श्रीविष्णुसहस्रनाम आणि वृक्ष
वटपौर्णिमेनिमित्त विशेष लेख
श्रीविष्णुसहस्रनाम आणि वृक्ष
आजीव्यः सर्वभूतांनां ब्रह्मवृक्षः सनातनाः।
- महाभारत
भगवंताने सृष्टी निर्मिती प्रक्रियेत रजोगुणाचा आश्रय घेऊन वृक्षादि वनस्पती उत्पन्न केल्या त्यास 'वैकृतिक सृष्टि' असें भागवतकारांनी म्हटले आहे. आणि अव्यक्त तथा अव्यय बीजापासून जे ब्रम्हांड निर्माण झाले त्यास 'विश्ववृक्ष' असें लाक्षणिक वर्णन सगळ्या प्राचीन तत्वज्ञानातून केलेंले आहे.
प्रस्तुत विषय दोन तऱ्हेने पुढे जाणार आहे. वृक्ष या संकल्पनेला अध्यात्मात किंवा तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत 'ब्रह्मवृक्ष', 'विश्ववृक्ष', 'सनातन वृक्ष', 'ब्रह्मवन' या संज्ञा वापरण्याची वहिवाट आहे. याचा अर्थ 'प्रकृतीचा पसारा' अथवा आपल्या भोवतालची दृष्य सृष्टी असा आहे. हा पहिला भाग , आणि दुसरा भाग मूळं, खोडं, फांद्या, पाने, फुले - फळे या स्थूल अर्थाने झाड म्हणून आपण ओळखतो तो भोग्य वस्तू वृक्ष.
श्रीविष्णुसहस्रनामातल्या काहीं नामांद्वारे वृक्ष या संज्ञेचा वरील दोनही वर्गीकरणांचा विचार करून त्यातील गर्भितार्थ उलगडण्याचा प्रयत्न या लेखामधून करणार आहे. खरं तर हा विषय अत्यंत गंभीर आणि म्हणूनच विद्वानांनी हाताळावा असा असून माझ्याकडून त्याला न्याय देता येईल का याविषयीं मी साशंक असलो तरीही "अल्पधारिष्ट्य" करून पाहण्याची प्रेरणा झाली म्हणून हा विषय मांडण्याचे धाडस संपूर्णतः परमेश्वराचे स्मरण करून सुरू करीत आहे.
शीर्षकाखाली महाभारतातील अश्वमेधपर्वामधील अनुगीतेतला एक श्लोक उद्धृत केला आहे. "आजीव्यः सर्वभूतांनां ब्रह्मवृक्षः सनातनाः।" याचा अर्थ असा की, 'सर्व प्राणीमात्रांना आधारभूत (हा) पुरातन मोठा ब्रह्मवृक्ष आहे.' हा ब्रम्हवृक्ष म्हणजे प्रकृती, बुद्धी, अहंकार, मन, इंद्रिये, महाभूते; अर्थात बीज, खोड, पालवी, गाभा, शाखा, डहाळ्या असा सर्वकाळ पानाफुलाफळांनी सृष्टीरुपी बहरलेला वृक्ष. यालाच सनातन ब्रह्मवृक्ष म्हटले आहे.
श्रीमद्भागवतपुराणामध्यें ब्रह्मदेव शेषशायी परमात्म्याचे स्तवन करताना देवाने संकल्पमात्रे आधीच निर्माण केलेल्या सृष्टी रचनेची लीला किती आश्चर्यकारक आहे, त्यासंबंधी स्तवनरूपाने कथन केलें. ब्रह्मोवाच असा की, "तुझ्या आश्रयाने राहणारी प्रकृती ही या विश्ववृक्षाचे मूळ असल्याने परमेश्वरा! तू त्रिभुवनरूपी एक वृक्ष आहेस. मूळामधून जसा वृक्ष बाहेर पडतो त्याप्रमाणे त्या प्रकृतीरूप मूळाचा भेद करून हा विश्ववृक्षारूपी तू बाहेर पडला आहेस, प्रकट झाला आहेस. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांस कारण असणारे अनुक्रमे मी (ब्रह्मदेव) स्वतः, तू विष्णू आणि तो शंकर या तुझ्याच विभूती विश्ववृक्षाच्या तीन फांद्या आहेत. या तीन प्रमुख फांद्यांपासून पुढे अनेक शाखा, उपशाखा उत्पन्न होऊन हा ब्रह्मांडवृक्ष वाढला आहे. अशा त्या त्रिभुवनवृक्षरूपी तुला माझा (ब्रह्मदेवाचा) नमस्कार असो. "नमो भगवते भुवनद्रुमाय" अशी सुरेख संज्ञा भागवतकरांनी वापरली आहे.
सांख्यतत्वज्ञानानुसार हा ब्रह्मांडचा वंशवृक्ष काहींसा याप्रकरारे - अनादी पुरुषाचे म्हणजेच स्वयंभू परतत्वाचे प्रकृतीच्या आधारे अथवा मिलनाने अर्थात सत्वरजतमोगुणाद्वारें बुद्धी निर्माण झाली. त्या बुद्धीचे रूपांतर अहंकारात म्हणजे अभिमानात होऊन सात्विक सृष्टीतून ज्ञानेन्द्रिय व कर्मेंद्रिय व मन , तर तामसी सृष्टीद्वारे शब्दादीगंध हे पंचतन्मात्रे आणि पंचमहाभूते निर्माण झाली. असा हा ब्रम्हांडाचा वंश वृक्ष सृष्ट्युत्पत्तिक्रम विश्वाच्या उभारणीचे मानचिन्ह होय. {याविषयीं जिज्ञासूंनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यातील प्रकरण आठवें अवश्य वाचावे.}
या विश्ववृक्षासंबंधी श्रीभगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायातील पहिल्या दोन श्लोकात भगवंताने संसाराच्या वृक्षाचे वर्णन केलें आहे :- ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्।।१।।
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके।।२।।
सरळ अर्थ: ज्याचें मूळ उर्ध्व म्हणजे वर आहे ज्याच्या शाखा अधः म्हणजे खाली असून जो कधीही नाश न पावणारा म्हणजे सनातन, छंदांसि म्हणजे वेद ही ज्याची सुंदर पालवी आहे असें ज्या अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाचे वर्णन केलें आहे त्याचे यथार्थ रूप जो जाणतो तो वेदवेत्ता होय. अशा या वृक्षाच्या सत्व, रज, तम या तीन गुणांनी वाढलेल्या आणि शब्द स्पर्शादी विषयांचे अंकुर फुटलेल्या शाखा खाली आणि वरही पसरलेल्या आहेत आणि कर्मरूपाने त्याची मुळे खाली मनुष्यलोकात सर्वत्र विस्तारली आहेत.
विवरण: ज्याची मुळे वर आणि फांद्या पाने खाली अशा डेरेदार उलट वृक्षाची उपमा का दिली असेल, तर हा वृक्ष क्षणभंगुर किंवा आपल्याला दिसणारा पिंपळ असा अर्थ नाहीं. एखाद्या घराण्याच्या वंशावळीसारखा अक्षुण्ण असा हा जगाच्या उत्पत्ती, उभारणीपासून त्याच्या विस्तारापर्यंतचा पसारा अशा रीतीने हा अश्वत्थवृक्षाचा संदर्भ आला आहे.
हा दृष्टांत किंवा ही उपमा समजण्यास कठीण असून काहीं अंशी सोप्या पद्धतीत सांगायचे झाले तर, परमात्म्यापासून निर्माण झालेला वृक्ष म्हणजे त्याचे बीज वर असून अंकुर फुटून त्याचे खोड आणि नंतर पाने खाली प्रसरण पावली अर्थातच सृष्टी निर्माण होऊन मनुष्यलोकांत तो बहरला.
श्री ज्ञानदेव म्हणतात:- की ब्रह्मयाच्या शेवटवरी। उर्ध्व शाखांची थोरी। आणि मूळ तंव निराकारीं। उर्ध्वीं असे।। हा स्थावरही तळीं। फांकत असे आधींच्या डाळीं। माजी धांवतसे दुजा मुळीं। मनुष्यरुपीं।। {श्रीज्ञाने० १५: २११,२१२}
:- त्याच्या वरच्या शाखा (मूळ) ब्रह्मलोकापर्यंत पोहोचल्या आहेत इतक्या मोठ्या असून त्याचे मूळ उर्ध्व म्हणजे परमश्रेष्ठ जी निराकार ब्रह्म वस्तु ठिकाणी आहे. खालच्या फांद्यांनी या वृक्षाचे सर्व स्थावरजंगम व्यापीले असून त्याचे मध्यस्थ मूळ मनुष्यलोक हे आहे.
हा तत्वज्ञानात्मक ब्रह्मवृक्षासंबंधी विवेचनाचा भाग झाला. परमेश्वराने ब्रह्मदेवास आज्ञा देऊन स्थावर सृष्टीची निर्मिती करण्यास सांगितले. ती कशाप्रकारे केलीं हें काहीं निवडक नामांद्वारें पाहू. कारण स्थूल अर्थाने वृक्ष सुद्धा या विश्व निर्मितीच्या प्रक्रियेचाच एक भाग होय.
या भागाकरिता सहस्रनामातील तीन श्लोक निवडले आहे ज्यामधून वृक्षची संकल्पना मांडायची आहे. श्लोक वा नामें कोणती त्याची यादी खाली दिली आहे
१) विस्तारः स्थावरस्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् ।
अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनाः ।।४६।।
२) वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनाः।।५९।।
३) न्यग्रोधोदुम्बरोऽश्वत्थ ।।८८।।
प्रलयकाळात जलमय झालेल्या विश्वाला परमेश्वराने पुन्हा सृष्टी उत्पन्न करण्याहेतुने आपल्याच शरीरात सूक्ष्मरूपाने अधिष्ठित शब्द, स्पर्शादी बीजाकडे पाहिले. सृष्टीच्या उभारणी करिता योग्य काळ आणि रजो गुणात्मक सृष्टीकर्त्याला म्हणजे ब्रह्मदेवाला प्रकट केलें. आपल्या नाभिप्रदेशातून उत्पन्न केलेल्या कमळावर ब्रह्मदेवाला प्रतिष्ठित केलें. तो (४८) पद्मनाभ महाविष्णु ब्रह्मदेवांना सृष्टी निर्मितीसाठी उद्युक्त करतो. प्रलयकाळात जलाच्या क्षोभामुळे भयभीत झालेला ब्रह्मदेव विश्वाची रचना कशी करावी याचा निश्चित विचार न आल्याने खिन्न झाला. तेव्हा मधुसूदनाने ब्रम्हादेवाकडे पाहून त्यास "तू माझ्याच अंशापासून उत्पन्न झाल्यामुळे वेद स्वरूप आहे. नि ज्या प्रजा माझ्यामध्येंच लय पावल्या आहेत त्या आणि त्रैलोक्यास पूर्वीप्रमाणेच उत्पन्न कर," अशी आज्ञा केली. (५५७) महामनस् ब्रह्मदेवाने विश्व उभारणी करण्यासाठी प्राणांचे नियमन करून आपले चित्त अंतर्मुख केलें. आणि कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवाने परमेश्वराने पूर्वीच प्रेरणा करून ठेवलेल्या सृष्टीरचनेचे कार्य सुरू केलें. महामनस् या नामआधीचे पुष्कराक्ष हे नामही या संदर्भात जोडावेसे वाटते. पुष्कराक्ष या विशेषणचा अर्थ 'ज्याचे डोळे कमळासारखे' म्हणजे सौंदर्याचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. परंतु अविकसित कमळ हे बंद नेत्रांप्रमाणे दिसते तद्वत ब्रह्मदेवाने ध्यान करतेवेळी डोळे मिटल्यावर (५५६) पुष्कराक्ष या नामाप्रमाणे ती मुद्रा झाल्याने काही अंशी संयुक्त ठरावी. (हा सर्वस्वी माझा कल्पनाविलास आहे.)
भगवंताने प्रलयाच्या आधीच आपल्या (४३२) महाकोशामध्यें सृष्टी सृजनाचे अव्यक्त बीज सांभाळून ठेवलेले असते. ते जसें अव्यक्त स्वरूपांत असते तसेच, ज्याचा केव्हाही क्षय होत नाहीं असें अव्यय असून विश्वाचे मूलकारण (४२९) व्या नामाप्रमाणें बीज अव्यय आहे. या बीजाचे परिणाम व विस्तार ब्रह्मदेवाने निरनिराळ्या प्रकाराच्या सृष्टी निर्मिती करीता उपयोगात आणून (४२८) प्रमाणम् म्हणजे विस्तार करीत गेला.
जेव्हा ब्रह्मदेव आपल्या उत्पत्तीचा शोध घेत होता तेव्हा त्यास सहस्त्रफण्यांच्या शेषावर पहुडलेला महाविष्णू अर्थात महापुरुषाचे दर्शन झाले. तथा त्याच्या महाकाय देहांत अनंत ब्रम्हांडापासून यच्चयावत् स्थावरजंगम वस्तु दिसल्या. ते (५३४) महाधन दृष्टीस पडता जगत् उत्पन्न करण्याचे ज्ञान प्राप्त झाले. त्या विश्वरूपाचा (४२६) विस्तार पंचमहाभूतांच्या कारणरूपाने 'स्थिर असणाऱ्या गोष्टी ज्याचा आधारावर टिकून राहिल्या आहेत' अशा (४२७) स्थावरस्थाणुः मध्ये झाला.
श्रीसमर्थरामदास स्वामींनी दासबोधात अव्यय, अव्यक्त बीजापासून सृष्टिरचना कशी विस्तारली याविषयीं "उभारणीनिरूपणनाम" समासांत वर्णन केलें आहे. 'परब्रम्हापासून अदिनारायण उत्पन्न झाला. तो चंचल आदिनारायण ज्याला मूळ मायाही म्हटले त्याच्यापासून अष्टधा प्रकृती. मूळ मायेच्या अलीकडे गुणमायेतून तीन गुण, तेथून ओंकार, पुढे पंचमहाभूतांचा विस्तार, अंतरात्म्याला आकाश संबोधून त्या आकाशापासून वायु, वायूपासून तेज. वायूच्या दर्शनामुळे अग्नी उत्पन्न होतो तेथेच सूर्यबिंब प्रकटते. तो वारा थंड वाहू लागला म्हणजे जलाची उत्पत्ती. ते पाणी आटले की भूगोल निर्माण झाला , त्या भूगोलाच्या पोटी बीजांची कोट्यावधी जाती. माती व पाणी एकत्र आल्याने अंकुर फुटून पृथ्वीवर वृक्ष, लता, वेली,पाने, फुले, धान्यादी अन्न निर्माण झाले. अन्नापासून रेत, रेतापासून प्राणी. त्यात अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. तशाच चार खाणी, चार वाणी, चौऱ्याऐंशी लक्ष योनी, स्वर्गादी तिनही लोक मिळून पिंड ब्रम्हांड तयार झाले. ऐसा सृष्टिरचनेचा विस्तार। (दा• १३:३) सहस्रनामातल्या विस्तारः स्थावरस्थाणुः प्रामाणं बीजमव्ययम् । या नामांशी संलग्न आहे.
भागवतामध्यें ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेल्या दहा प्रकारच्या सृष्टीमध्यें सातवा सर्ग वृक्षादि वनस्पतींचा सांगितला आहे (स्कंद ३:अ:१०) . ब्रह्मदेवाने भगवंताचे ध्यान करून रजोगुणाद्वारे स्थावर सृष्टी उत्पन्न केली. त्यातून उर्ध्वमार्गाने आहार करणारे वैकृतिक सृष्टी प्रकारात येणारे वनस्पती, औषधी, लता, त्वक्सार , वीरुध आणि द्रुम निर्मिली. सध्या आपण पुष्पावांचून फळे येणारे वड, पिंपळ आणि उंबर या वृक्षवनस्पती विषयीं विचार करणार आहोत. सहस्रनामातले (५५५) वे नाम वृक्ष असें भगवंताला संसाररूपी वृक्षाच्या रूपाने प्रकट होणारा किंवा लौकिक वृक्षातही त्याची विभूती या अर्थाने नमस्कारीले आहे.
सहस्रनामातील ५९ व्या श्लोकातल्या दुसऱ्या चरणात वरुण वारुणो वृक्षः। ही सलग नामे आली असून त्याचा परस्पर संबंध कसा याविषयी गीतारहस्यकार लो. टिळकांनी अतिशय महत्त्वाची नोंद केली असून, ते म्हणतात, "ऋग्वेदात वरुणाच्या लोकी एक वृक्ष असून त्या वृक्षाच्या किरणांचे मूळ वर (उर्ध्व) असून त्याचे किरण वरून खाली पसरतात." गीतेच्या ऊर्ध्वमूलमधःशाखम् या श्लोकाशी साम्य दर्शविणारे आहे. वरुणाच्या लोकी वृक्ष हा विचार करता (५५४) वारुणो आणि (५५५) वृक्ष या नाम समूहाचा संदर्भ जुळतो. वरुणाचा वृक्ष तो वारुण वृक्ष असल्याने (५५३) वरुण या नामाचा संदर्भ लागतो. वरुण आणि स्थूल वृक्ष असा संबंध जोडला तर वरुण ही जलाची देवता. वृक्षाचे संवर्धन पाण्यामुळे होते असाही एक अर्थ काढता येईल. कारण वरुणो यादसामहम् (गीता १०:२९) जलवासी भूतात (वरुण) जलदेवता मी आहे, असें विभूतियोगात योगेश्वर सांगतात.
अजून एक कंगोरा या नामसमूहातल्या बाबतीत दाखविता येईल की वृणुते इति वरुणः - जो (सृष्टीला) आवृत्त आहे तो वरुण. श्रीसमर्थांच्या ओवीप्रमाणे विचार करायचा तर मुळी अष्टधा प्रकृती। अवघे पाण्यापासून जन्मती। पाणी नसता मरती। सकळ पाणी ।। (१३:३) तेव्हा पाण्यामुळे आवृत्त जग त्यापासून हा संसाररूपी वृक्ष भरला, उभारला. वरुण हा सर्वत्र व्यापून असणारा महापुरुष त्याचा जगद् पसारा "वरुणवृक्ष" होय.
विष्णुसहस्रनामात तीन वृक्षात्मक नामें भीष्माचार्यांनी भगवंताचे गुणसंकीर्तनासाठी युधिष्ठिरास निवेदिली. या प्रकरणांत वृक्षांची जी नामें आली आहेत त्याचे केवळ लाक्षणिक अर्थ न घेता स्थूल वा लौकिक अर्थानेही विवरण करणार आहे.
न्यग्रोधोदुम्बरोऽश्वत्थ ।।
★ न्यग्रोध {वट} :- या नामत्रयींमधील पहिले वृक्ष न्यग्रोध किंवा वट, ज्याला मराठीत आपण वड म्हणतो हे आहे. यास ब्रह्मदेवाचे निवासस्थान तथा वरुणाचा वृक्ष असें प्राचीन धर्मग्रंथात वर्णन केलें आहे. वरून पारंब्यारुपी मूळ खाली सोडतो म्हणून न्यक् म्हणजे खाली आणि रोध म्हणजे वाढणार असा हा वटवृक्ष.
या वटवृक्षाचा संदर्भ महाभारतात असा आला की, मार्कंडेय ऋषी प्रलयकाली समुद्रामध्यें संचार करीत असताना त्या महासागरामध्यें अत्यंत विशाल वटवृक्षाच्या फांदीवर विस्तीर्ण पलंगावर परमेश्वराचे बालरूप दृष्टीस पडले. न्यग्रोधं सुमहान्त वै विशालम्। ... फुल्लपद्मविशालाशं बालं पश्यामि भारत।। (वन•१८८)
भागवतामध्यें बालरुपी परमात्मा एका फांदीवर पानाच्या द्रोणात शयन करताना दिसला आहे असा उल्लेख आहे. ते फळे व पाने यांनी सुशोभित झालेले वडाचे झाड होते.
न्यग्रोधपोतं ददृशे फलपल्लवशोभितम्।। (भाग• १०:९:२०)
तो बालरुपी भगवान् म्हणजेच अनंत विश्वाचा कारक अर्थात समस्त भूतांचें आदिकारण तथा उत्पन्न होणाऱ्या सर्व वस्तूपूर्वी जो अस्तित्वात असतो असा (२९) भूतादि विश्वेश्वर महाविष्णु होय.
श्रीमच्छङ्कराचार्यकृत श्रीदक्षिणामूर्तिस्तोत्रांत भगवान् शंकराच्या गुरुस्वरूपाचे स्तवन केलें आहे. महादेवाचे परमस्थान कैलास पर्वतावर विशाल वटवृक्ष असून त्याच्या छायेत श्रीशंकर त्याच्या चार शिष्यांसह बसलेले आहेत असें वर्णन केलें आहे.
वटविटपिसमीपेभूमिभागे निषण्णं
सकलमुनिजनानां ज्ञानदातारमारात् ।
वडाच्या स्वरूपाकडे पाहिले तर त्याच्या पारंब्या जणू एखाद्या वयोवृध्द ऋषीमुनींच्या जटा शोभव्या, त्याचा प्रचंड विस्तार हा त्यांचा ज्ञानाविष्कार आणि त्याचे आयुर्मान हे शेकडो वर्षांचे असल्याने भारतीय तत्वज्ञानात या वृक्षाची उपमा साधू संतांना देत असावी असें माझे अनुमान.
कैलासावर स्थित या अलौकिक वटवृक्षाचा संदर्भ गोस्वामी श्रीतुलसीदासांनी आपल्या श्रीरामचरितमानस या ग्रंथातही घेतला आहे.
परम रम्य गिरि बरु कैलासू। सदा जहाॅं सिव उमानिवासू।...
तेहि गिरि पर बट बिपट बिलासा । नित नूतन सुंदर सब काला ।।
:- जेथे श्रीशंकर आणि माता पार्वतीचे नित्य वास्तव्य असते अशा अत्यंत रमणीय कैलास पर्वतावर एक विशाल वटवृक्ष असून सहाही ऋतूंमध्ये तो बहरलेला असतो. अशा या वटवृक्षाखाली बसून महादेव उमादेवीस श्रीरामचरित्र ऐकावीत आहेत असे वर्णन गोस्वामींनी केलें आहे.
ह्या वटवृक्षाचे वेदांपासून प्राचीन काळापर्यंत अध्यात्मिक महत्त्व आहे तसेंच, आजच्या आधुनिक काळातही त्याचे स्थूल लक्षण आपल्याला माहीत आहे जसे की; प्राणवायुची निर्मिती, छाया आणि आयुर्वेदिक गुणधर्मामुळे मानवावर उपकार केलें आहेत. अनेक व्याधी, दुखणे यावर वडाच्या पारंब्यांचा, चिकाचा इत्यादी औषधी उपाय केला जातो.
अशी ही न्यग्रोधरुपी भगवंताची विभूती होय.
★ उदुम्बर {औदुंबर} :- परमात्म्याच्या पोटी जशी अनंत ब्रह्मांडे सामावलेली असतात तसेच पुष्पांवांचून फळ येणाऱ्या औदुंबराच्या फळांमध्ये बीजरुपाने असंख्य औदुंबर वृक्ष साठवलेली असतात. जसें हा सृष्टिकर्ता नेमका कुठे व कसा याचा पत्ता लागत नाहीं तिच गोष्ट औदुंबरला फुलं न येताच फळें कशी लगडतात हे कोडेच आहे .परंतु कार्य करणारा अदृश्य असला तरी तो आहे हे निश्चित.
औदुंबराचे दर्शन किंवा नांव काढतात भगवान् श्रीदत्तात्रयाची मूर्ती डोळ्यासमोर येते. या पवित्र वृक्षमध्यें याचा समावेश आवश्यक असूनही महत्त्वही त्याच प्रकारे आहे. श्रीनरसिंहावतारात भगवंतानी हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर त्यांच्या नखांची अतिशय आग होऊ लागली. ती शमविण्यासाठी लक्ष्मीमातेने औदुंबरावरील पिकलेली फळे एकत्र आणून भगवंताने नखे त्यात खुपसविण्यास विनंती केली. त्याचा परिणाम, नखांचा दाह शांत झाला. तेव्हा श्रीनृसिंहाने या वृक्षाला प्रसन्न होऊन सदैव फलत राहाशील असें वरदान दिले अशी ही कथा आहे.
औदुंबराचे दत्त तसेंच नाथ सांप्रदायात अनन्य महत्त्व आहे. प्रमुख दत्तस्थांच्या मुळाशी औदुंबराचे वृक्ष असते. औदुंबराचे झाड ज्या ठिकाणी असेल तेथें पाण्याचा मुबलक साठाही आढळतो.
आयुर्वेदात या वृक्षाच्या सालीचा, फळांचा, पानांचा अनेक तऱ्हेने उपयोग करून ज्वर, अतिसार, तोंड येणे, गर्भपोषण, दातांसाठी, उचकी, कावीळ असें आजार बरे करण्याचे सामर्थ्य आहे.
★ अश्वत्थ {पिंपळ} अश्वत्थ म्हणजेच पिंपळ हा आदित्यचा वृक्ष म्हटला आहे. मांडुक्योपनिषदातला प्रसिद्ध मंत्र द्वा सुपर्णा सयुजा सखाया... यातील दोन पक्षांपैकी एक बसून फळे खाणारा म्हणजे आसक्त जीव आणि दुसरा केवळ पाहत असणारा अनासक्त जीव (शिव) असें जें उदाहरण देण्यात आले आहे ते पिंपळाच्या वृक्षावर विराजत असलेल्या पक्षांचे.
ज्या संसारवृक्षाची चर्चा भगवान् श्रीकृष्णाने गीतेच्या पंधराव्या अध्यायात केलीं आहे 'ज्याचे मूळ वर आणि शाखा खाली अशा अविनाशी वृक्षाचे स्वरूप अश्वत्थ म्हणून वर्णिले आहे'. कठोपनिषदातही संकल्पना उर्ध्वमूलोऽर्वाक्शाखा एषोऽश्वत्थः सनातनः। याचप्रकारे आहे. गीतेच्या दहाव्या विभूतीयोग अध्यायांत भगवंत अश्वत्थः सर्ववृक्षाणाम् (१०:२६) अशी विशेषत्वाने आपली विभूती पिंपळवृक्षात आहे असें नमूद करतात.
सर्वकाळ प्राणवायु सोडणारा पिंपळ भारतात सर्वत्र आढळतो. मधुमेह, दमा, पोटाचे विकार यावर या वृक्षाचे औषधीगुण आयुर्वेदात वर्णन केलें आहे.
एकंदरीत ही तीनही वृक्ष पवित्र असून यज्ञादी कार्यांत त्याच्या समीधा विशेष उपयोगात येतात आणि औषधी गुणधर्मामुळे लौकिक जीवनातही त्याचे महत्त्व अनन्य आहे.
या वरील वृक्षांचा स्थूल गुणांचा विचार केला तर मला सहस्रनामातील ४६व्या श्लोकातील दुसरे चरण या मुद्द्याला घेऊन तत्संबंधी भाष्य करावे असें वाटते.
अर्थोऽनर्थो महाकोशो महाभागो महाधनः।।
(४३०) अर्थ : वृक्षाकडून जो लाभ होतो तो सर्वांना हवाहवासा वाटणार असल्याने तो सुखस्वरूप म्हणजे अर्थरूप आहे.
(४३१) अनर्थ : त्याच्या उपयोगिते विषयीं ती वृक्ष व वनस्पती पूर्णपणे अपेक्षारहित असते. परंतु ही औषधी वनस्पती मानवाकरिता अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय तथा आनंदमय अशा (४३२) महाकोश युक्त आहेत. त्याचा उपयोग अत्यंत श्रेष्ठ असून (४३३) महाभोग आहे आणि त्याचे संवर्धन हे सर्वार्थाने (४३४) महाधन होय.
आता या लेखाचा अंतिम टप्पा की ज्या वटपौर्णिमेनिमित्त हा विषय घेतला ती सत्यवान् सावित्रीची कथा आणि वटवृक्षाचा संबंध याविषयी:-
महाभारताच्या वनपर्वामध्यें "पतिव्रतामहात्म्यपर्व" या आख्यानात सावित्री आणि तिचा पती सत्यवान् यांची कथा येथे. सत्यवान् लग्न झाल्यापासून एक वर्ष होताच मृत्यू पावणार आहे हे विधिलिखित आहे असें नारद मुनींनी सांगूनही सत्यवानाला पती म्हणून मनोमन वरल्याचे सावित्रीने नम्रपणे सांगितले. सत्यवानाचे पिता राजा असूनही राजभ्रष्ट झाले होते. नि त्यांना वनांत राहण्याची पाळी आलेली. ही पूर्वकल्पना असूनही सावित्रीने सत्यवानासमवेत पाणिग्रहण (लग्न) केले.
सत्यवानाचा काळ समीप आल्याच्या चार दिवस आधीपासून सावित्रीने रात्रंदिवस उभे राहण्याचे व्रत घेतले. याची काहीं एक माहिती सत्यवानस नव्हती. त्या चौथ्या दिवशी वनामध्यें फळं तसेच सर्पणादी लाकूड आणण्यासाठी तो निघाला तेव्हा पहिल्यांदा तिने सोबत येण्याविषयी त्यास विचारले. सावित्री आग्रहाने सत्यवानाबरोबर निघाली आणि काळ कुठल्याही क्षणी आपल्या पतीवर कोसळेल याची चिंता करीत त्याच्या मागोमाग मंद गतीने चालत राहिली. सत्यवानाने फळे तोडून सावित्रीकडे दिले आणि लाकडे तोडू लागताच एकाएकी त्याचे डोके प्रचंड दुखू लागले आणि अंगातले त्राण निघून गेल्यासारखे झाले म्हणून तो विश्रांती करता सत्वर खाली येऊन सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवतो. सावित्रीला नारदांनी वर्तवलेली भविष्यवाणी आठवत तो दिवस नि अगदी क्षण येऊन ठेपल्याची खात्री पटते त्याच क्षणी यमधर्माची स्वारी तिच्या समोर उभी राहते.
यानंतर आख्यानामध्यें सावित्री आणि यमधर्माचा दीर्घ संवाद महाभारतात दिला आहे. यमराज तिच्या पातिव्रतेवर आणि धर्माधिष्ठित चतुर भाषणावर अतिशय आनंदित होऊन सत्यवानाचे प्राण त्यास परत देऊन सावित्रीस अखंड सौभाग्य आणि पुत्रपौत्रादी कीर्तिमान् असा वरदान देतो.
ही कथेची केवळ रूपरेषा सांगितली. मूळ कथा सावित्रीचे धैर्य, चिकाटी, धर्माविषयी निष्ठा, पतीव्रता, निस्वार्थ वृत्ती अशा उदात्त हेतूने परिपूर्ण आहे.
तथापि या लेखाच्या अनुषंगाने महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे वटवृक्ष.महाभारतातल्या आख्यानात वडाचा कुठेहीं उल्लेख नाहीं. तो सापडतो "स्कंद पुरणातल्या व्रतराज खंडामध्यें". सत्यवान् फळं काढून झाल्यानंतर काष्टांच्या मुळी एकत्र करून उचलणार तोच, त्याच्या मस्तकात वेदना होऊन शक्तीहीन होतो आणि मग वटवृक्षाच्या मुळाशी बसलेल्या आपल्या पत्नीला हाक मारतो तो श्लोक, वटवृक्षस्य सा साध्वी उपविष्टा महासती। असा.
हा वडाचा पहिला उल्लेख. त्यानंतर सत्यवानाचे प्राणोत्क्रम, यमधर्माची स्वारी नि सावित्रीचे त्याच्याशी संभाषण, वरप्राप्ती इत्यादी कथा भाग महाभारतासारखाच आहे. यमराज सत्यवानाचे प्राण पुन्हा त्यास देतो तेव्हा सावित्री, सा गता वट सामीप्यं कृत्वोत्सङ्गे शिरस्ततः। त्या वटवृक्षा जवळ येते जिथे सत्यवान् निपचित पडलेला असतो, हा दुसरा संदर्भ.
वडाच्या झाडाचा आणि सत्यवान सावित्री कथेचा असा संबंध आहे. त्यात वृक्षाचे महत्व असून, सतीचे पातिव्रताधर्म महत्वाचे खरे. त्यामागे भावना आहे, नीती आहे, धर्म आहे. अगदी भौतिक व वैज्ञानिक तर्कही काढता येतो. केवळ ते सगळे सकारात्मक तथा परंपरेला दुषणं न देता त्याची थोरवी वाढवणारी, जोपासणारी असावी. कारण तो इतिहास असला तरी लोकांनी धर्माप्रमाणे कसें वागावे याचे प्रमाण सांगणारी बोधकथा आहे. वडाच्या संदर्भाने त्यात वृक्षांचे महत्त्वही आले आहे.
भगवंताने सृष्टी निर्माण करून मानवाला त्याच्या उपभोग घेण्याकरिता इच्छेचे बीज रोवले हे ढोबळमानाने विचारात घेण्यास हरकत नाहीं. किंबहुना त्याप्रमाणेच आपण सगळे व्यवहार करीत असतो.
तथापि केवळ भोगवादी राहायचे की उपकृत्य भूमिकेतून त्याच्या असीम कृपेचा "त्यागपूर्वक भोग" घ्यायचा हे व्यक्ती सापेक्ष होय.
तेव्हा श्रीतुकोबांचे वचन मनांत रुंजी घालते की, हे विश्व आणि त्यातील सर्व सृष्टी पदार्थ ओरबाडून नव्हे तर आप्तेष्ट वा सोयऱ्यांप्रमाणे प्रेमाने जवळ करण्यासारखी गोष्ट आहे.
। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे।
✍🏻 अनिकेत घिवलीकर. {९७६९६८१९९९}


Comments