श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग : २

 


अभंग :१)


केशव म्हणतां क्लेश जाताती परते । त्याहूनि सरतें आणिक नाहीं ।।
वेद का पढसीं शास्त्रें कां शिणसीं । उखंड वाचेसी हरि म्हणा ॥
याहूनि पै सार नाहीं हो दुसरें । भीष्मे युधिष्ठिर  उपदेशिला।।

नामा म्हणे धरा केशवीं विश्वास । तुटे गर्भवास नामें के ॥

भावार्थ :

भगवान् श्रीकेशवाचे नामोच्चार करतांच मानवाच्या दु:खाचे हरण होते, अशा नामाच्या तुल्यबळा अन्य काहीं नाहीं. वेदशास्त्रांचे पठण करण्यात शक्ती का वाया दवडतो? त्या ऐवजी मुखाने हरिनामाच्या घोष करा. हाच उपदेश भीष्मांनी युधिष्ठिरास केला, की हरिनामाशिवाय दुसरे साधन नाहीं, ज्यामध्यें सगळ्या शास्त्रांचे सार सामाविलेले आहे. नामदेवराय म्हणतात, केशवाप्रती आपल्या हृदयांत विश्वास ठेवा, तोच जन्ममरणाच्या फेऱ्यातून तुमची मुक्तता करेल.

विवरण :-  

या अभंगाचे मर्म नामदेवरायांच्याच वचनाचा आधार घेत म्हणावयाचे तर "नाम घेतां भगवंताचे । पाश तूटती भवाचे॥" या आशयाचे आहे. नामोच्चार, नामस्मरण, नामसंकीर्तन या साधनेद्वारें मनुष्याचे कोटकल्याण आहे असें सगळ्या संत, ऋषी-मुनींनी म्हटले आहे. अगदी श्रीशंकराचार्यां- सारख्या अद्वैतमार्गी विभूतीमत्व महापुरुषानेही. याशिवाय अन्य मार्ग नाहीं असें श्रीनामदेव महाराज या अभंगातून उपदेश करीत आहेत.

श्रीएकनाथ महाराजांच्या संध्येतील चोवीसनाम अभंगात "केशव"  या नामाचे महात्म्य सांगताना म्हणताता : "नामपाठ केशव वदा नित्य वाचे। सार्थक देहाचे सहजासहज॥" वाणीद्वारें केलेल्या 'केशव' या नामाचा नित्य उच्चार मानवदेहाचे सार्थक सहज घडवून आणते.
'केशव"  (वि.स. ६४०) या नामाचें शांकरभाष्यानुसार विवरण असें आहे, केशसंज्ञिता: सूर्यादिसङ्‌क्रान्ता अंशवः तद्वत्तया केशव: | की, सूर्यादितारकांमध्यें व्याप्त किरणांना 'केश' म्हटले जाते; अशा दिव्यतम किरणांनी युक्त भगवान् हा केशव या नामाने ओळखला जातो. महाभारताच्या शांतिपर्वात भगवंत स्वतः केशव नामाची व्युत्पत्ती सांगतात: "अंशवो ये प्रकाशन्ते ममते केशसंशिताः । सर्वाज्ञाः केशवं तस्मान्मामाहुर्दिजसत्तमा:।।" (३४१) - [अर्जुना ] समस्ता जगाला प्रकाशित करणारे सूर्य, चंद्र व अग्नि यांचे जे किरण ते माझे केश असल्यामुळें द्विजोत्तमांनी मला 'केशव' हे नाम दिलें.
केशव या नामाचा गर्भितार्थ 'किरण' असा असल्याने "तमसो मा ज्योतिर्गमय" या न्यायाने भगवंताच्या तेजाने अंधःकार विरून जातो. म्हणजेच केशवाचे नामस्मरण करतो क्लेशदायी मनस्ताप नष्ट होतात.
(२३) केशव या नामाचा अजून एक अर्थ असा आहे की ज्याने केशीनामक दैत्याचा वध केला तो केशव. अर्थात दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा, क्लेश हरण करणारा केशव होय.

पद्मपुराणांत राजा ययातीने त्याच्या दूतांना पृथ्वीवर भगवंताच्या नामामृताचा प्रसार करण्याची आज्ञा दिली अशी कथा येते. त्यात जे स्तोत्र आले आहे त्याची त्याची सुरुवात: "श्रीकेशवं क्लेशहरं वरेण्यमान्यन्दरूपं परमार्थमेव ।". त्याचा अर्थ:  भगवान् श्रीकेशव समस्तांचे दु:ख दूर करणारे, सर्वश्रेष्ठ, आनन्दरूप तथा परमार्थतत्त्व आहेत. त्यांचे नाममय अमृत सगळ्या दोषांचे निरसन करणारे आहे.
इतकें सामर्थ्य या नामामध्यें असल्याने "त्याहून सरतें आणिक नाहीं ।।" नामदेवरायांचे वचन ओघाने सार्थ होते.

अभंगाचा दुसरा चरण फार काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. कारण त्यातील अंतस्थ हेतु लक्षांत न घेता केवळ वाच्यार्थ घेतला तर कदाचित गोंधळ होण्याचा संभव आहे. नामदेवराय म्हणतात: "वेद कां पढसी शास्त्रें कां शिणसी ।।" याचा ढोबळ अर्थ - वेदादी शास्त्रे शिकून वृथा कष्ट उपसण्याचे कारण नाहीं असा होतो. त्यापेक्षा "उदंड वाचेसी हरि म्हणा॥" मुखाने सतत हरिस्मरण करा. परंतु हे एवढे सरळ आहे असे मला वाटत नाहीं. कुठल्याही संतांनी कशाही पद्धतीने वेदशास्त्र पुराणांना कमी लेखले नाहीं. हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे. ऋषीप्रणित वेदा परंपरेचा सार्थ अभिमान त्यांनी बाळगला हे निराळे सिद्ध करून दाखण्याची आवश्यकता नाहीं. कारण भागवत किंवा वारकरी सांप्रदाय हा सनातन वैदिक परंपरेचाच भाग आहे. वेद, उपनिषद, शास्त्रवचने यांतील तत्त्वज्ञान सामान्यांना पटवून देण्याकरीता भक्तीचा सुलभ मार्ग त्यांनी स्वीकारला आणि त्यातील भगवद्भक्तीचाच प्रसार केला. नामदेवराय त्यांच्या उपदेशात्मक अभंगात म्हणतातः "अभ्यासिले वेद झाला शास्त्र बोध। साधिल्या विविध नाना कळा । प्रेमाचा जिव्हाळा जवं नाहीं अंतरीं। तव कैसा श्रीहरि करील कृपा॥" : चारही वेदांचा अभ्यास केला, शास्त्रांचा बोध प्राप्त करून घेतला. नानाविध कलांमध्ये पारंगत झाला; परंतु जो पर्यंत अंतरंगात जिव्हाळा प्रकट होत नाहीं तोपर्यंत श्रीहरिची कृपा कशी प्राप्त करू शकाल ?

श्रीज्ञानदेवांनीही हरिपाठाच्या अभंगात म्हटले आहे. "चहूं वेदीं जाण साहीं शास्त्र कारण | अठराही पुराणें हरिती गाती ।। मंथुनि नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥ :
चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे ही भगवान् श्रीहरिचीच लीला गातात. या सगळ्या विद्यांचे मंथन केलें असतां एक श्रीहरिचेचनाम लोणी हाती लागते नि इतर सगळी साधनमार्गादी विद्या व्यर्थ ठरून त्याचा भारी नाद करूं नये. आणि पुढे "हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा" या नामघोषाची द्विरुक्ती ज्ञानेश्वर महाराज करतात. याच आशयाचे वचन नामदेवरायांनी दुसऱ्या चरणात घेतले आहे.


हा अभंग वाचताना श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी रचलेल्या "चर्पटपञ्जरिका" स्तोत्राचे प्रकर्षाने स्मरण झाले. "भज गोविंदम्" या नांवानेही हे स्तोत्र प्रसिद्ध आहे. पूर्ण स्तोत्रात श्रीशंकराचार्यांनी दृश्य जगत् किती नश्वर आहे हे पटवून देत मंदबुद्धिचे लोक त्यामागे पळत स्वत:चा सर्वनाश करून घेतात तरीही त्यांना हरिचे स्मरण होत नाहीं याचा पाढा लिहिला आहे. दोषांची जाणीव करून देत आचार्यांनी गोविंदाचे नित्य भजन हाच एक तरणोपाय या स्तोत्राद्वारें उपदेशिला आहे.

हे स्तोत्र रचण्यामागची पूर्वपीठिका रंजक आहे. श्रीशंकराचार्य काशी क्षेत्री गंगेकाठी असताना एक अत्यंत वृद्ध मनुष्य संस्कृत व्याकरणातील धातुचे एक रूप घोकित बसलेला पाहिला. अंतकाळ जवळ येऊन ठेपला असतं भगवंताचे स्मरण करण्याऐजी हा कालापव्यय करीत आहे हे पाहून ते म्हणाले "प्राप्ते सन्निहिते मरणे। न हि न हि रक्षति डुकृञ करणे। भज गोविंद भजगोविंद गोविंदं भजे मूढमते।।" हे अज्ञानी मनुष्या, मृत्यु जवळ आला असताना डुकृञ घोकून तुझे रक्षण होणार नाहीं. तोच वेळ गोविंदाचे स्मरण करण्यात सत्कारणी लाव, तोच तुझी पुढची गती सुलभ करणार आहे.
'वेद को पदसी शास्त्रें कां शिणसी । उदंड वाचेसी हरि म्हणा।" या नामदेवरायांच्या अभंगातील चरणांचे मर्म आचार्याच्या श्लोकांतून समजू शकते.

तिसरा चरण विवरणाकरीता शेवटी घेतो. त्याआधी अभंगाच्या अंतिम चरणांत नामदेवशय काय म्हणतात ते पाहू. त्यानुसार वर नमूद केलेल्या स्तोत्राच्या आधारे त्यातील भावार्थ अधिक स्पष्ट करता येईल.
नामदेवराय म्हणतात - "नामा म्हणे धरा केशवीं विश्वास। तुटे गर्भवास नामें एके॥" मनुष्याच्या चंचल स्वभावाची पूर्ण कल्पना नामदेवरायांना असल्याने आग्रहपूर्वक ते भगवंतांवर विश्वास ठेवण्यास सांगत आहेत. आचार्यांनी चर्पटपंजरीकस्तोत्रांत मनुष्य कुठकुठल्या अशाश्वत वस्तुंच्या मागे लागून, आहारी जाऊन स्वतःचे अकल्याण करून घेतो त्याची श्लोकातून जंत्री मांडली आहे. ते म्हणतात धनाचा अतिहव्याय नसावा, संतोषाने जगावे, पैसा केवळ सुखाचे साधन नाहीं, नातीगोती हे मोहाचे कारण, आयुष्य सरत चालले तरी आशा सुटत नाहीं. परंतु त्यातून सुटका करावी. काळाची पुनरावृत्ती होते तशीच आशा आहे. संसारचक मोडणे आवश्यक आहे. ढोंग करू नये, संपन्नता आहे तोपर्यंत भोवती आप्त असतात. वयाने जर्जर झाल्यावर कोणी विचारीत नाहीं. बालपणी, तारुण्यात तथा वृद्धावस्थेत आपल्या धुंदीत राहिले. परंतु भगवद् स्मरण विसरले. शरीर दुर्बल झाले तरी आशेचा पाश सुरत नाही, जटाभार वाढवून अंगाला भस्म फासून
पोटासाठी नाना सोंग घेऊन केवळ दांभिकता वाढते, अहंकार बळावतो. विषय भोगाची, आसक्तीची वास्तविकता आचार्य परखडपणे दाखवितात. तथापि विषयांपासून निवृत्ती कशी करावींं तेही त्यांनी सांगून ठेवले आहे. अहंकाराला तिलांजली द्यावी, षड्‌रिपूंचे निवारण करावें, ज्ञानार्जन करावें, जन्माला येण्याचे खरे कारण शोधावे, त्यातच स्वतःचा अभ्युदय आहे हे जाणावे, सर्वत्र ऐक्यभावाने पहावें. असें आचार्य अपदेश करतात.
भगवंताचे चिंतन करण्याविषयी ते म्हणतात: "प्राणायामं प्रत्याहारं । नित्यानित्य - विवेक विचारम् | जाप्यसमेत समाधिविधानं । कुरू अवधानं महदवधानम् ॥" : प्राणायाम, विषयांपासून परावृत्त म्हणजे प्रत्याहार याला जोड योग्यायोग्याचा विचार आवश्यक आहे. तथा भगवंताच्या नामाचा जप करीत समाधी अवस्था साध्य करून घ्यावे, तेथे अत्यंत सावधानता पाळावी. पुढे म्हणतात: "भगवद्गीता किंचिदधीता । गंगाजल- लवकणिका पीता । सकृदपि येन मुरारी समर्चा । क्रियते तस्य यमेन नच न चर्चा ||" भगवद्गीतेचे थोडे वाचन, गंगादी पवित्र नदींचे मीठाच्या कणा एवढेतरी तीर्थ प्राशन, श्रीकृष्णाचे पूजन घडले तर त्यास यम सुद्धा त्रास देऊ शकत नाहीं, अशी ग्वाही आचार्य देताहेत.

आचार्यांनी 'अवधान' हा शब्द विशेष योजिला आहे. जीवनांत सदैव सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे हेच ते दर्शवितात. श्रीज्ञानेश्वरीतही  "तरी 'अवधान' एकले दिजे। मग सर्वसुखासि पात्र होईजे। हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका।। (९.०१) असें ज्ञानोबा सांगतात, की "श्रोते हो! आतां सावधपणे लक्ष द्या, जेणे करून (मी पुढे जे सांगणार आहे त्याचे श्रवण करून) तुम्ही सर्व सुख मिळवू शकाल, हे मी प्रतिज्ञापूर्वक मांगतो.
श्रीसमर्थ रामदास स्वामींचाही 'अवधान' किंवा 'सावधान' या शब्दावर अधिक भर असत "ऐसी श्रोत्यांची आशंका । वक्ता म्हणे चळों नका । 'सावध' होऊन ऐका। निरूपण ।।"   ( दा.१०:०१:११). श्रोत्यांनी नि:शंक मनाने, चंचल न होता, सावधता बाळगून वक्त्याकडून भगवद्निरुपण ऐकाअसत, असें म्हणाले. 

सांसारिक जगाप्रमाणें अध्यात्मक्षेत्रातही 'अवधान' किती महत्त्वाचे हे वरील वचनामधून जाणवते. किंबहुना अध्यात्मात त्याची आवश्यकता अधिकच.

या लेखाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा श्लोक म्हणजे: 'गेयं गीता
नामसहस्रं । ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम्।"
हा होय. याचा अर्थ
भगवद्‌गीता आणि विष्णुसहस्रनामाचे सतत गायन करावें, विष्णुच्या स्वरूपाचे ध्यान करावें अशी आचार्य 'मूढ जनास'  जणू उपासनेची दीक्षाच देतात.
यातील 'गेयं गीता नामसहस्रम्' याचा विचार कला असता नामदेवरायांच्या प्रस्तुत अभंगामध्यें "याहूनि पै सार नाहीं हो दूसरें ।" या वचनाचा प्रत्यय येतो. भगवद्‌गीतेसारखे नवनीता समान तत्त्वज्ञान आणि त्याला भगवन्नामाचे इंधन चित्तशुद्धीसाठी अत्युत्तम साधन होय.

महाभारताचे युद्ध झाल्यानंतर भीष्मांच्या दर्शनाकरीता गेलेल्या पांडवांना, विशेषत: राजपदी बसलेल्या युधिष्ठिरास त्यांनी प्रदीर्घ उपदेश कोला. त्याचे साद्यंत वर्णन अनुशासनपर्वात केलें आहे. परंतु सगळ्या उपदेशाचा कळसाध्याय जर कुठला असेल तर भगवान् श्रीगोपाळकृष्णा सन्मुख भाष्माचार्यांनी वाणीद्वारें प्रकट केलेलें 'विष्णुसहस्रनाम' यासारखे दिव्यस्तोत्र जे भगवद्‌गीतेचेही सार आहे.
नामदेवराय पुढल्या चरणांत म्हणतात: 'भीष्मे युधिकिर उपदेशिला ।"

विष्णुसहस्त्रनामस्तोमाच्या आरंभी भीष्म- युधिष्ठिर संवादात जे प्रास्ताविक श्लोक आहेत त्यामध्यें युधिष्ठिरराजाने पितामह भीष्मांना सहा प्रश्न केलें. त्याची उत्तरे भीष्माचार्य देतात. मग सहस्रनामावलीला प्रारंभ होतो. काही लेखांमध्यें मूळ संस्कृत श्लोक आणि त्या अर्थ दिला असल्याने येथे केवळ प्रश्न - उत्तराचे समाधान मराठीत देत आहे.
१) या लोकांत एकमेवम दैवत कोणते?
  - अत्यंत पवित्र नि मंगल, देवांचेही देव, सर्वभूतांचा सनातन पिता विष्णु.
२) परम पद कोणते?
  - परम ब्रह्य हे परमपद.
३) कुणाची स्तुती करावी?
  - लोकांचा अधिपती विष्णुची.
४)  कुणाचे अर्चन करावे?
  - सर्वलोकांचा महेश्वर विष्णुचे
५) परम धर्म कोणता ?
  - भगवंताचे स्तवन पूर्वक पूजन
६) कशाच्या जपाने जन्ममृत्यु लय पावेल?
  - सहस्रनामाच्या स्तवनाने.

भीष्माचार्यांनी अतिशय स्वच्छ आणि नेमकेपणाने धर्मराजास उत्तरे देऊन त्याचे शंका निरसन केलें. भगवान् श्रीविष्णुच्या महात्म्याचे स्तवन, पूजन, नामस्मरण, नमस्कार इत्यादी समस्त मानव जातीला मोक्षपद देणारे आहे. हाच कल्याणाचा मार्ग होय. या उपर ना कुठला धर्म म्हणजे कर्तव्य मोठे ना अन्य कर्म. विष्णुपद हेच सगळ्याचे एकमात्र गंतव्य स्थान सांगताना भीष्माचार्य म्हणतातः  तस्य लोक प्रधानस्य जगन्नाथस्य भूपते । विष्णोर्नामसहस्रं मे श्रृणु पापभयापहम् ॥ "त्या परमेश्वरापासून निर्माण झालेले विश्व म्हणून लोकप्रधान, जगाचा नाथ, पृथ्वीचा पति अशा विष्णुचे सर्वपाप तथा भय दूर करणारे सहस्रनाम माझ्याकडून ऐक".

हे सहस्रनाम कसे आहे ? तर, "यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः । ऋषिभिः परिगीतानि तानि  वक्ष्यामि भूतये ।।" भीष्मा धर्मराजाला म्हणतात," ही नामें विष्णुचे महात्म्याचे विशेष गुणांचे स्वरूप सांगणारी, वेळोवेळी ऋषींनी गायिली आहे. जी श्रवणाद्वारें कल्याण करून घेण्यासाठी मी सांगता है.

श्रीमन्मध्वाचार्यांच्या भगवद्‌गीतातात्पर्य या भाष्यग्रंथामध्यें ते म्हणतात- "शास्त्रेषु भारतं सारंतरतत्र नामसहस्रकम् । वैष्णवं कृष्णगीता च तज्ज्ञानात् मुच्यतेऽञ्जसाः ॥" या श्लोकाचा अर्थ असा की, समस्त शास्त्रांचे सार हे महाभारतामध्यें सामाविले आहे, तेच भगवद्गीता आणि विष्णुसहस्रनाम हे महाभारताचे सार होय. ही दोन साधने साधकास मोक्षपदांस घेऊन जाणारे आहेत असें ज्ञानी तज्ञांचे प्रतिपादन आहे.

राजा युधिष्ठिराने भीष्मांना विचारलेला शेवटचा प्रश्न हा आजतागायत सगळ्या साधकांना पडतो आणि त्याचे उत्तर आचार्य, संत, साधुजनांनी त्यांच्या वाङ्‌मयात जे लिहून ठेवले तेच अंतिम सत्य, किं "जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धनान् ।" हे पितामहा! कशाचा जप केल्याने प्राणिमात्रांची जन्ममरणाच्या चक्रातून मुक्तता होईल ? तर त्याचे उत्तर एकच "स्तुवन्नामसहस्रेण पुरुषः सततोत्थितः ॥" जो मनुष्य सदैव उत्साहपूर्वक विष्णुसहस्रनामाचे स्तवन करतो, तो पाशमुक्त होतो.

असें त्या सहस्रनामातील 'केशव' हे नाम श्रीनामदेवराय मनुष्याला त्याच्याच कल्याणाकरीता कंठी धारण करावयास उपदेश करतात. ज्यायोगे "तुटे गर्भवास नामें एकें।", जे आचार्यांच्या चर्पटपंजरीस्तोत्रातही नमूद आहे. "पुनरपि जननं पुनरपि मरणं । पुनरपि जननी जठरे शयनम् । अिह संसारे खलु दुस्तारे। कृपयापारे पाहि मुरारे।।" की, जन्म-मृत्युच्या अव्याहत फिरणाऱ्या चक्रात मुक्ती नाहीं. वासनेपायी आईच्या उदरांत पुन: जन्माला येणे आणि मरणे हे दुःखाचे कारण होय. त्यातून सुटक केवळ भगवंताच्या कृपमुळे होऊ शकते. त्यासाठी काय करावयाचे तर, नामदेवराय म्हणतात  "केशव म्हणतां क्लेश जानाती परते", ज्ञानोबा म्हणतात- "हरिमुखे म्हाणा हरिमुखे म्हणा" नि श्रीशंकराचार्य अपदेशितात- "भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते |"
नामदेवरायांचा या धर्तीवरचा अजून  एक अभंग आहे. त्याचे पहिले चरण "केशव म्हणतां जासी केशव दथे। त्याहून सरतें आणिक नाहीं।।" असें असून बाकीच्या चरणांचा आशय विवरणाकरीता घेतलेल्या अभंगासारखाच आहे.


आजन्म भगवद्स्मरण करणे हेच सार किंवा मर्म नामदेवराय या अभंगाद्वारें साधकांना निवेदन करतात.


अभंग २: 

निर्गुणाचे वैभव भाले भक्तिमिषें । ते हें विठ्ठल वेषे ठसावलें ।। 

बरविया बरतें पाहतां नित्यनवें । हृदयीं ध्यातां निवे त्रिविधताप ॥

"चोविसां वेगळे सहस्रां आगळें । निर्गुणा निराळें शुद्धबुद्ध।।"

वेदं मौना पडे श्रुतीसीं कां नडे | वर्णितां कुवाडें पुराणांसी ॥ 

भावाचें आळुक भुललें भक्तिसुखें । दिधलें पुंडलिकें सांधूनियां ॥ 

नामा म्हणे आम्हां अनाथा लागुनी। निडारले नयनीं वाट पाहे ॥


भावार्थ : 

निर्गुण परमात्मा श्रीविठ्ठलाच्या स्वरूपांत भक्ताच्या मोहाने स्थित झाल, नित्यनुतन स्वरूपाकडे पाहतां सुख होते नि हृदयामध्यें त्याचे ध्यान करतां त्रिविधताप निवळतात. पांडुरंग हा चोवीस नामांहून वेगळा आणि सहस्रनामांनी परिपूर्ण असून निर्गुणापेक्षाही शुद्ध ज्ञानस्वरूप आहे. वेदांना त्याचे वर्णन न करता आले म्हणून मौन पाळले, तर श्रुतींनाही तो अगम्य आहे. पुराणांना त्याचे वर्णन करताना कोडे पडले. भावाचा भुकेला भगवंत भक्ति सुखाला भुलला नि पुंडलिकाच्या निमित्ताने तो आपल्याला प्राप्त झाला. नामदेव महाराज म्हणतात आम्ही अनाथ भक्तांसाठी डोळे भरून वाटत पाहतो.


विवरण : 

श्रीतुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात: "निष्ठुर तो दिसे निराकारपणे। कोवळा सगुणें प्रतिपाळी॥" की, परमेश्वर हा निर्गुण, निराकार, अव्यक्त अवस्थेत फार कठोर वा निष्ठुर भासतो. पण तोच सगुणांत आला म्हणजे कोमल रूपांत दिसून भक्तांचा प्रतिपाळ करतो. श्रीमच्छंकराचार्य यांनी "परापूजा स्तोत्रात" त्या ईश्वराचे मूळ स्वरूप वर्णन करताना म्हटले आहे. "आनन्देसच्चिदानन्दे निर्विकल्पैकरूपिणि। स्थितेऽद्वितीयेभावेवै कथं पूजाविधियते ॥ -तो परमात्मा कसा आहे तर, ज्याच्या ठिकाणी केव्हांही दुःखाचा लवलेश

नसतो, तो सत्य - चिद् - आनंद स्वरूप होय. त्यासमान चिदानंदरूप अन्य अिश्वर ब्रह्मांडात नसल्याने, भावरूपाने व्याप्त असल्याने तो अद्वैत आहे. अशा निराकार, निरव्ययाची मुर्ती कशी असेल आणि त्याची पूजा तरी कशी करावी !"


निर्गुण ब्रह्माची उपासना सामान्य जनांना अत्यंत कठीण आहे. त्यासाठी गुरुच्या मार्गदर्शनासमवेत स्वत: ची साधन करण्याची मानसिकता उच्च असावी लागते. त्याशिवाय ब्रह्माचे शाश्वत स्वरूप ध्यानांत येऊ शकत नाहीं. अशी क्लिष्ट उपासना करणारे, ब्रह्मतत्त्व यर्थाथपणे सांगणारे, तथा आचरणारे श्रीशंकराचार्य आपल्या ब्रह्मसूत्रभाष्यांत म्हणतात- "एकमेव तु परमात्मेश्वर स्तैस्तैर्गुणविशेषैर्विशिष्ट उपास्यो यद्यपि भवति, तथापि यथागुणोपासनमेव फलानि भिद्यन्ते ।" (१:१:१२) की, एकमेव परमात्मा जो त्रिगुणात्मकरित्या पूजला जातो त्याचे फल त्याच्या उपासना पद्धतीने मिळते! म्हणून भक्तीमार्गाने केलेल्या विठ्ठलोपासनेचे फल नामदेवरायांना प्राप्त झाले, ते : "विठ्ठल वेषे ठसावले ।" अर्थात हृदयांत स्थित झाले. असें ते म्हणतात.

'निर्गुणाचे वैभव आलें भक्तिमिषें।" या वचनाचा अर्थ निराकार परमात्मा भक्तांना आनंद देण्याकरीता साकार प्रकट झाला असा किंवा भक्तांच्या भक्तीमुळे तो विठ्ठल स्वरूपात येऊन राहिला. दुसरा अर्थ भगवद्गीतेतील श्लोकाच्या आधारे त्याचा भावार्थ असा : "ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् |" (४:११) यावर ज्ञानोबांचे भाष्य : "एऱ्हवीं तरी पाहीं । जे जैसे माझ्या ठायीं । भजती तया मीही । तैसाचि भजे ||" (ज्ञा० ४ : ६६) : ज्यांची माझ्यावर (भगवंताविषयी) भक्ती असते, त्याप्रमाणे मी त्यांच्यावर (भक्तांवर) प्रीति करतो." या ओवीचा आशय आणि नामदेवरायांची या अभंगचरणातील भावना सारखीच दिसते.

"निर्गुणाचे वैभव" याचा भावार्थ सांगण्याकरीता पुनः गीतेचाच आश्रय घ्यावा लागतो. भगवान् म्हणतात: "एकांशेन स्थितो जगत्।। (१०:४२) की, (माझ्या विभूतीच्या कुठे अंत नाहीं, हे संपूर्ण विश्व) मी एका अंशमात्रे व्यापून धारण करून राहिलो आहे." परमात्म्याने निर्माण केलेल्या विश्वाचे अतर्क्स वैभव हे त्याचे तोच जाणे !


पुढे नामदेवराय म्हणतात: " बरविया बरतें पाहतां नित्यनवें । हृदयी ध्यातां निवे त्रिविधताप ।" भगवंताचे स्वरूप हे सदैव नूतन आहे. श्रीज्ञानेश्वरीमध्यें भगवान्‌ महादेवाच्या मुखी माऊलींनी अतिशय सुरेख ओवी घातली आहे.

भगवद्‌गीतेचा अगाध महिमा वर्णन करताना भगवान् शंकर देवी पार्वती मातेस म्हणतात: "तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें। जैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्त्व ||" (ज्ञा-१:७१) की, 'तुझ्या स्वरूपाचा जसा पार लागत नाहीं, तद्वत हे गीतातत्त्व आहे.' याच धर्तीवर परमात्म्याचे अगम्य तत्व होय. त्याचा पैलतीर केव्हांही सांपडणे शक्य नाहीं. विष्णुसहस्रनामांचा विचार केला की जाणवते भगवंताची एक सहस्रनामें उद्धृत असून त्या एकेका नामांचा अनेक तऱ्हेने अर्थ, त्यात सामावलेली त्यांची लीला, महात्म्य ही मनुष्याकरीता सदैव नवीनच आहेत. त्याचे चिंतन, लीलावर्णनाचे मनन, कीर्तन, स्मरण हे भवदुःख हरण करणारे होय. विवरणाच्या आरंभी घेतले त्या तुकोबांच्या अभंगातील पुढल्या चरणांत ते म्हणतातः "केलाच करावा केला कइवाड। होईल तें गोड न परतें ॥" की, एकदा का सगुण परमेश्वराच्या स्वरूपाचा निश्रय केला, तो तसाच टिकवावा, मनांत दृढ धरावा. ज्यायोगे आयुष्य सदैव गोड होते, आनंदमय होते. 


त्रिविधताप म्हणजे, देहासंबंधी होणारा ताप किंवा दु:ख हे आध्यात्मिकताप. इतर जीवांपासून होणारे दुःख हे आधिभौतिकताप आणि दैवीकारणांमुळे होणारा त्रास हा आधिदैविकताप होय. श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात: "तैसा संसारे दुःखावला। त्रिविध तापे पोळला । तोचि येक अधिकारी जाला । परमार्थासी ।।" (दास-३:२:६७) भौतिक जीवनांत ज्याला सांसारीक चटके बसले वा जगाची नश्वरता तीव्रतेने भासली तो शाश्वत आनंदाच्या शोधात निघतो नि परमार्थाचा अधिकार प्राप्त करून घेतो. या समर्थ वचनाचे उदाहरण श्रीतुकाराम महाराजांचे चरित्र पाहिले की सहज लक्षांत येईल. 


आता नामदेवराय सहस्रनामाचा उलेख करीत म्हणतात: "चोविसां वेगळे सहस्रां आगळे | निर्गुणा निराळे शुद्धबुद्ध ||" पंढरपूरचा पांडुरंग हा आचमना करीता म्हटल्या जाणाऱ्या चोवीस नामांपेक्षा वेगळा तथा विष्णुसहस्रांत वर्णन केलेल्या गुणवैशिष्ट्य नामांनी परिपूर्ण आहे.असें त्याचे आगळे तरी वेगळे स्वरूप आहे. 

याचा एक सरळ अर्थ असा काढता येथील की विठ्ठल किंवा पांडुरंग ही दोनही नामें संध्येच्या नामावलीत अथवा सहस्रनामांत नाहीत. परंतु सहस्रामध्यें भगवंताचे जे जे स्वरूप, गुण, वैभव, लीला वर्णिले ते सगळे पांडुरंगाच्या या सगुण विग्रहामध्यें सामावलेले आहे. विठ्ठल हा विष्णु आहे असें समस्त संतांनी म्हटले आहे. किंबहुना तो बाळकृष्ण स्वरूपात कटेवरी हात ठेवून उभा आहे. हे ज्ञानदेवांपासून ते तुकोबांपर्यंत मान्य करतात. "पांडुरंग बाळमूर्ति । गाई गोपाळ सांगाती । येथूनियां प्रीती । उभें समचि राहिलें ।।" 'बालकृष्ण पांडुरंग गाई - गोपाळांसमवेत येथे म्हणजे पंढरपूरांत प्रेमाने उभा राहिला"- हे प्रत्यक्ष तुकोबांचे शब्द आहेत. तसेंच जर पाहिले तर कृष्णासंबंधी संध्येतील काही थेट नामांचा दाखला देता येईल, जसे की, गोविंद, संकर्षण, वासुदेव, दामोदर, कृष्ण ही नामें कृष्णावताराशी निगडित आहेत, त्याच प्रकारे सहस्रामध्यें अनेक नामांचा थेट संबंध कृष्ण लीलेशी जोडता येतो. म्हणून कृष्ण अथवा विष्णु हाच पंढरीचा पांडुरंग होय हे सिद्ध आहे, प्रसिद्ध आहे.


भक्ताच्या भाबड्या लडीवाळ प्रेमाचा त्याने देऊ केलेल्या सगळ्या उपाध्या भगवंत स्वीकरतो. "तुका म्हणे जें जें बोला । तें तें साजें या विठ्ठला ॥ म्हणून तो चोवीसांत व सहस्रांतही नाहीं, तो निराळा असून निर्गुणतत्त्वाहून निराळा तथा अत्यंत शुद्ध ब्रह्मस्वरूपच होय, अशी नामदेवरायांची पांडुरंगावरची निर्भेळ भक्ती आहे. श्रीज्ञानोबांनीही त्यांच्या नामपर अभंगात म्हटले "जें रूपा वेगळे । सहस्रनामाहूनिं आगळें |" या वचनाचा भावार्थही वरील प्रमाणे आहे. यासंबंधी विस्तृत लेख "ज्ञानदेवांचे सहस्रनाम चिंतन" यात वाचावयास मिळेल.


नामदेवरायांचा प्रस्तुत अभंग 'श्रीविठ्ठल माहात्म्य' या सदरात येतो. अशा आशयाचा अणखी एक अभंग आहे. त्यात नामदेवराम पांडुरंगाच्या लीलावर्णनाचा अंत सांपडत नाहीं. त्यास उद्देशून म्हणतात: "जो सहस्रामाजी न दिसे । चोविसांत न भासे । दो सहस्र अनारिसे। पाहतां अरे न दिखेचि|| " की हा पांडुरंग सहस्रनामांत कुठे दिसत नाहीं, तो दोन सहस्रांपेक्षा असा वेगळाच आहे नि त्याचे प्रत्यक्ष दर्शन (त्यात) होत नाहीं, असा हा अकल्पित परमात्मा म्हणजे विठ्ठल.

येथे "दोन सहस्रांमध्यें" असा उलेख संख्यावाचक आहे कि इतर पुराणातील म्ह. पद्म किंवा स्कंद पुराणातील विष्णुसहस्रनामस्तोत्रांचा आहे, हे ध्यानांत येत नाहीं. असो. 


श्रीभगवद्गीतेत भगवंताने अर्जुनास विश्वरूपदर्शन घडविल्यानंतर म्हणाले, माझे हे जे तू रूप पाहिलेस ते वेदाध्यायाने, तपाने, दानाने किंवा यज्ञाद्वारेंही कुणाला जाणणे अशक्य आहे. "नाहं वेदैर्न तपसा न दानेन च चेज्यया। शक्यं एकंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा।।आह  परंतु पुढे ते म्हणतात: "भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टु च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥" (११:५३, ५४) हे शत्रुतापन अर्जुना, केवळ अनन्यभक्तीनेच मला यथार्थपणे जाणणे, पाहणें व माझ्या ठायीं तत्त्वाने प्रवेश करणें सुलभ आहे, शक्य आहे. 

या श्लोकाचे मर्म नामदेवरायांनी अभंगाच्या पुढील चरणांत दिले आहे. 


"वेदां मौना पडे श्रुतीसीं कां नडे। वर्णितां कुवाडें पुराणांसी ॥" परब्रह्माचे वर्णन करताना सर्वत्र शब्द वापरला जातो की ते "हे नाहीं हे नाहीं" अर्थात नेतिनेति" (न इति न इति), कारण शुद्ध ब्रह्माचे वर्णन करण्याकरीता ते नाम-रूप-गुण-कर्म-भेदे इत्यादींच्या पलिकडे जाऊन करावे लागेल. आणि त्यासाठी शब्दांची मर्यादा येते. म्हणून ते ब्रह्म कसे याचा थांग लागत नाहीं, सांगता येत नाही. म्हणून बृहदारण्योपनिषदांत "नेतिनेति, न ह्येत्समादिति नेत्यात्परमस्ति ।" (२:३:६) हा मंत्र आला आहे, की 'हे नाहीं हे नाहीं, कारण ह्याच्या पेक्षा (ब्रह्माचे) यथार्थ अर्थ वर्णन करता येते नाहीं. 


श्रीभगवद्गीतेमध्यें भगवान् गोपाळकृष्ण "ओमित्येकाक्षरं ब्रह्म" (८:१३) हा उपदेश करतात, की ॐ हे एकाक्षर ब्रह्म होय, याचा विस्तारीत मंत्र माण्डूक्योपनिषदांत आहे. "ओमित्येतदक्षरम्, इदं सर्वं तस्योपव्याख्यानम् भूतं भवद् भविष्यादिति सर्वम् ॐकार एव । यच्चान्यत् त्रिकालातीतं तदप्योङ्कार एव।" ॐ हे नामच अक्षरब्रह्म होय. हे सगळे नाम- रूपमय अखिल विश्व ॐकाराचेच विस्तृत विवरण आहे, हे एकाक्षर ब्रह्म अनंत नामरूपामध्यें आत्मप्रकाशित होत रहाते. भूत-वर्तमान- भविष्य यांत हेच ॐ कार स्थित आहे. या नामरूपाच्या वर जे त्रिकालातीत सत्य आहे तेही ॐ कारच.


नामदेवरायांनी याच चालीवर पांडुरंगाची महती गायली आहे.

त्याच्या स्वरुपाचे ज्ञान वेदांना समजले नाहीं म्हणून त्यांनी मौन धारण केलें. श्रुती म्हणजे वेदवाणी. नि पुराणांनी श्रीहरिची अितके लीला- वर्णन करून सुद्धा त्याच्या नेमक्या तत्त्वाविषयीं कोडे पडवे ! असा भक्तीपूर्ण भाबडा प्रश्न केला. श्रीतुकोबांचेही वचन येथे उद्धृत करावेसे वाटते. ते म्हणतात. "स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथे माझा धंदा कोणीकडे । रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमी होती जाती ब्रह्मांडेहीं ॥ - देवा, तुझी स्तुती करावी, तर वेदांनाही ती करता आली नाहीं मग तेथे माझा प्रयत्न कुणीकडे पुरेल ! तुझ्या स्वरूपाच्या एका रोमाच्या ठायीं अनंत ब्रह्मांडे निर्माण होतात, तेथे त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझी बुद्धी कोठे पुरी पडेल ?


हे जरी सत्य असले तरी, नामदेवराय म्हणतात- "भावाचें आळुक भुललें भक्तिसुखे। दिधलें पुंडलिकें सांधुनिया।।"- भक्तीचा महिमा मोठा आहे. त्यायोगेच तो निर्गुण परमात्मा सगुणांत भक्तांसाठी साकार कर होतो. वारकरी सांप्रदायांत भक्तराज पुंडलिक हे पांडुरंगाचे परमभक्त किंबहुना ज्याच्यामुळे परमात्मा नारायण अठ्ठावीस युगे विटेवर अभा आहे तो कर्मयोगी पुंडलिकामुळेच. देव भावाने आळवला जातो. तेच पुंडलिकाने केलें. वा घडले. त्याचा लाभ समस्त मानवांकरीता, मुमुक्षूंकरीता झाला. त्याचे एक प्रकारे ऋण आहे असें संतांनी म्हटले आहे. पुंडलिकासाठी भगवंत प्रकट झाला तो त्याच्या निःस्वार्थ सेवेमुळे. तेच परमात्म्याम अत्यंत प्रिय होय. "तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांचि वीरा । पूजा केली होय अपारा। तोषालागी ।। (१८:९१७) असें श्रीज्ञानोबांनी म्हटले आहे, तो हा भगवंत (७३६) भक्तवत्सल होय. 


"नामा म्हणे आम्हां अनाथा लागुनी। निडारलें नयनीं वाट पाहें।।" - पांडुरंगा, अनाथांच्या नाथा ! आम्हां पोरक्यांकडे डोळे लावून वाट पाहात आहे, असें नामदेवराय म्हणतात. भक्तीचे एक निराळे भावविश्व असते. तिथे स्थाल, काल, वर्णक जाती, लिंगभेद कशाचेही बंधन नसते. भक्त आणि भगवंत हे एकेच नाते उभयतांमध्यें असते. नामदेवराय पांडुरंगाला तो निराकार, निर्गुण, नित्यनुतन, तारक सहस्रनाम, चोवीसनामे याहून निराळा, शुद्ध, वेदांनाही थांग न लागणारा अशी नानाविध विशेषण समर्पण केल्यानंतर म्हणतात की; तो पांडुरंग आम्हा अनाथ भक्तांची वाट पाहत आहे. यावर काहीं भाष्य करणे म्हणजे त्या भावनेचा उपमर्द केल्यासारखे होईल. कारण हा भक्ताचा प्रेमळ संवाद आहे. तो तेवढाच वाचून आपण याचे मनन करणे अिष्ट होय. 

या अभंगातून भगवंताची (४०) निर्गुण, (९४१) अनादि, (९११) शब्दातिग (५८७) शान्तिद या सहस्रांतील नामांचा भावार्थ अलगडू शकतो.


क्रमशः




Comments

Anonymous said…
अतिशय अभ्यासपूर्ण ,आकर्षक व नामस्मरणाप्रती श्रध्दा दृढ करणारे लेखन...

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १