तां वन्दे श्रीभारती संस्कृतिम्
या वेदोपनिषत्स्वनादिसमयाद्मूलं बिभर्ति स्वकम्।
या रामायणभारतादिषुहिता प्राज्ञैः समाख्यापिता॥
या वै व्यष्टिसमष्टि मड्ग़लकरी संपूर्णता बोधिनी।
तां वन्दे विनयेन तत्परतया श्रीभारती संस्कृतिम्॥
- स्वामी वरदानंद भारती.
ज्या संस्कृतीची मूळे अनादीकालापासून वेद, उपनिषदादिंमध्यें रुजलेली आहेत, ज्या संस्कृतीचा हितकार विचार आणि वैशिष्ट्ये रामायण, महाभारतादी प्राचीन ग्रंथातून थोर बुद्धिमंतांनी प्रकट केला, जी संस्कृती व्यष्टि म्हणजे व्यक्ती आणि समष्टि म्हणजे सर्व समाजाचे कल्याण साधून देणारी आहे, जी सर्व दृष्टीने संपूर्णतेचा बोध करून देते, त्या ऐश्वर्ययुक्त भारतीय संस्कृतीला तत्परतेने मी विनयपूर्वक वंदन करतो.
हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव संपूर्ण देशामध्यें मोठ्या दिमाख्यात साजरा होत आहे.पंचाहत्तर वर्षांपूर्वी पारतंत्र्याच्या शृंखला निखळून आनंदवनभुवन निर्माण झाले.ह्यामागे अगणित देशभक्तांनी रक्ताचे पाणी करून, घरावर निखारा ठेवून, आयुष्याची होळी स्वहस्ते पेटवून वंदे मातरम् या एका मंत्रासाठी वा मंत्राने स्वातंत्र्यलक्ष्मीच्या यज्ञार्थ स्वाहाकार केला.एवढा सर्वस्वाचा त्याग करून काहीं ऐहिक प्राप्ती होईल असला कुठलाही गोष्टीचा विचारही निदान या यज्ञकुंडाचे स्थंडिल रचणाऱ्यांनी तरी केला नव्हता ना मनांतही तसे आले असेल.आजोबांनी आंबा रुजवावा आणि नातवाने फळ खावे हाच भाव ह्यातून प्रकट होतो.केवळ कर्मण्येवाधिकारस्ते म्हणत हाती घेतलेले सतीचे वाण जीवाची बाजी लावून ते व्रत आचरीले.फाशी, तुरुंगवास, भूमिगत, देशांतर, जन्मठेप, सत्याग्रह, सशस्त्र उठाव, निःशस्त्र प्रतिकार अशी साधनं या स्वातंत्र्यसमरात उपयोगत आणली.एक उत्तम दुसरे कनिष्ठ असा भेद करणेही अनुचित.विवेकी माणसाच्या मनांत तसा विचार येत नाहीं.आलाच तर तो स्वार्थबुद्धीने अहंकाराने समजावा.
निदानपक्षी १८५७ पासून इंग्रजींविरुद्ध लढा सुरू झाला.तो सशस्त्र लढा पाहता ब्रिटिशांना भारतीय वीरवृत्तीची पुरेपूर ओळख झाली.तथापि त्यांच्या विरोधातल्या तलवारी त्यांनी या भूमीत पाऊल ठेवल्यापासूनच उगारली होती.आणि फक्त इंग्रज असेंही मानणे योग्य नाहीं.तर मुसलमानी आक्रमकांपासून पोर्तुगीज, डच, इत्यादी सगळेच यामध्यें आले.भारतीय स्वातंत्र्यचा इतिहास केवळ दीडशे वर्षांचा आहे असे मी तरी मानीत नाहीं.सगळ्यचा विचार करता नाहीं म्हणता एक सहस्र वर्षे भरतील इतका मोठा काळ भारतभूमीने अनेकांच्या जुलमी राजवटीत पारतंत्र्याखाली व्यतीत केलीं.बरं, १९४७ला याचा शेवट सुखासुखी झाला, तर तोही नाहीं. कारण देशविच्छेदनाचा महाभयंकर हविर्भाग देऊन तो धगधगता यज्ञ शांत झाला! स्वातंत्र्य मिळाले, पण भारतमातेचे दोन तुकडे करून!!
तरीही काहीं मधुर काहीं कटु सत्य पचवून आजही भारत सार्वभौम प्रजासत्ताक राज्य म्हणून जगाच्या पाठीवर दिमाखात उभा आहे हे यःकश्चित कमी मानण्याचे कारण नाहीं.श्रीसमर्थांचे आहे तितुके जतन करावें। पुढे आणखी मेळवावे॥ हे धोरण मनांशी बाळगले तरी पुष्कळ आहे.
अकराशें- बाराशें वर्षे परकीय आघात सोसून राष्ट्र म्हणून भारतभू जीवंत कशी राहिली हे आश्चर्य करण्यासारखेच आहे.जगांत अनेक संस्कृती उदयास आल्या नि कालौघात लुप्तही झाल्या.आर्यसनातन संस्कृती राम-कृष्णाच्या आधीपासून होती नि आजही ती तशी आहे.आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या आणि कष्टाने जोपासणी केलेल्या परंपरेचे जाळे कोळ्याच्या जाळ्या इतके अतूट तथा त्याची वीण मानवाच्या एकूणएक अंगोपांगाचा सूक्ष्म विचार करून एकजुटीने वेढून टाकणारी आहे.त्यातूनच संस्कृतीचा विस्तार झाला.
आज स्वातंत्र्यदिवसाचे औचित्य असून संस्कृतीचा विषय कुठे आला, असें कुणाला वाटू शकेल.पण माझ्यामते संस्कृती वा परंपरा आणि राष्ट्र याचे पृथक्करण करता येणें अशक्य.किंबहुना एकावाचून दुसरा लंगडा असें एकंदरीत इतिहासाचे अवलोकन केल्यास सहज दिसून येईल.ज्याला आपण आज संस्कृती, धर्म, सभ्यता म्हणून ओळखतो ते पूर्वी सगळे मिळून धर्म याच व्यापक व्याख्येत बसत.लोकांच्या सोईकरता वर्गवारी केली जाते इतकेच.धर्म या शब्दातच आचार, तत्त्वज्ञान, अध्यात्म, राजकारण इत्यादी सगळ्याचा समावेश होतो.आता संस्कृती म्हणून निराळे काय काढणार! पण शब्द अलीकडचा असला तरी अप्रस्तुत अजिबात नाहीं, म्हणून तो स्वीकार्यही सहज झाला.
सन १९९५ मध्यें स्वामी वरदानंद भारती यांनी नांदेडच्या "संस्कृती विचार सेवक संघ" या संघटनेस त्याचे उद्दिष्ट नि त्यातून भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणारा श्लोक रचून त्याविषयीं मार्गदर्शन केलें होते. अध्यात्माबरोबर राष्ट्रोन्नतीचा विचार त्याच तळमळतेने करणारे स्वामी वरदानंद भारती तथा अप्पा हे अलिकडच्या काळात मोठे अधिकारी पुरुष होऊन गेलें.त्या श्लोकाविषयीं, तदनुषंगाने सांस्कृतिक ठेवा याचे आपण चिंतन करु.तो संपूर्ण श्लोक लेखाच्या सुरुवातीस दिला आहे.त्यातल्या प्रत्येक चरणाचे विवरण माझ्या बुद्धिप्रमाणें, पण प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न करतो.
या वेदोपनिषत्स्वनादिसमयाद्मूलं बिभर्ति स्वकम्।
अनादीकालापासून चालत आलेले तत्त्वज्ञान ऋषी, मुनी, साधुजन, आचार्यगण, तत्त्ववेत्ते, संत, आधुनिक संत यांची परंपरा थेट वेद आणि उपनिषदांपर्यंत पोहचते.हिंदुसंस्कृतीचा पाया हाच मूळी वेद आहे.ब्रह्म, जगताची व्याख्या करणारे वेदच आहेत असें श्रीज्ञानोबाराय भावर्थदीपिकेच्या पहिल्या ओवीत त्यास वेदप्रतिपाद्या म्हटले आहे.वेद विधानांचा काम्यकर्म इतकेच अध्यात्मिक साधनेचा विषय आहे.तो सामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असून विद्वान अधिकारी व्यक्तींचे काम आहे.पण त्याचा गर्भितार्थ श्रीतुकोबा नेमका मांडतात.ते म्हणतात, वेद अनंत बोलिला। अर्थ इतुकाचि साधिला॥ विठोबासी शरण जावें। निजनिष्ठे नाम गावें॥ आता याहून अधिक स्पष्ट काय सांगावे! आपल्या भारताच्या संविधानाची कलमे नुसती वाचून त्यातल्या खाचाखोचा समजतील का? त्याला विधिज्ञ (कायदे पंडित)च पाहिजे.तो सांगेल ते आपण निमुटपणे ऐकतो. तिच गोष्ट इथे लागू होते.संतांनी अवघड काम आपल्यासाठी सोपे करून ठेवले आहे त्याची कास धरावी.
उपनिषदांतही ब्रह्मांडापासून संसारापर्यंत सगळे विस्तारपूर्वक कथन केलें आहे.सूत्ररूपांत नि गुढ असल्याने अर्थ लागणे थोडे कठीण होते.पण आज सगळ्या भाषेतून त्याची भाषांतर, भाष्ये उपलब्ध असून त्यातले ज्ञान थोडेअधिक प्रमाणात समजू शकते.उपनिषदांचे कर्ते बहुतेक सगळे राजे आहेत हेही जाताजाता सांगायला हरकत नाहीं.म्हणजे आपली परंपरा सुरुवातीपासून केवळ भोगवादी नसून, नव्हतीच; पण निवृत्तीवादीही तितकीच आहे.हिंदुधर्माचा हा मुळी गाभाच आहे.बरं, हिंदु या शब्दातच सनातनी वैदिक, जैन, बौद्ध, लिंगायत, आर्यसमाजी, वनवासी इत्यादी सगळ्यांचा समावेश होतो हे ओघाने आलेच.जैन नि बौद्धांनी वेदप्रामाण्य मानले नाहीं तरी ईश्वर, पुनर्जन्माविषयीं त्यांची कल्पना वेदांच्या आड येत नाहीं.शेवटी "केशवं प्रति गच्छति"हेच खरें!
ऋग्वेद हे जगातील अतिप्राचीन पहिलें वाङ्मय आणि आपण हिंदु याच वेदांपासून उत्पन्न झालेल्या परंपरेत जन्मणे हे निश्चित अभिमानाची गोष्ट आणि पूर्वजन्मीचे सुकृत मानणें इतके गौरवास्पद आहे.
या रामायणभारतादिषुहिता प्राज्ञैः समाख्यापिता॥
तिच गोष्ट रामायण महाभारतासारख्या अतुलनीय ग्रंथांची.वेदवाङ्मय, पुराणे, स्मृतिग्रंथ, इत्यादी ऐतिहासिक ठेवा केवळ पुजण्याचा विषय नसून काहीं अंशी आजही आचरणाचा आहे.मी काहीं अंशी म्हणालो तरी संपूर्णपणे त्याच मार्गाने जीवन व्यवस्थितरित्या जगणारे आजही असंख्य लोकं आहेत.आपल्याकडे कुठलेही शास्त्र दडवून, लपवून ठेवले नाहीं.काहीं दीडशहाण्या स्वार्थी लोकांनी या गोष्टीचा उत येईतोवर अपप्रचार करून सामान्य माणसांचा जाणुनबुजून बुद्धिभेद केला.कुठल्यातरी उत्तर पेशवाईच्या किरकोळ घटना सांगायच्या आणि ब्राह्मणांवर विद्या झाकून ठेवल्याची बोंब ठोकावी.आज सगळे मोबाईलच्या एका क्लिक्वर उपलब्धता असून अशा किती विद्या आत्मसात केल्या? क्रमिक पुस्तकांच्या जोरावर जी काहीं माहिती गोळा करतात त्याचा उपयोग परत विष पेरण्यातच खर्ची करतात.मग उपयोग तो काय? विषयांतर होतोय, तरी काहीं गोष्टी सांगेन.मनुस्मृतीचे नांव काढता विनाकारण काहीं लोकांच्या अंगावर पाल पडल्यासारखे वागतात.त्यातल्या नव्याणनव टक्के लोकांनी ती काळी का गोरी हेही पाहिले नसते.पण.काहींतरी ब्रह्मणेतरांच्या विरुद्ध आहे अशी फसवी समजूत करून घेतली आहे.उदाहरण म्हणून एकच सांगतो, त्याच मनुस्मृती जो अपराध शुद्र करील त्याच्या एकशे अठ्ठावीस पट ब्राह्मणाला शिक्षा सांगितली आहे.अधिक बोलणे प्राप्त आहे का ह्यावर? महाभारताचा तिसरा वक्ता सूत हा शुद्र आहे.स्त्रीशुद्रद्विजबंधुनां त्रयी न श्रुतिगोचरा। इति भारताख्यातं कृपया मुनिनां कृतम्॥ उगाच आम्हाला ज्ञानापासून लांब ठेवले वगैरे बाष्कळ बडबड. हा, अधिकार तैसा दावियेला मार्ग। चालतां मग कळो येते॥ हे तुकोबांचे वचन सगळ्याच क्षेत्रांत प्रमाण आहे.ही अट सर्वत्र लागू होती आजही आहे.
तेव्हा,रामायण महाभारतस एका पारड्यात घालावे आणि दुसऱ्या पारड्यात इतर ग्रंथ म्हणा वा काहीं, पहिले पायडेच खाली जायचे यात शंचा नाहीं.त्याचे कारण यामध्यें मनुष्य जन्माच्या सार्थकतेचा सर्वांगीण विचार सांगितला तो क्वचितच असा एकत्रीपणे नमुद झालाय.आचारधर्माचा आणि नातेसंबंधाचा उत्कट आविष्कार अशी रामायणाची विभागणी केलीं तथा जगातल्या सगळ्या विषयांचे ज्ञान जेथें एकवटले तो महाभारत ग्रंथ हा सर्वभूत हितैरतः असा आहे. म्हणौनि महाभारतीं नाहीं। तें नोहेचि लोकीं तिहीं। येणे कारणें म्हणिपे पाहीं। व्यासोच्छिष्ट जगत्रय॥{ज्ञाने०} अशा महाभारततून श्रीगीतारूपी नवनीत आजही सऱ्या जगाला दीपस्तंभासारखे प्रकाशमान करीत आहे.चारही पुरूषार्थाची यथार्थता दर्शविणारे हे ग्रंथ मानवाच्या हितासाठीच वाल्मिकी, व्यासमुनीनी रचून कल्याणाचा मार्ग मोकळा केला.श्रीराम- श्रीकृष्ण ही याच संस्कृतीचे दोन मानबिंदू , की पाच- सात सहस्र वर्षे लोटली तरी हिंदूंच्या हृदयांत त्यांचे स्थान अढळ आहे.त्यांचा आदर्श हाच आपल्या हिताचा राजमार्ग होय.
या वै व्यष्टिसमष्टि मड्ग़लकरी संपूर्णता बोधिनी।
भारतीय संस्कृतीने केव्हांही एकांगी, स्वार्थी विचार केला नाहीं.सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:खमाप्नुयात्॥ ही प्रार्थना व्यक्ती पूर्ती किंवा विशिष्ट समाजासाठी आहे असे कोण म्हणेल? समस्त मानवांच्या सुखास्तव परमेश्वराजवळ केलेली आळवणी नव्हे का! सनातनधर्मातले विविध सांप्रदाय, पंथ, उपासना पद्धती ह्या व्यक्तीपरत्वे भिन्न आहेतच.पण रूचीनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषाम् हा प्रकार सगळीकडेच असतो.परंतु जेव्हा समाजाच्या, राष्ट्राच्या अभ्युदयाचा विचार करण्यात येतो तेव्हा तो व्यष्टीचा न राहाता समष्टीचा विषय होतो. व्यक्तिगत उन्नतीचा मार्ग कथन करताना श्रीगीतेतले वचन देणेच सुयोग्य होईल.स्वतःचा उद्धार स्वतःच करावा असा स्पष्ट उपदेश भगवंताने केला - उद्धरेदात्मनाऽऽत्मानम्.
तत्त्वज्ञान, धर्मकारण, राजकारण, गणित, विज्ञान आणि त्याच्या सगळ्या उपशाखा, ज्योतिष, अर्थकारण, समाजव्यवस्था इत्यादी सगळ्या विषयांचा परिपक्व आविष्कार हिंदु संस्कृतीत केव्हाच विकसित झालेला.उपनिषदकाली म्हणजे निदान दहासहस्र वर्षांमागे छांदोग्योपनिषदातला एक राजा आपल्या राज्याचे वर्णन करताना म्हणतो, "न मे स्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यप । नानाहिताग्रिर्नाविद्वान्न स्वैरी स्वैरिणी कुतः॥" की, माझ्या राज्यात कुणी चोर नाहीं, कुणी कृपण नाहीं कुणी दारुडा नाहीं, कुणी अधार्मिक नाहीं, कुणी निरक्षर मनुष्य नाहीं.स्वैरवर्तनी पुरुष नाहीं तर स्वैराचारी स्त्री असेलच कशी? ह्या प्रमेयाच्या पट्टीने आज मोजले तर एक सेकंदही कोठले राज्य चालणार नाहीं.पण एकेकाळी असेही दिवस या भारतभूमीने पाहिले आहेत.
मधल्या आक्रमकांच्या धुमश्चक्रीत अतोनात वाताहत समस्त देशाला भोगावी लागली तो भाग निराळा.किंतु त्या प्राचीन संस्कृतीची मधुर फळे आजही आपण चाखीत आहोत.व्यक्ती आणि समाजाच्या विकासासाठी लागणारे मूलतत्त्व ऋषी प्रणितच आहेत.फारतर आज त्याची साधनं वेगळी झाली असतील.
हि भारती संस्कृती आजही आपल्या पदरात भरभरून दान देण्यास समर्थ आहे.आपण कितीही घेतले तरी त्यात उणीव होणार नाहीं.पू.पांडुरंगशास्त्री आठवले म्हणत "ही संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी रक्ताचा थेंबन् थेंब खर्च केला आहे.त्याविषयीं आदराने जोपासना केली पाहिजे".
सुज्ञ पालकांनी त्यांच्या मुलांसमवेत हा वारसा सांभाळण्याकरीता विशेष प्रयत्न केलेंच पाहिजेत.ज्या उत्साहाने हाॅटेल, पिकनिक, सिनेमा, जेवणावळी, पार्टी करतात त्यापेक्षा अधिक उत्कटतेने धर्मकार्य झालेच पाहिजे.घरामध्यें हाॅरी पाॅटर असण्याला कुणाचीच ना नाहीं.पण मग गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यासारखे सद्ग्रंथ का नको? आम्हाला वाचता येत नाहीं हे कारण देणें म्हणजे स्वतःचे अज्ञान नि निरक्षर असल्याचे जगाला सांगणे हे दुर्दैवाचे लक्षण नव्हे? स्वधर्माविषयीं अत्यंत उदासीन असा एकमात्र हिंदूच असावा असें नेहमी वाटते.धर्मो रक्षति रक्षितः या वचनाचे निरंतर चिंतन घडले पाहिजे. स्वधर्म, स्वराष्ट्राविषयी आस्था, प्रेम हे शिकवावेच लागते.
तां वन्दे विनयेन तत्परतया श्रीभारती संस्कृतिम्॥
अशा या वैभवसंपन्न, विद्यासंपन्न, शौर्यशील भारतीय संस्कृतीस तत्परतेने तथा विनयाने, आदराने, अभिमानाने नमस्कार करण्यासारिखे दुसरे भाग्य नाहीं.पुराणातल्या राक्षस-आसुरांपासून ते अतिरेक्याचे अगणित हल्ले, आक्रमणे झेलूनही हिंदुधर्म संस्कृती ताठ मानाने जिवंत आहे.तथापि हिंदूंनी निद्राधीन असणे शहाणपणाचे नाहीं.आजचे हल्ले प्रत्यक्ष शस्त्रांपेक्षा मानसिक छालाचे आहेत.त्याविषयीसुद्धा उदासीनवृत्ती असेंल तर येणारा काळ अजून कठीण आहे.वैयक्तिक, सामाजिक, राजकीय पातळीवर हिंदुत्वाचा म्हणजेच राष्ट्रियत्वाचा सार्थ अभिमान नुसता मनांत ठेवून भागणार नाहीं.तो मिरविलाच पाहिजे.त्यात लाजण्याचे कारण काय! पाश्चात्यांच्या अंधानुकरण आणि भ्रष्ट नक्कल करण्यापेक्षा स्वधर्मे निधनं श्रेयः चा अर्थ समजून उमजून आपापल्यापरिने देशसेवा झाली पाहिजे.तरच या स्वातंत्र्याचे साफल्य.नाहींतर मानसिक गुलामगिरी याहून भिन्न काय!
![]() |
| स्वामी वरदानंद भारती |
पू.अप्पा म्हणजेच स्वामी वरदानंद भारती यांनी भारतीय संस्कृतीच्या पुरातन वटवृक्षाची मूळं, त्याचे खोड, शाखा, पाने, फुले, फळं या सगळ्याचे यथार्थ दर्शन या श्लोकाद्वारें करून दिले.दररोजच्या प्रातःस्मरणांत त्याचा समावेश करण्याइतका तो महत्वाचा आहे असेंही म्हणता येईल.हिच कास धरून आपल्या देदिप्यमान हिंदुसंस्कृतीची जोपासना अधिक जागृततेने केली म्हणजेच देव आणि देशाची सेवा केल्याचे पुण्य लाभेल यात तिळमात्र शंका नाहीं.
✍ अनिकेत घिवलीकर.
✍ अनिकेत घिवलीकर.
🚩 वन्दे श्रीभारतीसंस्कृतीं वन्दे मातरम् च 🇮🇳


Comments
महत्वपूर्ण माहिती👌🏻
वन्दे मातरम ��