धन्य ते संसारी। दयावंत जे अंतरीं॥

 



"शांतिजलधि संत श्रीएकनाथ महाराज समाधी दिवस"
"नाथषष्ठी"
 श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी उपरांत काहीं काळात उत्तरेकडून मुसलमानी आक्रमकांचे तांडे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात आदळून बहमानी, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही वगैरे इस्लामी राज्ये धुडघूस घालू लागली.तलवारीच्या जोरावर हिंदूंवर चोहोबाजुंनी हल्ले चढवून क्रूरतेच्या टाचेखाली तूडवू लागली.देवालयांच्या धडाधड मशिदी होऊ लागल्या, शेती-वाड्यांची जाळपोळ, बायकां-मुलांवर अत्याचार, करत्या पुरुषांच्या कत्तली, बाटवाबाटवी, एकना अनेक अनन्वित छळ हा महाराष्ट्र नि देश सोसत होता.
त्या कालखंडात गोदावरीकाठी प्रतिष्ठान नामक संपन्न नगरीत शके १४५० इ.स.१५३२ च्या सुमारास श्रीभानुदासांचा नातू श्रीसुर्यनारायण नि त्यांच्या पत्नीस रुक्मिणीच्या पोटी श्रीएकनाथ जन्मले.

प्रतिष्ठान नगरी म्हणजेच पैठण.शककर्ता शालिवाहन अर्थात सातवाहनाची ही राजधानी. या नगरीचे वैभव ओळखून तीस दक्षिण काशी  म्हणून गौरविले जाई.सत्त्वशील ब्राह्मण संत घराण्यात नि संपन्न नगरीत जन्मलेले श्रीएकनाथ महाराजांची मूळची वृत्ती भगवद्भक्तमय असल्याने तीचे पोषणही त्याच प्रकारें झालें.पूर्व जन्माचे सुकृत नि बालपणापासून उपजत असामान्य लक्षणयुक्त नाथ विलक्षण बुद्धिमत्तेचे.मुंज होताच घरी येणाऱ्या पुराणीकबुवांकडून संस्कृताचे अध्ययन करीत स्नानसंध्यादी ब्रह्मकर्माचे नियमीत नि काटेकोर पालन करुन अंतर्भूत शुचीता पाळीत.या सगळ्याचे तेज त्याच्यातून फांकले जात नि थोरा मोठ्यांना त्याचे कौतुक मिश्रित अचंबा वाटे.
गुर्वानुग्रहावांचून जीवनाचे सार्थक नाहीं हे मर्म नाथांनी वयाच्या १२व्या वर्षी ओळखून एका जनार्दनीं शरण। गुरु एक जनार्दन॥ ही खूण जाणताच देवगिरीवर रहाणाऱ्या स्वामी जनार्दन महाराजांच्या पायी आपले सर्वस्व वाहिले.श्रीदत्तानुग्रहांकित श्रीजनार्दन स्वामींनी शरण आलेल्या नाथांचे इह-परलोकी कल्याण केलें. कल्पना उठोंचि न लाहे। निजसुख आहे गुरुचरणीं॥ ही नाथांची उक्ती ते आधी स्वतः जगले मग सांगितले.गुरुगृही पडेल ते काम, पण प्रेमाने, आनंदाने नाथ करीत.स्वामी सकाळी उठायच्या अगोदर आपण उठून- आवरून त्यांच्या सेवेस तत्पर रहाणें, स्नानाचे पाणी काढून ठेवणें, धोतराच्या निऱ्या करून हातात देणें, भोजन वाढणें, पंख्येने वारा घालणें, विडा करून देणे, वगैरे देवाच्या सेवेकऱ्यासारखे वावरणे यात नाथ निमग्न होत.

सहसा संतचरित्रांत इतरत्र न आढळढारा एक प्रसंग नाथांच्या चरित्रांत ठळकपणे दिसून येतो. तो असा, की एकदा जनार्दन स्वामी समाधीमग्न असताना देवगिरीवर परचक्राची अचानक धाड पडली. गुरुमहाराजांच्या साधनेत व्यत्यय येऊ नयें म्हणून स्वतः नाथांनी लढाईचा पोशाख चढवून घोड्यावर बसून तलवारीसकट बाहेर पडले.शत्रुचा पूर्ण बिमोड करून नाथ परत आले नि तो शस्त्रशज्जतेचा पोशाख उतरवून पुनः स्वामींच्या सेवेत समोर उभे राहिले. स्वामींना घडलेला प्रकार इतरांकडून मागाहून समजला नि लाडक्या शिष्याचा पराक्रम लक्षांत घेता धन्यता वाटली.
आपण केलेल्या गोष्टींची कुठल्याही प्रकारे वाच्यता न करता शिष्याने गुरुसन्मुख कसें असावें हे उदाहरण नाथांना समोर ठेवलें. आणि ज्या हाती जपाची माळ आहे त्याच हाती वेळ प्रसंगी खड्गही धरता येते हे कृतीतून सांगितले.

आपली तपश्चर्या आणि गुरुभक्तीच्या बळावर प्रत्यक्ष भगवान् श्रीदत्तात्रेयाने नाथांना केवळ दर्शन दिले नाहीं तर, "भागवतावर अपूर्व ग्रंथ लिहील" असा आशीर्वाद देऊन प्रेमपूर्वक आलिंगन दिले. हा योग म्हणजे आत्मा माझा देव दत्त। एका जनार्दनीं स्वस्थ असा  सबाह्य अंतरी  कृतकृत्य करणारा ठरला.याची आपण सामान्यजन काय कल्पना करणार!
श्रीदत्तानुग्रहानंतर जनार्दन स्वामींनी नाथांना भगवान् श्रीकृष्णाची उपासना करण्यास आज्ञा देऊन देवगिरीवरच अनुष्ठानास पाठविले.सगळ्या वृत्तींचा निरोध करून नाथांनी अभ्यास आरंभिला नि भगवद्गीतेत वर्णिल्याप्रमाणें नित्ययुक्ता उपासते असें होऊन तपश्चर्येचे गोमटे फल म्हणून की काय प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे सगुण दर्शन घडलें.
पुढें काहीं वर्षे तीर्थाटन करून नाथ २५व्या वर्षी स्वगृही आले नि सौ.गिरिजाबाईंसोबत गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला.नाथांचा गृहस्थाश्रम हा संतांमध्ये आदर्श संसार होय असें उदाहरण आजही कीर्तनातून गाईले जाते.

नाथांचे चरित्र इतके विस्तृत आहे की त्यातल्या प्रसंगाचा केवळ उल्लेख केला तरी लेखाला मर्यादा रहायची नाहीं.तरी सर्व सामान्यांना ठाऊन किंवा वरवर माहित असलेल्या दोन गोष्टी सांगाव्याशा वाटता.(अर्थात आताच्या पिढीला ते माहित असतील ही अपेक्षा नाहीं)
पहिला नाथांवर मुसलमान माणसाने थूंकणें नि दुसरा प्रसंग गंगेची कावड गाढवाच्या मुखी घालणें.
मजमाजी रंगली चित्तवृत्ती। या लागी विसरला गृहसक्ती॥
संतसज्जनांना त्रास देणाऱ्या व्यक्ती कुठल्याही काळात असणार. माध्यम बदलले तरी वृत्ती तीच असते.नाथांनाही छळणारी माणसे कमी नव्हती.पण ते त्याच्यावर न रागावता त्यांच्यातली नीच वृत्ती जिरवून टाकीत.पण त्यासाठी ती व्यक्ती नाथांसारखी थोर हवी.येड्या गबाळ्यांची ती कामं नव्हेत.तो यवन त्यांच्यावर थूंकला याचा राग येण्याऐवजी अनेक वेळा गोदास्नान घडले हे पुण्य नाथांनी घेतले.नाथांच्या या वागण्याचा काहीं मोठ्या व्यक्तींनी भिन्न अर्थ काढले.पण हा प्रसंग नाथांच्या वैयक्तिक पातळीवरचा आहे.पण समाजात यवन लोकं जो बुद्धिभेद करीत होते त्यावर त्यांनी खडे बोल सुनावले आहे.ते  हिंदूतुर्कसंवाद या प्रकरणात पहावयास मिळते.
भूतदयेची केवळ बडबड करणाऱ्यांपैकी नाथ नव्हते ते गाढवाच्या तोंडात गंगेचे पाणी घालण्याच्या प्रसंगावरून समजून येते. भगवद्गीतेतल्या समदर्शिनः चे जीवंत उदाहरण त्यांनी लोकांसमोर ठेवले.
द्रव्य संचय करणाऱ्या व्यापाऱ्याची अधोगती न पाहवत स्वतः त्यास विष्णुसहस्रनाम शिकवणे, दोनशें रुपये मिळावेत म्हणून ब्राह्मणाने त्यांना त्रास देऊनही त्यांचे शांत रहाणें, श्राद्धाचे अन्न आधी महारांना जेवू घालणें, वेश्येचा उद्धर, लोकांनी भगवंताचे नाम घ्यावे म्हणून कीर्तनानंतर मूठभर साखर वाटणे, असें कितीतरी गोष्टी नाथांनी केवळ आणि केवळ लोकांच्या कल्याणासाठी केलें.कीर्तन हे प्रबोधनाचे माध्यम होते.अठरा पगड जातीचे माणसं मिळून कीर्तनास येत.त्यात हरिकथा, नामस्मरण, उपदेश, सांसारीक तथा आध्यात्मिक गोष्टींबरोबर भारूड, रूपकांच्या साह्याने लोकोद्धार करावा हाच हेतु असे.

नाथांची ग्रंथ संपदा हा एक स्वतंत्र विषय आहे.श्रीगुरु जनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून नाथांनी "चतुःशलोकी भागवत" हा ग्रंथ प्रथम लिहिला. श्रीमद्भागवतावरच्या एकादश स्कंधावरची टीका म्हणजे एकनाथी भागवत, भावार्थ रामायण,रुक्मिणी स्वयंवर, हस्तामलकटीका,शुकाष्टकटीका, स्वात्मबोध, चिरंजीवपद, आनंदलहरी, अनुभवानंद, मुद्राविलास, लघुगीता अशी एकंदर ग्रंथसंभाराची ओवी संख्या ६५०००० पर्यंत जाते.त्याशिवाय अभंग, आरत्या, भारूड, रूपके, गौळणी इत्यादी रचना पांच सहस्राच्या वर होय.
नाथांनी त्यांच्या लेखणीद्वारें मराठी भाषेची केलेंली ही अपूर्व सेवा नि आपल्यावर उपकार ऋणाएवढ्या मोलाच्या आहेत.

श्रीनाथांचा आणि माऊली श्रीज्ञानोबांचा आत्मिक ऋणानुबंध काय असेल तो अवर्णनीय आहे.ज्ञानोबांनी नाथांना स्वप्नांत येऊन अजानवृक्षाची मुळी सोडविण्यास सांगणे,अशुद्ध झालेल्या ज्ञानदेवीची प्रत त्यांच्याकडून शुद्ध करवून घेणें, अहो स्वतः भगवंत ज्याच्या घरी श्रीखंड्या म्हणून पाणी भरे त्या श्रीएकनाथ महाराजाची कथा आपण सामान्यजन काय गाणार, काय त्या चरित्राचे अवलोकन करणार!
तरी महाराष्ट्रात आपण जन्मलो, या समस्त महापुण्यपुरुषांविषयीं आपल्याला आपुलकी आहे, त्यांच्या चरणांवर कुठलाही विचार न करता डोके ठेवण्याची बुद्धी त्यांच्या कृपेने प्राप्त झाली हे काय कमी आहे का!!
असो.श्रीतुकाराम महाराज आपल्या अभंगात संतांच्या कृपाळूपणाचे वर्णन करतात ते श्रीएकनाथ महाराजांसारख्यांना किती तंतोतंत लागू होते हे पाहून नाथांच्या समाधी दिवशी साष्टांग दंडवत घालून ह्या लेखप्रपंचाला विराम देतो.

धन्य ते संसारी । दयावंत जे अंतरी॥
येथें उपकारासाठीं। आलें गर ज्या वैकुंठीं॥
लटिकें वचन। नाहीं देंही उदासीन॥
मधुर वाणी ओठीं। तुका म्हणे वाव पोटीं॥

अनिकेत घिवलीकर. नाथषष्ठी.

Comments

Unknown said…
खूपच सुंदर लेख,
भानुदास एकनाथ
धन्यवाद 🚩

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १