्राप्त झाले हे सांगणारे काहीं अभंग आहेत. त्यामध्यें प्रल्हाद, नारद, हनुमंत, वाल्हा कोळी, गजेंद्र, अक्रूर, द्रौपदी, बिभीषण, गणिका, ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई , गोरक्षनाथ गहिनीनाथ, चोखोबा, सांवतोबा, गोरोबा, नामदेवराय अशा महात्म्यांवर स्वतंत्र अभंग लिहून त्यांच्या नाम चिंतनाने त्यांनी प्राप्त केलेलें भागवत्प्रेम वर्णिले आहे. 
त्यातला भीष्मांवरील हा अभंग. नाम जपामुळे संदेह जातो, वेदांचे वर्म नामच, स्वर्गसुखाहून थोर, संतांनी त्यात शोधलेला विसावा आणि मोक्षाचे द्वारही नाम. असा सुखाचा सोहळा त्या नामपाठफल अभंगांमध्यें एकोबांनी अनुभवांती लिहिला आहे. 



अभंग : २.
सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हां ज्याची चाळी ।  
पातकांची होळी । होत तेणें कली ये ।। 
नको ध्यान धारण आसन | वाचे सदा नारायण । 
केलिया ऐसा नेम जाण । मेरू समान सुकृत ।। 
उपमा नव्हे तथा नरा । जनार्दन तो निर्धारा।
एका जनार्दनीं बरा । त्याचा सांगात घडता ॥

भावार्थ: कलियुगामध्यें ज्या मनुष्याच्या मुखात सतत भगवंताच्या नामांचे आवर्तन होत असते त्याची पापे अग्नीत भस्म व्हावीत अशी नाहींशी होतात. भगवत्प्राती करीता ध्यान, धारणा, आसने अित्यादींपेक्षा वाणीद्वारे नित्य नारायणाचे नाम ही पुण्यकारक कृती मेरु पर्वता एवढी थोर आहे. जो मनुष्य असें करतो त्याला अितर उपमा नसून तो निश्चित जनार्दन आहे नि त्याची संगत घडता एकोबांना फार आनंद होतो.

विवरण: श्रीएकनाथ महाराजांच्या चरित्रामध्यें विष्णुसहस्रनामासंबंधी एक कथा आहे. कै. पांगारकरांनी त्यासंबंधी अगदी थोडक्यात लिहिले आहे. एकोबांच्या घराशेजारी एक व्यापारी (त्यांनी उदमी हा शब्द वापरलेला आहे) रहात होता. भगवंताचे स्मरण, पूजन करावे, कीर्तनास जावे हे त्या व्यक्तीच्या मनातही येत नसे. केवळ आपल्याला द्रव्यप्राप्ती होऊन सांसारिक सुख कसे उपभोगता येथील याचेच चिंतन तो सतत करीत. दयासिंधू नाथांना त्याची ही अवनती पाहावे ना. ते आपणहून रोज त्याच्या दुकांनांत जाऊ लागले. त्याचे मन वळवून त्यास विष्णुसहस्रनामाचा एक श्लोक लिहून देत नि शिकवीत. हा नित्यक्रम नाथांनी चालू ठेवला.
असें करता करता त्या व्यापाऱ्याला संपूर्ण सहस्रनाम सहज पाठ झाले जणू नाथांनी त्यास दीक्षाच दिली. पुढे नाथांनी त्याला एक आसनही शिकवले. तो निष्ठेने पहाटे स्नान आटोपून त्या असनावर विष्णुसहस्राचे दहा पाठ करीत. हा त्याचा नेम अंतकालापर्यंत त्याने पाळला. शेवटच्या दिवशीही त्याने सहस्रनामाचे आवर्तन केलें नि मग देह ठेवला. अशी कथा वर्णिली आहे. 

प्रस्तुत अभंगाचा पहिला चरण वाचल्यावर मनांत नक्की असा विचार येईल की या व्यापाऱ्याला उद्देशून तर हा अभंग रचला नाहींना! कोण जाणे, असलही !! संतवचनांचा नेमका अभिभेत अर्थ हे ते स्वतःच सांगू शकतात. आपण सामान्य माणसे त्यांच्या वचनांचा केवळ अनुमान काढू शकतो. पण अनुमान काढताना सुद्धा तो त्या विचारांशी संलग्न असावा. ना की त्याचा विपर्यास व्हावा. नाहीतर प्राध्यापकीय डोकी असलेली काही नाठाळ लोक प्रक्षिप्त म्हणून सहज बाजूला काढतात. हे उपयोगाचे नाहीं. असो.

या अभंगामध्यें कुठेही सहस्रनामाच्या उलेख आढळत नाहीं असें कुणाला वाटेल. परंतु तसे नाही. पहिल्या चरणाचा तिसरा शब्द "नामावळी" हा सहस्रनामाशीच निगडीत आहे, अशी माझी प्रामाणिक धारणा आहे. नामावली या शब्दाची मीमांसा माझ्या मागच्या "नामदेवरायांचे सहस्रनाम चिंतन" या लेखाच्या प्रस्तावनेत केली आहे. तो भाग वाचकांनी अवश्य पहावा. तथापि येथे थोडक्यात त्याचे विवरण करतो.
नामावली किंवा नामावळी या संज्ञेचे दोन अर्थ निघू शकतात. एकाच नामाची आवर्तने यालाही नामावली म्हणता येते. परंतु त्यास नामजप अधिक श्रेयस्कर शब्द आहे. आणि अनेक नामांची केलेली गुंफण म्हणजे नामावली. नाम + आवली. आवली म्हणजे सूची (यादी हा आपला शब्द नाहीं.) म्हणून भगवंताच्या विविध नामांची सूची जेथे एकत्र बांधली आहे ती नामावली, हा उल्लेख विशेषत्वाने केला आहे.

एकोबांच्याच अभंगांचे उदाहरण घ्यायचे झाले तर, "सोपे जपता नामावळी। रामकृष्ण गोपाळ।। , सदा वाचे नामावळी । महा दोषा होय होळी।।, सोपी नामावळी। वाचे वदावीं सकळी ॥ अित्यादी. या अभंगांच्या चरणांमध्येंं नामावळी असा उल्लेख अनेक नामांची जंत्री या अर्थानेच आहे.

उत्तम खाद्यपदार्थाच्या सेवनाने पुन्हा त्याचा आस्वाद घेण्यास जशी जीभ चटावते नि आणखी हाव सुटते, त्याच प्रकारे सतत केलेल्या नामावलीचे चिंतन, उच्चारण याने त्या साधकाची जिव्हा त्या नामोच्चारासाठी का न चळावी ! 
कित्येक साधकांचा हा अनुभव असल की नेमाने एखाद्या स्तोत्राचा पाठ अथवा नामस्मरण केल्यानंतर त्याचेच चिंतन, मनन करीत राहिलो तर नकळत मुखामध्यें ते स्तोत्र, नाम, नामवली चालू होते. याचाच परिणाम मनुष्याच्या पातकांची होळी होण्यास पुरेसा आहे, याचे अभिवचन नाथ महाराज देत आहेत.

नामस्मरणाने मनुष्याच्या पातकांची होळी होते, ते भस्मसात होतात हा सत्य सिद्धांत नाथांच्या वाङ्‌मयामध्यें अनेक ठिकाणी आढळतो. भागवताच्या एकादश स्कंधटीकेमध्यें भगवंत उद्धवाला कीर्तन महिमा सांगताना नाथांनी भगवंतांच्या मुखी अशी ओवी घातली आहे की,  "सप्रेम संभ्रमाचे मेळीं । गर्जती नामाच्या कल्लोळीं । नामा सारिखी वाजे टाळी । जाहली होळी महापापां ।।" (१९ :२२२) : मोठ्या समारंभाचे वेळी आनंदाने प्रेमयुक्त नाम गजर करीत टाळ्या वाजवतात त्यांच्या महापापांची अक्षरश: होळी होते. "सकाम स्मरतां नाम। नाम पुरवी काम । निर्विकल्पें स्मरतां नाम । करी भस्म पापाचें || (१९:३२७) 'मनामध्यें काही कामना घरून केलेलें नामस्मरण हे ती कामनापुरती करून देते आणि निरिच्छ होत्साता केलेलें भगवत्स्मरण हे मनुष्याच्या पापांना भस्म करते'. हा कृष्णाने उद्धवास भक्तीचा मार्ग सांगितला.

भावार्थ रामायणामध्यें सुद्धा नाथांनी रामनामाची महती सांगताना बालकांडामध्यें म्हणतात: "नित्य स्मरता रामनाम । सकळ पातकां करी भस्म। चहूं पुरुषार्थांचे काम। होय सुगम हरिनामें ।।" (अ. १४:१४९) 'नित्य रामनामाचे स्मरण करता सगळ्या पापांचा समूळ नाश होऊन, धर्म- अर्थ- काम- मोक्षाचे द्वार या हरिनामामुळें विनासायास मोकळे होतात. त्यायोगे मनुष्याचे जीवन आनंदमय होते. पुढे सुंदरकांडात नाथमहाराज लिहितात: "नामासरसी वाजे टाळी । आशापाश होती होळी। नये कीर्तन समेळीं । रंगीं वनमाळी डुल्लत ||" (अ-२२:६६) 'नाम गाताना सोबत टाळी वाजता आशांचे पाश तुटून त्याची होळी होते. अशा तन्मयतेने नि विषयनिवृत्तीपूर्वक झालेल्या कीर्तनामध्ये स्वतः तो वनमाळी भगवंत रंगतो आणि डोलतो सुद्धा.'

कलियुगामध्यें मानवाकडून झालेल्या पातकांची होळी म्हणजे समूळ नाश हा एकाच साधनेने होतो ते म्हणजे भगवन्नामस्मरण होय. याचे अनेक संदर्भ देत, फलश्रुती सांगत नाथांनी तळमळीने उपदेश केला आहे. याचे कारण सुद्धा भगवंतच आहेत. 'अपि चेत्सुदुराचारो ..." हे लेखाच्या प्रस्तावनेत घेतलेले गीतावचन भगवंताचे ब्रीद सत्य करण्यासाठी संतांचा उपदेशातून पतितांचा उध्दार आहे. 

नामस्मरणाची थोरवी प्रत्यक्ष भगवंताने भगवद्गीतेत "यज्ञानां जपयज्ञोऽस्मि " गायली आहे. त्याशिवाय सगळ्या पुराणातूनही त्याचे महत्त्व वर्णन केले आहे. नारदपुरामध्यें एका श्लोकांत 'हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम् | कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा ॥ (१:४१:११५) की, कलियुगामध्यें केवळ श्रीहरिचे नाम श्रीहरिनाम, श्रीहरिचे नामच परमकल्याणकारक असून त्याशिवाय अन्य मार्ग नाहीं, नाहीं, नाहीं. या श्लोकात 'हरिनामा' आणि अन्य गति "नाही" याची त्रिरुक्ती केली आहे. त्यावरून नामस्मरणाची आत्यंतिक आवश्यकता दृष्टीस येते. 

गोस्वामी श्रीतुलसीदास यांनी श्रीरामचरितमानस या ग्रंथात म्हटले आहे: "कलिजुग केवल हरि गुन गाहा। गावत नर पावहिं भव थाहा। कलिजुग जोग न जग्य न ग्याना | एक अधार राम गुन गाना ||" : की, कलियुगात श्रीहरिची केवळ स्तुती गायन केल्याने मनुष्य या भवसागरातून थडी पार होतो.सत्ययुगातला योगमार्ग, त्रेतातील यज्ञयाग नि द्वापारातील अर्चन भक्ती या कलियुगामध्यें काही कामाचें नमून एका रामनामाशिवाय अन्य आधाराची आवश्यकता नाहीं. 
श्रीएकोबा म्हणतात: "नामपाठ कलीमाजी सोपे वर्म । । साधन तो श्रम न करी वाया ।। " या कलियुगात नामपाठासारखा सोपा उपाय नाहीं, ज्यायोगे भगवत्कृपा प्राप्त होईल . उगीच योग, याग, यजन या साधनांच्या मागे न लागता, व्यर्थ श्रम उपसण्यापेक्षा भगवद्भजनामध्ये तो काळ सत्कारणी लावा. 
श्रीज्ञानोबांनी हरिपाठामध्यें लिहिलेल्या अभंगाचे स्मरण होते. "योग याग विधि येणें नोहे सिद्धी। वायाची उपाधि दंभधर्म ।।" याचेही मर्म नामसाधनेचे श्रेष्ठत्व हेच आहे. 

अत: कलिप्रभावाची बाधा मनुष्यास होऊ नये आणि झालेल्या पातकांचीही होळी व्हावी म्हणून नाथ महाराज सहस्रनामाचे वा नामाचे नित्य अनुसंधान ठेवण्याचा उपदेश देत आहेत..

भगवंताची कृपा संपादण्यारसाठी हठयोगासारखा मार्गही अतिशय कठीण आहे असे एकोबा म्हणतात. 'नको ध्यान धारण आसन।'. भगवद्‌गीतेत भगवंत अर्जुनास सहाव्या अध्यायांत ध्यानयोग सांगताना अगदी आसन लावण्यापासून "शुचौ देशे प्रतिष्ठाप्य" ... "यतचित्तेन्द्रियक्रिय:" अभ्यास करावा, मग "समं कायशिरोग्रीव" करीत अन्यत्र न पाहता- "मच्चित्तो युक्त" होऊन - "युक्ताहारविहारस्य, युक्तस्वप्नावबोधस्य" असें नियम पाळून ''यदा विनियतमं चित्तम्" तो योगी "ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्रुते" अनुभवतो "स योगी परमो मतः ॥" सांगितले. त्यावर भरतश्रेष्ठ अर्जुन म्हणतो - "एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्सितिं स्थिराम् ॥, 'मन चंचल असून ते नित्यस्थिर राहिल असे मला वाटत नाहीं. 

अर्जुन हा गतजन्मीचा नारायणासमवेत बद्रीकाश्रमांत तप करणारा नर. या नरोत्तमाला, ज्याला भगवंतही गुडाकेश म्हणजे निद्रेवर ज्याने विजय मिळवला म्हणतात अशाने हा आसनादीध्यान योग कठीण वाटावा ! भगवंतानेही चंचल मन आवरण्यास कठीण आहे याच स्वीकृती दर्शवली तयापि लगोलग "अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृहयते ॥" - अभ्यास आणि वैराग्याने ते हस्तगत करता येते हे सांगितले.
एकोबांनी 'नको ध्यान धारण आसन' हे चरण का घातले आणि 'वाचे सदा नारायण' असें का म्हटले याचे थोडे विवेचन करु. 

योगसूत्रदर्शनामध्ये आठ अंगांचा योग सांगितला आहे. त्यामध्यें -
१} यम- अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह,
२} नियम - पावित्र्य, संतोष, तप, अध्ययन, ईश्वरभक्ती.
३} आसन- सिद्धासन, पद्मासन, भद्रसन, सिंहासन इत्यादी. 
४} प्राणायाम, त्याचे प्रकार.
५} विषयाचा लय करून चितात इंद्रिये स्थिर करणे तो प्रत्याहार 
६ } त्या विशिष्ट ठिकाणी चित्त स्थिर ठेवणे ती धारणा. 
७} त्याठिकाणी एकतेचा प्रत्यय आल्याने ध्यान सिद्ध होते.
८} ध्यान करीत आहोत हे विसरणे ती समाधिस्थिती. 

खरे पाहतां एकेका वाक्यात ही आठ सूत्रे सांगणे केवल दुष्कर आहे. त्यातील पहिली पाथरी यम आणि त्याचे पांच प्रकार हे कलियुगांत सामान्य गृहस्थाला किंवा ब्रह्मचर्याला सुद्धा अतिशय दुर्गम आहेत. यातील अहिंसा याविषयीं बोलायचे झाले तर, सांसारिक मनुष्य रोज पांच प्रकारची पापे करीत असतो, त्याला कौटिल्य अर्थशास्त्रात "पंचसूनादोष" म्हटले आहे. त्यामध्यें उखळीत कांडणे, जात्याने दळणे, चुलीमध्यें अग्नी सिद्ध करणे, पाणी उपसणे आणि सुपाने पाखडणे हे पांच दोष किंबहुना हिंसा मानले आहेत.
आता प्रत्यक्ष आपण ते करीत नसलो तरी स्वार्थासाठी या गोष्टी आधी झालेल्या आहेत नि त्याचा दोष आपल्याला लागतो. कारण त्याचा उपभोग आपण घेत आहोत. या पंचसूनादोषांच्या परिमार्जनाकरीता "वैश्वदेव' ही संस्था निर्माण झाली. त्या वैश्वदेवाच्या अग्नीमध्यें या दोषनिवृत्ती करीता आहुत्या देणे असून त्यातून पापमुक्तता आहे. आपण तेही करीत नाहीत. मग ध्यानाच्या पहिल्या पायरीवरच जर आपण अनुत्तीर्ण असू, तर तो योग साधणार कसा? मग बाकीचे यम आणि नियम याची वार्ताच नको!

म्हणून कलियुगात विशेषत्वाने सामान्य गृहस्थांना योग प्रशस्त नाहीं, मात्र नियमानुसार योगयुक्त होत्साता हा ध्यानयोग कुणी साधला नाही का? तर असे नव्हे. आजही असें योगी आहेत. तसे नसते तर स्वतः नाथांनी त्या व्यापाऱ्यास आसन शिकवले नसते. आणि जर नाथांनी तो त्यास शिकविला तेव्हां नाथांची योग्यता काय असली पाहिजे याची कल्पना करावी ! आणि यातला मुख्य भाग म्हणजे केवळ आरोग्य व्यवस्थित राहावे हा विचार करून कसरती करण्याकरीता त्यांनी आसनादी ध्यान शिकवले नाहीं. तर त्यांचा उद्देश त्याला भगवंताची कृपा प्राप्त व्हावी हा होता. भागवतातही प्रत्यक्ष भगवान् यमनियमांचे पालन करणाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार फल देतात असे वचन आहे! "यथाकामं दुहन्ति हि।" (११:१९:३५)

प्रस्तुत अभंगाच्या दुसऱ्या चरणांत आसनादी ध्यान इत्यादी कशाचाही अवलंब न करता केवळ 'वाचे सदा नारायणा' हा एकेच नेम धरून तो नेटाने करणाऱ्याचे भाग्य मेरुपर्वता एवढे थोर आहे असे एकोबा म्हणतात.

गोकुळातल्या गोपबालकांनीतरी कुठे योग साधना केली होती. तरीही स्वतः ब्रह्मदेवाला त्या गोपाळांचा हेवा वाटून म्हणावेसे वाटले की जो यज्ञयागयोगाने ऋषी मुनींना गवसला नाहीं तो परब्रह्म या गोपाळांसमवेत खेळातो! म्हणून मनुष्याला साधे सोपे नामस्मरण हे साधन सर्वोत्तम आहे. श्रीज्ञानोबांही म्हणतात; "म्हणोनी यम नियम प्राणायाम प्रत्याहार आटणी । वाउगाचि बांधोनि सिणसी कां पां ||"
नामधारकाला दुसरी उपमा नसून तो प्रत्यक्ष जनार्दन समजावा असें नाथ महाराज म्हणतात नि अशा लोकांची संगती सदैव घडो ही मागणी अखेरी करतात. "नामाचे धारक विष्णुरूप देख | त्रिभुवनीचे सुख तथे ठायीं ॥" नामधारकांना एकोबांनी विष्णुरूप म्हणून गौरवून असें साम्य दर्शक त्रिभूवनाचे सुख त्यांच्या ठिकाणी वसते याची साक्ष देतात.

अत एव या कलियुगात नामावळी, मगती चोवीस असो वा अष्टोत्तरशत असो वा सहस्र असो त्याची परिणीती अिश्वरकृपेतच आहे. याचा नाथांनी प्रत्यक्ष प्रत्यय घेऊन मग तो उपदेशिला आहे. 
"चिंतातुर मन नसावें कदा काळी । हृदयी नामावळी जप करी ॥ श्रीअनंत माधव गोविंदा । हाचि जप सदा चिता माजीं ।।
वारंवार चिंतावी देवाची पाऊलें। जेणे जन्मजालें उकललें ।। 
एका जनार्दनी आलासे प्रत्यक्ष । सर्वभावें गाय नाम त्याचें ।।


समारोप : भगवंतांची परम कृपा म्हणजे अद्वैत अवस्थेतील ब्रह्मज्ञान. ती प्राप्त होते भक्तीने, नि ती साधण्याकरीता नवविधा भक्ती वर्णिली आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनं । अर्चनंवन्दनं दाख्य सख्यमात्मनिवेदनम् ॥ (भागवत) या नऊ प्रकारच्या भक्ती साधनेमध्यें समस्त लोकांना अत्यंत सुलभ उपासना पद्धत आहे नामस्मरणाची. त्याचा महिमा स्वतः भगवताने नारदांना सांगितला. महर्षी नारदांनी श्रीनारायणांना विचारले की, प्रभु! आपले नेमके निवासस्थान कुठे आहे? त्यावर भगवद्वचन असें आहे : "नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृदय नवै । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद । " (पद्मपुराण) 'नारदा! मी ना वैकुण्ठामध्यें राहतो ना योगिजनांच्या हृदयांत. जेथे माझे भक्त माझी स्तुती गातात, मी त्याच्यामध्यें वसतो.'
विष्णुसहस्रामध्यें भगवंताचे एक नाम आहे (९२२) "पुण्यश्रवणकीर्तन" की भगवंताच्या लीलांचे श्रवण आणि त्यासमवेत केलें जाणारे कीर्तन हे पवित्र करणारे आहे असा. भगवंत स्वतःच स्वताच्या गुणांचे श्रवण व कीर्तन कसें करणार ? कारण ही सगळी नामे भगवताचे गुणधर्म सांगणारी आहेत. याविषयीं नामरूपी व्याख्या आधी येथून गेली आहे. "ज्याची स्तुती केली जाते आणि ती करणारा हाही तोच म्हणजे (६८३) "स्तोता". होय. म्हणून भक्त हे सुद्धा भगवंताचेच स्वरुप आहे. 

परमात्मा आणि जीव याचे अद्वैत साध्या नामजपाने साधते अशी श्रीज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रत्यक्ष भूदेवाने साक्ष देथून सांगितले, तेथे आपली बुद्धी व्यर्थ किन्तु परन्तु करण्यात खर्च का करावी? ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान किंवा नाम, नामस्मरण आणि नामधारक या त्रिपुटीचा लय नामजपानेच होऊन "हेचि त्रिपुटीचे छेदक। हेचि भवार्णवतारक। हाचि शंकराचा विवेक । रामकृष्ण चोखडे ।।"  हा उपदेश केला आहे. 

म्हणूनच गोपबालकांसमवेत खेळणारा कृष्ण निराळा नसून त्या गोपाळांच्या रूपांत आणि वासरांच्या देहात कृष्णच होता. कृष्णाची लीला पाहण्याच्या मोहात त्या कृष्णालाच कोड्यात पाडणारा ब्रह्मदेव हाही परमात्मा कृष्णाचा अंश नाहीं का? यासंबंधी कथा आपण प्रस्तावनेत पाहिली.

श्रीएकनाथ महाराज यांचे विष्णुसहस्रनाम चिंतन या विषयाचा बिंदु नाममाहात्म्यच आहे. तो सहस्रनामाच्या अपेक्षित वलयांत कदाचित बसला असेल-नसेल: पण नामाशिवाय अन्य चर्चा झाली नाहीं
सुरुवातीस जो कथा भाग घेतला त्याचे कारण हरिकथेशिवाय नाम शकत नाहीं आणि जेथें नाम तेथें हरिकथा फुलासोबत सुगंध यावा या न्यायाने येते. "सप्रेम नाचोनि वाजवा टाळी। गर्जा हरिकथा नामावळी ।।" 
तसेच भावार्थ रामायणात नाथमहाराज म्हणतात: "ऐसी हे तुझी निजकथा। पावन करी लोकां समस्ता | असो कथानुवादवार्ता | नाम स्मरता निजमुक्ती ॥ (बा.१४:१४८) भगवंताची कथा आणि नाम हे मानवाच्या परमोच्च आनंदाचे म्हणजेच मुक्तीचे सहज सोपे साधन स्वतः भगवंताने निर्माण करून ते ऋषी- आचार्य- संत- महात्म्यांनी आपल्या कल्याणाकरीता मुक्तहस्ते दिले आहे हे निश्चित समजावे. 

लेखारंभी भगवान् श्रीकृष्णाने त्याच्या सवंगड्यांसमवेत कालिंदीतटी केलेली वनभोजनाची योजना. त्या वनभोजनाचा बाळ गोपाळांनी केलेला काला, त्या काल्याचे नाथांनी नामस्मरणांत केलेलें भाव मधुर रूपांतर, पुढे ब्रह्मदेवाच्या मायेला गुंगवून त्या काळाचा कृष्णाने केलेला काला आणि त्यामध्यें गुंफलेले विष्णुसहस्रनाम चिंतन! हा हरिकथा आणि नाम महात्म्याचा मेळावा होय

भीष्मांनी ज्या "नामपाठामुळे" स्वतः बरोबर सगळ्यांच्या उद्धाराचा मार्ग मोकळा केला त्या "नामावळीचा" म्हणजेच विष्णुसहस्राचा हा विवेचनात्मक लेख श्रीएकनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करतो.

- अनिकेत घिवलीकर, मुंबई


विशेष आभार :
श्री. सागर दाबके गुरुजी
श्री. वैभव महाराज जगताप
श्री. घनश्याम गोसावी. 

Comments

Chetan said…
अप्रतिम 🙏🏻
अनेक आभार तुझे चेतन 😊

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १