श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीवराहावतार
।। धरि बराह बपु एक निपाता ।।
-श्रीतुलसीरामायण
{परमात्म्याने वराहाचे शरीर धारण करून हिरण्याक्षाला मारले }
भगवंताच्या सगळ्या अवतारांमध्यें श्रीवराहावतार हा अत्यंत गूढ तथा गहन असा पृथ्वी स्थिरस्थावर होण्यापूर्वीचा आश्चर्यकारक रूपकात्मक अवतार आहे श्रीवराहवताराची कथा श्रीभागवतपुराणानुसार संक्षिप्तरित्या कथन करून त्या अवतार लीलेचा कथा भाग सहस्रातल्या नामांद्वारे विवरण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. भगवंताचा हा अवतार आधी सांगितल्याप्रमाणे समजण्यास कठीण असल्याने एक एक स्वतंत्र नामांच्या आधारे "जे काहींसे आकलन" झाले त्या संबंधी आपणास विशद करून देण्याचा माझा हा प्रयत्न होय.
त्याचे कारण असें की या वराह अवताराचे सविस्तर वर्णन भागवतकारांनीही केलें नाहीं. त्यास "यज्ञस्वरूप" मानून स्तुती गायली आहे. महाभारत आणि इतर पुराणांमध्यें अल्पभेदाने भागवतातलीच कथा आली आहे. त्याचे विवरण त्या त्या नामांप्रमाणे ओघाने घेण्यात आले आहे.
श्रीभागवताच्या तिसऱ्या स्कंधात ही अवतार कथा आली असून, ती याप्रकारे; सृष्टीच्या आरंभी ब्रम्हदेवांनी स्वयंभुव मनु आणि भार्या शतरुपा यांना उत्पन्न करून त्या उभयतांस प्रजोतपन्न आणि प्रजापालन करण्याची आज्ञा दिली. ती अज्ञात शिरसावंद्य मानून प्रजेला राहण्यासाठी स्थान दाखवावे असें म्हणून ब्रह्मदेवास सांगतो. कारण पृथ्वी अगाध जलात बुडून गेली होती. आपण सृष्टी उत्पन्न करण्याच्या कार्यात मग्न असताना उदकाची वृद्धी होऊन पृथ्वी रसातळाला गेली हे ब्रह्मदेवाच्या ध्यानी आले. पृथ्वीच्या उद्धारार्थ काय करावे असा सत्यसंकल्प विचार ब्रह्मदेवाच्या मनांत यायचा अवकाश तोच त्याच्या नाकपुडीतून अंगुष्ठमात्र वराहाचे पिल्लू बाहेर पडले. ब्रह्मदेवास आश्चर्य वाटण्याच्या आधीच क्षणार्धात त्या वराह पिल्लूने हत्ती एवढा आकार घेतला. या योजने मागे (५१०) सत्यसंध अर्थात सत्यसंकल्पाचा प्रणेता भगवंताच आहे हे उघडच आहे.
वराहोत्पत्ती झाल्या क्षणी तो "यज्ञवराह" आपल्या तेजोमय कांतीने सर्व दिशा प्रदीप्त करीत गंधवती पृथ्वीचा शोध घेण्याकरिता, वराहच्या स्वभावानुसार हुंगत हुंगत गाळात शिरला. त्याने उदकाचे विदारण केलें तेव्हा त्यास पृथ्वी दिसली आणि आपल्या दाढांवर उचलून तिस रसातळातून वर काढली. तोच हिरण्याक्ष नामक दैत्य तेथे आला नि भगवंतावर गदेचा प्रहार केला. आदिवराह आणि हिरण्यक्षाचे तुंबळ युद्ध होऊन भगवंताने त्याचा नाश करून उद्धार केला. पृथ्वीला तिच्या कक्षेमध्यें स्थापन करुन ऋषीगणांनी त्याची स्तुती गायली. अवतार कार्य पार पाडून तो यज्ञवराह तिथून अंतर्धान पावला.
अशी ही भगवंताची लीला मोठी अद्भुत असून तिचे पूर्ण आकलन होणे दुस्तर आहे. पृथ्वीच्या बाहेर पाणी, तेथील गाळ, पृथ्वी रसातळाला जाऊन तिला आपल्या सुळ्यांच्या आधारे बाहेर काढून पुन्हा सूर्यमालेच्या कक्षेत व्यवस्थित बसविणे या गोष्टी किंवा गप्पा नसून खगोलशास्त्रीय रूपक आहेत. संशोधनाला मोठा वाव आहे. पृथ्वी बाहेर अंतरिक्षात पाण्याचा अधांतरी जलाचा साठा आहे हे सिद्ध झालेले आहे. शास्त्रज्ञांनी पृथ्वीला कोणीतरी तिच्या कक्षेमध्ये बसविले असेें संशोधन पूर्ण म्हटले आहे. आपल्या परंपरेत पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आधारलेली आहे असेें मानतो कै. श्री.शेखर अनंत आठवले यांनी एका भागवत प्रवचनात याचें समर्पक विश्लेषण केलें. तेें म्हणतात शेष संकल्पना खोटी नाहीं. शेष या एका शब्दाने सामान्य जन तथा शास्त्रज्ञांचीही समाधान व्यासांनी केलें आहेत. पृथ्वी सोडून इतर जे विश्व व अंतरिक्ष आहे त्याच्या परस्पर गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने पृथ्वी तिच्या कक्षेत फिरते. पृथ्वी सोडून अन्य विश्व म्हणजे शेष विश्व , पृथ्वी सोडून उरलेले विश्व तीच ही शेष संकल्पना. शेष म्हणजे नाग आणि शेष म्हणजे राहिलेले असा दुहेरी अर्थ निघतो.
वराहावताराची संगती एका कल्पातली नसून काही कल्पनांच्या आधारे याचा विचार करावा लागतो. या "आदिवराह" अथवा "यज्ञवराहाच्या" आधी "नीलवराह" आणि पुढे "श्वेतवराह" असेंंही अवतार झालेंं आहेत , परंतु तो भाग येथे मी घेत नाहीं.
आता वराहावताराची लीला, कथा भाग आणि सहस्रातील नामे या आधारे तें चरित्र विवरण करण्याचा प्रयत्न करतो.
(३५) प्रभाव : ज्याची उत्पत्ती दिव्य आहे असा. ब्रह्मदेवाला विचार करण्याचाही अवधी या संकल्प सिद्ध भगवंताने दिला नाहीं. श्रीवराह भगवंताची उत्पत्ती अशी दिव्य तऱ्हेने झाली की मरीचि आदी ऋषी, सनकादिकुमार व मनू यांनी आश्चर्य तथा हे विलक्षण रूप पाहून अनेक तर्क केलें. आणि मग ब्रह्मदेव म्हणाला हा दिव्य म्हणजे प्रभाव कोण?
(४२) अनादिनिधन : ज्याला जन्म आणि मृत्यू या विकारांची बाधा नाहीं असा. वराहाची उत्पत्ती जनना वाचून झाली असल्याने तो अनादिनिधन आहे. अवतार कार्य करून तो (११) परमात्मा अंतर्धान पावला, असें महाभारतात वर्णन केलें आहे.
(५३) स्थविष्ठ : जो आकाराने अति विराट. ब्रह्मदेवाच्या नाकपुडीतून वराहाची उत्पत्ती झाली तेव्हा ते अगदी लहान पिल्लू बाहेर पडले. (४५७) सूक्ष्म होते आणि त्याचे पुढे (८३६) बृहद् रुपात परिवर्तित होऊन प्रचंड आकाराचे रूप धारण केलें.
(५५) अग्राह्य : वराहाची उत्पत्तीच नव्हे लीलांचे वर्णनही इंद्रिय, मन, बुद्धीच्या पलीकडे आहे. सनकादिक ऋषींनी त्याच्या प्राकट्यकाली नमस्कार केला नि आश्चर्य व्यक्त केलें. तसेच अवतारकार्य झाल्यानंतर भागवतकरांनी "या लीलेचा अंत नाहीं" असें म्हटले आहे.
(४१) महास्वन : वराहाचे प्राकट्य झाल्यानंतर त्याने पहिली कृती कुठली केली तर मोठ्याने गर्जना. त्या भयकारी गर्जनेने दाही दिशा निनादून टाकल्या. अतः तो महास्वन. स्वन म्हणजे ध्वनी.
(१०१) वृषाकपि : महाभारताच्या शांतीपर्वामध्यें काश्यप ऋषींनी भगवान् वराहास वृषाकपी म्हटले आहे. "कपिर्वराहः श्रेष्ठश्च धर्मस्य वृष उच्चते।" "क" म्हणजे जलातून पृथ्वीचा उद्धार केला म्हणून वराहरुपी वृषाकपि. तथा वृष म्हणजे धर्म सुद्धा जो, धर्माचे उत्थापन करतो तो वृषाकपि होय.
(१०२) अमेयात्मा : जो मोजमापाच्या पलीकडे तो अमेयात्मा. या अवताराचा नेमका अंत लागणे शक्य नाहीं असा या नामाचा गर्भित अर्थ आहे
(१०३) सर्वयोगविनिःसृत : समस्त बंधनांपासून मुक्त असा या नामाचा अर्थ. या संदर्भात महाभारतात एक कथा वराहावताराशी निगडित आहे. पृथ्वीला रसातळातून बाहेर काढून योग्य जागी तिची स्थापना केल्यानंतर वराहाच्या सुळ्यांना तीन मृत्पिंड म्हणजे मातीचे तीन गोळे चिकटलेले. माध्यान्ह काल लागलेला असताना पृथ्वी समवेत निर्माण झालेल्या दर्भावर वराहने आपले द्रंष्ट हालवून ते मातीचे पिंड त्यावर ठेवले. यथाविधीने पिंड स्वतः म्हणजे परमात्म्याने परमात्म्यासाठीच अर्पण करून पिता पितामह आणि प्रपितामह हे सर्व त्याच्याच ठिकाणी असल्याने पिंडार्पणविधी केला. अशी पिंडदानाची पूर्वपीठिका आहे. आपले सर्व कर्तव्य हे पिंड झाल्यानंतर पुरु पूर्ण होते हेच सर्वयोगविनिःसृत या नामावरून दाखवून दिले.या क्रियेने भगवंताचे मानवावर अनन्य उपकार केलें म्हणून त्यास (६१४) लोकत्रयाश्रय हे नामाभिधान प्राप्त झाले. तथा सज्जनांना मरणोत्तर उत्तम गति देणारा (१८४) सतांगति होय.
(१२७) वेद (१३०) वेदांग : ब्रह्मदेवादीप्रभृतींनी वराहाची स्तुती केली तेव्हा त्यास वेदत्रय स्वरूप म्हटले आहे.
(१७०) महामाय : ज्याचे अगम्यत्त्व ध्यानांत येत नाहीं म्हणून तो मायामय आहे. हिरण्याक्ष यासारख्या मायावी दैत्यावरही भगवंताने आपल्या मायेच्या प्रभावाने परास्त केलें. अतः वराह हा महामाय होय.
(१८२) महीभर्ता : पृथ्वीचे भरण पोषण करणारा भर्ता, म्हणजे पती.पृथ्वीला रसातळातून वर काढणारा वराह हा भूमातेचा पती झाला. विष्णुपुराणात पृथ्वीमाता वराहास "त्वत्समाश्रया" म्हणजे मी तुमची आश्रित आहे असें म्हणते. (५३३) मेदिनीपती हे नामही पृथ्वीचा स्वामी या अर्थी वराहावताराशी निगडित आहे.
(१९०) दमन : अपराध्यास शासन करणारा. जय- विजय या विष्णु पार्षद पुढे हिराण्यकशिपु आणि हिराण्याक्ष या नमाने सनकादिक कुमारांच्या शापामुळे दैत्य म्हणून जन्माला आलेले. त्या शापातून स्वतः भगवान विष्णूच त्यांना (८६९) दण्ड देऊन त्यांच्या वासनांचा क्षय करून म्हणजे (५८१) शम करणारा आदिवराहाच्या रुपाने (२०८) सुररिहा म्हणजे देवांच्या शत्रूंचा निपात करणाऱ्याच्या रूपाने प्रगट झाला.
(२३५) धरणीधर : श्रीवराहने आपल्या सुळ्यांच्या आधाराने पृथ्वीला उचलले त्या योग्य धरणीधर हे नाम त्यास प्राप्त झाले.(७५६) धराधर हेही नाम त्याच्याशी संलग्न आहे.
(२५१) शुचि : रसातळासारख्या अधलोकांमध्यें पृथ्वी जाऊन अडकल्याने त्या प्रचंड गाळामध्यें उतरणार कोण? तर परमेश्वरांनी आपले सोवळेपण सोडून घाणीत उतरण्यास तसेच नीच योनी धारण करते झाले नि पृथ्वीचा उद्धार केला. श्रीसमर्थ मनोबोधात वर्णन करतात "जना रक्षणाकारणें नीच योनि। नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी" (श्लो.१२०) असें केलें आहे. की मानवाची ज्या भूपृष्ठावर धारणा व्हायची त्याकरिता पृथ्वी सुस्थिर पाहिजे तर ज्या अधोगतीला ती जाऊन रूतली तेथून तिचा उद्धार करण्यासाठी वराह म्हणजे डुकरासारख्या नीच योनीत हा परमात्मा भक्तांसाठी प्रगट झाला. त्या प्राण्याप्रमाणे हुंगण्याची (८३) कृति ही मात्र त्याने लीलया केली. हे सगळे जरी खरे असले तरी तो नित्य शुद्ध म्हणजे सूची आहे, पवित्र आहे. म्हणून त्यास (४४५) यज्ञ स्वरूप मानले आहे.
(२६६) दुर्धर : पृथ्वीला आपल्या सुळ्यांवर लीलया धारण करणे हे भगवान अदिवराह ऐवजी अन्य कोणालाही शक्य नव्हते. मागच्या नामाचा संदर्भ लक्षात घेता आपले शुचित्व सोडून नीच योनीत येऊन सबंध पृथ्वीचा उद्धार करणे हे दुर्धरच नव्हे काय? आणि या सगळ्या लीला सामान्य मानवाने आकलन करून मांडणे हे त्याहून दुर्धर होय.
(२७२) बृहद्रूप : अंगुष्ठमात्र प्रगट झालेले वराह पिल्लू क्षणार्धात हत्ती एवढे प्रचंड रूप म्हणजे बृहत् रूप घेते झाले. गजमात्र ववृधे असें भागवतात वर्णन केले आहे.
(२७३) शिपिविष्ट : शिपि म्हणजे प्राणी. त्या प्राण्यांमध्यें यज्ञरूप स्थित असल्याने भगवान् यज्ञमुर्ती शिपिविष्ट होय. वराहाला यज्ञस्वरुपच म्हटले आहे. "यज्ञो वै विष्णुः पशवः शिपीर्यज्ञ एव पशुषु प्रतितिष्ठति। " असें तैत्तिरीयोपनिषदात म्हटले आहे. शिपी म्हणजे किरण सुद्धा. वराहाच्या अंगावरच्या राट केसांमुळे त्याची कांती किरणांप्रमाणे दैदीप्यमान दिसत होती.
(२७४) प्रकाशन : आपले ताठ पृच्छ, त्वचेवरील किरणांसारखे केस, मानेवरील लांब केस, खुरांनी अस्ताव्यस्त संचार आणि दाढांचा पांढराशुभ्र वर्ण नि दृष्टीने सर्वत्र पसरणारा प्रकाश हे सगळे वराहाचे भागवतकारांनी केलेलें वर्णन प्रकाशन या नामाला शोभून दिसते
(२७५) ओजस्तेजोद्युतिधर : ओज म्हणजे प्रभा, तेज म्हणजे सामर्थ्य, नि द्युति म्हणजे वैभव. या त्रयींना धारण करणारा तो वराह भगवान्.
(२९४) कामकृद् : भक्तांची कामना पूर्ण करणारा तो कामकृद्. जय- विजय यांना सनकादिक मुनींनी त्यांना मृत्यूलोकांत दैत्यकुळामध्यें जन्माला याल असा शाप दिला. तो मान्य करून त्यांनी या अधम योनीतही भगवंताचे स्मरण सदैव असावे अशी प्रार्थना करून उःशाप मागितला, तो श्रीमहाविष्णूंनी दिला. तो वर विरोधभक्ती या नावाने प्रसिद्ध झाला. तथा पृथ्वीनेही "मामुद्धरास्मादद्यत्वम्" आपण मला या पाताळातून उद्धार करून यावे अशी प्रार्थना केली. ती वराहाने पूर्ण केली म्हणून त्यास कामकृद् असें म्हणतात.
(३१५) क्रोधकृत्कर्ता : योग्य प्रसंगी रागावणारा किंवा रागीट माणसांचा नाश करणारा. वराहावताराचे प्रयोजन दोन प्रकारे होते , एक पृथ्वीची पुनर्स्थापना दुसरे हिरण्यक्षाचा वध. युद्धामध्यें कृद्ध झालेला हिरण्यक्षाला वराह भगवानाने लीलया संपविले.
(३१५) महीधर : पृथ्वीला आपल्या दाढेवर धारण करणारा तो महीधर. त्याच पृथ्वीला आपल्या सामर्थ्याने तारुण नेणारा तो (३३७) तारण होय आणि (९२३) उत्तारण या नामाचा अर्थही हाच आहे, संकटातून पार नेणारा.
श्रीवराह भगवंताचे वर्णन श्रीविष्णुसारखे चारही आयुधे धारण करणारा असे विष्णुपुराणात केलें आहे. तेव्हा शंख, चक्र, गदा आणि पद्म यासंबंधी सहस्रनामातील नामे पाहून.
(३४४) पद्मी : ज्यांनी हातामध्यें कमलपुष्प धारण केलें तो पद्मी.
(५८६) चक्रगदाधर : या नामात चक्र आणि गदा अशी दोन आयुधे धारण करणारा भगवान् असें नाम आहे. युद्ध प्रसंगी गदेचा प्रयोग आणि सुदर्शन चक्राच्या साह्याने हिरण्याक्षाचा उद्धार केला.
(९९३) शंखभृत् : ज्याने पांचजन्य शंख हाती धारण केला आहे असा.
(९०८,९९५) चक्री : सुदर्शनचक्र जो धारण करतो तो चक्री.
(९९७) गदाधर : कौमुदकी नावाची गदा ज्याने घेतली आहे असा.
(९९८) रथाङ्गपाणि : ज्याचा हातात सदैव चक्र असते असा.
(३६२) समितिंजय : आपल्या अतुल पराक्रमाने युद्ध जिंकणारा. समिती म्हणजे युद्ध.
(४६२) जितक्रोध : दृष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात तथापि भगवान् क्रोधावश होत नाहीत. या संदर्भात जितक्रोध हे नाम आहे. हिरणनाक्षाचा वध हा दुसऱ्या तऱ्हेने त्याचा उद्धारच होता.
(४६३) वीरबाहु : : ज्याचे बाहू पराक्रमी आहेत नि रसातळाला गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी उदकाचे (४६४) विदारण केलें असा, तथा विशिष्ट पद्धतीने विश्व खोदणारा वराह यास (४८७) वैखान म्हटले आहे.
(४९८) पुरातन : पृथ्वी वराह भगवंताची प्रार्थना करताना म्हणते “त्वयामुद्धृता पूर्वं त्वन्मयाहं जनार्दन” (वि.पु) "हे जनार्दना! आपण आधीही माझा उद्धार केला आहे." याचा याचा अर्थ असा की, हा वराह अवतार किंवा हे कार्य पूर्वी केव्हातरी झालेलें आहे. ही एका कल्पातील गोष्ट नव्हे.
(५०१) कपिल : याचा अर्थ बराह त्यामध्ये श्रेष्ठ असलेला भगवंताच्या वराह अवतार आला उद्देशून कपिंत्र हे नाम आले आहे (८९९) कपि "कपिर्वराहो" असें श्रीशंकराचार्यांनी भाष्य केलें आहे.
(५०७) पुरुसत्तम : विशाल विश्वरूप ज्याने अभिनवरित्या आपल्या सोळ्यांवर धारण केले असा.
(५२४) जितामित्र : हिरण्याक्ष जरी दैत्य असला तरी तो गतजन्मी विजय नामक विष्णुचा पार्षद होता. वराहाने त्याच्या बाह्य शत्रुत्वाला जिंकले असा याचा गर्भित अर्थ आहे.
(५३५) त्रिदशाध्यक्ष : श्रीपराशरभाष्यानुसार प्रलयकालामध्यें हिरण्यक्षाने ब्रह्माचे वेद पळवून ते पातळ घेऊन बसला. या आपत्तीमध्यें वराह भगवान् यांनी ब्रह्मदेवाचे साह्य केलें म्हणून त्रिदशाध्यक्ष हे नाम त्यास प्राप्त झाले.
(५३६) महाशृङ्ग : श्रीवराहाच्या दाढांना महाशृङ्ग म्हटले आहे. यास महाभारतात एकश्रृंग असेंही म्हटलेले आहे.
(५३७) कृतान्तकृत : वराहाच्या रूपाने हिरण्यक्षासमोर प्रत्यक्ष यम उभा ठाकलेला, ज्याने त्या दैत्याचा अंत केला.
(५३८) महावराह : भगवान् वराहाच्या प्रचंड आकाराला अतुल सामर्थ्याला उद्देशून महावराह हे नाम सहस्रांमध्यें विष्णुस्वरूपात अंतर्भूत केलें आहे. विष्णुपुराणात वराहस महावराह अशा बिरुदावलीने संबोधले आहे. "महावराहः स्फुटपद्मलोचनः" - विकसित कमळाप्रमाणे त्या महावराहाचे नेत्र आहेत इत्यादी.
श्रीवराहाचे वर्णन अतिप्रचंड शरीराचे केलें आहे म्हणजे (७१८) महामूर्ति नि त्याच्या तेजस्वी कांती आणि प्रभावामुळे तो (७१९) दीप्तमूर्ति होय.
(५३९) गोविन्द : गोविंद म्हणजे वाणी. जो वाणीच्या द्वारे ओळखला जातो. वराहाच्या उत्पत्तीवेळी त्याने प्रचंड गर्जना केली तेव्हा ऋषीगणांना त्याच्या दिव्यते विषयीं कल्पना आली. किंवा "गो" म्हणजे पृथ्वी, तिस "अविंदम्" म्हणजे परत आणली म्हणून वराह म्हणजेच गोविंद. (म.भा.शांतिपर्व)
(५४०) सुषेण : ज्याच्या भोवती सुंदर परिवार आहे तो सुषेण. वराह भोवती श्रीलक्ष्मी आणि श्रीभूदेवी अशा पारिवार देवता असतात. अनेक शिल्प वा पुजेतल्या मुर्तीमध्यें भूदेवी तथा श्रीदेवी यांच्या मुर्ती असतात.
(५४१) कनकाङ्गदी : सोन्याची आभूषणे धारण करणारा. भगवंताने वराह स्वरूप धारण केले नि पृथ्वीच्या उद्धारार्थ प्रकट झाला तेव्हा तो प्रलयकालीन अग्नीप्रमाणे देदीप्यमान् दिसत होता असें महाभारतात वर्णन केलें आहे. दिव्य शरीर हेच सुवर्णासमान होते.
(५४२) गुह्य : ज्याचे स्वरूप सहज ध्यानांत येत नाही असा. म्हणून भागवतकारांनी रहस्यमय अशा वराहाचे स्वरूप यज्ञ संस्थेद्वारे वर्णन केले आहे.
(५४३) गभीर : भागवतकार म्हणतात "रसातळाला गेलेल्या पृथ्वीला आपणवांचून कोण बाहेर काढणार, पण केलेली ही महान कृती आम्हास आश्चर्यकारक नाहीं; कारण आपणच आपल्या माया शक्तीने हे ब्रम्हांड निर्मिले आहे. तेव्हा हे कार्य अशक्य कसे असणार!" गंभीर म्हणजे पुष्कळ खोल ज्ञान, ऐश्वर्या, बल, इत्यादी गुण. गंभीर स्वरूपाचा.
(५४४) गहन : जो अत्यंत कठीण. श्रीनामदेवरायांच्या एका अभंगातील ओवी या नामाचा अर्थ समजण्यास पुरेशी आहे. "नामा म्हणे धन्य अघटीत करणी । दाढेसी धरुनि वराह तूं।।"
(५४५) गुप्त : सामान्य बुद्धीने ज्याचे ज्ञान होणे (७७८) दुर्गम आहे असा. मनोबोधात श्रीसमर्थ म्हणतात "नव्हे जाणता नेणता देवराणा । नये वर्णितां वेदशास्त्रां पुराणा।।
(५७३) अयोनिज : जननी वांचून जन्माला आलेला वा प्रकट झालेला.
(५९१) गोहित : पृथ्वीचे हित साधून देणारा.
(६०१) श्रीवत्सवक्षा : पृथ्वीचा उद्धार करण्याकरिता वराहाने उदकात प्रवेश केला तेव्हा ऋषींना त्याच्या छातीवरचे श्रीवत्स चिह्न स्पष्ट दिसले असें महाभारतात वर्णन केलें आहे.
(६८०) स्तव्यप्रिय : वराहाच्या उत्पत्तीवेळी सनकादिक कुमारांनी भगवंताच्या अद्भुत स्वरूपाची वेदमंत्रांनी युक्त स्तुती केली. ते आपले गुणकीर्तन श्रवण करून वराहने देवांच्या उत्कर्षार्थ गर्जना केली नि उदका प्रवेश केला. पुढे पृथ्वीच्या उद्धार आणि हिरण्यक्षाचा वध केल्यानंतरही ब्रम्हदेवादी प्रभृति यज्ञ स्वरूप वराहस्य परमेश्वराची स्तुती करतात. अतएवं भगवान् स्तव्यप्रिय आहेत आणि तेच नामही धारण करणारे आहेत.
(६८४) रणप्रिय : धर्मयोद्ध करण्याचा संदेश भगवान् श्रीकृष्णाने गीतेत दिला आहे. "अथ चेत्त्वमिमं धर्म्यम्" (२:३३) या श्लोकाप्रमाणे आपल्या सर्व देवतांनी दुष्ट प्रवृत्तींचा नि दुष्ट माणसांचाही निःपात केला आहे. वराहावतारातही हिरण्याक्षासारख्या दैत्यासमवेत युद्ध करून धर्मस्थापनाच केली.
(८०७) कुमुद : रसातळातून उद्धार करणाऱ्या पृथ्वीला आनंदित करणारा भगवान वराह , तोच कुमुद.
(८०८) कुन्दर : श्रीशंकराचार्य भाष्यानुसार हिरण्याक्षाचा वध करण्याच्या उद्देशाने भगवंताने वराहरुप धारण करून पृथ्वीचे विशिष्ट प्रकारे विदारण केलें म्हणून तो कुंदर होय.
(८२०) शत्रुजित्, (८२१) शत्रुतापन : हिरण्याक्ष दैत्याला युद्धात जिंकणारा तथा पीडा देणारा वराह भगवान् हा त्याला (८३३) भयकृत म्हणजे भय उत्पन्न करणाराच होता. तथापि केवळ अविविकी लोकांवर संतापणारा आहे म्हणून तो (८५३) श्रमण होय.
श्रीभागवतपुराणामध्यें वराहाचे वर्णन मुख्यतः यज्ञ स्वरूपात केलें आहे. सहस्रनामांत यज्ञ विषयीची नामे खाली एकत्र विवरण केली आहेत.
वराहाची स्तुती करताना ऋषी म्हणतात “ हे वराह! तुझे यज्ञ रूप पातकी पुरुषांच्या दृष्टिक्षेपातही येणे कठीण आहे ”. यानंतर वराहाच्या निरनिराळ्या अवयवांचा उल्लेख यज्ञसंस्थेची ते जोडतात. सहस्रांत सुरुवातीला (०३) वषट्कार हे नाम येते. यज्ञामध्यें एका विशिष्ट क्रियेस वषट् म्हटले जाते. विष्णुपुराणात पृथ्वी मातेने “त्वं यज्ञस्त्वं वषट्कार स्त्वम्” तुम्हीच यज्ञ आहात, वषटकारही तुम्हीच आहात, असें वराह नारायणाला निर्देशून प्रार्थना करते.
(३०८) इष्ट : इष्टि म्हणजे यज्ञ. ज्याच्याद्वारे देवतेचे पूजन केलें जाते. यज्ञामध्यें दीक्षा घेण्याकरिता जी “इष्टि” करतात हेच वराहाचे स्वरूप.
(४३७) महामख : अश्वमेधस्वरू, वाजपेय, सोमयाग इत्यादी मोठ मोठे यज्ञ ज्याचे स्वरूप तो महामख.
(४४५) यज्ञ : सर्व प्रकारचे यज्ञ हेच वराहाचे स्वरूप.
(४४६) इज्य : यज्ञ ज्याला उद्देशून केला जातो तो इज्य.
(४४७) महेज्य : यज्ञरुपी आराधना करण्यास जो सर्वोत्तम.
(४४८) क्रतु : यज्ञस्तंभयुक्त यज्ञाला क्रतु म्हणतात. तेही वराहचेच स्वरूप.
(४४९) सत्र : दीर्घकाल चालणारे यज्ञ त्याला सत्र म्हणतात.
(७४४) घृताशी : घृत म्हणजे तूप जे ओज, तेजवर्धक असून यज्ञातील महत्त्वाचे साधन. त्याचे भक्षण हे बुद्धीवर्धक होय. तेही भगवंताचे स्वरूप आहे. कारण सहस्रनामांत (९८३) अन्न हिही भगवंताचीच विभूती सांगितलेली आहे.
(९५२) यज्ञपति (९५३) यज्वा (९७४) यज्ञाङ्ग (९७५) यज्ञवाहन.
हे वराह भगवंता! तूंच यज्ञाचा स्वामी, यजमान ही तू, यज्ञ हेच तुझे अंग नि यज्ञाचे वहन म्हणजे यज्ञ हेच ज्याच्या प्राप्तीचे साधन तथा,
(९७६) यज्ञभृत् , (९७७) यज्ञकृत् , (९७८) यज्ञी, (९७९) यज्ञभुग्, (९८०) यज्ञसाधन, (९८२) यज्ञगुह्य :
यज्ञ धारण करणारा, यज्ञ करणारा, यज्ञाची पूर्तता करणारा, यज्ञाचा भोग घेणारा, यज्ञाची साधने आणि निष्काम यज्ञही तूंच आहेस.
असा हा श्रीवराह अवतार म्हणजे दशावतारातल्या तिसऱ्या तथा चोवीस अवतार क्रमातील दुसरा अशी भगवंताची अद्भुत विभूती होय. पूर्वी विष्णु पार्षद असलेला विजय म्हणजे हिरण्याक्ष दैत्याच्या उद्धाराची अर्थातच सनकादिक कुमारांच्या शापातून मुक्तता व पातकांचा नाश करणारा हा (९२४) दुष्कृतिहा आणि पृथ्वी मातेला तिच्या नियोजित कक्षेत पुनर्स्थापित करणारा असा (९५०) आधारनिलय असा (९३२) अचिन्त्य अवतार.
भाद्रपद शुद्ध तृतीया ही तिथी भगवान् श्रीवराह याची जयंती तिथी म्हणून गणला जाते. श्रीमहाविष्णुच्या अंशात्मक अवताराची विष्णुसहस्रनामाने केलेंली ही वाक्पुजा त्याच्या चरणकमलांवर अर्पण.
✍🏻-अनिकेत घिवलीकर

Comments