श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीवामनावतार
कृपा भाकितां जाहला वज्रपाणी ।
तया कारणें वामनु चक्रपाणी।।
- श्रीसमर्थ रामदासस्वामी
भोगवादी प्रवृत्ती बळावली म्हणजे समाजातले सत्व निघून जाते. हा सिद्धांत नवा नाहीं, पुराणकाळापासून याचे दाखले आपल्याला पाहावयास मिळते. त्यातील इतिहास म्हणजे बलीराजाची कथा.
भगवतभक्त प्रल्हादाचा नातू नि विरोचनाचा पुत्र बली ब्राह्मणांच्या जोरावर आणि आपल्या बाहुबलाने स्वर्गस्थ इंद्राचा पराभव करून गुरु शुक्राचार्यांच्या आशीर्वादाने इंद्र पदावर आरुढ झाला.
देवमाता अदितीने घडलेला प्रकार पतिदेव ऋषी कशापांना कथन करून शोक व्यक्त केला. इंद्रादी पुत्रांना स्वस्थानापासून भ्रष्ट होण्याची पाळी आल्याचे सांगितले. झाल्या प्रकाराचा बिमोड करण्यास आणि देवांचे गतैश्वर्य पुन्हा कसे प्राप्त होईल याची पृच्छा तिने केली. कश्यपांनी अदितीस श्रीनारायणाची उपासना करण्याचे सांगून “पयोव्रताने” त्याची कृपा संपादित केल्यास देवांच्या कार्यास बळ मिळेल असें आश्वासन दिले तथा गेलेंले वैभव ते पुन्हा प्राप्त करू शकतील असेंही वचन दिले. त्याप्रमाणे अदितीने व्रतारंभ तथा द्वादशाक्षरी मंत्राचा जप सुरू केला. व्रताच्या प्रभावाने भगवान् श्रीहरी तिच्या पुढे अवतरीत होऊन यथाकाली तिच्या पोटी आपण अवतार घेऊन बलीचा गर्वहरण आणि देवांची स्वस्थानी पुनर्स्थापना करण्याची ग्वाही देते झाले.
तो सुरसाह्य जगजीवन। स्वयें कुब्ज झाला “वामन” । अंगें याच होऊन। देवांचा अपमान उतरला जेणें।। (एकनाथी भा. ४:२३७)
भाद्रपद शुद्ध द्वादशीस श्रीहरीने माध्याह्नकाळी कश्यप-अदितीच्या पोटी जन्म घेऊन अद्भुतरीत्या बटू स्वरूप धारण केलें. प्रजापती ऋषी कश्यपांनी वामनाचे जातकर्म केल्यानंतर वामनाने अग्नीमध्यें समिधा घालून होम केला. लागोलग तो बळीराजाने आरंभिलेल्या अश्वमेध यज्ञ स्थानी आपला पदभार टाकीत निघाला.
यज्ञोपवित, छत्र, दंड, कमांडलू धारण केलेल्या या बटू रूपाकडे पाहून तिथले ऋत्विजजन निस्तेज झाले नि वामनाने यज्ञ मंडपात प्रवेश केला.
बलीने श्रीवामनाचे यथोचित स्वागत करून पादप्रक्षालन केलें. आसनादी उपचार समर्पण केल्यानंतर, दानार्थ काय द्यावें असा उघड प्रश्न केला. वामनाने बलिची स्तुती करून केवळ त्रिपाद भूमी म्हणजे तीन पावले मावेल एवढीच भूमी दान म्हणून मागितली. तेव्हा बलीने अल्पवयी, पोरकट आणि अप्रबुद्ध म्हणून वामनाच्या या याचनेची थट्टा केली. बलीचा हा अहंकार ठेचण्यास हे एक कारण पुरेसे झाले. त्रैलोक्याचे राज्य हे असंतोषाचे कारण होते तेच उलटपक्षी संतोष आणि आत्मतेज वृद्धिंगत होण्यास साहाय्य होते, असा श्रीवामनाने बलिराजास उपदेश केला.
शुक्राचार्यांनी श्रीविष्णूच वामनस्वरूपात येथे प्रकट झाला आहे हे ओळखले होते आणि तसें बलीला सावधान करण्याचा प्रयत्नही केला. तरीही बळीने गुर्वाज्ञेचा नम्रपणे अव्हेर केला. त्रिपाद भूमी दान देण्याकरिता उदकपूर्वक संकल्प सोडला. आपले सर्वस्व हरण होणार हे ठाऊक असूनही बलीने ब्राह्मण याचकाचा अवमान होऊ नये म्हणून वामनाला ते दान अर्पण करण्याचा निश्चय केला. संकल्पचे उदक हातावर पडतात वामनाने योगबलाने आपले शरीर वाढवित विश्व व्यापून टाकले.
श्रीवामनाने पहिल्या पाऊलामध्यें संपूर्ण पृथ्वी, आकाश व बाहूंनी दिशा व्यापून टाकल्या. दुसऱ्या पाऊलाने स्वर्गादी तपलोकांच्याही पलीकडे सप्तलोकापर्यंत आक्रमिले.
तीन पावले भूमी दानाचे वचन बलीने दिले पण पहिल्या आणि दुसऱ्या पावलागणिक सर्वस्व हरण झाले. तिसऱ्या पावलाचे दान देता येत नसेल तर नरकवास भोगणे प्राप्त होते. वामन प्रत्यक्ष विष्णू आहेत याची पूर्ण जाणीव बलीला होती.त्याने तिसरे पाऊल ठेवण्यासाठी आपले मस्त पुढे वाकवून त्यावर आपले चरण कमल ठेवण्यास श्रीवामनाला नम्रपणे विनवीले. वामनाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि असुरांसह सुतलामध्यें (सात पाताळांपैकी एक) प्रवेश करण्यास धाडून दिले आणि आपण स्वतः त्याचा द्वारपाल म्हणून सदैव तिष्ठत राहण्याचे अभिवचन दिले. “ आत्मार्पण करितां बळी । द्वारीं द्वारपाळ जाहला वनमाळी” ( ए.भा ३:३४०)
श्रीवामन अवताराची ही कथा सर्वसाधारणपणे हिंदूंना ज्ञात असते. तेव्हा आता श्रीविष्णुसहस्रनामांत भगवतपुराणानुसार पंधराव्या तथा दशावतार क्रमातील पांचव्या अवतारासंबंधी त्यातील नामे आणि लीला प्रसंग यावर अल्पचिंतनात्मक भावार्थ देण्याचा हा प्रयत्न.
(०१) विश्व - भगवंताचे विश्वरूप दर्शन आपल्याला महाभारतात उल्लेखिलेले हे सामान्यतः माहीत आहे. परंतु बळीराजास वामनरुपी श्रीहरीने पहिल्या पावलात पृथ्वी, आकाश, अंतरिक्ष व्यापून टाकणारे आघात “विश्वरूपाचे” दर्शन घडविले होते. सर्व दिशांमध्यें वास करणारा म्हणून वामनास (९४०) दिशा हे नाम साजेसे आहे.
(०२) विष्णु - जो सर्वत्र व्यापून राहिला तो विष्णु. या अर्थाने वामनाने दोन्हीही पावलात पृथ्वीसह ब्रह्मांड आपल्या कवेत घेतले. अतः विष्णु हे नाम वामन अवताराशी निश्चित जोडता येते, तथा वामन हा मुळातच विष्णु अवतार आहे.त्यामुळे विष्णु हे नाम दुसऱ्या क्रमात वामन अवताराची जोडणे क्रमप्राप्त आहे.
(५३) स्थविष्ठ - आकाराने ज्याचे रूप विशाल असा. दानाच्या संकल्पचे उदक वामनाच्या हाती पडताच तो बटु वामन महाकाय रूपात परिवर्तित झाला.
(६१) त्रिककुब्धाम - श्रीमहाविष्णुने वामनावतार धारण करता तो प्रचंड रूपात वाढू लागला तेव्हा भूमी, स्वर्गादी सप्तपाताळही ज्याच्यामध्यें सामाविले ते बलीस दिसून आले. “त्रि” म्हणजे तीन लोक, “ककुभ” म्हणजे दिशा आणि “धाम’ म्हणजे आश्रयस्थान. या तिन्हींचा समुच्चय वामनरूपात बलीला दिसला.
(७९) क्रम - ज्याने तीन पावलांमध्यें अखिल ब्रह्मांड ओलांडले किंवा आक्रमिले असा. ओलांडणे किंवा व्यापणे हा ज्याचा स्वभाव आहे तो क्रम या नामात समाविष्ट आहे. ऋग्वेदातल्या विष्णुसुक्तात वामनावताराशी निगडित एक ऋचा प्रसिद्ध आहे “इदं विष्णुर्वि चक्रमे त्रेधा नि दधे पदम्। समूढमस्य पाॅंसुरे।।” की, भगवान् श्रीविष्णुने या जगताला धारण केलें आहे कीं, ज्याने पहिले भूमी दुसरे अंतरिक्ष आणि तिसरे द्युलोक आपल्या तीन पावलाने व्यापिले आहे.
(८२) कृतज्ञ - बळीराजाचा प्रामाणिकपणा, स्वार्थत्यागाने वामन प्रसन्न झाला. वामनाच्या स्वारीचे कारण माहीत असतानाही बलीने त्रैलोक्याचे राज्य एका वचनपूर्ती करिता समर्पण केलें. त्याच्या केवळ या दातृत्वाने भगवान् आनंदित झाले नि कृतज्ञता बाळगून त्याचा द्वारपाल झाले आणि बळीराजाला चिरंजीव पद दिले.
(१०२) अमेयात्मन् - ज्याचे स्वरूप मोजण्याच्याही पलीकडे असें भगवंताचे “वामन रूप”.
(१३३) लोकाध्यक्ष - इंद्राचे हरण केलेले राज्य वामनाने बलीकडून दानात पुन्हा मिळवून देवांना दिले. तेव्हा ब्रह्मादेवादी प्रभृतींनी लोकांच्या कल्याणास्तव वामनास लोकपालाचे अधिपत्य दिले असेच देवांचेही रक्षण करण्याकरिता तो तत्पर असल्याने (१३४) सुराध्यक्ष जाहला.
(१४७) विजय - देवांचा पराभव करून बळाने इंद्रप्द ओरबाडणाऱ्या बलीवर आपल्या बौद्धिक युद्धाचा वापर करून वामनाने विजय संपादित केला.
उपेन्द्रो वामनः प्रांशु: अमोघः शुचिरूर्जितः ।
अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः ।।
(१५१) उपेंद्र - इंद्र हा ऋषी कश्यप आणि देवी अदिती यांचा थोरला पुत्र. बलीच्या पराभवासाठी श्रीहरीच्या उपासनेने वामन हा पुत्ररत्न त्यांना प्राप्त झाला. इंद्राच्या पाठचा भाऊ म्हणून त्यास उपेंद्र म्हणतात. किंवा जो इंद्रापेक्षाही पराक्रमी असाही अर्थ आहे. देवांच्या अभ्युदयार्थ वामनाला अधिकार दिला तेव्हा भागवतकरांनी त्यास उपेंद्र असें बिरुद लावले आहे. “उपेंद्रकल्पयाञ्चक्रे पतिं सर्वभूतये।” (भा.सं ८:२२:२३)
(१५२) वामन - बलीचा गर्व नष्ट करून देवांना स्वस्थान पुन्हा प्राप्त करून देण्याकरिता श्रीनारायणाने अश्यप अदितीच्या पोटी बटुरुपात अवतार धारण केला. तो हा “वामना” ठेंगण्या ब्रह्मचार्याने आपल्या प्रखर व्यक्तिमत्त्वाने देह आणि बुद्धी याचा विनियोग बलीच्या अहंकाराला वाकविता झाला.
(१५३) प्रांशु - बली कडून त्रिपात भूमी दान मागून ज्याने विराट रूप धारण केले त्या लिहिलेला प्रांशू म्हणजे उंच हे दाम शोभते.
(१५४) अमोघ - भगवंताची केलेली अल्प सेवा ही व्यर्थ जात नाहीं. वामनाने एकाच वेळी बळीराजा तथा देवेंद्रास अमोघ कृपेने कृतार्थ केले.
बलीने अन्निच्छेने सर्वस्व भगवद्दर्पण केले. त्या कृतीमुळे वामन प्रसन्न झाला. “यान्ति मद्याजिनोऽपि माम्” (गीता ९:२५)
(१५५) शुचि - ज्याच्यात दर्शनमात्रेनेही ज्यास पावित्र्य प्राप्त होते अशा वामनाच्या आगमनाने बळीराजा अत्यंत आनंदित होऊन त्याचे पितर तृप्त झाले, कुळ पवित्र झाले, चालविलेला यज्ञ यथासांग पार पडला अशी स्तुती भागवतकरांनी केली आहे. शुचि म्हणजे अत्यंत पवित्र.
(१५६) उर्जित - बलीचे सैन्य ज्यावेळी वामनावर धावून गेले तेव्हा त्या दैत्यांचा विष्णुपार्षदांनी नाईनाट केला. या सामर्थ्याच्या, बलाच्या गुणामुळे हे उर्जित नाम वामन अवतारासंबंधी आपण पाहू शकतो.
(१५७) अतीन्द्र - थोरला बंधू इंद्र याचे सुरेंद्रतत्त्व अबाधित राहावे यासाठी धाकटा बंधू वामन सहाय्यभूत झाला. गुणैश्वर्याने इंद्रापेक्षाही वरचढ झाला म्हणून वामनास अतीन्द्र हे नाम प्राप्त झाले.
(१५८) संग्रह - हे नाम प्रलयाशी निगडित आहे. तथापि वामनावताराचा विचार करता बलीचा आजोबा प्रल्हाद आणि आता स्वतः बली या निस्सीम भक्तांचा भगवंताने आपल्या भक्तमंडळीत “संग्रह” केला असेंच म्हणावे लागेल.
(१५९) सर्ग - ज्या त्रिविक्रमाने आपल्या तीन पाऊलांमध्यें भूमीसहित पाताळादी स्वर्ग व्यापून टाकले, ते चरण भक्तांसाठी सहज साध्य आहेत असें पराशरभाष्यात म्हटले आहे.
(१६०) धृतात्मा - पराशरभाष्यामध्येंच असें म्हटले आहे की, भगवान् भक्तांसाठी आत्मदान करूनच जगत असतात. याचा अर्थ भगवंत भक्ताच्या अधीन असतात म्हणून तो धृतात्मा म्हटला आहे.
(१६१) नियम - बळीराजाच्या राज्यात व्यवस्थित असलेले शैथिल्य वामनाने ओळखून ज्याचे त्याचे अधिकार त्यास दिले. इंद्राला इंद्रलोकांचे राज्य आणि आपल्या असुरांसह संपत्ती घेऊन सुतल्या पाताळ्यात सुखेनैव राज्य करण्याचा कठोर नियम बलीला घालून दिला.
(१६२) यम - अंतःकरणामध्यें राहून वृत्तींचे नियमन करणारा तो यम. बलीच्या अंतरंगामध्यें वामनाला भूमी दान करण्याची इच्छा जागृत करणारा स्वतः भगवंतच आहे.
(१७३) महाबुद्धि - बळीचा अहंकार निस्तेज करण्यासाठी त्याच्याकडे कुठल्या गोष्टीचे दान मागावयाचे याची पूर्वपीठिका एका भगवंता शिवाय अन्य कुणाला ठाऊक असणार!
(१८६) सुरानन्द - इंद्रादी देवतांना आपले राज्य पुन्हा मिळून देणारा वामन हा आनंद देणारा म्हणजे सुरांना आनंद देणारा होय.
(१९०) दमन - बळीराजा दैत्य बहुत मातला । संपत्ति हरिल्या देवांचिया ।। (नामदेवराय)
तिसऱ्या पावलाचा संकल्प पूर्ण झाला नाहीं म्हणून बलीला त्रिविक्रम वामनाने त्यास दंड देणे प्राप्त झाले. त्याचे दमन वामनाने सुतलामध्यें धाडले. तसेच त्याला शासन केले म्हणून (२०६) शास्ता हे नामही येथे उद्धृत करणे योग्य आहे.
(२०१) संधाता - बलीचे वामनाने दमन केलें. तरी बलीच्या उत्तम कार्याची भगवंताने प्रशंसा केली तथा स्वर्गापेक्षा उत्तम सुखचैनीने परिपूर्ण अशा सुतलामध्यें त्याला स्थान देऊन चिरंजीव केलें. रक्षपाळ बळीच्या द्वारीं। भक्तीचा आभारी ।। (तुकोबाराय)
(२१८) अग्रणी, (२१९) ग्रामणी, (२२२) नेता - देवतांच्या रक्षणार्थ श्रीवामन त्यांचा पुढारी झाला, म्हणजे अग्रणी. ग्रामीण म्हणजे नेतृत्व करणारा आणि हे सर्व गुण नेत्यामध्यें एकवटलेलें असतात.
(२४२) सत्कृत - वामनाची स्वारी येताच बलीने आदरपूर्वक आसन देऊन पाद्यपूजन करून देव दुर्लभ सत्कृत्य केलें.
(२४८) अप्रमेयात्मा - जो बाह्य स्वरूपावरून ओळखता येत नाहीं. असा बटुरुपातला वामन कुठल्या प्रकारचे वा किती दान मागणार याचा अनुमान बलीला आला नव्हता.
(२५०) शिष्टकृत - या नामाचा अर्थ शासन करणारा तथा पालन करणारा असून बलीला शिक्षा केली त्याच प्रकारे पाताळाचे राज्य देऊन त्याचे पालनही केलें.
(२५३) सिद्धसंकल्प - वामनाने ठरविलेला संकल्प मोठ्या चतुराईने सिद्धीस नेला.
(२६२) वर्धमान - जो आकाराने प्रचंड रूप धारण करतो असा. भागवतामध्यें वामन बळीराजाला विश्वरूप दर्शन घडवीत असताना श्लोक आला आहे तो असा : तद् वामनं रुपमवर्धताद्भुतां हरेरनन्तरस्य गुणत्रयात्मकम्। की, अनंत असणाऱ्या श्रीहरीने त्रिगुणात्मक वामन रूप वाढवू लागले. ते वर्धमान नाम येथे यथायोग्य निर्देश होते.
(२६८) महेन्द्र : इंद्र हा देवांचा राजा तथापि असुरांच्या भयापोटी ते राज्यपद सोडून महाविष्णूच्या आश्रयाला जावे लागले ते राज्यपद वामनाने पुन्हा इंद्राला मिळवून दिले. असा हा इंद्राचाही इंद्र अर्थात राजांचा महाराज महेंद्र वामन होय.
(२७२) बृहद्रूप - विशाल रूपाचा तो बृहद्रूप. श्रीवामनाने बळीराजाला दाखविलेले विश्वरूपदर्शनाशी हे नाम निगडित आहे.
(३२२) वासवानुज - वासव म्हणजे इंद्र अनुज म्हणजे भाऊ ऋषि कश्यप आणि माता अदिती यांच्या पोटी इंद्राच्या मागून जन्मल्याने वामनास हे नाम प्राप्त झाले.
(३८७) स्थानद - बलिने त्याची प्रतिज्ञा पूर्ण केल्यानंतर त्याला सुतलामध्यें जाण्याची आज्ञा देऊन तेथे यथायोग्य स्थान निर्माण करावयास वामनाने सांगितले. बलीला ते परमस्थान देणारा तो स्थान.
(४७५, ४७६, ४७७) धर्मगुप्, धर्मकृत्, धर्मी - श्रीवामनाचा अवतार हा धर्मरक्षक, धर्मस्थापना आणि धर्मधारणा करणारा असा आहे. देवांचा शत्रू बली याने भ्रष्ट केलेली संपत्ती पुन्हा देवांना प्राप्त करून देण्याची ग्वाही धर्मरक्षक वामनाने केली. गतवैभव धर्माने प्राप्त करून देईन असें वचन आई अदितीस त्याने दिलेले. असा हा वामन मूर्तीमंत धर्मच होय. “धर्माची तू मूर्ती । पापपुण्य तुझे हाती।।” (श्रीतुकोबा)
(४७८, ४७७) सत्, असत् - वामनाचे स्वरूप सत्तारुप म्हणजे सत्. तथा भासमान विश्वापलीकडे मायायुक्त तो असत्. ही दोन्ही वामनाचीच रुपे.
(५३०) त्रिविक्रम - स्वर्ग, अंतरिक्ष आणि पृथ्वी ही तीनही लोक ज्याने आपल्या तीन पावलाने जिंकली व व्यापली तो त्रिविक्रम.
(५३४) त्रिपद - तीन पावलांमध्ये स्वर्गादी अंतरिक्ष, भूमी व्यापणारा हा त्रिपद होय.
(७१८) महामूर्ति - या त्रिविक्रम वामनाने बलीला घडविलेले विश्वरूपदर्शन ही महामूर्तिच.
(७५७) तेजोवृष - बलीचा यज्ञ ज्या ठिकाणी चाललेला त्या नर्मदेतटी अनुष्ठान करणारे ऋत्विकजनांनी श्रीवामनास येताना पाहिल्यावर सूर्य उदयाला येत असल्याचा भास व प्रत्यक्ष अग्नी चालत येत आहे असें त्यांना प्रतीत झाले. तो हा तेजोवृष. तसाच तो (७५८) धृतिधर होय.
(७८६) इंद्रकर्मा - इंद्र इत्यादी देवतांसाठी म्हणून वामनाने हे अवतार कार्य केले अथवा श्रीमहाविष्णुने हा अवतार धारण केला.
(८३५, ८३६) अणु बृहत् - ब्रम्हांडांच्या मानाने प्राकृतिक स्वरूपातला वामन अणू एवढाच होता. अत्यंत लहान. पण तोच वामन बृहत होऊन ब्रह्मांडापार त्याचा विस्तार स्वरूप दाखविता झाला.
(८३८) स्थूल - श्रीवामनाचे शरीर स्थूल अथवा लठ्ठ स्वरूपात दाखविण्यात येते.
(८५१) सर्वकामद - बलीने वामनाची भक्तीपूर्वक आज्ञापालन करता झाला आणि आशीर्वाद प्राप्त करून घेतला. म्हणून वामनाने त्याची सर्व इच्छा पूर्ण करीत सर्वकामद हे आपले नाम सार्थ केलें
(८५९, ८६०) दण्ड, दमयिता - ही दोन नामे प्रत्येक अवतारा संबंधी लागू पडतात. कारण ज्या उद्देशाने परमेश्वर अवतार धारण करतो त्यात दृष्टांचे पारिपत्य, त्यांना दंड देणे, शासन करणे हे विशेषत्वाने आहे. भगवद्गीतेत त्याची प्रतिज्ञाच आहे विनाशाय दुष्कृताम्। .वामनानेही बलीचा गर्वहरण केला. हा एका अर्थाने दंडाच होता. बलीचे सैन्य ज्यावेळी वामनावर चालून गेले तेव्हा विष्णूच्या पार्षदांनीही त्यांचे दमन केलें.
(८७३) अर्ह - समस्तजनास अत्यंत पूज्य असा. त्या योग्यतेच्या पुरुषाचे अर्ध्य,पाद्य, आसनादी उपचारांनी स्वागत करणे पूजन करणे प्रशस्त असा. वामनाची स्वारी यज्ञमंडपा समोर येत असल्याचे पाहताच बळीराजांनी भक्तीपूर्वक त्याचे स्वागत, पूजन केलें. श्रीवामनाच्या पदप्रक्षालाने भूमी पवित्र आणि यज्ञाची पूर्तता झाल्याचे बली कथन करतो.
(८८०) विभु - वामनाने विश्वरूपदर्शन घडविताच तो सर्व व्यापक असल्याचा प्रत्यय दिला.
(८९४) लोकाधिष्ठानम् - स्वर्ग, अंतरिक्ष, भूमी या सर्व लोकांवर ज्याने आपले अधिष्ठान सिद्ध केलें तो लोकाधिष्ठानम्.
(८९५) अद्भुत - आतां वामन असणार हा बटू एकाएकी बृहद् स्वरूप घेऊन आश्चर्यकारक सामर्थ्य प्रकट करता झाला ही त्याची अद्भुत लीला होय.
(९५४, ९५५) ऊर्ध्वग, सत्पथाचार - धर्माचे पालन तथा उपदेश करता वामनाने सन्मार्गाचे आचरण स्वतःच्या देहबोलीतून प्रकट केले मी बलि समवेत असूरांना उन्नत तिकडे घेऊन गेला.
(९८१) यज्ञान्तकृत - बळीराजांनी आरंभ लिहिलेला यज्ञ त्याच्या त्यातला अहंपणा नष्ट करून वामन आणि तो यज्ञता संगम पार केलाच त्याबरोबर बरी बळीराजाला यथायोग्य फलही प्राप्त करून दिले. यज्ञाची समाप्ती करणारा तो यज्ञान्तकृत.
असा हा श्रीवामन अवतार स्वयमेव (४०३) धर्म स्वरूप असून बलीराजाच्या प्रामाणिकतेवर (५२६) आनंद तथा (३९१) तुष्ट होत्साता त्यास विविध फल देत म्हणजे (९३८) विदिश झाला. आणि सुतलाचे राज्य देऊन तेथे सदैव राहण्याची आज्ञा अर्थात (९३९) व्यादिश या नामाने अंकित झाला.
देवांचेही समाधान आणि बलीराजाचे प्रतिज्ञा पालन अशी दुहेरी लीला भगवंताने या अवतार कार्यात केली.
देव देवपदीं बैसऊनि सारे। राखीतसें द्वार नामा म्हणे।।
✍🏻अनिकेत घिवलीकर.

Comments