श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीनृसिंहावतार
भक्त प्रल्हादाकारणें नरसिंह झाला । विदारुनि दैत्य स्तंभी उद्भव केला॥
- श्रीएकनाथ महाराज.
सज्जनांच्या रक्षणासाठी भगवंत कुठल्या स्वरुपांत येऊन सहाय्य करतील, ते एक परमेश्वरच जाणे. तो उत्पत्तिकारण (६) भूतकृत् आहे, पालनकर्ता म्हणून (३३) भर्ता नि संहारक (५५९) भगहा असल्याने प्रत्येक प्राणीमात्रांच्या जीवनाची दोरी त्याच्या हाती आहे. पौराणिक इतिहासावरुन प्रत्येक अवतारामागे कारणमीमांसेची पार्श्वभूमी असल्याचे दिसून येते. कारणाशिवाय परमेश्वराने एकही गोष्ट निर्माण केलेंली नाहीं. अवतरीत होण्याचे कारण उपद्रवमूल्य हा घटक महत्त्वाचा आहे. स्वामी वरदानंद भारती नेहमी म्हणत की परमात्मा ज्ञानदेव- तुकोबांसारख्या महात्म्यांना मुक्ती देण्यास येतो किंवा कंस- रावणासारख्यांच्या संहाराकरीता. त्यातही आपल्याकडे कंसवध, रावणवध या संज्ञापेक्षा कंसोद्धार, रावणोद्धार असें म्हटले आहे. कारण त्या त्या जीवांची शापापासून झालेंली मुक्ती ही होय, म्हणूनच त्यास (१२) मुक्तानां परमा गतिः असें श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्रामध्यें म्हटले आहे.
श्रीविष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय यांनी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादी चार ऋषीकुमारांना नारायणाच्या भेटीपासून अडविले म्हणून उन्मत्त झालेल्या त्या दोघांना शाप दिला की तुम्ही मृत्युभूमीत असूर म्हणून जन्मा याल. त्यातला जय हा हिरण्यकशिपू तर विजय हिरण्याक्ष. हा इतिहास सनकादींच्या अवताराशी निगडीत असल्याने इथे अधिक विस्तार करीत नाहीं.
त्याच हिरण्यकशिपूच्या वधास्तव भगवान् श्रीनारायणाने आगळे वेगळे असें मनुष्याचे धड सिंहाचे मस्तक असा श्रीनृसिंहस्वरुप अवतार धारण केला. हा अवतार पूर्वनियोजित होता नि त्याचे कारण हिरण्यकशिपूला ब्रह्मदेवाकडून झालेली वर प्रप्ती. वराहावतारात श्रीविष्णुने हिरण्यकशिपूचा बंधु हिरण्याक्षाचा वध केलेंला. त्याचा प्रतिशोध घेण्याकरिता विष्णुवधाची प्रतिज्ञा ह्यानें केलेंली.
मूळ संकल्पच तामसी आणि अधर्मावर आधारित असेल तर इप्सित फलाची पूर्तता कर्त्याच्या मनाप्रमाणें कशी होईल. जसा कर्णाचा श्रीपरशुरामांकडून अस्त्रविद्या मिळवण्याचा हेतू अर्जुनाविषयीं आत्यंतिक आकसापोटी त्याचा सर्वनाश करणें हा होता, म्हणूनच विद्या प्राप्त करुनही त्यात यश आलें नाहीं. परशुरामांशी असत्य भाषण हे एक कारण असले तरी या न् त्या मार्गाने तो उद्देश सफल झाला नाहींच. तद्वत हिरण्यकशिपूने कपट धरून केलेंले तप आणि मिळवलेंली सिद्धी.
निवडूंगामध्ये जसें एखादे कोमल फुल उमलावे त्याप्रकारें या दैत्यकुळांत प्रल्हादासारख्या अनन्य भगवद्भक्ताचा जन्म झाला. वासुदेवाच्या ठाईं त्याची स्वाभाविक भक्ती जडली आणि त्या हरिभक्तिचा द्वेष हिरण्यकशिपूच्या सर्वनाशाचे कारण ठरला. ती कथा सर्वसाधारणपणे आपल्याला ठाऊक असेलच.
उन्मत्त झालेंली व्यक्ती काय करेल याचा नेम काय सांगावा, तोच प्रकार हिरण्यकशिपूचा. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यानें वरदानाची यादीच समोर ठेवली नि तथास्तु म्हणून ती मान्यही झालीं! हा दैत्य अजिंक्य, अमर, अवध्य झाला. परंतु परमेश्वरी लीलेचा थांग कुणाला लागला आहे का! कुकर्माचा घडा भरला म्हणजे कितीही सावधानता बाळगली तरी काहींही उपयोग नाहीं. काळाची झडप इतकी विलक्षण असते की त्याच्या समोर देवांनाही नमावे लागते.
महां भक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी। जपे रामनामावळी नित्यकाळीं।
पिता पापरूपीं तया देखवेना। जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना।। - श्रीसमर्थ रामदास.
हिरण्यकशिपूचा वध त्याला वर देण्याक्षणींच ठरला होता. पण वेळ यायची होती, ती प्रल्हादाच्या निमित्ताने एक एक घटका भरावी तद्वत दैत्यराजाचा पापसंचय भरत चाललेला. प्रल्हादाच्या श्रद्धेची कसोटी पूर्ण व्हायला आणि त्याच्या बापाचा अंतकाळ समीप यायला, वरदीक्षेत ठरलेल्या अटींची पूर्तता तथा भक्तीचा विजय अशी सुयोग्य वेळ भगवंताने साधली. दिवस नाहीं की रात्र नाहीं अर्थात प्रदोषकाळी, ना पूर्ण मनुष्य ना पूर्ण प्राणी, अशा विलक्षण उग्रस्वरुपांत निर्जीव वस्तुमधून भगवान् श्रीनृसिंह स्तंभ फोडून प्रकट झालें. घरांतही नाहीं की बाहेरी म्हणजे दाराच्या उंबरठ्यावर, ना भूमीवर ना आकाशात या अवस्थेत त्या दैत्याला आपल्या मांडीवर आडवे घेऊन अद्भुत, भयकारक रूपांत आपल्या तीक्ष्ण नखांचेच शस्त्र करून वरप्राप्तीच्या सगळ्या अटींचा पाडाव करून पोट फाडून हिरण्यकशिपूचा वध झाला.
अशा या अवतारकथेसंबंधी श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्रामध्यें जी नामें आलीं आहेत, त्याचा भावार्थ थोडक्यात विवरण करतो.
(२१) नारसिंहवपुः - नर म्हणजे मनुष्य आणि सिंह या दोघांचे अवयव मिळून ज्यानें वपु म्हणजे शरीर धारण केलें तो नारसिंहवपु.
हा झाला प्रत्यक्ष नामोल्लेख.
तथापि २२वा संपूर्ण श्लोक या नृसिंहावताराचा महिमा सांगण्याचा प्रयत्न:-
अमृत्युः सर्वदृक सिंहः संधाता संधिमान् स्थिरः।
अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा॥
श्रीशांकरभाष्यांत या श्लोकातील नामांचा अर्थ परतत्त्वानुसार परमात्म्यासंबंधी केला आहे, तर रामानुजीय पराशरभाष्यामध्यें भगवंताचे "विभवरूप" विशाद करून नरसिंह अवताराशी त्याचा मेळ घालतात.
(१९८) अमृत्युः - या अवतारात भगवंत दैत्यांसमक्ष स्वयं मृत्युचे कारण होऊनच उभे ठाकलें. म्हणून तो अमृत्यु होय की ज्याला मृत्यु नाहीं असा. नृसिंहाचे अवतार विसर्जन झालें. पण देवादिकांनी त्यांचे देह गुप्त करणें, सदेह परलोकांत गमन करणें, यौगिक क्रियेने तो नाहींसा करणें, अशा दिव्यरितीने अवतार समाप्ती केलीं वा तेज आवरते घेतलें म्हणजे ते मृत्यु या संज्ञेत बसणारा नाहीं. अतः तो अमृत्यु ठरतो. उदाहरणार्थ श्रीशंकराचार्य, श्रीज्ञानेश्वरमहाराज, श्रीतुकाराममहाराज.
(१९९) सर्वदृकः - प्राणीमात्रांची सगळी कर्म जो पाहतो तो सर्वदृश्.हिरण्यकशिपूने आपल्याच मुलाचा चालवलेला आत्यंतिक छळ भगवंत पाहत होता. त्यानुसार भगवंताने त्याच्या कर्माचे भोग भोगावयास लावलेच.
(२००) सिंहः - या नामांत नर उल्लेख नसला तरी जो सिंहाप्रमाणें शक्तिशाली आहे अशी उपमा परमेश्वराला दिली. गजराजाचे गंडस्थल जसें सिंह फोडून त्यास ठार मारतो तसाच हिरण्यकशिपूला श्रीनृसिंहाने ठेचला.
या स्वरूपाला सुयोग्य (१३८) चतुर्द्रंष्टः अर्थात ज्याला सिंहासारखे चार दाढा आहेत असेंही नाम स्तोत्रात आहे.
(२०१) संधाताः - लोकांच्या कर्मानुसार फलाची गांठ घालून देणारा तो संधाता.
या अवताराचा उद्देश प्रल्हादाची भक्ती तथा हिरण्यकशिपूचा "उद्धार" हाही होता.
नाट्यशास्त्रांत नृसिंहावताराचे स्वरूप रेखाटताना काहीं भावमुद्रांचा उल्लेख केला कीं, या अवताराचे प्राकट्य दोन कारणामुळें झालें. एक म्हणजे हिरण्यकशिपूचा वध आणि दुसरे प्रल्हादाची अनन्य भक्ती. तेव्हा एकाच वेळी दोन भाव नृसिंहरूपी भगवंताच्या मनांत कसें जागृत झालें असतील याची चिकित्सा केलीं आहे.एका डोळ्यांत प्रल्हादाविषयीं प्रेम, वात्सल्य, करूणा आणि दुसऱ्या डोळ्यांत दैत्याच्या वधाची क्रूरता! ह्या एकानेच वठवायच्या दोन अक्षमुद्रा किती कठीण आणि आपले नाट्यशास्त्र किती प्रगत आहे याची कल्पना करावीं.
(२०२) संधिमान् - सामंजस्य राखणारा भगवंत आपल्या भक्तापासून विलग नाहीं. तिथे द्वैताचे अद्वैतच होऊन जाते. नृसिंहावतार आणि भक्त प्रल्हाद यांचे नाते असेंच आहे. "देवभक्तपण। तुका म्हणे नाहीं भिन्न॥"
(२०३) स्थिरः - पित्याने श्रीनारायणाची आराधना करण्यापासून कितीही परावृत्त करण्याचे यत्न केलें तरी प्रल्हादाची निष्ठा अढळ राहिली.
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात- "अगा दैत्याचिया कुळीं। प्रऱ्हादु तो मी न्याहळी। म्हणौनि दैत्यभावादिमेळी। लिंपीचि ना॥ {ज्ञा•१०: २४७}
दैत्यकुळात जन्म घेऊनही प्रल्हादाने आपला मूळ सात्त्विक स्वभाव दैत्यांच्या तामसीवृत्तीमुळें दूषित होऊ दिला नाहीं.
(२०४) अजः - शाश्वत परब्रह्मापासून जो प्रकट होतो किंवा गर्भरहित असा, तो अज. नरसिंह अवतार गर्भातून झाला नव्हता तर खांबातून प्रकट झालेला.
'गमन करणारा' असाही अज या नामाचा अर्थ आहे. जो भक्तांकडे आपणहून येऊन दुर्जनांचा संहार करतो, जसे भगवन् प्रल्हादासाठी - हाके सरशी उडी । घालोनिया स्तंभ फोडी {श्रीतुकोबा}
(२०५) दुर्मर्षण: - दानव, सुर, दुर्जनांना जो सहन करणें कठीण असा. भगवंताच्या तेजापुढे कुणाचे काय चालणार! श्रीभागवतात असें वर्णन आहे कीं नृसिंहाचे ते अतिभयकारी स्वरुप पाहून हिरण्यकशिपूने डोळे मिटले.
तो (२६६) दुर्धर आहे केवळ दुष्टांसाठी. संतकवी श्रीदासगणु महाराजांची छान ओवी आहे ते म्हणतात- "त्या भयंकर रूपाची। भीती नसे भक्ता साची। पिलें जेवीं वाघिणीची। अंगावरी खेळती तिच्या॥"
वाघिणीच्या अंगावर जशी तिची पिले खेळतात तसें भक्त देवाच्या रौद्र रूपानेही भयभीत होत नाहीं.
(२०६) शास्ताः - दंड देणारा तो शास्ता. लोकांच्या वर्तनाचे नियंत्रण करणारा असाही अर्थ आहे. हिरण्यकशिपूचा वध करून त्याच्या इतर सहचाऱ्यांना, राक्षसांनाही भगवंताने शासन केलें.
(२०७) विश्रुतात्माः - ज्या आनंदमय रूपाचे ज्ञान व्हावें म्हणून ते सत्यज्ञान विशेषत्वाने लोक श्रवण करतात तो विश्रुतात्मा. दैत्यवधानंतर ब्रह्मदेव, इंद्र, ऋषी, पितर, यक्षादी गंधर्व आणि शेवटी प्रल्हादानेही नृसिंहाच्या अतुलनीय महापराक्रमाची स्तुती केलीं ती भागवतात आली आहे, तिचे आज आपण श्रवण करतो, त्याचे कीर्तन करतो.
(२०८) सुरारिहाः - देवतांच्या शत्रूंचा निःपात करणारा असा हा सुरारिहा. वरप्राप्तीच्या जोरावर हिरण्यकशिपूने देवतांनाही आपल्या बलाने वश केलें. तेव्हा भगवंताने त्याचा नाश करून सुरारिहा हे आपले नाम सार्थ केलें.
अशी हीं विष्णुसहस्रनामातली ही निवडक नामें नृसिंहावताराचे चरित्र प्रतिपादन करणारी असून, संहारवाचक वा दंडात्मक अशी अनेक नामें या अवतारातकार्याच्या जवळ जाणारी आहेत.
तसेंच श्रीभगवद्गीतेतही नृसिंहावताराचे माहात्म्य सांगणारी विभूती भगवंतानेच उद्धृत करावीं हे विशेष होय.
"प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहत्। मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्॥" {१०:३०}
प्रल्हादाच्या एकनिष्ठ अचल भक्तीपाई परमात्म्याने नरसिंहाच्या रुपांत प्रकट होऊन वरदान दिले कीं मन्वंतर संपेपर्यंत दैत्यांचा राजा होऊन भूलोकीचे विषयभोग घे, असें म्हणून भक्तांमध्यें श्रेष्ठ कोण तर प्रल्हाद हे स्वतः नृसिंहरूपी नारायणाचे वचन भागवतात आहे. 'प्रल्हादश्चास्मि दैत्यानाम्' हे वचन किती सार्थ आहे! प्रल्हादाने भगवंताचे ते (११४) रुद्र रुप पाहूनही नामस्मरणांत दंग राहत त्या (६८०) स्तव्यप्रिय देवाची (६८२) स्तुति गात होता. हिरण्यकशिपूकरीता तो (८३३) भयकृत् म्हणजे भय उत्पन्न करणारा होता तर (७३६) भक्तवत्सल असलेला भगवान् प्रल्हादासाठी मात्र (९०६, ९१५) अरौद्र तथा अक्रूर असा भयरहित, क्रूरताविरहित मूर्ती होता.
हिरण्यकशिपू अनेक वर्षे विष्णुवधकरण्यास काल मोजत होता. तो (४१८) काल स्वयं नृसिंहावतार धारण करुन त्याचा नायनाट करता झाला! परमेश्वराची कालगणना आकड्यांवर नसून संकल्प सिद्धीवर आधारित असते. कालः कलयतामहत्॥ कालरुपानें सर्वांना कुचलणारा, ठेचणारा म्हणून भगवंताला (२३१) संप्रमर्दन असेंही नाम योजिले आहे.
'मृगाणां मृगेन्द्रोऽहम्' - अर्थात पशूंमध्ये सिंह ही माझीच विभूती भगवंत सांगतात. येथें निःसंशय नृसिंह रूपच आपल्या डोळ्यासमोर येते.
श्रीमद्भागवतात नरसिंह- हिरण्यकशिपू युद्धाचे वर्णन करताना गरुड जसा विषारी सर्पावर झडप घालतो, तसाच नरसिंह त्या दैत्यावर चाल करुन त्याचे पोट फाडून विदीर्ण केलें, म्हणून त्यास (४६४) विदारण म्हटले आहे. तेव्हां 'वैनतेयश्च पक्षिणाम्॥' पक्ष्यांत गरुडाच्या ठिकाणी माझी विभूती हे भगवद्वचन आणि ह्या कथेचा मेळ बसतो.
हा झाला पौराणिक नाममहिमा. आधुनिक काळांत या नृसिंहासारखा परक्रम करणाऱ्या छत्रपती श्रीशिवाजी महाराजांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "हिंदुनृसिंह" हे नामाभिधान यथार्थ योजले. ते म्हणत- "मदोन्मत्त दिग्गजांची गंडस्थाने एका झेपेसरशी फोडून फाडून टाकणारी क्रकच तीक्ष्ण नखरे (नखे) ज्याची आहेत तो नृसिंह आता पूजला पाहिजे, हिंदुत्वाचे ध्येय ते, खूण ती."
मुर्तीभंजक कुकर्म्या अफजल्याचा हिरण्यकशिपूसारखा कोथळा बाहेर काढून वध करणारे श्रीशिवराय यांना श्रीनृसिंहाचेच नाम निःसंशय शोभून दिसते.
✍ ©️अनिकेत घिवलीकर, मुंबई.

Comments
विपुलकराभयदायिनीं भक्तवत्सलम्।
हिरण्यकशिपोर्वधमार्गे स्थितं,
नमामि नृसिंहं शरणागतत्राणम्॥
अनिकेतजी, लेख खरंच भारावून टाकणारा आहे. देवाचा नृसिंह अवतार आणि शिवराय यांचं सुंदर साम्य तुम्ही अतिशय प्रभावीपणे मांडलंत.
"हिंदुनृसिंह हे नामाभिधान यथार्थ योजले..." आणि
"मदोन्मत्त दिग्गजांची गंडस्थाने एका झेपेत फोडणारी ती नखे..."
या ओळी विशेष भावतात – त्या केवळ शब्द नाहीत, तर जिवंत चित्रं आहेत.