श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत कूर्मावतार

 


तेणेंचिं कमठावतारा । स्वपृष्ठीं धरुनि गिरिवरा । 

मंथोनियां क्षीरसागरा । अमृत सुरवरां अर्पिले ॥

  - श्रीनाथभागवत, ४:२१७. 


विश्वाचा आदिकारण जो परमेश्वर त्याच्यापाशी द्वैतभाव नावाची वस्तुच नसल्याने अमुकांना तारणार आणि तमुकांचा नाश करणार, एकाचे रक्षण दुसर्‍याचा वध असा पक्षपातीपणा नाहीं. कारण तोच जर सगळ्यांचा (६९) प्रजापती आहे तर दुजाभाव कसा ठेवेल ! तथापि जसा तो उत्पत्तीकारक नि पालक आहे तसाच लयाचाही अधिपती आहेच. सूक्ष्मातून स्थूलांत संक्रमण झालें की सत्त्व-रज- तम या गुणांचा अंतर्भाव होऊन उपाधीव्याप्त होतो. म्हणूनच 'संभवामि युगे युगे' हे त्याचे वचन दुष्टांच्या विनाशाकरीता आणि सुष्टांच्या रक्षणार्थ असल्याने पुन्हा पुन्हा अवतार धारण करून आणि तेही निरनिराळ्या स्वरुपांत घ्यावा लागतो. यास्तवच भगवंत सगळ्या मोजमापाच्या पलीकडे असा (१०२) अमेयात्मा असून साकार प्रकट होणारा (३०५) व्यक्तरुपः असाही आहे. 


देवदानवांच्या युद्धांत दैत्यांचे वाढत्या बळामुळें देवांपुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला. निस्तेज झालेल्या देवांना संजीवनी मिळेल असा ठोस उपाय हाती असणें आवश्यक होते आणि ते समुद्रमंथनातून उत्पन्न होणार्‍या अमृतसेवनानेच मिळणार होते. ब्रह्मदेव शंकरादी देवांसह भगवान् नारायणाला शरण जाऊन या संकटातून तारून नेण्यास त्याच्याशिवाय गती नाही असे प्रार्थनापूर्वक कथन केलें. त्यावर श्रीनारायणाने देवांनी दैत्यांशी तात्पुरते सख्य करून एकत्र मिळून समुद्रमंथनाची योजना आखावी असें सांगितलें. तथा आपण स्वतः त्यांच्या सहाय्यास येण्याचे अभिवचनही दिलें. देवांनी त्याप्रमाणें ही कल्पना दानवांना सांगून अमृताच्या लोभाकरीता त्यांनी तत्काळ मान्यही केली. 


समुद्रमंथनवेळी भगवंत 'कूर्म' म्हणजे कासवाचे अद्भुत स्वरूप घेऊन प्रकट झालें. त्या श्रीकूर्मावताराशी निगडीत श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील काहीं नामें वेचून अवतार लीला पाहू. 


(१७१) महोत्साह - सज्जनांच्या रक्षणकरीता जो सदैव उत्साही असून आपल्या सत्यसंकल्पमात्रे उत्पत्ती - स्थिती - लय करण्यामध्यें अति तत्पर आहे तो 'महोत्साह'. कूर्मरूपांत प्रकट होण्याआधी देवांप्रती भगवंताने केलेंले भाषण देवांचा उत्साह वर्धिष्णु करणारे होता.

तो प्रचंड असा मंदरपर्वत देव-दानवांनी मोठ्या प्रयासाने समुद्रकाठी आणला. त्या कार्यांत अनेक देव तथा दैत्यांची शक्ती क्षीण झाली पाहून भगवान् अकस्मात येऊन एका हाताने तो पर्वत लीलया उचलून गरुडावर ठेवला, म्हणून (३१७) महीधर  या नामाने विख्यात झाला. 


तो पर्वत नंतर समुद्रात स्थापित करून वासुकी सर्पाची घुसळीला असते तशी दोरी केली. त्या वासुकी सर्पांत भगवंताचा अंशात्मक वास असल्याने सहस्त्रनामांत (६७४) महोरग असे नाम योजिले आहे. 


मंथनाचा उद्योग आरंभिला. परंतु पर्वताखाली भक्कम आधार नसल्याने तो वारंवार समुद्रांत बुडू लागला. तेव्हा श्रीहरीचा अवतार काळ समीप आला आणि (७१८) महामूर्ति अशा 'कूर्मरूपांत' प्रकट होऊन तो पर्वत आपल्या पृष्ठभागी धारण केला म्हणून या अवतारलीलेस्तव (१८०) महाद्रिधृक असें नाम सर्वश्रुत झालें. 


मंदराचल रवीसारखा फिरू लागल्याने डगमगू लागला, तेव्हा भगवंताने आपल्या सहस्त्रहातांनी त्या पर्वताचे शिखर धरून ठेवले. या प्रसंगाला उचित नाम म्हणजे (३१६) विश्वबाहु , की जो सर्वांना आधार देणारा होय. 


श्रीपराशरभट्टांच्या भाष्यामधील ३५व्या श्लोकातींल सहा नामे भगवंताचे व्यूहरुपांतर्गत कूर्मावताराचे वर्णन करणारे आहेत. 


प्राणदो वासवानुजः। अपांनिधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः॥


भगवद्गुणदर्पणभाष्यानुसार (३१३) प्राणदः - या नामामध्यें भगवंताचे बल प्राकट्याचे वर्णन आहे. भगवंताने देवांना तथा दानवांनाही सारखेच बल प्रदान करुन समुद्रमंथनासाठी प्रवृत्त केलें. त्या अतुल सामर्थ्याचा प्रणेता परमेश्वरच होय. 


(३२४) वासवानुजः - वासव हे इंद्राचे नाव आहे. अमृताची अभिलाषा बाळगणाऱ्या इंद्राची इच्छा पूर्ण करावी म्हणून त्याच्या धाकट्या भावाच्या नात्याने जो अवतरीत झाला तो 'वासवानुज'. 


(३२५) अपांनिधिः - सागरमंथनावेळी भगवंताचे कासवाच्या रुपांत प्रकट होऊन समुद्राचे संतुलन राखलेले म्हणून त्यास अपांनिधि म्हणतात. 'जलाचा साठा' असें शांकरभाष्य असून, ज्याने समुद्रात अवतार घेतला म्हणूनही त्यास अपां (पाणी) निधि (वैभव) असें साजेसे नाम आहे. 


(३२६) अधिष्ठानः - कूर्मरुपांत भगवंताने मंदरपर्वत आपल्या पाठीवर धारण करून त्यास आधार दिला. अतएवं तो 'अधिष्ठान' या नामास सुयोग्य ठरतो. या क्रियेला अनुसरून अजून एक नाम आहे (९५०) आधारनिलयः जो सगळ्या वस्तूमात्रांचा आधार वा आश्रयस्थान अशी या नामाची ख्याती होय. 


(३२७) अप्रमतः - समस्त जीवांना सारखेपणाने वागविणारा. कूर्मावतारामध्ये भगवंताने मंथन उद्योगास जसें देवांना बळ दिले तसेंच दानवांनाही. 


(३२८) प्रतिष्ठितः - ज्यास दुसर्‍या कुणाचाही आधार किंवा सहाय्य घेण्याची आवश्यकता भासत नाहीं, जो स्वयमेव आपल्या लीलेने प्रतिष्ठित आहे. अशी कूर्मावतारांत परमेश्वराची लीला पाहावयास मिळते. (पराशरभट्टांनी हे नाम कूर्म अवतार वर्णनामध्यें घेतले नाहीं.) 


(५२०) अम्भोनिधिः - भगवंत पाताळातल्या अम्भ समुद्रांत जगताचा आधार होत कूर्मरुपाने निवास करतात, अशी कूर्मभगवंताच्या मंत्रामध्ये त्याची स्तुती केली आहे. 


विष्णुसहस्रनामस्तोत्रातला एकोणसाठाव्या श्लोकातील पहिला चरण मला कूर्मावताराचे महात्म्य वर्णन करणारा भासला. तो भागवतपुराणाच्या आधारे निवेदन करतो. 


वेधाः स्वाङ्गोऽजितः कृष्णो दृढः संकर्षणोच्युतः।


(५४७) वेधाः - प्रेरणा देणारा, निर्माण करणारा असा या नामाचा अर्थ आहे. इंद्रादी देव भगवान् श्रीनारायणाला शरण गेलें असता समुद्रमंथनाचा संकल्प त्यांनी विधान करून ते कार्य देव दानवांकरवी घडवून आणलें. 


(५४८) स्वाङ्गः - जे कार्य करावयाचे त्यामध्यें स्वतः जो अंगभूत राहतो, तो स्वाङ्ग. समुद्रमंथनाच्या समयीं अंशांशत्मकरित्या वासुकीमध्यें प्रविष्ट झालें, अगदी सुरुवातीस देव-दानवांमधील शक्ती कमी झाल्याने त्यांना बळ दिले, मंदरपर्वत धारण करण्यास प्रत्यक्ष कूर्मरुपांत अवतरले. तसेच धन्वंतरी, मोहिनी या अवतारात तथा कामधेनु, ऐरावतादी रत्नांमध्येही परमेश्वरी विभूतीच असल्याने तो 'स्वाङ्ग' होय. 


(५४९) अजित: - जो कुणाकडून जिंकला जात नाहीं, तो अजित. हे नाम अत्यंत महत्त्वाचे असून कूर्मावताराची पूर्वपीठिकाच म्हणावी लागेल. श्रीभागवतानुसार 'चाक्षुषमन्वंतरामध्यें' वैराज आणि पत्नी संभूती यांच्यापासून झालेला मुलगा हा भगवंताचा अंश अवतीर्ण होऊन 'अजित' या नावाने प्रख्यात झाला, त्यानेच कासवाचे रुप घेऊन हे क्षीरसागराचे मंथन करुन अमृतकुम्भाची उत्पत्ती केली.

भगवंत --> अजित --> कूर्म असा सोपा संबंध लावता येईल. 


(५५०) कृष्णः - या नामाचा येथें अर्थ वर्णाने काळा असा आहे. महाभारतामध्यें भगवान् श्रीकृष्णनाथ अर्जुनास "माझा रंग कृष्ण असल्याने मी कृष्ण या नावाने ओळखला जातो" असें म्हणतात. निरनिराळ्या कल्पांमध्यें झालेल्या अवतारांचा बाह्यरंग वेगवेगळे वर्णिले आहे. प्रस्तुत कल्पातल्या मत्स्यादी अवतारांचा रंग काळा सांगितला आहे. अतः कूर्मावतारासंबंधी कृष्णवर्णाचे आरोपण शास्त्राला धरुन आहे. 


(५५१) दृढः - मंदरपर्वत समुद्रांत स्थापन केला खरा. मात्र तो घुसळीत असताना खाली भुसभुशीत वाळू असल्याने तो रुतू लागला. कूर्मरुपांत प्रकट झालेल्या श्रीहरीने तो पाठीवर धारण केला आणि डगमगू नये म्हणून आपल्या सहस्र बाहूंनी वर धरुन ठेवला म्हणून तो 'दृढ' या नामाला प्राप्त झाला. 


(५५२) संकर्षणः - अमृतकुंभाची उत्पत्ती एकट्या देवांच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती, त्यासाठी दानवांचे सहाय्य आवश्यक होते. तो उपाय भगवंताने देवांना सुचवून दानवांचे मन इंद्रादींकरवी त्या कार्याकडे आकर्षित केलें, अमृत बाहेर येताच तो कुंभ दैत्यांच्या हाती गेला तेव्हा भगवान मोहिनीरुपांत प्रकट होऊन दानवांचे मन त्यांच्याकडे खेचून, मोहित करुन तो अमृतकुंभ मिळविला. या दोन्ही कार्यात परमेश्वराची 'आकर्षण करुन घेण्याची लीला' दिसून येते. 


(५५३) अच्युतः - जो त्याच्या कार्यापासून च्युत अर्थात ढळत नाहीं तो अच्युत. प्रचंड मंदराचल पाठीवर घर्षण होत असतानाही जो आपल्या स्थानापासून तथा देवांना दिलेल्या वचनापासून यत्किंचितही मागे सरला नाहीं त्या कूर्मावतारांस हे अच्युत नाम सर्वार्थाने शोभायमान् आहे . 


असें हे भगवंताचे कूर्मस्वरुप अतर्क्यरित्या देवांच्या आणि पर्यायाने सत्त्वगुणांच्या वृद्धीकरीता प्रकट झालें नि समुद्रमंथून त्यातून अमृतादी उत्पत्तीपासून सर्वांचे कल्याण व्हावें म्हणून सहाय्य करण्यास भगवंत (८४७) भारभृत् झाला. तथा आपल्या पाठीवर मंदरपर्वताच्या घर्षणानें केवळ अंग खाजविल्याचा भास होत असून तोही सोसून (८६३) सर्वसहः नि देवांच्या सगळ्या इच्छा पुरविणारा (८५१) सर्वकामदः होय.

अमृतमंथन म्हणजे प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे प्रतिक याप्रकारचे कार्य होते. त्यात देव-दानवांसह पर्वत हे स्थूलाचे चिन्ह तसेंच वासुकी सर्प हे वन्यजीव असा सगळ्यांनी मिळून केलेला भव्य पराक्रम. पण ज्याचा त्याचा वाटा हा ठरलेला असतो त्याप्रमाणे असुरांनी सुरा जवळ केलीं तर देवांना आवश्यक ते अमृत भगवंताने मिळवून दिलें. असा हा श्रीविष्णुसहस्रनामामध्यें गुंफलेल्या कूर्मावताराच्या भावार्थाचा महिमा श्रीकृष्णार्पण करतो. 


✍🏻 -अनिकेत घिवलीकर, मुंबई .


Comments

Anonymous said…
Chaan
धन्यवाद

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १