निवृत्ति संपन्न सेवी गुरुकृपा

 


संत श्रीनिवृत्तीनाथमहाराजांची "गुरुनिष्ठा".

सांसारीक असो वा पारमार्थिक सद्गुरुवांचून मानवीजीवनाला गती व कृतार्थता प्राप्त होणे दुरापास्त असून हा न्याय अनादीकालापासून आजपावेतो तसाच चालत पुढे आला आहे.गुरु म्हणजे अज्ञानावर ज्ञानाने केलेंली मात, मोहग्रस्तास बंधमुक्त करणारा, सारासार विवेक जागृत करणारा, अहिताच्या खाईतून वर आणणारा, शाश्वत सुखाचा विस्तार दाखवणारा, जगन्मिथ्याची प्रचिती देणारा, पापांचे खंडन नि दोषांचे निरसन करणारा आणि सर्वात मुख्य म्हणजे जीव आणि परमात्म्याचे ऐक्य साधून देणारा "भवसिंधुतारक" होय.
त्यातही अध्यात्मक्षेत्रांत सद्गुरुच्या मार्गदर्शनाबरोबर अनुग्रहाखेरीज प्रगती असंभवनीय गोष्ट आहे हे त्रिवार सत्य.सद्गुरु मोक्षदाताच आहे ही भावना दृढ झाल्याविना ज्ञानाचा प्रकाश कसा संभवेल! आचार्य नि संतमहात्म्यांनी याच प्रमेयाचा उच्चार सर्वत्र केला.पूर्ण शरणागती आणि पराकोटीची श्रद्धा आवश्यक आहे त्यायोगेच सद्गुरुकृपेचा वर्षाव होईल.भगवंतानेही गीतेत म्हटले आहे तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाया। (४:३४) की, ज्ञानीपुरुषांना साष्टांग दंडवत घालून, नम्रतापूर्वक प्रश्न केल्याने आणि त्यांची मनोभावे सेवा केल्याने आत्मज्ञान प्रदान करतात, मग श्रद्धावान् लभते ज्ञानम्। (४:३९) अशा तऱ्हेने आत्मोद्धाराची पायरी सर करता येते.
तेव्हा गुरू-शिष्याचे ऋणानुबंध कसे जन्मजन्मांतरीचे नि अनाकलनीय असते ते पुढल्या विवेचनावरून आपल्या दृष्टीस येईल.

आई, वडील आणि भावंडांसमवेत ब्रह्मगिरी डोंगराला प्रदक्षिणा घालत असताना त्या मार्गात वाघाची चाहूल लागताच सगळ्यांची पांगापांग झाली. त्यात निवृत्तीनाथ पळता पळता वाट चुकून एका गुहेत शिरले.ते पायवाट चुकले तरी आत्मोन्नतीचा राजमार्ग बरोबर सापडला! त्या गुंफेत नाथ सांप्रदायाचे महान् योगी श्रीगैनीनाथ (गहिनीनाथ असेंही म्हणतात) यांना निवृत्तीनाथांनी पाहिले आणि सद्गुरु - सत्शिष्याची खुण गाठ पटली.गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना पाहताच क्षणी या कोवळ्या मुलाचा अध्यात्मिक अधिकार अंतःचक्षुंनी ओळखून आपल्याजवळ बोलवून यथावकाश मस्तकावर हात ठेवून नाथपरंपरेप्रमाणे योगमार्गाची दीक्षा दिली आणि महावाक्यांचा बोध केला.तथा श्रीकृष्णाची उपासना देऊन नामस्मरणभक्तीचा प्रसार करण्याची आज्ञा केली.निवृत्ति गयनी कृपा केली पूर्ण। कुळ हें पावन कृष्णनामे॥
असा गैनीनाथांच्या अनुग्रहाने निवृत्तीनाथांची मुळातली वैराग्यशील वृत्तीला अधिकच तेज चढले तथा घराण्याचा उद्धर होऊन ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताईंनाही निवृत्तीनाथांनी नाथसांप्रदायाची दीक्षा प्रदान केली. ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले । निवृत्तीने दिधले माझे हाती॥

आई-वडील निवर्तल्यानंतर ज्ञानोबांनी निवृत्तीदादांस मुंजीविषयी विचारणा केली.परंतु गुरुकृपेने ब्रह्मज्ञान हाती आल्याने त्यांना व्रतबंधनादी बाह्य संस्कारांची तशी अनावश्यकता वाटली.निवृतीनाथांच्या जीवनमुक्त अवस्थेचे यथार्थ वर्णन निरंजन माधवांनी केलें आहे. मी तो निवृत्ती न पडेचि प्रवृत्तिमार्गी। भोगी अखंड स्वसुखामृत राजयोगी॥ तथापि ज्ञानोबांच्या  प्रेमळ आग्रहस्तव पैठणला गेलें.त्यापुढील वृत्तांत आणि चमत्कार बहुतेक लोकांना ज्ञात आहे.नंतर सगळी भावंडे नेवाश्याला आली तेथें सद्गुरु श्रीनिवृत्तीनाथांनी श्रीज्ञानेश्वरमहाराजांकरवी गीताभाष्य करवून घेतले.त्या भावार्थदीपिकेत म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्यें ज्ञानोबांनी दादा निवृत्तीनाथांचे गुरुस्तवनपर भक्ती, प्रेम ज्या भावोत्कट पद्धतीने वर्णन केलें आहे त्याला दुसरी कसलीच उपमा देणे गैर लागु होईल.त्यातील सद्गुरुनिष्ठा त्यांच्याच शब्दांत देणे उचित. आतां विश्वात्मक माझा। स्वामी श्रीनिवृत्तिराजा। तो अवधारू वाक्यपूजा। ज्ञानदेव म्हणे॥ (१५:५९९)
श्रीसोपानकाका आणि श्रीमुक्ताबाईंनीही निवृत्तीदादांचे गुरुत्व अनुक्रमे वर्णन केलें आहे.सोपान संगती निवृत्तीची तृप्ती। ज्ञान अर्क गति सोपानाची॥, मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल। निवृत्तीनें चोखाळ दाखवीलें॥ अशी गुरूमहिमा तीनही भावंडांनी अत्यादरे  अभिवंदिली आहेत.

तेव्हा सगळ्यांचे गुरुपद निवृत्तीनाथांकडे आले असून त्यांची गुरुनिष्ठाही त्यांनी शेकडो अभंगांद्वारें  वर्णिली.निवृतीनाथांवर गैनीनाथांनी अनुग्रह देऊन कृष्णभक्तीची दीक्षा दिली हे मागे पाहिले.नाथपंथाची हठयोग साधना प्रदान करूनही नामस्मरण उपासना प्रामुख्याने सांगितली.त्याचे कारण निवृत्तीनाथांना झालेली गुर्वाज्ञा. साधन हरिपंथु हाचि निजहेत। गुरुमुखे मातु ऐशी असें॥
त्या गुरुवर गैनीनाथांनी लोककल्याणातून मोक्षापर्यंतचा मार्ग सांगितला.समता वर्तावी अहंता खंडावी। तेणेचि पदवी मोक्षमार्ग॥
हा उपदेश चारही भावंडांनी पाळला.त्या गुरुमाऊलीविषयी निवृत्तीनाथांच्या अंतःकरणांत भक्ती नि प्रेमाचा अखंड झरा वाहत असे.त्या परब्रह्माचे नि भगवान् श्रीकृष्णाचे ऐक्या निवृत्तीनाथ वर्णन करतात, निवृत्ति साधन कृष्णाचे रुपडे। ब्रह्मांडा एवढे तदाकार॥
हठयोगादी मार्ग, कर्मकांड या गोष्टी सामान्य लोकांसाठी तशा कठीण.अनेक विधीनिषेध पाळून त्या सिद्धीस नेणें सगळ्यांना जमेवच असें नाहीं.पण म्हणून परमेश्वराची कृपा संपादण्याचा त्यांचा मार्ग खुंटला असे होत नाहीं.आत्मोद्धारचा, मोक्षाचा अधिकार प्रत्येक मनुष्यास आहे. ब्रह्मावलोक धिषणम् असें भागवतकारही म्हणतात. अतः नामसंकीर्तनाचे सोपे सुलभ साधन सर्वांसाठी खुले केलें.नामजपाचे महत्त्व गीतेतही आहे की, यज्ञानां जपयज्ञोऽस्मि. त्याचा प्रचार केला, लोकांना पटवून दिले.तो अव्यक्त परमात्मा विठ्ठल रूपाने साकार प्रकट होऊन समोर ठाकला आहे त्याची भक्ती करा.न साहे सगुण अवघाचि निर्गुण। तो कृष्ण आपण गोपाळसंगे॥ निवृत्ति गयनी कृष्ण जप तो अमूप जाण। सांगितली खूण गोरक्षाने॥

सद्गुरुकृपेने जगातच नव्हे तर ब्रह्मांडातही द्वैत राहिले नाहीं.किंबहुना युक्तायुक्ताचे, भेदाभेदाचे, नाना मतामतांतराचे असें कसलेही बंधन त्यांच्या आशीर्वादामुळें राहिले नाहीं.कारण- निवृत्ति म्हणे आम्हा सद्गुरु उपदेशु। सर्वांभूती वासु हरि असे॥ म्हणूनच, निवृत्ति म्हणे गुरुबोध दिठी। भक्तिनाम पेटी उघडिली॥ सद्गुरुकृपेने आमचा आचार, विचार, नारायणाला समर्पित केला नि अंतर्बाह्य भगवद्रूप झाले, अहंभाव बाजूला सरून परमेश्वराचे दर्शन घडले, त्याचे कारण- निवृत्ति साधन गयनि प्रसाद। सर्व हा गोविंद सांगतसे॥

श्रीगहिनीनाथांचा उपदेश अद्वैतपर कसा होता हे सांगताना निवृत्तीनाथ म्हणतात, एक देव म्हणजे परमात्मा हा भाव अंतःकरणामध्यें दृढ करणे हेंच कल्याणाचे होय.द्वैत पाहिले तर अधोगती निश्चित समजावी.विश्वरुपदर्शनाप्रसंगी परमात्मा जसा विश्वात सबाह्य कोंदून राहिला, हें जसे अर्जुनास दाखविले, त्याच प्रकारचा दैवी अनुभव निवृत्तीनाथांना गुरुकृपेद्वारें मिळविता आला.
गयनीप्रसादे निवृत्ति बोधु। अवघासि गोविंदु अवघा रुपी॥.

सद्गुरु गैनीनाथांच्या कृपेने निवृत्तीनाथांची दृष्टी पूर्णपणे पालटून गेली किंवा त्यांना आता कृष्णपरमात्म्याशिवाय अन्य कुठलीही गोष्ट दिसेनाशी झाली.चंद्र अमावस्येनंतर जसा कलेकलेने वाढतो नि पंधरा दिवसांती पूर्ण दिसतो, ती पौर्णिमा पहावयास सोळा दिवस वाट पहावी लागते.परंतु हा कृष्णरूपी पूर्ण चंद्र आम्ही नित्य त्याच अवस्थेत पहातो.ही अध्यात्मातील भावोत्कटतेची परिसीमाच होय.आकाशातही पोकळी नसून सर्वत्र हरि भरून राहिला आहे, असें निवृत्तीनाथ आत्मस्वरूप झालें ते गैनीनाथांच्या वरदहस्तामुळें. निवृत्ति कोंदले सद्गुरु दिधले। हरिधन भले आम्हामाजी॥
पंढरपूरचा भगवान् श्रीविठ्ठल हे श्रीकृष्णाचे बालरूप असून तेथे तो जनांना भवसागरातून तारून नेणारा नि "मी" - "तू" पणाचे द्वैत मोडून अद्वैताचे बिंब जागवणारा आहे.त्या "विठ्ठलराजाचे" मर्म गयनीराजे मज सांगितले॥ असें निवृत्तीनाथ म्हणतात.
त्या कृष्णाच्या सगुण भक्तीबरोबर नामस्मरणाचे महात्म्य वर्णन करण्यासाठी निवृत्तीनाथांकडून अनेक अभंग रचिले गेले.भगवंताचे नामसंकीर्तन करणारा धन्य, शुद्ध असून त्याचे पापक्षालन होत्साता तो पुण्यवंत होऊन त्याचे भाग्य उदयास येऊन मोक्षाचाही अधिकारी होतो अशी अखंड फलश्रुतीच निवेदन केली आहे.नामस्मरणाला सगुण- निर्गुण अशा कुठल्याही प्रकारच्या स्वरूपाची आवश्यकता नसून सगळे काहीं भगवद्स्वरूपच आहे. निवृत्ति अव्यक्त रामनाम जपे। नित्यता पै सोपे रामनाम॥ हे रामनाम अगदी सोपे साधन आहे, म्हणूनच हे अव्यक्त रामनामातून परमात्म्याची प्राप्ती, कृपा निश्चित आहे असें प्रतिज्ञापूर्वक कथन करतात.म्हणून साधकास आणि सिद्धास नामस्मरणाचे साधन तितकेच कल्याणकारी होय. प्रकृत्ति निवृत्ति या दोन्ही सहज। जनी वनी काज करूनी असती॥ नारायण नाम जपताचि दोन्ही। एक तत्वी करणी सांगितसे गुज॥
नामस्मरण, कीर्तन लोकांत राहून अथवा एकांतात कुठेही केलें तरी जीवा-शिवाचे ऐक्य संभवते नव्हे होतेच.हा उपदेश संसारी तथा संन्यासी अशा दोघांनाही केला आहे.तो एकाच बळावर, ते म्हणजे - निवृत्ति म्हणे गुरुचरणसोये। तेणें मार्गें पाहे हरि सोपा॥

निवृत्तीनाथांवर गैनीनाथांद्वारें ज्ञानप्राप्ती नंतरची स्थिती भगवद्गीतेच्या भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः। ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्॥(१८:५५) अर्थात, भक्तीच्या जोरावर हा अहंभावाचा भेद न रहाता स्वस्वरुपाचे तात्विक ज्ञान होते आणि त्यायोगे तो वैराग्यसंपन्न पुरुष भगवद्स्वरूपांत लीन होतो. तिच सहजस्थिती निवृत्तीनाथांची झाली. निवृत्ति सर्वज्ञ गरूची धारणा। ब्रह्म सनातनामाजी मन॥
त्या गुरूरूपी द्वीपाच्या आधारेच नश्वर संसारातून तारून गेलो असें अत्यंत विनयाने म्हणतात.निवृतीनाथांनी त्यांच्या अभंग रचनेमध्यें सद्गुरु कृपेचा, आज्ञा शिरसावंद्य मानण्याचा, भक्तीचा, प्रत्येक ठिकाणी महिमा गायला आहे.नामसंकीर्तनाचे महत्त्व त्यांच्या रचनेतूश पहावयास मिळते नि तोच वारकरी सांप्रदायांचा पाया आहे हे त्रिवार सत्य आहे.निवृतीनाथांनी गीतेवरही भाष्य केलें आहे,पण.त्याविषयीं आज खात्री देता येत नाहीं.

अशी निवृत्तीनाथांची गुरुभक्ती अलौकिक होती.मुळात त्यांचा स्वभावपिंड वैराग्यसंपन्न होताच, त्यात गुरुकृपेचा वर्षाव! अमृतानुभवात श्रीज्ञानेश्वरमहाराज आपल्या दादागुरुचे वर्णन करताना म्हणतात, तैसें निवृत्तिपणासी कारण। हाचि आपणया आपण। घेयावया फूलचि झालें घ्राण। आपुली दृति॥ (२:७५) की, जसें फुलानेच आपल्या ठिकाणी असलेला सुगंध घेण्यास नाक व्हावें, त्याप्रमाणेंच गुरुनाथ श्रीनिवृत्तीनाथमहाराजांच्या ठायींच असणाऱ्या निवृत्तीपणास निवृत्तीनाथ स्वतः कारण आहेत!
या प्रकारची उपमा ना कुणी केली असेल ना त्या शब्दाला सार्थ करणारी व्यक्ती झाली असेल!! नाम निवृत्ति धन्य तो निवृत्ति। देह निवृत्ति पाहतां डोळा॥ असें श्रीएकनाथमहाराजांनी म्हणून ठेवले आहे.
अशा या वारकरी भागवतसांप्रदायाच्या थोरल्या सद्गुरुंनी, श्रीनिवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीस शके१२१९ मध्यें आपल्या दीक्षास्थली त्र्यंबकेश्वरी संजीवन समाधी घेतली. श्रीनामदेवमहाराजांनी चारही भावंडांच्या समाधी प्रकरणाचे साद्यंत वर्णन अभंगातून करून ठेवले आहे.ते वाचताना तो काळ, परिस्थिती, लोकांच्या आणि प्रत्यक्ष त्यांच्या भावना वाचताना भावनिक व्हायला होतं.ज्या कार्यासाठी परमेश्वराचे अंश भूतलावर अवतरले, ते अवतारकार्य यथोचित पार पाडून ही संत मंडळी कसलीही तक्रार न करता आनंदाने ब्रह्मलीन पावतात.
भगवान् आदिनाथापासून मच्छिंद्रनाथ - गोरखनाथ - गहिनीनाथ ते निवृत्तीनाथांपासून तुकाराममहाराज ते दासगणुबुवा ते अनेक फडकरी महाराजांपर्यंत ही दैदीप्यमान् परंपरा आपल्यापर्यंत विनासायास आली आहे.त्याचा आपण प्रत्यक्ष भाग असो वा नसो "पुंडलिक वरदा" म्हटल्यावर "हरिविठ्ठल" ज्याच्या मुखातून सहज येते, तो या परंपरेच्या नाळेने जोडला गेलाच होय.समाजाचा उत्कर्ष पैश्या-नाण्याने होतो, तो कुणी नाकारत नाहीं.पण त्यात संस्कारांचा स्पर्श नसेल तर सगळे असून नसल्यासारखेच! जीवनात ऐहिकते बरोबर पारमार्थिकजोड देणे हिच सकल संताची शिकवण आहे.

नामा म्हणे देवा निवृत्तिसारखा योगी।
नाहीं आतां जगीं दावावया॥

✍ अनिकेत घिवलीकर, मुंबई.


Comments

Anonymous said…
रामकृष्णहरी
Vinay said…
अप्रतिम आणि बोधप्रद वैचारिक लिखाण आहे!
Anonymous said…
अप्रतिम👌🙏🚩
Anonymous said…
Wahhh deva sundar 🙇🏻👏🏻
Anonymous said…
खूप छान
Vihang said…
अप्रतिम लेख !!
Anonymous said…
सुरेख
धन्यवाद
दादा खूपच सुंदर 👌👌
शेवटच्या दोन ओळी आत्ताच्या भौतिक सुखात गुंतलेल्या समाजासाठी अगदी चपखल आहेत. पण समाज आज ह्या तत्वज्ञानाकडे सोयीस्कर रित्या डोळेझाक करतो आहे ...असं मला वाटतं....
जय जय राम कृष्ण हरी.....

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १