श्रीशिवछत्रपती जयंती
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति । काय सांगणे तुम्हांप्रती।
परी धर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळली पाहीजे॥
-समर्थ रामदास.
हिंदूंमध्यें अलौकिक कार्य करणाऱ्यांना दैवी अवतार मानण्याची सात्विक प्रवृत्ती अगदी प्राचीन आहे.त्यात हिंदूंच्या निर्मल मानसिकतेचे दर्शन होतें.
सनातन धर्माची मरगळ दूर सारून त्यास पुनः चैतन्य प्रदान करण्याचे "या सम हाच" या न्यायानें कुठल्या दोन विभूतींनी महत कार्य केलें असेल तर तें पूज्य भगवद्पाद श्रीमदाद्यशंकराचार्य आणि छत्रपती श्रीशिवाजी महाराज होय.
तत्त्वज्ञानाच्या आणि तलवारीच्या जोरावर भारतावर शेकडो आक्रमणें झाली नि अजूनही होत आहेत.तथापि या तडयाखातून आपले 'सनातन' अस्तित्व हिंदू धर्माने टिकवलें आहे, जपले आहे.याचें श्रेय निःसंशय अडीच सहस्रवर्ष मागे जन्मलेलें श्रीशंकराचार्य आणि शके १५५१ मध्यें महाराष्ट्रांत जन्मलेलें श्रीशिवराय यांनाच जाते.
हिंदूंचे गाढ झोपी गेलेलं स्वत्व या दोन महापुरुषांनी जागृत केलें हा सूर्य प्रकाशाइतका स्वच्छ इतिहास आहे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम्॥
हें भगवंताचे वचन आणि अवतार धारण केल्यानंतर -
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
भगवद्गीतेचे हे श्लोक सार्थ करणारें ह्या दोन महान विभूती होय.
श्रूयते किल हिन्दूनां शास्त्रे कैश्चिदुदाहृतम्।
कल्की विष्ण्वताराणां दशमः संभविष्यति॥
छेत्स्यते तेन सर्वत्र व्याप्तं यावनमण्डलम्।
तस्यैव कल्किनस्तावदसावग्रे समागतः।
दूतो वै प्रतिभात्यस्मान्यतोऽस्मन्निधनोद्यतः॥
म्हणजे- हिंदूंच्या शास्त्रामध्यें ऐकीव गोष्ट कि,विष्णूचा दहावा अवतार कल्कि हा होणार आहे नि तो यवनांचा प्रचंड संहार करणार आहे. आणि जणु त्याच कल्कीचा पुढें येऊन ठेपलेला दूत आहे कीं काय असा भास व्हावा !
हें जयरामकवी कृत 'पर्णालपर्वतग्रहणाख्यान' यांत श्रीशिवप्रभुंचे वर्णन कुणाला अतिशयोक्तीचे वाटले तर वाटो, परंतु ज्या प्रकारचे कार्य महाराजांनी केलें त्यांस तंतोतंत लागू पडते.नव्हे, नव्हे ते तसेंच झालें. श्रीशिवाजीराजे झाले नसते तर हिंदुस्थानचे आणि पर्यायाने हिंदूंचे काय झाले असते याचे कवी भूषणाने चित्रण करून ठेवलें आहे हा थोरला पुरावा आहे - "अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी." स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही असेंच वर्णन केलें आहे.ते म्हणतात "नेती धर्म लयातें छळिती गो-द्विजवरां यवनकर ते । श्रीशंकर शिवरूपें धर्माचें जाहले अवन करते॥"
श्रीशंकराचार्यांची जयंती वैशाख शु.पंचमी आणि छत्रपती महाराजांची फाल्गुन वद्य तृतीय . पांच आणि तीन मिळून आठ. अष्टमी हि तिथी म्हणजे धर्मकारण आणि राजकारण धुरंधर भगवान् श्रीकृष्णाची जयंती हे आपण सगळे जाणतोच.योगायोग मानायचा कां हा! कारण भगवान् श्रीकृष्णाच्या मुखातून नवनीतासम प्रकट झालेंले तत्त्वज्ञान श्रीशंकराचार्यांनी धारण केलें.आणि त्याचे मुत्सदी राजकारण हे श्रीशिवाजीराजांनी आत्मसात केलें.
नि या सगळ्याचा परिपाक म्हणून की काय, स्वराष्ट्र- स्वधर्म- स्वभाषा याचे रक्षण या पुरुषश्रेष्ठांकडून झालें नसते तरच नवल!
अशा या हिंदुनृसिंह छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पावन चरणी जन्मतिथीनिमित्त शतशः दंडवत.
✍अनिकेत घिवलीकर.
Comments