शङ्करं लोकशङ्करम्


 श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयम् ।

नमामि भगवत्पादं  शङ्करं लोकशङ्करम् 

केरळ प्रांतात कालडी नामक खेड्यात पूर्णा नदीतटी सुमारे अडीच सहस्र वर्षांपूर्वी एका अद्भुत नि लोकोत्तर महापुरुषाचा जन्म झाला.प्रत्यक्ष भगवान् श्रीमहादेवाच्या आशीर्वादाने पिता शिवगुरु आणि माता आर्यांबा यांच्या उग्र तपश्चर्येचे फल अलौकिक बुद्धिमत्तेच्या बालरुपाने प्रकट झालें.त्या अवतारी महापुरुषाचा अल्प तथापि दिव्य जीवनपटाचे यथार्थ दर्शन करून देणारा श्लोक प्रसिद्ध आहे. अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद्। षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात्॥ की, वयाच्या आठ वर्षे पूर्ण होण्याआधीच चारही वेदांना आत्मसात केलें,बारा वर्षापर्यंत समस्त शास्त्र पारंगत, सोळाव्या वर्षापर्यंत भाष्ये लिहून हाता वेगळी केलीं आणि बत्तीसाव्या वर्षात पार्थिव देहाची यात्रेची इतिश्री केलीं.
अशी ज्यांची महानता वर्णली त्या पूज्यभगवद्पाद श्रीमच्छंकराचार्य स्वामी महाराज  यांचा वैशाख शु.पंचमी हा जन्मदिवस होय.

वैदिक सनातन धर्मात शिरलेल्या अनाचारास समूळ नष्ट करून सद्धर्माची ध्वजा भरतखंडभर दिमाख्यात फडकविण्याचे महान् कार्य श्रीआचार्यांनी यशस्वीपणे पार पाडले आणि व्यवस्थाही लावली.सांप्रदायिक मतमांतर, अहंकार, धर्मशिथीलतेची धुळ दूर करून आपल्या वाक् तथा कृतीने वैदिक धर्माची निर्भेळ भव्य परंपरेचे पुनरुत्थान केलें.वैदिक तत्त्वज्ञानाचा झालेला वा केलेंला विपर्यास, भग्न देवालये यावरची जळमटे काढून पुनर्निर्माण श्रीआचार्यांनी काहीं वर्षात करुन आश्चर्य वाटले असें कार्य केलें.सर्वसंगपरित्याग करून संन्यासाश्रम स्वीकारूनही श्रीआचार्य अथपासून इतिपर्यंत लोककल्याणार्थच झटले.संपूर्ण भारतवर्षाची तीनदा परिक्रमा करून भारतीयांची मने, सामाजिक, धार्मिक, राजकीय, कौटुंबिक परिस्थितीचा यथोचित आकलन श्रीआचार्यांना होते.ईश्वर- निरीश्वरवादाच्या कात्रित सापडलेल्या खऱ्या भाविक मनाची होत असलेली ओढाताण पाहून विद्वान आणि सामान्यांकरीता तत्त्वज्ञान आणि भक्तीचा मेळ कसा याचा विचार करून हिंदुस्थानास एकसंघ ठेवण्याची मोलाची कामगिरी केलीं.तत्त्वज्ञानाबरोबर मठस्थापना, शिष्यपरंपरा, ग्रंथलेखनातून देव आणि देशकार्य अविरत झालें पाहिजे,हाच श्रीआचार्यांच्या कार्याचा मुख्य उद्देश होता.तो झालाच.

अनादीकालापासून श्रुतिप्रतिपादीत अद्वैत तत्त्वज्ञानाचा विस्तार श्रीआचार्यांनी आपल्या भाष्यग्रंथातून समर्थपढे केला आणि पाखंडीमताचे खंडन करून केवलाद्वैत तत्त्वज्ञान लोकांसमोर मांडले नि पटवून दिलें. त्या तत्त्वज्ञानाचे सूत्र असे- श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः। ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवोब्रह्मैव नापरः॥ - अनेक ग्रंथातून जे ज्ञान थोर महात्म्यांनी सांगितले, ते मी (आचार्य) अर्ध्या श्लोकांत सांगतो की ब्रह्म हेच जगताचे अधिष्ठित सत्य आहे, जगात चाललेला व्यवहार हा अनित्य वा परिवर्तनशील आहे आणि जीव म्हणजे आत्मा हेच ब्रह्म होय.
या सूत्रात श्रीआचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा अर्क किंवा सार आहे असें म्हटले तर वावगे नाहीं.त्याचा विस्तार महाभाष्य, लघुभाष्य, प्रकरणग्रंथ आणि इतर रचनेतून पहावयास मिळतो.

श्रीशंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या वाङ्मयाचे वर्गीकरण करावयाचे झालें तर ते तीन विभागात करता येईल.
१} प्रस्थानत्रयी महाभाष्य २} प्रकरणग्रंथ लघुभाष्य ३} स्तोत्रवाङ्मय.
उत्तमाधिकरी साधकांसाठी ब्रह्मसूत्र, उपनिषदे आणि भगवद्गीता हे प्रस्थानत्रयी म्हटले जाणारे महाभाष्य वा टीकाग्रंथ.
यामध्यें परमात्म्याच्या तत्त्वाचा शोध आणि तत्त्वज्ञानाचा पाया महाभाष्याद्वारें घातला गेला.

मध्यमाधिकारी मुमुक्षूंकरीता विवेकचुडामणि, अपरोक्षानुभूती, प्रश्नमाला, उपदेशसाहस्री, शतश्लोकी, तत्त्वबोध इत्यादी प्रकरणग्रंथामध्यें शिष्यांनी श्रीआचार्यांना केलेल्या अनेक तात्विक प्रश्नांचा आणि मग विविध दृष्टांत, उदाहरण देऊन त्याचे केलेंले उत्तरात्मक निरसन पहायला मिळते.

आणि स्तोत्रवाङ्मयात तुमच्या आमच्यासारख्या सामान्य भाविकजनांना केवळ तत्त्वज्ञानाच्या अवघड मार्ग न दाखवता देवाच्या आराधनेसोबत अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली.

अध्यात्ममार्गात  ज्यांची बैठक स्थिर झाली अशांना भाष्ये, प्रकरणग्रंथाचे आकलन होण्यास काहीं सहजता आहे.ते विद्वानांचे क्षेत्र असेंही म्हणू शकता.परंतु महान् तत्त्वज्ञानाचा विषय तिथेच मर्यादित राहून उपयोगाचे नाहीं, ते सामान्य माणसांपर्यंतही पोहचविणे आवश्यक आहे.हे जाणूनच स्तोत्रांची रचना श्रीआचार्यांनी करताना ज्ञान आणि भक्तीची सौंदर्यपूर्वक मेळ घालून लोकोद्धार केला.कुठल्याही प्रकारे ते ज्ञानभांडार दडवून ठेवले नाहीं.केवळ अधिकार तैसा दावियेला मार्ग  ही मार्मिकता लक्षात ठेवून प्रसार केला.

संसाराच्या महासागरातून तरून मुक्त होण्यासाठी भगवत्प्राप्तीचे अनेक मार्ग आणि मग "हे" की "ते" या मोहात वा संभ्रमात सापडलेला नि आत्मोद्धरासाठी तळमळणाऱ्या भाविकजनांकरीता कर्म, ज्ञान, भक्ती, गृहस्थ, संन्यस्त, प्रवृत्ती, निवृत्ती, योग, याग, जप, तप अशा विविध मार्गांचा एके ठिकाणीच समन्वय साधून भाष्यतत्त्वज्ञान आणि भक्तीभाव याचा सुंदर मेळ प्रकरणग्रंथात आणि स्तोत्रवाङ्मयांत रचना करून श्रीआचार्यांनी भूतदया विस्तारय तारय संसारसागरतः।  हा आशय गुंफला.

श्रीशंकराचार्यांनी निर्वाणाष्टकामध्यें चिदानन्दरुपः शिवोऽहम् शिवोऽम्  अशी मोक्षापर्यंताची साधकाची अवस्था वर्णन करीत मायेपासून हा जीव अलिप्त असून सगळ्या लौकिक व्यवहारातून मुक्त होऊन परमात्म्य स्वरूपात लीन झाल्याची भावना व्यक्त करतात.
पण हे माया,ब्रह्म, मुक्ती, पंचमहा वाक्ये, त्याचे चिंतन, मनन, गुरुसानिध्यात अभ्यास, असे एक ना अनेक अवघड दार्शिनिक तत्त्वज्ञान सामान्यांना कुठे समजायचे! तथापि तेच ज्ञान श्रीआचार्यांनी स्तोत्रांच्या माध्यमातून भक्तीमार्गाने लोकांपर्यंत पोहचविले.कारण, मोक्षकारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयसि। स्वस्वरूपानुसंधानं भक्तिरित्याभिधीयते॥ - मोक्ष मिळविण्यासाठी भक्ती हे मुख्य साधन आहे,  स्वस्वरुपाचा साक्षात्कार म्हणजे जीव आणि शिवाचा मेळ याचेच नांव भक्तीवा जाणिव  असें होय.

श्रीआचार्यांनी लोकांची मानसिकता जाणून भक्ती मार्गानेच लोकांना चांगल्या मार्गावर आणून भावयुक्त साधनेने मोक्षापर्यंतची वाट मोकळी करता येईल किंवा सामान्यांना भगवंताची भक्ती अंतःकरणपूर्क करण्याची उर्मी जागृत करणे हे ध्यानात घेऊन आपली दिग्विजय यात्रा सुरु केली.
या दिग्विजययात्रेचे कारण सनातनधर्माच्या मूळस्वरुपांस पुन्हा उजाळ देऊन बौद्ध, जैन, सांख्य, वैय्याकरणी, चार्वाक, मीमांसक, कापालिक, इत्यादी विविध दर्शने नि त्यांच्या पंथापंथातले मोक्ष तथा ईश्वराविषयीं तत्त्वज्ञान कसे तोकडे आहे आणि त्याचा तात्विक चर्चेने बिमोड करून अशाश्वत जगात ब्रह्म हेच सत्य आहे  हा सिद्धांत प्रस्थापित करणे होतें.ते श्रीआचार्यांनी समर्थपणे केलें.
त्याच तत्त्वज्ञानाचा अर्क सगुणोपासना करत निर्गुणतत्त्वाचा बोध त्यांनी सहजरित्या स्तोत्रांच्या माध्यमातून प्रसारित करत गेलें."चर्पटपञ्जरीका" सारख्या अतिशय रसाळ रचनेत श्रीआचार्य म्हणतात भगवद्गीता किञ्चिदधीता गङ्गाजललवकणिका पीता। सकृदपि यस्यमुरारिसमर्चा तस्यायमः किं कुरूतेचर्चाम्। भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते॥
की, ज्याने भक्तियुक्त अंतःकरणाने थोडी जरी भगवद्गीता वाचली असेत, श्रद्धेने गंगाजळाचा एक थेंब जरी प्राशन केला, भावायुक्त होत्साता भगवंताचे एकदातरी पूजन केलें, त्यास यमराज तरी काय करू शकेल? म्हणून हे मूढ जना, गोविंदाचे भजन कर, स्मरण कर.अंती तोच तारणहार आहे.

खरेंच, आपल्यासारख्या सामान्यांना मोठ मोठे तत्त्वज्ञान काय करायचे! भगवंताच्या नामासारखी दिव्य वस्तु असताना कुठे सिद्धांतांच्या घनदाट अरण्यात जायचे!! नामस्मरणभक्तीची पायरी चढत चढत तो परमात्माच अज्ञानाचा पडदा दूर सारुन ज्ञानगंगेचा ओघ स्वहस्ते प्रदान करेल!!!
यास दुजोरा श्रीआचार्यांनीच विष्णुसहस्रनामभाष्याच्या सुरुवातीस  सच्चिदानन्दरुपाय कृष्णाययक्लिष्टकारिणे। नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे॥ अशा सच्चिदानंदरूप म्हणजे निर्गुण परमात्मा, त्याचे कृष्ण हे सगुणस्वरुप अक्लिष्ट आणि ज्ञानमुर्ती असून गुरुवरच होय, असें गुणसंकीर्तन केलें आहे.ते ज्ञान मोक्षदायीच होय.ज्ञानादेव मोक्षो भवति

श्रीआचार्य ज्ञानसूर्य, वैराग्यमार्तंड असूनही त्या प्रखर ज्ञानास भावनेचा ओलावा होता.लोकांचे दुःख निवारणासाठी आपले जीवन समर्पित केलें होते.
बटुशंकर एकदा भिक्षेकरीता गरीब ब्राह्मणाच्या दारी उभा रहातो.भिक्षेत घालावयास घरात एका आवळ्याव्यतिरीक्त अन्य काहीं नाहीं असे ती गृहिणी अत्यंत व्याकुळतेने म्हणते.बालशंकरास तिचे शुद्ध अंतःकरण पाहून दया येते नि तिथेच अंगणात उभे राहून महालक्ष्मीची प्रार्थना करतात. बालशंकराची परोपकार आणि दयापूर्ण भक्ती पाहून महालक्ष्मीने सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडला अशी कथा आहे.ती स्तुती आज कनकधारास्तोत्र  सर्वज्ञात आहे.भक्तांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रीआचार्यांनी अनेक देवदेवतांवर सुंदर स्तोत्रे रचिले. पाण्डुरङ्गाष्टकम्, कृष्णाष्टक, गणेशपञ्चरत्नम्, दक्षिणामूत्याष्टकम्, गङ्गाष्टकम्, नर्मदाष्टकम्, अन्नपूर्णास्तोत्र, कालभैरवाष्टकम्, अच्युताष्टकम्, अशा अनेक स्तोत्रांची रचना श्रीआचार्यांनी लोकांमध्यें भक्तीभाव निर्माण व्हावा म्हणूनच केलें.
नाहींतर ज्या महात्म्यने वेदान्त तत्त्वज्ञानाचे परमोच्च बिंदू आपल्या साधनेने प्राप्त केलें आहे त्यांना या स्तोत्रांची खरीच आवश्यकता होती? लोकहितास्तव ते लेखन झालेंच तथापि भगवंताच्या नामसंकीर्तनाचा मोह श्रीआचार्यांनाही सुटला नाहीं. ते म्हणतात, आब्रह्मस्तम्बपर्यंतं सर्वं मायामयंजगत्। सत्यं सत्यं पुनःसत्यं हरेर्नामैव केवलम्॥ हरिनामापुढे सगळे भासमान्, मायामय आहे.अशी भगवंताच्या नामाची श्रेष्ठ वर्णिली नसती.त्यांच्यापेक्षा ते आपल्याकरीताच अधिक उपयोगाचे म्हटले तर वावगे नाहीं ठरायचे!
आपले श्रीतुकाराम महाराज हेच म्हणतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव। मी भक्त तू देव ऐसे करी॥* पण अर्थातच ज्ञानाची वा ब्रह्मज्ञानाची आवश्यकता कुणीही नाकारली नाहीं.केवळ आपल्याला काय झेपेल हा मुद्दा लक्षात आला म्हणजे झालें.

श्रीशंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञान महाराष्ट्रीय संतपरंपरेने शिरोधार्य केलें.श्रीज्ञानेश्वर महाराजांपासून ते श्रीसमर्थ रामदासांपर्यंत समस्त संतकवींनी अद्वैत सिद्धांत आणि नामस्मरणभक्ती याचा सुरेख मिलाफ करून आचार्य तत्त्वज्ञानाला अनुरुप ज्ञान-कर्म- भक्तीची पताका फडकविण्याचे महत्कार्य केलें.कुणीही खंडनाच्या भानगडीत पडले नाहीतच, परंतु साधकांना संसारात राहून परमार्थची शिकवण दिली.
एकाजनार्दनीं पंचभूत आत्मा। सर्व परमात्मा नेणती ते॥ आणि न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदान्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्॥ यात श्रीनाथमहाराजांच्या आणि श्रीआचार्यांच्या तत्त्वज्ञानात काय भेद आहे? काहींच नाहीं.

वैदिकांमध्यें कुठलाही वाद नको म्हणून श्रीआचार्यांनी पंचायतन पूजेसारखा प्रयोग मांडला आणि तो संपूर्ण हिंदुस्थानात रूढही झाला. धर्माची घडी विस्कळीत न व्हावी म्हणून मठस्थापना करून त्या त्या क्षेत्रात लोकांना धार्मिक अध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबर सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे कार्य केलें.श्रीआचार्यांनी कर्मसंन्यास सांगितला होता.आश्रमसंन्यास नव्हे.कारण घरदार सोडून अध्यात्म करणें याला काहीं अर्थ नाहीं असें त्याचे मत होते.प्रश्नोत्तरमाला या प्रकरणग्रंथात ते स्पष्ट करतात की लौकिकाचा आधार घेऊन योग्य वेळी त्याचा त्याग करून परमार्थ साधावे.

सरते शेवटी पुन्हा भगवद्गीतेत श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनास सगळ्या विभूतीदर्शन घडवून म्हणतात, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन। तुला हा सगळा पसारा जाणून करायचे काय? त्याच धर्तीवर अद्वैततत्त्वज्ञानासारखे जड विषय घेऊन आपल्यासारख्यांना काय करायचे? त्यापेक्षा "भज गोविन्दं भज गोविन्दम्" ह्या सोप्या मार्गाने उपासना करून ते साध्य होणार आहे अशी श्रीआचार्यांच ग्वाही देताहेत!
 
अशा या महान् योगीराजाने संन्यासाश्रम स्वीकारून अथपासून इतिपर्यंत केवळ आणि केवळ लोककल्याणाचा विचार केला.मोक्षप्राप्तीचा अधिकार प्रत्येकाला आहे तो त्यांनी विविध मार्गांनी निवेदिला.ज्याची जशी प्रकृती त्याने तो पंथ धरून स्वहित करून घ्यावें हाच विचार त्यातून प्रकट होतो.
म्हणूनच समस्त भूतमात्रांचे कल्याण करणाऱ्या श्रीमद् शंकराचार्यांना शङ्करं लोकशङ्करम् असें म्हणतात.त्या पूज्यभगवद्पादांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. 

✍ अनिकेत घिवलीकर.
वैशाख शु पंचमी, श्रीशंकराचार्य जयंती. 


Comments

श्रीशंकराचार्यांचे महान आणि प्रचंड व्यापक कार्याची माहिती अतिशय अभ्यासपूर्वक केलेले लेखन... सुरेख च झाले आहे.👌.. वाचुन आनंद झाला 🚩
धन्यवाद🙏🏻🚩
Nehami pramane utaam ani aka thikani maharastratil sant vangmay ani achyaranche shikvan hyacha sundar milaf ghadawala ahes.
Asech uttam likhan hou det ...jai gurudev

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १