गाथा बलिदानाची

 


तुजसाठी मरण ते ज
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
श्रीस्वतंत्रते भगवती॥
                                                      - स्वातंत्र्यवीर सावरकर

मातृभूमीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांची यादी करावयाची झाली तर खरोखरी अथपासून इतिपर्यंत प्रामाणिकपणे सगळ्या देशभक्तांची नांवे सापडतील काय? कठीण आहे.कारण या क्रांतिकार्यास अप्रत्यक्षपणे साह्य करणारेही प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्याइतकेच स्वार्थ त्यागून स्वदेशाकरीता झुंजले.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे या समरात शौर्याच्या पराकाष्ठेविषयीं म्हणतात "कोण मेला आणि कोण जगला ह्या रणघाईतील योगायोगावरून हुतात्म्यांची नि वीरात्म्यांची योग्यता ठरत नाहीं.तर ती सत्समरात देहपतन होईतो किंवा विजय मिळेतो कोण लढत राहिला ह्यावरून ठरते."

इंग्रजींविरूद्ध भारतीयांनी केलेल्या स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास असाच आहे.स्वातंत्र्याचे रण माजले असता या यज्ञामध्यें रक्ताचा हविर्भाग पडल्याखेरिज तो यज्ञकुंड शांत होत नसतो हे त्रिकालातीत सत्य आहे.अतः स्वातंत्र्यसंपादनाचे श्रेय हे कोणा एका व्यक्तीचे वा गटाचे नसून सामायिक होते.मग ते सशस्त्र असो वा निःशस्त्र.

अशा सहस्रावधी वीरपुरुषांनी आपले तन- मन- धन सर्वस्वी देशासाठी अर्पण केलें.त्याचे पुढे येणाऱ्या पिढीने स्मरण करावे या करीता "दैनिक लोकसत्ता" या वृत्तापत्राने १९९६ साली काहीं क्रांतिकारकांची अगदी त्रोटक माहिती त्यांच्या छायाचित्रसहित प्रसिद्ध करुन आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला होता.औचित्य होते १९९७मध्यें होणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे ५०वें वर्ष अर्थात सुवर्ण महोत्सव!

त्यावेळी लोकसत्ताचे संपादक डाॅ.अरुण टिकेकरांनी वृत्तपत्राबरोबर "लोकमुद्र", "बालरंग", "चतुरा", "गाथा वैज्ञानिकांची" असें स्तुत्य उपक्रम विशेष पुरवणी किंवा काॅलमचा घाट घालून चालविले.त्याला उदंड प्रतिसादही लाभत.मी लोकमुद्रेचे जवळपास सगळे अंक अजून जपून ठेवले आहेत. "गाथा बलिदानाची" हा असाच छोटेखानी काॅलम.दररोज एका क्रांतिकारकाची संक्षिप्त माहिती छापून येत. असें २०० दिवस म्हणजे निवडक दोनशें क्रांतिकारकांची ओळख या माध्यमातून झाली.त्यामध्यें पहिला मान दिला तो १८५७च्या युद्धाची ठिणगी चेतवली त्या मंगल पांडे यांना.पुढें तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी, राव तुलाराम, वासुदेव बळवंत, गुरु रामसिंग, चाफेकर बंधु, बिरसा मुंडा, खुदिराम फोस, धिंग्रा, कान्हेरे, भाई भगतसिंग, कर्तारसिंग, रहमत अलि, राजगुरू, भगतसिंग, आझाद, सुखदेव, निर्मल सेन, सूर्यसेन, उधमसिंग, मादाम कामा, बाबाराव सावरकर, शिरिषकुमार, सुभाषचंद्र, रासबिहारी... किती नांवे घ्यावी!

काहीं शाळांनी या उपक्रमात सहभागी होऊन आम्हा विद्यार्थ्यांना त्या माहितीची कात्रणे काढून त्याची आकर्षक वही करून स्पर्धेसाठी तयार करण्यास सांगितले.आमच्या दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटी शाळेने यात पुढाकार घेतलेला नि अनेक विद्यार्थ्यांकडून तशा वह्या तयार करून घेतल्या.मी तेव्हा इयत्ता पांचवींत होतो.

घरी तेव्हा लोकसत्ता नसे.आजोळी त्याची कात्रणे काढून ठेवायला सांगितलेंले असें.केव्हांतरी त्याचा क्रम लागायचा नाहीं.मग परिचितांकडून तो अंक मिळवायचा, कधी एकच कात्रण अधीक असायचे! असा छान गम्मतीचा प्रकारही घडत.आता ते सगळे आठवून "रम्य ते दिवस" असेंच म्हणावेसे वाटते.मम्मा आणि मी ती कात्रणे वगैरे चिकटवायचो, देशभक्तांची माहिती वाचून त्यांच्याविषयीं कृतज्ञता वाटायची.मनोमन नमस्कारही व्हायचा.कदाचित तेव्हापासूनच याविषयांची गोडी लागली.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सवी वर्षी तयार केलेंली म्हणजे २५ वर्षांनी ही वही आठवली.तशी ती नेहमी लक्षात असायची.अशा गोष्टी मी विसरत नाहीं! ती केवळ वही नव्हे, तो गाथाच. हाच शब्द योग्य आहे.सुदैवाने नेमक्या वेळी हाती लागली म्हणून त्याचे फोटो सादर करता येत आहेत याचा आनंद आहे.तेव्हा साधेपणातही मजा होती हे या वहीकडे पाहिल्यानंतर सहज ध्यानात आले.असो.

हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी  हसतमुखानं हौतात्म्य स्वीकारणाऱ्या असंख्य क्रांतिकारकांप्रती माझा सादर नमस्कार!

✍ अनिकेत घिवलीकर, मुंबई. 


Comments

Dr.Aditya said…
👏👏🇮🇳🙏

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १