श्रीविष्णुसहस्रनाम आणि श्रीमारुतीराय
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा।। श्रीतुकाराम महाराज
श्रीविष्णूसहस्रनामस्तोत्र स्वयमेव भगवंताचे अवतार लीलाचरित्र आहे, अशी अभ्यासांती जाणीव होते. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी त्यास भक्तिकोश असें कौतुक केलें ते किती यथार्थ आहे याचा प्रत्यय येतो. भगवंत हा सहस्रनामातल्या (७३६)व्या नामाप्रमाणे भक्तवत्सल आहे, तेव्हा आपल्या प्रिय भक्तांची नामेही तो आनंदाने धारण करतो हे पुराण कथेवरून आपण पाहतो.या न्यायाने हनुमान अथवा मारुती ही नामें प्रत्यक्ष जरी सहस्रनामांत आली नसली तरी त्याच्या अवतार कार्यासंबंधी किंवा व्यक्तिमत्वाचे साधर्म्य सांगणारी अनेक नामें अवश्य सापडतात.
भगवंताला आपला अनन्य भक्त किती प्रिय असतो हे सांगताना श्रीनाथ महाराज भागवतीटीकेत म्हणतात, "मज नामरुप तिहीं करणे। मज पवित्रता त्यांचेनि गुणे। (१४:२७४)
श्रीमारुतीरायाला रुद्राचा अंश असें परंपरेने मानण्यात येते.श्रीमहादेव नित्य रामनामात दंग असतात.तेव्हा मारुतीचा "महारुद्र" असा नामघोष होतो. इथे गोस्वामी श्रीतुलसीदासांच्या दोहावलीचा आधार घेऊन रुद्र म्हणजेच मारुती कसें ते उद्धृत करतो :- जेही सरीर रति राम सों , सोइ आदरहिं सुतान । रुद्र देह तजि नेह बस , संकर भे हनुमान ।। की, "सुज्ञ जन त्या शरीराचा आदर करतात ज्यामध्यें श्रीरामाचे प्रेम आहे.या प्रेमामुळेच श्रीशंकराने आपल्या देहाचा त्याग करून हनुमानाचे रूप धारण केलें."
(११४) रुद्र हे नाम असें सहस्रनामांत आहेच.श्रीतुकोबांही मारुतीच्या अभंगात म्हणतात तुका म्हणे रुद्र । अंजनीच्या कुमरा ।।
श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधात भगवान् श्रीकृष्ण विभूतीयोग सांगताना {भागवतातही निराळा विभूतीयोग श्रीकृष्णाने अर्जुनास निवेदन केला आहे} सोळाव्या अध्यायात किंपुरुषाणां हनुमानः म्हणजे किंपुरुषात वास करणारा वानरांमध्यें हनुमान ही माझी विभूती आहे असें सांगतात. किंपुरुष हे मानसरोवर आणि कैलास या मधला भूभाग होय. तिथे मारुती रामाची उपासना करीत बसलेले आहेत अशी मान्यता आहे. तेव्हा भागवताच्या आधारे श्रीहनुमान भगवंताचा अंशावतार आहे हे ओघाने आलेच.
अंशात्मक अवताराचा अजून एक संदर्भ श्रीसमर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सोळाव्या दशकाच्या "वायुस्तवनिरूपण" या सहाव्या समासात केलेला आढळतो. ऐसा हा समर्थ पवन । हनुमंत जयाचा नंदन । रघुनाथस्मरणीं तनमन । हनुमंताचें ॥ हनुमंत वायोचा प्रसीध । पित्यापुत्रांस नाहीं भेद । म्हणोनि दोघेहि अभेद । पुरुषार्थविषीं ॥ हनुमंतास बोलिजे प्राणनाथ । येणें गुणें हा समर्थ । प्राणेंविण सकळ वेर्थ । होत जातें ॥ (२४-२६)
"परम सामर्थ्यवान् वायु त्याचा पुत्र हनुमान ज्याने आपला देह आणि बुद्धि श्रीरामनामस्मरणांत अर्पण केली. त्या बापलेकांत मुळीच भेद नाहीं, दोघेही बरोबरीचे पराक्रमी आहेत. प्राणावांचून सर्व निष्फळ असल्याने हनुमंतास प्राणनाथ म्हणतात ते त्याच्या सामर्थ्याकडे पाहूनच."
या ओव्यांत वायु आणि प्राण म्हणजेच हनुमंत आहे असें श्रीसमर्थ म्हणतात.सहस्रनामात (४१४) वायू आणि (६६,३२०,४०७) प्राण, ही नामें. तथा प्राणाचे निवासस्थान (९६०) प्राणनिलय आणि प्राण धारण करणारा तो (९६१) प्राणभृत अशी नामें आली आहेत.
श्रीरामरक्षास्तोत्रातील मारुतीची स्तुती आपण जाणतातच.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।
या श्लोकाप्रमाणें काहीं नामें केवळ यादी स्वरूपात देतो.
• मनोजवम् (६९०) - मनाप्रमाणे वेग असलेला. जेथें संकल्पे जाय मन। तेथे होय देहाचेंनि गमन। हे मनोजवसिद्धि जाण । धारणालक्षण या हेतू।। (ए.भा.१५:११८)
• "मारुततुल्यवेगम्" - मारुत म्हणजे(४१४) "वायू" हे नाम आधी आले आहे. त्या व्यतिरिक्त, (३७१) वेगवान.
•"जितेन्द्रियम्" - म्हणजे, ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय प्राप्त केला तो (८४) आत्मवान् , (५२४) जितामित्र.
•"वातात्मजं" - ज्याची बुद्धी अत्यंत तेजस्वी असा (७७) मेधावी , (१२८) वेदविद् , (१७३) महाबुद्धि , (४५४) ज्ञानमुत्तमम् (५७७) धर्मी , (६६६) ब्रह्मविद् (६७३) महातेजस् (९३६) चतुरस्र अशी अनेक नामें यासंदर्भात काढता येतील. आणि हा •"वातात्मज" म्हणजे वायुपुत्र आणि •"वानरयूथमुख्यम्" म्हणजे वानरगणांचा मुख्य (५०१) कपिंद्र होय. अर्थात समुदायांचा पुढारी (२१९) ग्रामणी तथा नेतृत्व करणारा (२२२) नेता. अशा या श्रीरामाच्या दुताने आपल्या आराध्याजवळ केलेला संकल्प तडीस नेला असा (२५३) सिद्धसंकल्प होय.
श्रीमध्वसांप्रदायातील श्रीविद्याधिराजतीर्थकृत सहस्रनामभाष्यामध्यें (८९८) कपिलः या नामाचे भाष्य करताना ते म्हणतात, 'कपिलवर्णः कपिल:'. जो तांबूस वर्णाचा वानर तो कपिल असें केलें आहे.
मनाच्या श्लोकामध्यें मुखी राम त्या काम बाधूं शकेना। गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना ।। हरिभक्त तो शक्त कामास मारी। जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी।।
असा हा श्रीरामनामरत हनुमान बलाचे मूर्तिमंत प्रतिक्र, अर्थात (१७२) महाबल (३५७) भीम तथा (९४९) भीमपराक्रम करणारा. कामाचा नाश करणारा (२९४) कामहन्. इष्ट गुणांना धारण करणारा वा सद्गुणांना धारण करणारा (८३९) गुणभृत् .कामनेचा पूर्ण नाश करून नामस्मरणाने शक्त म्हणजे समर्थ झालेला व रामभक्तीने प्रकृतीरूप तंतूंचे छेदन करणारा (७८५) तन्तुवर्धन्. श्रीमारुती हा सदा ब्रह्मचारी अर्थात (६६९) ब्रह्मज्ञ होय.
रावणादी अनेक राक्षसांना शासन करणारा (८५९) दण्ड (८६०) दमयिता तथा रणांगणात गदेबरोबर मुसल, वृक्ष अशा नाना प्रकारे दुष्टांचा पराभव करणारा (१०००) सर्वप्रहरणायुध होय आणि शरणागत भक्तांचे कल्याण करणारा (९०२) स्वस्तिकृत् हेही अंजनीसुत हनुमंताचे स्वरूप आहे.
या केसरीनंदनाचे लीलाचरित्र वर्णन करण्यास सहस्रनामाच्या आधारे अनेक नामें आणि त्याचा भावार्थ विशाद करून सांगता येईल. तथापि या अल्प नामांद्वारे श्रीविष्णुसहस्त्रनामाची खोली आणि व्याप्ती श्रीहनुमानासारख्या (७१८) महामूर्ति प्रमाणे किती प्रचंड आहे याचे अनुमान आपण या विषयावरून लावू शकतो.
-अनिकेत घिवलीकर, मुंबई.
Comments