नैष्ठिक ब्रह्मचारी निश्चितीं । ज्यासी स्वप्नीं नाहीं वीर्यच्युति तयालागीं कुमार म्हणती । अवतारमुर्ति सनकादिक।। - श्रीएकनाथी भागवत
परमेश्वराने लोककल्याणास्तव व केवळ धर्मोपदेशकाच्या भूमिकेतून काहीं अवतार धारण केलें. त्यातील श्रीसनकादिक ऋषींचे प्राकट्य हा ब्रह्मदेवाच्या मनाद्वारें निर्माण झालेला भगवान् श्रीविष्णूंचा पहिला अंशावतार. भगवंताने ब्रह्मदेवास पुनःसृष्टी रचिण्यासाठी आज्ञा देऊन त्याने प्राकृत व वैकृत सर्ग म्हणजे स्वयंसिद्ध चेतन अशा स्वाभाविक, सात्विक एका (वयाच्या) स्थितीत (बालरूपात) राहणारा दिव्य देह उत्पन्न केला. ज्यांची गती देवलोक आणि मनुष्य लोकातही आहे अशा श्रीसनत्कुमारांना ब्रह्मदेवाने निर्मिले.
या सनकादिक मुनींविषयीं समस्त संत मंडळींनी त्यांच्या वाङ्मयांत भगवद्भक्त, ब्रह्मनिष्ठ, गुरुवर्य या प्रकारचे विशेषणात्मक गौरवोद्गार काढून उल्लेख केला आहे. श्रीनिवृत्तीनाथ सनकादिक हे परमेश्वराच्या भक्तीत कसें एकरूप झालें हे सांगताना म्हणतात: सनक सनंदन भक्त अंतरंग । हरिरुपें सांग सर्वम्हणता। ।
श्रीज्ञानदेवांनी हे मुनिगण भगवद्गुणांचे श्रवण व त्याचे कीर्तन करीत शुद्ध झाल्याचे वर्णन करतात : श्रवणे कीर्तनें जाले ते पावन। सनकादिक जाण परमभक्त ।।
श्रीज्ञानोबांच्या समाधीपर अभंगात श्रीनामदेवराय देवांसह सनकादिकही समाधीस्थली आळंदीत आल्याचे नमूद करताना लिहितात: सनकादिकीं मंत्र घोष । केलें विधिपूर्वक पांच दिवस। मग पांडुरंग यथावकाश । भक्ता वास महिवरी।।
पंढरपुरामध्यें देवांसह भक्त आल्याचे दृश्य पाहून सनकादिक ऋषींचे मनोदय रेखाटताना श्रीएकोबा म्हणतात: देखोनियां देवभक्त। सनकादिक आनंदत।।
भगवान् श्रीनारायणाने स्वतः पुंडलिकासाठी तिष्ठत उभे राहणे मान्य केलें तोच सनकादिकांना वैकुंठलोकी सापडला, या आशयाचे वचन श्रीतुकोबा त्यांच्या अभंगात लिहितात : उभेंचि विकिलें एका। सनकादिका सापडलें।।
श्रीसमर्थांनीहि "भक्तांची आरती" या त्यांच्या काव्यामध्यें सनकादिक सनत्कुमार सनक नारद। तुंबर अंबरिष भीष्म प्रल्हाद।।.. असा उल्लेख केला आहे.
या व्यतिरिक्तही इतर संत मंडळींनी सनत्कुमारांचा उल्लेख त्यांच्या अभंगातून व इतर ग्रंथांतून केल्याचे उल्लेख सापडतील. या वरील निवडक संतवचनांच्या आधारे सनकादिकांची महती ही त्यांची भगवंतावरच्या अनन्यभक्तीपोटी संतांनी मुक्तरवाने वेळोवेळी गायल्याचे दिसते.
या चार ऋषितुल्य बालकुमारांचा भागवत, महाभारत, पुराण इत्यादी ग्रंथात सनकादिक, सनकादिक मुनी/ ऋषी/ कुमार, सनत्कुमार, सनत्सुजात, चतुष्कुमार या संज्ञांद्वारे नामोल्लेख केला गेला आहे.
सनकादिकऋषींचे प्राकट्य, त्यांचे गुरु कोण, त्यांनी कोणाला उपदेश केला हे त्यांचे अवतारकार्य श्री विष्णुसहस्रनामस्तोत्रातील निवडक नामांद्वारें आपण पाहणार आहोत.
★ उत्पत्ती : ब्रह्मदेवाने भगवंताचे ध्यान करून मनाद्वारें सनक, सनंद, सनातन आणि सनत्कुमार या चतुष्कुमारांना प्रकट केलें. ब्रह्मदेवाच्या सत्वगुणापासून निर्माण झालेली ही चार बालके स्वभावतः नैष्टिक ब्राह्मचारी आणि निवृत्तीमार्गी निपजली. धर्म, अर्थ आणि कामाविषयीं ते निरपेक्ष असून कोणतेही कर्म करण्यास प्रवृत्त नव्हते. अतः भगवत्स्मरणातून मोक्षधर्माची अत्यंतिक ओढ नि आचरण करणारे म्हणून भागवतकारांनी त्यांस निष्क्रियानूर्ध्वरेतसः। म्हटलें आहे.
सनक, सनन्द, सनातन आणि सनत्कुमार या चारही नामांना मिळून सनत्कुमार अथवा सनकादिक असा नामोल्लेख केला जातो.
श्रीविष्णुसहस्रनामामध्यें (८९६)सनात् आणि (८९७) सनातनतम ही दोन प्रत्यक्ष नामें आली आहे. त्याचा अर्थ शाश्वत, चिरकाल टिकणारा तथा कालावर मात करून राहणाऱ्यामध्यें श्रेष्ठ असा आहे.
श्रीमन्महाभारताच्या उद्योगपर्वामध्यें सनत्कुमारांना "सनत्सुजात" असें संबोधिलें आहे. त्यातील सनत्सुजातपर्वावरील श्रीशांकरभाष्यांत "... सनत्सुजातं सनदिति सनातनं ब्रह्मेच्यते हिरण्यगर्भाख्यत्, तस्मात्सनातनात् ब्रह्मणो मानसात् ज्ञानवैराग्यादि समन्वितः सुष्ठु जात इति सनात्सुजात इत्युक्तो भगवान् सनत्कुमारः।" अर्थात सनत म्हणजे सनातन ब्रह्म्याच्या मनापासून ज्ञानवैराग्यादीगुणांनी युक्त जो कुमार निर्माण झाला त्याला श्रीशंकराचार्यांनी सनत्सुजात म्हटले.
हि चारही ब्रह्मदेवाची मानसपुत्रे पांचवर्षांच्या बालकाप्रमाणेच असतात. परंतु ज्ञानाने वृद्ध अर्थात थोर असत. महाभारतामध्यें विदुराने त्यास "कुमारो वै यः पुराणः सनातनः।" शाश्वत कुमाररूपधारी असें म्हटले आहे.
श्रीमद्भागवताच्या सातव्या स्कंधात हे कुमार मरीचिप्रभृतींच्याही आधी उत्पन्न झालेले मुनी असून ते सदैव बालस्वरूप मुमुक्षु असून इंद्रियनिग्रहपूर्वक दिगंबर राहात. गोस्वामी श्रीतुलसीदास म्हणतात ब्रम्हानंद सदा लय लीना। देखत बालक बहुकालीना।। (श्रीरामचरितमानस) याचा भावार्थ असा की, दिसायला ते बालकांप्रमाणे असले तरी बऱ्याच काळापासून त्यांचे अस्तित्व आहे.
वरील दिलेल्या मुद्द्यांवरून सनकादिक कुमार यांची उत्पत्ती तथा दिव्य विग्रहदर्शन सहस्रातल्या काहीं नामांत होते ते पाहूया.
(१०) पुतात्मा : ज्यांची उत्पत्तीच मुळांत सत्वप्रधान असल्याने कुठलीही उपाधी त्यांना लिंपू शकत नाहीं. अशा सनत्कुमारांना पुतात्मा म्हणावे. तथा त्यांचा अवतार दिव्य असल्याने ते (३४) प्रभव होय.
(४२) अनादिनिधन : ज्यास आदि म्हणजे आरंभ नाहीं किंवा अंतही नाहीं, असें नाश वा मृत्यू या दोन्ही विकारांच्या पलीकडे असलेला तो अनादिनिधन. चतुष्कुमारांविषयीं असेंहि म्हटले आहे की, त्यांची उत्पत्ती सांप्रत ब्रह्मदेवाच्याही आधीची आहे. अर्थात या न्यायाने ते (३५२) वृद्धात्मा आणि (४९८) पुरातन म्हणजे सर्वांपेक्षा वडील ठरतात.
(५६) शाश्वत : जे सर्वकाळ अस्तित्वात असून जन्म - मृत्यू विरहित असें सनातन म्हणजेच शाश्वत सनत्कुमारमुनी, जन्म - मृत्यू - वृद्धत्व या अवस्थाही त्यांना बांधू शकत नाहींत असें. तथा (९६६) जन्ममृत्युजरातिग हे नामही त्याच अर्थाचे आहे.
जे देव आणि मनुष्यांच्या कल्याणाकरिता सदैव स्थिर राहणारे ते (१२०) शाश्वतस्थाणू होय.
(१२७) वेद (१२८) वेदविद : हे चतुष्कुमार ऋग्यजुस्सामाथर्व वेदांचे प्रत्यक्ष ज्ञानरूपी मूर्ती आणि वेदांचे प्रत्यक्ष जाणकार आणि तेच (७७१) चतुर्वेदविद्.
(१६१)नियम (१६२) यम : सनकादिकऋषींची उत्पत्तीच दिव्य असून यमनियमांचे त्यांच्यामध्ये (३२४) अधिष्ठान आहे म्हणून इंद्रियनिग्रह करणारे चतुष्कुमार (१८७) गोविन्द या संज्ञेस शोभतात. म्हणजे ज्यांनी आपल्या इंद्रियावर संपूर्ण नियंत्रण केले असें. श्रीभागवतात पृथुराजाने मुनींच्या या स्वभावाकरिता त्यांना "बृहन्ति व्रतानि चरन्ति" म्हणजे मोठमोठी व्रते आचरितात असें म्हटले आहे.
(८६१)दम हे नामही इंद्रियांवर विजय प्राप्त करणे या अर्थी असल्याने सनकादिकांना ते सार्थ लागू होते. मृत्यू यांना बाधत नाहीं म्हणून ते (१९८) अमृत्यु नामाभिधान ग्रहण करतात.
ब्रह्मदेवाने सनकादिकांना उत्पन्न केल्यासरशी त्यांना प्रजोत्पत्ती आज्ञा दिली. परंतु ही मानसपुत्र मूलतः सर्व प्रकारच्या बंधनापासून अलिप्त असल्याने ते कार्य करण्यास ब्रह्मदेवला त्यांनी नम्रपणे नकार सांगितला. या लीलेमुळे त्यांना (२२९) निवृत्तात्म म्हटले गेले.
इंद्रिय (७६१) निग्रह असल्याने वासनारहित म्हणजे (५८१) क्षम स्वरूपाचे सदापवित्र, निर्मळ अर्थात (२५१) शुचि अंतःकरणामुळे ब्रह्मदेवांची इच्छा ते पूर्ण करू शकले नाहीत. या कारणास्तव ते (५७७) निर्वाण म्हणजेच परमानंद अशी (७९१) सुंदर स्वरूप मूर्तीच होय. याच सर्वसंगपरित्यागास (५८०) संन्यासकृद् अशी संज्ञा चतुष्कुमारांना प्राप्त होते.
सनकादिकमुनी पृथुराजकडे आकाशमार्गाने येत असताना यांच्या दिव्य तेजाने लोकांच्या पापांचा नाश होईल असें हे चतुष्कुमार आहेत या प्रकारे आपल्या सभासद सेवकांसह असलेल्या पृथुराजाने ओळखले, असें वर्णन भागवतात येते. "तांस्तु सिद्धेश्वरान् राजा व्योम्नोऽवतरतोऽर्चिषा। लोकानपापान् कुर्वत्या सानुगोऽचष्ट लक्षितान्।। (भाग ० ४:२२:२) की ज्यांच्या दर्शनानेच सर्व शुभकारक होते असे हे चार कुमार (३९३) शुभेक्षण होय. येथे सनकादिकांना सिद्धेश्वर म्हटले आहे की जो सर्वश्रेष्ठ असा (९७) सिद्ध.
सनकादिकांचा अवतार हा (२४३) साधु वृत्तीचा म्हणजे सर्वदा न्यायाने वागणारा असा आणि ही स्थिती तेव्हाच येईल जेव्हा "येथें कारण अंतरस्थिती। अंतरीच पाहिजे निवृत्ती। अंतर लागलें भगवंती। तोच साधु।।" (दास० ८:९:१७) या प्रकारची आहे.
धर्म जाणणाऱ्यांमध्यें सनकादिक वरिष्ठ आहेत अर्थात (४०४) धर्मविदुत्तम. नि सदा उन्नतीकडे वाटचाल करणारे म्हणून (९५४) ऊर्ध्वग होय. भगवान् श्रीनारायणाला सर्वस्व मानणारे, एका मोक्षधर्माचेच आचरण करणारे सनकादिकांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार करणारे असें जे स्वभावतःच सर्व तऱ्हेच्या बंधनापासून मुक्त ते (४५२) विमुक्तात्मा होय. मोक्षधर्माणः वासुदेवपरायणाः (भाग० ३:१२:५)
ही सनकादिक कुमार पांचवर्षांचे बालरूपधारी असल्याने अतिशय मोहक स्वरूपांचे दिसत म्हणून त्यांना (७८२) शुभाङ्ग म्हटले. असें हे ब्रह्मदेवाचे चार मनसपुत्र जणू (७६५) चतुर्मूर्ति होय.
★ शिष्यत्व : परमात्म्याचे स्वरूप जाणून घेण्याकरीता सनत्कुमारांनी शेष या नागराजाकडून प्रथम श्रीभागवतपुराण श्रवण केलें होते. श्रीमद्भागवताच्या एकादशस्कंधात श्रीकृष्ण- उद्धव संवादात सनकादिक ऋषींचा उल्लेख आला आहे. त्यात उद्धव श्रीकृष्णास चतुष्कुमारांना आपण कोणत्या अवतारी आणि कुठला उपदेश केला अशी विचारणा करतो. तेव्हा भगवान् म्हणतात, "हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाच्या चार मानसपुत्रांनी आपल्या पित्यास 'विषयांचे चिंतन उल्लंघून मोक्ष प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाने चित्त व गुण याचा त्याग कसा करावा' असा प्रश्न केला. तेव्हा ब्रह्मदेवाने भगवान् श्रीमहाविष्णूंचे ध्यान केलें. तत्क्षणी तो (१९१) "हंस" रूपाने ब्रह्मदेव तथा सनकादिकांपुढे प्रकट झाला. त्या हंसरूपी भगवान् नारायणांस समस्तांनी साष्टांग प्रणिपात केला आणि त्यांच्याकडून उपदेशाची भिक्षा मागितली. तेव्हा श्रीहंसाने जो उपदेश केला त्यास हंसगीता या नामाने भागवतात समाविष्ट केलें आहे.
सनकादिककुमार यांनी सांख्य व योग या दोन्हीचे धर्मरहस्य हंस भगवंताकडून ग्रहण केले नि संशयरहित होत्साता संपन्न असें ब्रह्मवेत्ते झाले. इति ते छिन्नसंदेहे मुनयः सनकादयः।। (भाग०११:४१) श्रीएकनाथमहाराजांनी आपल्या भागवतभाष्यांत या उपदेशाचे अत्यंत रसाळ व सखोल वर्णन केलें आहे. "ते योगियांमाजीं अति उद्भट। भक्तांमाजी अति श्रेष्ठ। ज्ञानियांमाजीं अतिवरिष्ठ । शिष्य चोखट सनकादिक।।" (एभा १३:७५२) अशा या चोखट म्हणजे अत्युत्तम शिष्यवर्य चतुष्कुमारांची शिष्य या नात्यासंबंधी सहस्रातील नामें अवलोकन करू.
श्रीहंसोपदेशाने संशयरहित झालेले चतुष्कुमार यांना सहस्रांतले (६२३) छिन्नसंशय हे नाम यथायोग्य आहे. कारण प्रत्यक्ष भगवंताने ज्ञानोपदेश केल्यानंतर किन्तु परन्तु मनांत राहणे शक्य नाहीं.
भगवंताने योगविद्येचे अत्यंत गूढ रहस्य सनकादिकांना दिल्याने ते (८५०) योगीश या पदाला पात्र होऊन तथा योग जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असें (१९) योगविदांनेता म्हणजे इतरांकरिता मार्गदर्शक झाले. त्याप्रमाणे ब्रह्मविद्येच्या उपदेशाने सनकादिकांना (६६६) ब्रह्मविद् (६६७) ब्राह्मण तसेच (६६९) ब्रह्मज्ञ ही नामें ओघाने लागू होत.
शेवटी या उपदेशाने कृतकृत्य म्हणजे (८२)कृतज्ञ होऊन "भगवद्भभावो धरावा दृढ" या न्यायाने सनकादिकांनी भगवंताची यथासांग पूजा (६३४) अर्चित करून स्तोत्रे गाऊन म्हणजे (६८२) स्तोता या तऱ्हेने समाराधना करीत (२४१) सत्कर्ता सत्कार केला.
श्रीहंस भगवंताने केलेला उपदेश ज्याने उत्तम प्रकारे धारण केला तो (७५२) सुमेधा होय. गुरुबल लाभले की कोणाही जीवाची वाटचाल ही (९५५) सत्पथाचार अशा ऊर्ध्वगतीनेच होते. त्यात सनत्कुमारांसारख्या महात्म्यांची उंची कुठल्या मापाने मोजावी! त्यास
★ गुरुपद : चाक्षुष मन्वंतराच्या प्रलयांत लुप्त झालेले वेदादिशास्त्रे भगवान् श्रीहंसाकडून सनकादिकांनी पुन्हा प्राप्त करून घेतले. (केवळ माहितीसाठी एकूण १४ मन्वंतरे आहेत. चार युगांचे मानवी वर्ष ४३ लक्ष २०सहस्र एवढे. ते एक सहस्त्रवेळा झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस, तेवढेच झाले की एक रात्र होते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात १४ कल्प होतात. सहा मनवंतरे उलटून गेली असून सातवें वैवस्वत म्हणजे चाक्षुषच्या नंतरचे मन्वंतर तर चालू आहे.)

१} श्री हंसोपदेशानंतर सनकादिकांचे पहिले शिष्य श्रीनारदमुनी हे होय. छांदोग्योपनिषदात याचा उल्लेख आला आहे. वेदादिषट्शास्त्रे, इतिहास, पुराणे, आयुर्वेदादी रसायन, पदार्थशास्त्र, राजकारण, संगीतशास्त्र अशा सर्व विद्या नारदांना अवगत असूनही आत्मज्ञान न झाल्याने व्यथित झाले. ते ब्रह्मपुत्र नारदमुनी सनकादिकांकडे आले.
ब्र. भू. स्वामी वरदानंद भारती (अ. दा. आठवले) यांनी त्यांच्या ओवीबद्ध छांदोग्योपनिषदाभाष्यांमध्यें सप्तमाध्यायांत सनकादिकऋषी कुमार नि नारद या गुरुशिष्य संवादाच्या ओव्या घातल्या आहेत. त्यातील काहीं ओव्या उद्धृक करतो म्हणजे आशय समजण्यास सोपे जाईल.
सनत्कुमार ते ऋषिवर्य। तेे आचार्यांचेही आचार्य । आदेश ज्यांचा शिरोधार्य । मानिताती वेदवेत्ते।। त्यांचे घेण्यासी दर्शन । नारद केलें आगमन । नम्रतेनें स्वीकारून । हृदीं भावना शिष्याची ।। (७:१:२२,२३) श्रीसनत्कुमार नारदांस विचारतात : अभ्यासाचें तुझ्याविषय । सांग होते काय काय। काय शिकायाची सोय । मानोनी येथे आलास तू ।। (२७)
श्रीनारद सांगतात : विद्या अभ्यासुनी सारी । शोक माझा न झाला दूरी । व्यथित होतो अंतरीं। प्रत्यहीं नानारीतीनें ।। म्हणून हे ज्ञानराशी। पातलो आपल्या पायाशी । सर्व माझिया शोकासी। प्रभू आपण नासावें ।। (३९, ४०)
नारदांचे निवेदन ऐकून चतुष्कुमारांनी त्यांच्यावर अनुग्रह केला आणि "सनत्कुमार ते प्रत्यक्षात । निर्धूम सतेज ज्ञानज्योत । स्पर्श तयांचा होता खचित। दुजा दिवा तेजाळला ।। दिव्यानें दिवा लागतां। सांगता ये न तरतमता । झाले नारदां पूर्तता । ब्रह्मज्ञान मूर्त झाले।।" (८:१:५, ६)
अशा प्रकारे नारदमुनी श्रीसनत्कुमार यांचे पहिले शिष्य आत्मबोध प्राप्त करते झाले.
२} ज्या महान् विभूतीमुळे या भूगोलास पृथ्वी हे नाव प्राप्त झाले त्या पृथुराजाने सनत्कुमारांना अत्यंत श्रद्धापूर्वक "त्रिविधतापाने पोळलेल्या लोकांना कुठल्या सुलभ उपायाने आपले कल्याण करता येईल" असा प्रश्न केला. तो या परमदयाळू ऋषीचतुष्टयांनी इश्वर प्राप्तीचा मार्ग कथन करुन आत्मज्ञानाचा संतोषपूर्वक त्यांस बोधानुग्रह दिला. "सनत्कुमारो भगवान् यदाहाध्यात्मिकपरम्। योगं ते नैव पुरुषमभजत्पुरुषर्षभः।।" (भा० ४:२३:९)
ज्ञानसंपन्न सनत्कुमारांनी भगवत्प्राप्तीचे साधन म्हणजे ज्या श्रेष्ठ अध्यात्म योगाचा उपदेश केला, त्या साधनाने पृथृराजाने भगवंताची आराधना केली अंतिम समयी पृथृराजाने योगबलाचा अवलंब करून आपला देह पंचमहाभूतांच्या त्या त्या ठिकाणी लय करून जीव सोडून दिला आणि ब्रह्मरूप झाला.
येथे आपल्याला सनत्कुमार पृथ्वराजाचे सद्गुरु असल्याचे दिसून येते.
३} महाभारताच्या शांतिपर्वामध्यें भीष्म-युधिष्ठिर संवादात शुक्राचार्य- वृत्रासुर आख्यान येते. वृत्रासुराला आपल्या पराक्रमाविषयीं निर्वासना उत्पन्न झाली आणि त्याने आपले दैत्यगुरुवर्य शुक्राचार्यांना "अशा कुठल्या ज्ञानाद्वारें शाश्वत ब्रह्मरुप जाणून घेऊ शकतो" असें अनेक प्रश्न करता झाला. शुक्राचार्य त्यांस उपदेश करणार तोच त्या ठिकाणी सनत्कुमार प्रकट झाले. त्यांनी दैत्येंद्राला श्रीविष्णूची महती सांगण्यास प्रारंभ केला. "श्रृणु सर्वमिदं दैत्य विष्णोर्माहात्म्यमुत्तमम्। विष्णौ जगत्थितं सर्वमिति विद्धि परंतप।।"(मभा.मोक्षपर्व,अ०२८०)
हे दैत्या ऐक या चराचरांमध्ये सर्वत्र एक विष्णूच ठाई ठाई स्थावर जंगमात भरून राहिला आहे , असें या श्रीविष्णूचे महात्म्य आहे. या उपदेशामुळे वृत्रासूराचे अंतकरण पालटून तो विष्णुभक्त होत्साता अंतकाळी त्यांने योगबलाने आत्म्याच्या ठिकाणी ध्यान करून प्राण सोडले.
अशा या दैत्य राजाचेही गुरुपद श्रीसनत्कुमारांनी त्याच्या आत्मोद्धारासाठी भूषविले.
४} महाभारतामध्येंच सनकादिक धृतराष्ट्र संवाद आहे. उद्योगपर्वत विदुराने धृतराष्ट्राला नीतीविषयीं भाषण देऊनही त्याचे समाधान होत नाहीं. तो विदुराला ब्रह्मज्ञानाविषयीं सांगण्यास आग्रह धरतो. तेव्हा विदूर आपला अनाधिकार आणि असमर्थता दर्शवून त्या सभेत सनकादिक ऋषींना आवाहन करून ब्रह्मविद्ये संबंधित ज्ञानोपदेश करण्यासाठी प्राचारण करतो. तो अध्याय "सनत्सुजातपर्व" म्हणून प्रसिद्ध असून त्यावर श्रीमदद्यशंकराचार्यांचे स्वतंत्र भाष्य आहे. त्यात गुरुवर्य सनत्कुमार धृतराष्ट्राला मृत्यू म्हणजे काय, अहं ब्रह्मास्मि, विषयासक्ती, काम, पाप-पुण्य, मोक्ष, परमात्मा, जीवात्मा, माया, योगी, पुरुषांचे कर्तव्य इत्यादी असंख्य विषयांवर साद्यंत ज्ञानदान करतात.
नारद, पृथुराजा आणि वृत्रासुरासारख्या दैत्यानेही सनत्कुमारांनी केलेल्या ब्रम्होपदेशाचे चिंतन करून आत्मोद्धार करून घेतला परंतु धृतराष्ट्राच्या बाबतीत त्या उपदेशाची तात्काळ उपरती किंवा प्रयोग झाल्याचे दिसत नाहीं. कारण त्यानंतर भारतीयुद्ध घडते नि त्यामध्यें धृतराष्ट्राच्या अनितीचे प्रतिबिंब स्पष्ट दृष्टी येते. तथा युद्धानंतरही तो सत्याने वागला असे नव्हे. जेव्हा तो वानप्रस्थाश्रमात प्रवेश करतो तेव्हा अगदी शेवटी योगाग्निने स्वतःला संपवतो.
मात्र चतुष्कुमारांनी ज्ञानदानामध्यें कसलाही दुजाभाव धरला नाहीं. जसा नारद पृथुराजाला उपदेश केला, असाच वृत्रासुर धृतराष्ट्रालाही केला. गोस्वामी श्रीतुलसीदास यांनी त्यांच्या श्रीरामचरितमानस या ग्रंथामध्यें सनकादिकांविषयीं लिहिलेली चौपाई अत्यंत समर्पक आहे. "रूप धरे जनु चारिउ बेदा। समदसी मुनी बिगत बिभेदा।।" (उ.कां० ३१:३) जणू चार वेदच बालरूपाने अवतरीत झाले, ते मुनी समदर्शी तथा भेदरहित आहे. असें गोस्वामी म्हणतात.
किंवा श्रीभगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायात "अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।" हा श्लोक येथे सहज ध्यानीं येतो.
म्हणूनच त्यांना सद्गुरूरुपी पटाचे (७८४) सुतन्तु नि त्याची वृद्धी करणारे (७८५) तन्तुवर्धन अशी नामें समर्पवी वाटतात.
यावरील चार कथा भागांच्याद्वारे सनकादिक मुनींचे उपदेशकर्ता किंवा ज्ञानदाता या नात्याने त्यांचे गुरुपद या संज्ञेला साजेसे सहस्रनामातील नामें पाहू.
नारदमुनी असो वृत्रासुर वा समस्त मुमुक्षूंना अलिप्ततेने पाहून ज्ञानदान करणारे चतुष्कुमार (१५) साक्षी भावाने पाहतात. ब्रह्मज्ञानाचा प्रचंड साठा असणारे (३०) निधिःअव्यय होय. बालरुप असूनही ज्ञानवृद्ध असे (६७) ज्येष्ठ (६८) श्रेष्ठ तथा यथायोग्य मार्गदर्शन करणारा (२२२) नेता होय. संपूर्ण रागद्वेष विरहित सर्वकाळ सारखेपणाने असणारे हे (१०७) समात्मा व (१०९) सम ही नामे त्यांच्या चरित्राच्या एका नाण्याच्या दोन बाजू याप्रमाणे आहेत. सत्पुरुष तथा मानवाला सर्वोत्कृष्ट ज्ञानदानाचे ज्यांनी व्रत घेतले ते (४५५) सुव्रत धारी असून त्यांना उत्तम गतिपर्यंत नेणारे (१८४) सतांगति नि मोक्ष देणारे (६९९) सद्गति ही नामे त्यांची लीला सांगणारी आहेत.
सनत्कुमार नारदांना वाणीचे महत्त्व सांगताना छांदोग्योपनिषदात म्हणतात: "ब्रह्म म्हणून वाणीची। उपासना जो करी साची। पूर्ति तयाच्या इच्छांची। होते तिच्या क्षेत्रांतल्या।।" (स्वामी वरदानंद भारती भाष्य) मुळांत जो वाणीचा स्वामी आहे तोच नारदाला त्याचे महत्त्व कथन करतो. अशी उत्कृष्ट वाणी प्राप्त झालेलें सनत्कुमार (१८८) गोविदांपति.
पृथुराजा व वृत्रासूर यांना त्याच्या कर्मफलाची गाठ घालून देण्यास सनत्कुमार कारणीभूत झाले. ते (२०१) संधाता होय. नागराज शेष अथवा संकर्षण यांच्याकडून भागवताची दीक्षा घेतल्यानंतर ते ज्ञान भगवान् सनत्कुमारांनी सांख्यायनांस सांगितले. त्या सांख्यायनाचेही ते गुरु.
वरील भागात आपण वाचले सनत्कुमार मुमुक्षूंचे आध्यात्मिक मार्गदर्शक झाले. ते (२०९) गुरु आणि गुरूंचे गुरु म्हणजे (२१०) गुरूतम होतात. विद्येचे, वाणीचे स्वामी तथा उदार, विशाल बुद्धिमत्तेचे ब्रह्मपुत्र (२१७) वाचस्पतिउदारधी होय. पृथुराजा तथा धृतराष्ट्रास केलेला दीर्घ उपदेश खरोखरी अचंबित करणारा असून त्यात चतुष्कुमारांच्या उत्कृष्ट वक्तृत्वाचे दर्शन घडते अतः (२६७) वाग्मिन् हे नाम त्याचे सार सांगणारे आहे.
सनकादिकमुनी स्वयमेव (२८०) मंत्र रूप आहेत. सनत्कुमारांनी त्यांच्या शिष्यांचे जीवन ब्रम्हरूप करून टाकले. हा शिवापासून जीवापर्यंतचा त्यांचा प्रवास (२८८) जगतःसेतु असा जोडणाराच म्हणावा लागेल. त्याच प्रकारे या भवसागरातून तारून नेणारे सनकादिक (९२३) उत्तराण व उद्धरुन नेणारे (९६८) तार होय.
धृतराष्ट्राला ब्रह्मविद्या जाणून घ्यायची म्हणून विदुराच्या विनंतीनुसार सनकादिक आले आणि त्यांची कामना पूर्ण केलीं. असें हे (२९५) कामकृद्. सर्व विद्यांचे ज्ञाते ते (६९१) तीर्थकर. कारण विद्येला तीर्थ असें म्हणतात. ब्रह्मविद्येचे (११९) अमृत ज्यांनी या मुमुक्षूंना कथन केलें ते स्वतःच (८४८) कथित ठरले. यांच्या वाणीमुळे पृथुवृत्रादी प्रभृतींना ब्रह्माश्रय लाभला ते (८५२) आश्रम होय. विद्वानांचे महापंडित असें (९२०) विद्वत्तम तथा (९६४) तत्त्वविद् म्हणजे तत्वज्ञानी आहेत. असें शिष्यांचे प्रिय करणारे (८७४) प्रियकृद् आणि त्यांची आसक्ती नाहींशी करून आत्मकल्याण करणारे सनकादिक (८७५) प्रीतिवर्धन होय.
★ श्रीसनकादिक चतुष्कुमारांची वैकुंठ यात्रा :
सनत्कुमारांना श्रीनारायणाच्या दर्शनाची इच्छा निर्माण होऊन त्यांचे परमस्थान जे (४०५) वैकुंठ येथे योगबलाने पोहोचले. त्या वैकुंठलोकीच्या महाद्वारापाशी श्रीविष्णूचे पार्षद असलेले दोन द्वारपाल जय आणि विजय यांनी कुमारांना अडवून आंत जाण्यास मज्जाव केला. या द्वारपणांनी बालरूपी महाज्ञानी सनत्कुमारांना केवळ प्रवेश करण्यास अटकावा केला नाहीं तर दिगंबर अवस्थेत असलेल्या कुमारांकडे पाहून हसू लागले. भगवद्दर्शनामध्यें व्यत्यय आणि विनोदाने हसल्याकारणाने सनकादिकांना स्वाभाविकपणे किंचित क्रोध निर्माण झाला. त्यांनी जय- विजयांस परमेश्वराचे सेवक असूनही मंदबुद्धीचे ठरवून घडलेल्या अपराधाबद्दल मनुष्यलोकांत दैत्यकुळांत जन्माला याल असा शाप दिला. चतुष्कुमारांची योग्यता ध्यान्यांत येताच द्वारपाल त्यांना शरण आले नि घडलेल्या पापाला शासन अवश्य झाले पाहिजे असें म्हणून त्या अधमयोनितही भगवंताविषयीची स्मृती नष्ट न होवो अशी याचना सनकादिकांकडे त्यांनी केलीं.
त्याच क्षणी भगवान् श्रीविष्णु तिथे प्रकट झाले. त्यांनी सनत्कुमारांना दर्शन, आशीर्वाद दिला. सनत्कुमारांसाठी भगवंताचे चरणकमल जणू "सनकादिकांलागीं पाय वज्र कवच।" आहेत असें श्रीनामदेवराय म्हणतात.
देवाने झालेल्या प्रकाराविषयीं कोणालाही दोष न देता हा सगळा खेळ त्यांच्याच प्रेरणेने झाल्याचे सांगितले. सनत्कुमारांच्या शापवाणीच्या प्रभावाने जय-विजय हे सत्ययुगांत हिरण्यक्षा व हिरण्यकशिपु, त्रेतामध्यें रावण - कुंभकर्ण तथा द्वापारयुगांत शिशुपाल आणि दंतवक्र या रूपात दैत्य म्हणून जन्माला आले. त्यांनी भगवंताची "विरोधभक्ती" केली. या लीला प्रसंगातून भगवंताने आपले अवतारकार्य निश्चित करून धर्मरक्षणार्थ योजना केली.
या कथाभागामध्यें सनकदिकांचा सात्विक क्रोध तथा दया या परस्पर तत्त्वांशी साधर्म्य असणारी सहस्रातील नामें पाहू:
सनकादि ऋषी वैकुंठलोकात प्रवेश करतेवेळी तिथल्या दैवी ऐश्वर्याला यत्किंचितही भुलून न जाता केवळ अलिप्त भावनेने श्रीहरिच्या दर्शनाकरिता चालत राहिले. "असज्जामानाः मुनयः (भा० ३:१५:२७)असें भागवतकार म्हणतात की, जो सर्वांतून अलिप्त आहे तो (२६३) विविक्त.
(८१) दुराधर्ष : जय - विजय यांनी चतुष्कुमारांना वैकुंठ नगरीत प्रवेश करण्यास प्रतिबंधक करण्याचा उद्योग केला. पण ज्यांना दडपून टाकणे अशक्य आहे. अशा दुर्धर मुनीवर्यांनी त्यांना दंड दिला.
(८२) कृतज्ञ : ते विष्णुपार्षद शरण आल्यानंतर सनकादिकांनी त्यांना शापोद्धाराचा मार्गही कथन केला. असा पाप पुण्याचा संतुलित व्यवहार सांभाळणारा कृतज्ञ होय.
(१७९) अमेयात्मन् : बालरूपी सनत्कुमारांची योग्यता जय - विजय ओळखू शकले नाहींत. ज्यांच्या स्वरूपाचे अनुमान करता येत नाहीं तो अमेयात्मा.
(१९०) दमन : आपल्या कर्तव्यापासून च्युत झाल्याने तथा वैकुंठलोकी राहात असून मंदबुद्धीने वागले याकरिता कुमारांनी जयविजयांस शिक्षा केली. विष्णुसहस्रांत या दोन्ही पार्षदांचीही नामे आहेत. ती पार्षद म्हणून आली नसली तरी (५०९) जय आणि (५१०) विजय या नामांचा उल्लेख झाला पाहिजे.
(३१५) क्रोधकृत्कर्ता : प्रसंगी रागावणारा नि त्या आवेशात कृती करणारा असा या नामाचा भावार्थ सनकादिकांच्या लीलेचे यथार्थ वर्णन करणार आहे.
(४६२) जितक्रोध : वास्तविक सनत्कुमार क्रोधावश झाले परंतु ते संतापून अमंगल करण्याच्या उद्देशाने नव्हे तर जयविजय परमेश्वराजवळ राहूनही त्यांच्यातली भेददृष्टी तशीच राहिली याकरिता. भागवतकार म्हणतात : " तव्दाममुष्य परमस्थ विकुण्ठभर्तृः कर्तृं प्रकृष्टमिह धीमहि मन्दधीभ्याम्। (३:१५:३४) "या वैकुंठ नायकाचे तुम्ही सेवक. तरी बुद्धी मंद झाली. अतः तुमचे कल्याण करण्याकरिता या अपराधाबद्दल (आम्ही) योग्य दंड देण्याचा विचार करतो".
सनत्कुमारांच्या या सात्विक रागाला अनुसरून(४७१) वत्सल हे नाम शोभते. त्यांचे स्वरूप सहज प्रकट होऊ शकत नाहीं असें
(५४२) गुह्य असल्यामुळे जयविजयांकडून हा अपराध घडला. (७१२) दर्पहा : जयविजय यांनी केलेल्या या उन्मत्तपणाबद्दल समकादिकांनी त्यांना (८५९) दण्ड देऊन (८६०) दमयिता म्हणजे शासन करणारे ठरले.
भगवान श्रीविष्णूचे दर्शन घडल्यानंतर समकादिकांनी जयविजयांना दिलेल्या शापाचा उच्चार करून परमेश्वराने यथायोग्य निर्णय घ्यावा. अथवा त्यांना (कुमारांना) नरकात जन्माला घालावे अशी भावना व्यक्त केली. येथे सनदादिकांचा नम्रभाव व दयाळूपणा दिसतो. अतः (७९२) सुंद म्हणजे करुणाकार हे नाम या चतुष्कुमारांना भूषाणावह होय.
असे हे सनक, सनन्द, सनातन आणि सनत्कुमार नित्य कल्याण, मांगल्य प्रदान करणारे असत तेच (९०१) स्वस्तिद. कल्याण करणारे (९०२) स्वस्तिकृत् , मांगल्य हेच ज्यांचे मूळ स्वरूप असें (९०३) स्वस्ति , श्रीहंसरूपी भगवंताकडून मांगल्याचे मंगल जे ब्रह्मज्ञान स्वीकारणारे (९०४) स्वस्तिभुग् आणि देव असो वा दानव किंवा मानव या सगळ्यांचे भद्र करण्यासाठी शीघ्र गतीने आशीर्वाद देणारे असें (९०५) स्वस्तिदक्षिण.
ही सगळी सलग असणारी नामावली सनकादिकऋषींचे विशेष गुण वर्णन करणारीच आहेत. सत्वगुणांची खाण असें (८६७) सत्ववान् तथा (८६८) सात्विक. सत्य म्हणजे धर्म. जे धर्मानुसारण करणारे त्याचे मूर्त स्वरूप (८६९) सत्य सनकादिक नि त्याच सत्यधर्माचे आचरण स्वतः करण्यात तत्पर ते (८७०) सत्यधर्मपरायण होय.
श्रीभगवद्गीतेत : अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः।
सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः।। (१२:१६)
की, ज्यांना कशाचीही अपेक्षा नाहीं ,जो नित्य सोवळा किंवा अंतर्बाह्य शुद्ध आहे, सदैव सावधान, तटस्थ तथा दुःख मुक्त आहे, ज्यांनी सकाम काम्यकर्म सोडले (पिता ब्रह्मदेवालाही नकार दिला) अशा सर्वोत्कृष्ट भक्तांची लक्षणे म्हणजेच सनत्कुमारांचे दिव्य चरित्र या श्लोकातून प्रतीत होते.
असा हा भगवान् श्रीसनकादिकमुनींचा भागवतमहापुराणानुसार भगवंताचा पहिला अंश अवतार. ज्याच्या सात्विक संतापामुळे शापवाणीद्वारे जयविजयास दैत्ययोनीत जन्म घेऊन त्यांच्या क्षयाकरिता अथवा उद्धाराकरिता परमेश्वराला वराहादी रामकृष्ण अवतार धारण करणे प्राप्त झाले, ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून समस्त लोकांचे ज्ञानवृद्ध तत्त्ववेत्ते, मोक्षगुरू या पदाला भूषण ठरले असें सनकादिकऋषी.
श्री विष्णुसहस्रनामात अंतर्भूत या अवतार लीलेचे शब्दसुमन ऋषीचतुष्टयांच्या चरणांपाशी अर्पण.
तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत।।
एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार।।
भाकोनी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा।।
तुका म्हणे मज आठवा। मूळ लवकरी पाठवा।।
-अनिकेत घिवलीकर
Comments