स्वरसम्राज्ञींचे प्रथम पुण्यस्मरण


                देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी॥    - मनाचे श्लोक 

पाहता पाहता एक वर्ष झालें! गेल्या वर्षी ही बातमी ऐकताच मनांत जे चर्रर् झालेंले, त्याची आठवण पुढे संपूर्ण आयुष्यभर जाणार नाहीं हे नक्की.तसं पाहिले तर काय संबंध हो ह्या मोठ्या लोकांचा आणि आपल्या सामान्यांचा? ना नात्यात ना गोत्यात, मग असं का होतं की आपल्या घरतलाच कुणी माणूस कायमचा निघून जावा नि दुःख व्हावं! याला म्हटले तर उत्तर आहे म्हटले तर नाहीं. आपण बहुतांशी भावविश्वामध्यें जगतो.ते सगळ्यांना सुखावह असते.प्रत्यक्षांत व्यवहार हा म्हणाल तर तसा रुक्षच असतो.तो मानवी मनाला फार काळ मानवणाराही नसतो.ती भूक भावना, कल्पना, स्वप्न, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी अशा कोमल अवस्थेतून भागवली जाते.त्यातूनच न पाहिलेल्या, तोंड ओळख नसलेल्या व्यक्तींसंबंधी आपण अनामिक नाते जोडून तिस आपल्यातलीच एक व्यक्ती म्हणून आस्थेने जोडतो.

न कळत्या शिशुवयापासून लतादीदींचे स्वर कानावर पडत असे.आमच्याकडे reel suitcase tape recorder होता.त्यात दीदींनी भा.रा.तांबे, कवी "बी" यांचं चाफा बोलेना, अखेरचा हा तुला दंडवत, इत्यादी गाणी आजी सकाळी लावीत.(ती वेळ, जागा, सकाळची सगळ्यांची लगबग हेही चांगलं आठवतंय)ती गाणी काहीं कळत नव्हती, काहीं विलक्षण जादू आहे ह्यात याचाही पत्ता नव्हता.तरीपण सारखं ऐकावसं वाटे.पुढे थोडी समज आल्यावर "लता मंगेशकर" हे नांव माहित झालं. शालेय वयांत हिंदी - मराठी चित्रपट गीतांबरोबर "तुझं मागतो मी आंता", खेळ मांडियेला", "जयोऽस्तु ते" अशी गाणी, अभंग यांची ओळख झाली.मला मूळातच गाण्याची आवड असल्याने ती अधिक वाढत गेली.

१९९७ हे वर्ष मी विसरु शकत नाहीं. शिव उद्योग सेनेने आमच्या दादरच्या शिवाजी पार्क येथें दीदींचा जाहीर कार्यक्रम आयोजित केलेंला.आम्ही घरातले सगळे लग्न समारंभ असल्यासारखे गेलेलो.तो आनंदाचा क्षण आयुष्यांत विसरणार नाहीं की ज्या दिवशी दीदींना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहता, ऐकता येणार होते! पर्वणीच होती.तो प्रचंड रंगमंच,पार्कात उसळलेली अलोट गर्दी सहस्रावधी खुर्ची, पोलिस बंदोबस्त अजून स्मरतो.
ज्येष्ठ निवेदक श्री.हरिष भिमाणींचे भारदस्त आवाजात निवेदन झाल्यावर स्वरसम्राज्ञींचे आगमन झालें!! टाळ्यांचा नुसता पाऊस!!! मागोमाग बाळासाहेब मंगेशकर, अनिल मोहिले, उषाताई, उदित नारायण, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर इत्यादी मान्यवरांनाही पाहता आले आणि शेवटी कै.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या आगमनाने मराठी माणसांच्या मनांत काय होते हे सांगायला नकोच. सगळा सोहळा डोळ्यात, मनांत, हृदयांत भरून घेत होतो.

त्यांच्या गाण्याविषयीं वर्णन वगैरे करण्याच्या भानगडीत कोण पडणार आणि मी ते काय करणार! गुणातीत असते तसेंच ते "वर्णनातीत" आहे.

वर्षा मागून वर्षे गेली, त्या स्वर्गीय सुरांचे दवबिंदू टिपत जीवनांतल्या प्रत्येक भावनेशी निगडीत गाणी ऐकत कधी हसलो, सुखावलो, रडलो, भक्तीरंगात न्हलो. हा माझाच अनुभव आहे असं नाहीं तर दीदींची गाणी ऐकली त्या प्रत्येकांना हा प्रत्यय आला असणारच.संगीत ही गोष्टच अशी आहे की आपण त्यात नुसते सहभागी होत नाहींत तर मिसळून जातो.

पण..पण.. "मृत्यु न म्हणे रागज्ञानी।मृत्यु न म्हणे ताळज्ञानी। मृत्यु न म्हणे तत्त्वज्ञानी। तत्त्ववेत्ता॥ या श्रीसमर्थांच्या श्रीदासबोधातले वचन ०६ फेब्रुवारी २०२२ला पुनः प्रत्ययास आलें.लक्षावधी लोकांच्या हृदयांत आपल्या स्वरांची मोहिनी टाकणारा सुर गेला.कितीतरी दिवस मला दीदींचे मुद्दाम एखादे गाणं लावून ऐकायला मन धजावत नव्हतं.कारण... नाहीं सांगू शकत...

गिरगांवात बस वा गाडीतून जाताना नेहमी प्रभु कुंज इमारतीकडे दृष्टी वळायची.माहित असायचं दीदी अशा कशा दिसणार..पण बालभाव असा की न जाणो कधी चुकून दिसल्या तर! पण आता तीही आशा नाहीं. तरी सुद्धा परवा त्या बाजूला जाताना नकळत इमारतीकडे लक्ष गेलंच आणि उदास झालो...

भाग्यवान की दीदींच्या युगांत जन्मलो, त्यांना ऐकायला, पाहायला मिळाले.त्यातून त्या मराठी, त्यातही सावरकर भक्त.. हा माझा भाव निराळा,  तो माझ्यापुरताच हृदयसंपुटांत सोनेरी कोंदणांतला होय.

सहस्रकालामागे सरस्वती नदी गुप्त झालीं.तरीही वेदकाळापासून ते आजपर्यंत त्या पवित्र सप्तनदी श्लोकात तिचे नाम घेतलें जाते.तशीच योग्यता "आधुनिक सरस्वती" कै.लता मंगेशकर तथा दीदीं बाबत आहे हे निर्विवाद होय. हि भारतीय संगीताची खळखळणारी महानदी लुप्त झालीं.तथापि, जोपर्यंत जगतामध्यें स्वर नामक दैवीवस्तु विद्यमान् असेल, तोवर दीदींचे नांव त्या सरस्वती नदीप्रमाणें अदृश्य स्वरूपांत निनादत राहिल हे त्रिवार सत्य! विज्ञानाच्या उपकारांमुळे या भारतरत्नाचा संपूर्ण संगीत ठेवा आपल्याकडे सदैव आहे, हिच समाधानाची गोष्ट.
              
- अनिकेत घिवलीकर.

Comments

Dr.Aditya said…
वाह!👏👏👏👏

Sanjay said…
सुंदर लिहिले आहेस
या लेखाच्या माध्यमातून दीदींना तुमच्या नजरेतून समजून घेता आलं. छान वाटला लेखनाचा प्रवास. आणि त्या नसण्यावर पुन्हा एकदा मन उदास झालं. पण त्यांचा आवाज आपल्याबरोबर कायम रेकॉर्डिंग स्वरूपात आहे, हाच काय तो आधुनिक सरस्वतीचा आशिर्वाद होय.
सुरेल प्रवासाचा सुंदर मागोवा, चिरंतन स्मृतींचा वारसा जपण्याचा
Unknown said…
Khup chhan lihila ahe
माणूस जितका मोठा होत जातो तितकाच तो जनसामान्यांचा होत जातो...लतादीदींच्या बाबतीतही हेच लागू पडतं...तुमच्या दीदींविषयी असलेल्या भावना आणि आठवणी यांनीच त्यांचं अस्तित्त्व तुमच्यासाठी अजूनही आहे...आणि यामुळेच ते त्यांच्या सगळ्या रसिक चाहत्यांसाठी आहे...

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १