श्रीतुकोबारायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन


     नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरींचीं ॥
    
वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्रातल्या भागवतधर्माचे एक अनुपम रूप होय. याची प्राचीनता श्रीज्ञानोबारायांच्याही मागे जाते.वारकऱ्यांचे मुख्य दैवत पंढरपूरस्थित श्रीविठ्ठल आणि सांप्रदायाचे अग्र उपासना साधन हें नामस्मरण होय.कलियुगांत परमेश्वरप्राप्तीसाठीं नामस्मरणासारखें अन्य प्रभावी साधन नाहीं हें सकलसंतमंडळींनीं अनुभवांती एकमतानें सांगितलेले आहे. भगवद्गीतेत स्वयं भगवान् याची ग्वाही देत म्हणतात - यज्ञानां जपयज्ञोऽस्मि (१०:२५) यज्ञामध्यें जप अर्थात नामस्मरण हें अध्यात्मातलें उच्चतम साधन आहे.
हरिपाठाचे अभंग हेही वारकऱ्यांच्या नित्य उपासनेतील एक महत्त्वाचा भाग.ते अभंग पहिल्यावर लक्षात येईल कीं त्याचा मुख्य विषय नामसंकीर्तन हाच आहे.लोकांना योगयागादी न झेपणारी साधनेपेक्षा नामसंकीर्तनाचा सोपा मार्ग दृष्टीस आणुन दिला.
महाभारतातल्या अनुशासन पर्वात येणाऱ्या श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे वैष्णवांचे आवडते स्तोत्र.या लेखामध्यें श्रीतुकोबारायांनी सहस्रनामाचे अभ्यासांती केलेंल्या अभंगांचा उहापोह करणार आहोत.


श्रीतुकोबारायांचे संक्षिप्त पूर्वचरित्र :
तुकोबांचे ८वें पूर्वज विश्वंभरबोवा यांच्यापासून मोरे कुळांत विठ्ठलोपासना चालत आलेलीं. ती परंपरा अक्षुण्णपणें तुकोबांकडे आली.जगद्धोधाराचे कार्य करून घ्याचे असले म्हणजे भगवंत विशेष योजना करतो असें अनेक संत आचार्यांच्या चरित्रावरून आपण पाहतो.इथेहि तसेंच घडावयाचे होतें नि म्हणून, शुद्धबीजां पोटी । फळ रसाळ गोमटी ॥ हा न्याय तंतोतंत लागू पडला तर नवल तें काय! शुचीनां श्रीमतांगेहे योगोभ्रष्टाऽभिजायते । (गीता ६:४१) या श्लोकाचे मूर्तिमंत उदाहरण तुकोबारायांच्या रूपानें आंबिले घराण्यात अवतरले.

कांहीं वर्षें सुखांत जाताच दैवाने विचित्र खेळ आरंभिला.एकामागून एक कोसळणाऱ्या आपत्तींने तुकोबांचा स्वभाव विरक्त माणसासारखा झाला.
संचिताचा ठेवा । आतां आला तैसा घ्यावा ॥
तुका म्हणे देवें । केलें आतां हें बरवें ॥
असें म्हणत दुःखांचे पर्वत लंघून भगवद्भक्ती दृढ करण्यास दैवाचा आघात शांतपणे सहन केला.

तुकोबांची साधना आणि अभ्यास:
त्यांची दिनचर्या आता पहाटे श्रीपांडुरंगाची पूजा करावीं नंतर भामनाथ,भंडारा अगर गोरडा यापैकी कुठल्यातरीं डोंगरावर जावें नि एकांतात सद्ग्रंथांचे वाचन मनानं चिंतन करावें,अखंड नामस्मरणांत दिवस सत्कारणी लावावा आणि सायंकाळी देवळात कीर्तनादी प्रवचनात दंग होऊन जावें अशी झालीं. विठ्ठलाशिवाय त्यांना अन्य विचार नसें.
तुकोबांनी श्रीज्ञानेश्वरी, नाथभागवत, नामदेवारायांचे अभंग, कबीरांचे दोहे,हरिपाठ यांसारखें प्राकृत ग्रंथ तसेंच गीता, मूळ भागवत, भर्तृहरीची नीती व वैराग्य शतके,पुराणें, तसेंच दर्शन शास्त्रे हिही "धोंडाळिलीं".(हा शब्द तुकोबांचाच होय)
एकांतात चाललेल्या या अभ्यासानें तुकोबांनी अत्यंत प्रीतीनें त्याचें पठण केलें नि ते करता अन्वयार्थ लावताना त्यांना कुठेहीं श्रम झालें नाहींत. श्रवणभक्ती बरोबर वाचनभक्तीही महत्वाची हें यातून दिसून येतें.
तुकोबांच्या साधनेला आता सुरुवात झालेलीं.या काळांत तुकोबांनी काय केलें याचे दर्शन एका अभंगात आलें आहे. सज्जनांनी केलेंल्या आग्रहास्तव तो लिहिला आहे. याती शूद्र वैश्य केला वेवसाय । आदि तो हा देव कुळपूज्य ॥ {हा अभंग २० चरणांचा आहे.विस्तारभयास्तव येथें उद्धृत करणें टाळतो.आशय खालील प्रमाणें}
या आत्मचरित्रपर अभंगांत तुकोबा आपली जात,कुळ,धंदा, कुळपरंपरा,मग आपतींची मालिका, घरच्या देवालयाचा जीर्णोद्धार,अभ्यास, संसाराचा वीट, हरिदासाच्या मागे ध्रुवपद धरणें,एकादशी व्रत,स्वप्न दृष्टांतात रामकृष्णहरि मंत्रदीक्षा ,कवित्व, लोकांची निंदा,गाथा बुडविणें, इत्यादी कथाभाग थोडक्यांत लिहिले आह.
संसाराच्या तापत्रयानें पोळून भागवद्भक्तीची ओढ लागली तरीं त्यात सातत्य,अलोट श्रद्धा , निष्ठा, नियमित साधना आवश्यक असत्ये. तुकोबांना साधनेसाठीं मार्ग शोधण्याची आवश्यकताच भासली नाहीं.लहानपणापासून ज्या वारकरी संप्रदायाचे बाळकडू मिळत गेलें नि त्यातच गोडी असल्यानें परमार्थ साधनेला पूरक होती. तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सापडला ॥
नामस्मरणांत अखंड तल्लीन असून तुकोबांनी कांहीं सद्ग्रंथांचे अध्ययन केलें हें त्यांच्या आत्मचरित्रपर अभंगातून स्पष्ट होते. "कांहीं पाठ केलीं संतांची उत्तरें । विश्वास आदरें करुनिया ॥" , "केलीं आटाआटी । अक्षरांची देवासाठी ॥", "शिकल्या शब्दाचे व्युत्पादितो ज्ञान॥" इत्यादी.

येथें मला एक गोष्ट आवर्जून सांगावयाची आहे कीं, तुकोबाराय लोकोत्तर महापुरुष होतें ह्यांविषयी यःकिंचित दुमत नाहीं. तेव्हां काहीं लोकांच्या मनांत त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेपाई असें येईल, तुकोबांना ग्रंथ अभ्यासिण्याची ती काय आवश्यकता, ते प्रत्यक्ष भगवंतच होतें. अगदी मान्य. तथापि ह्याचे पहिलें उत्तर तुकोबांनीच लिहिलेल्या आत्मचरित्रपर अभंगातून मिळते.(याती शूद्र - हा अभंग मूळातून पाहावा) आणि दुसरें भगवान् श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना 'थोर लोकांनी सतत कार्यप्रवीण राहावें म्हणजे त्याच सन्मार्गानें आणि विश्वासानें इतर लोक तसें वर्तन करून कर्मयोग साधतात' असें वचन आहे-  यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ (गीता ३:२१)
या गीताश्लोकाचा भावार्थ तुकोबांनी नेमका जाणलेला होता यात शंका राहत नाहीं.
आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ॥ ह्या अभंगात तुकोबांच्या उद्देशाचे चित्र स्पष्ट होते.


श्रीगुरुकृपा आणि कवित्वस्फुर्ती :
तुकोबांच्या साधकस्थिती पूर्णत्वास जाऊन देह मन बुद्धी शुद्धातिशुध्द होऊन भगवद्भेटीची आस लागली. गुरुकृपेशिवाय मुमुक्षाला तो करीत असलेल्या साधनेला शिक्का बसत नाहीं आणि तो भाग्य क्षण तुकोबांच्या आयुष्यांत येऊन सद्गुरु श्रीबाबाजी चैतन्य यांनी स्वप्न दृष्टांत देऊन मंत्र दीक्षा दिली.
बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्णहरि ॥
माहो शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥

आणि यानंतर तुकोबांना कवित्वस्फुर्तीने अभंगरचना करण्यास अंतःकरणांत इच्छा जागृत झाली. तेहीं नामदेव महाराज पांडुरंगासह स्वप्नांत येऊन आज्ञा देते झालें.
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥

यानंतर तुकोबांची स्थिती माझी मज झाली अनावर वाचा । अशी होऊन मुखातून जवळपास पंधरा वर्षें सहस्रावधी अभंगांचे गंगौघ अविरत वाहत राहिला. काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥ अशीं अपौरुषेय स्थिती प्राप्त होऊन सकळजनांच्या उद्धाराकरिता प्रासादिक वचने लिहिते जाहलें.

संतांच्या कांहीं अभंगांचा,पदांचा नेमका भावार्थ समजणे ही कठीण बाब आहे कारण, संत ज्या आत्मानुभूतीच्या शिखरावरून अभंगादी ग्रंथांची रचना करते झालें त्या पदाला सामान्य माणूस कसा जाऊ शकेल!
तथापि थोरा मोठ्यांनी गाथेचा सखोल अभ्यास चिंतन करून जो अर्थ आपल्या समोर आणून अमोल ठेवा दिला ,त्याचीच कास धरून मी पुढचे लिखाण नम्रतेने नि भक्तिभावपूर्वक मांडण्याचे धारिष्ट करतो.  


श्रीविष्णुसहस्रनामाचा अभ्यास :

भागवतधर्मात महाभारतांतर्गत विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे अनन्य साधारण महत्व आहे. पुराणांपासून संतचरित्रात नि आतापर्यंत शेकडो भाविकांनी त्याच्या दिव्यत्त्वाचा अनुभव घेतला आहे. हे स्तोत्र म्हणजे भगवंताचे नामसंकीर्तनच आहे. गीतेमध्यें भगवंत यत्नशील,दृढव्रती सतत नामगान करणारा अनन्य भक्त मला प्रिय आहे असें म्हणतात. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः। (९:१४)
तेच पालुपद धरुन तुकोबांनी निष्ठेने नामस्मरण चावलिलें होते.आणि भगवंतच जेथें साक्षीस्वरुप आहे तेव्हा, नाम घेतां वाया गेला। ऐसा कोणें आईकिला॥ हें यथार्थच म्हटलें.

श्रीभगवद्गीता, विष्णुसहस्रनाम स्तोत्र तुकोबांच्या नित्य पाठाचा विषय होता. आणि त्यानुषंगाने कांहीं अभंगरचना झाल्या.या सहस्रनाम स्तोत्राची तुकोबांनी एक लक्ष परायणे केलीं आणि त्यांच्या जावयाला विष्णुसहस्रनामाची हस्तलिखीत प्रत हुंडा म्हणून दिली अशा दोन सांप्रदायिक कथा आहेत.
परमेश्वराचे गुणऐश्वर्यादी प्रकट करणारी सहस्रनामावळी एकाच ठिकाणी मिळून भगवद्भक्ताचे त्याकडे ध्यान न जाईल तरच नवल! तुकोबांनी त्याचा अत्यंत प्रेमानें नि सूक्ष्म अभ्यास केला.

आता आपण मूळ विषयाकडे येऊ.ज्या अभंगात सहस्रनामाचा प्रत्यक्ष उल्लेख आला असें ९ अभंग सापडले आहेत.वानगीदाखल १०-१२ इतर अभंग स्वतंत्ररित्या ओझरते पाहू.
सहस्रनामाचे अभंग मुद्दाम संपूर्ण देत आहे आणि भावार्थ निवेदन करून, त्या अभंगात सहस्रनामाचे कोणतें महत्त्व सांगितले याविषयीं चिंतन करू. 

अभंग १}
न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटी । जाय तेथें दाटी । वैष्णवांचीं ॥
भाविक गे माये भोळें गुणाचें । आवडे तयाचें नाम घेतां तयासी ॥
जो नातुडे कवणेपरी । तपें दानें व्रतें थोरी । म्हणतां वाचे हरी । राम कृष्णा गोविंदा ॥
चौदा भुवनें जया पोटीं । तो राहे भक्तांचिये कंठीं । करुनियां साटी । चित्त प्रेम दोहोंची ॥
जया रूप ना आकार । धरी नाना अवतार । घेतलीं हजार । नांवें ठेवूनि आपणां ॥
ऐसा भक्तांचा ऋणि । पाहतां आगमीं पुराणीं । नाहीं तुका म्हणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥

भावार्थ - देवाचे नि भक्ताचे नाते कसें असते ते ह्या अभंगातून दर्शनास येतें.जेथें भगवंताचे नामघोष सुरु असतो तेव्हा देव वैकुंठातही राहत नाहीं, तो त्या भाविनकांच्या सान्निध्यांत असतो.व्रत,दानादी कुठल्याही उपचारांची तिथे अवश्यकता नसून भक्ताचा शुद्ध भाव आणि देवाचे अलोट प्रेम याची घेवाण देवाण होते. भक्तोत्तम प्रल्हादासाठी भगवंत नृसिंहाच्या रूपात प्रत्यक्ष प्रकट झाला.त्याचे कारण प्रल्हादाने करुणेने केलेलें नामस्मरण हेच होय.भोळ्या भाविकाला कठीण तप, मोठमोठाली दानें,खडतर व्रत अशा कर्मकांडाची कसरत करणें शक्य असेलच असें नाहीं, मग त्यानें करावें तरी काय, तर मुक्त कांठानें भगवंताचे सतत नाम! भक्तीमार्ग सोपा म्हणतात पण "अनन्य" भक्ती असेल तर. मग योगक्षेमं वहाम्यहम्। हे भगवंत त्याचे हें ब्रीद पूर्ण केल्याशिवाय रहात नाहीं, असेंच पुराणकथा किंवा संतांच्या चरित्रात दिसतें. आणि एका परमेश्वराशिवाय दुसरें कांहीं विचार ज्याच्या मनांत नाहींत मग तो देव वैकुंठात लक्ष्मी,गरुड,शेष या त्रिपुटी जवळ तरीं कां राहील,तो सदैव "जेथें जातो तेथें तू माझा संगती!" अशीच प्रचिती यावयाची.          
तुकोबा सहस्रनामाचा उल्लेख करून म्हणतात जो अव्यक्त आहे,त्या परमात्म्याने भक्तांसाठी विविध अवतार धारण करून सहस्र नामें ठेवून घेतलीं. म्हणजेच त्याच्या रूपाचे गुणांचे प्रकटीकरण झाले.
असा हा देव भक्तांचाच ऋणी झाला! तो वेदादिपुराणांत न सापडता वैष्णवांच्या कीर्तनांत नक्कीच सापडतो.  


अभंग २}
भक्तिसुखें जे मातले । ते कळिकाळा शूर झाले ॥
हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥
महादोषां आला त्रास । जन्ममरणां केला नास ॥
सहस्रनामाची आरोळी । एक एकाहून बळी ॥
नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यांवांचून ॥
तुका म्हणे त्यांच्या घरीं । मोक्ष-सिद्धी या कामारी ॥

भावार्थ - हा अभंग वाचला कीं शूर वीरांचा पोवाडा असतो, तसें "शूर भक्तांचे" पद अशी भाव येतो.
भक्तीच्या मागे गेले म्हणजे निष्क्रिय झालें अशी बोंब कांहीं जण उठवतात. त्यांच्यासाठी हा अभंग चपखल उत्तर आहे. अवश्यक तिथे भक्तमंडळींनी त्यांची वीरवृत्तीही दाखवली आहे. "मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास" म्हणणारे तुकोबा "नाठाळाच्या माथा हाणू काठी" हि सुद्धा शिकवण देतात.
१९४४च्या जून मध्यें मुंबई सरकारने पंढरपूर यात्रेस बंदी घातलेलीं.ती स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अन्य हिंदू संघटनांनी मिळून मोडून काढली आणि आषाढ वारी निर्विघ्न झाली,याची आठवण होते.वैयक्तिक आस्था तसेंच सामाजिक स्वास्थ्य ह्या दोन्ही एकाच वेळी जपायची म्हटली कीं सद्कृपा होते. हा "कळिकाळ शूर झाले" मधून भावार्थ निघाला तर नवल नाहीं.
पुराणांत अश्या अनेक कथा आपण पाहतो,कि भगवंताने भक्तांना सर्व संकटातून पार केलें नि कोट कल्याण केलें.पण त्या मागे भक्ताची अलोट निष्ठा खूप महत्वाची आहेच.मीराबाईच्या चरित्रातला विषप्रयोगाचा प्रसंग आठवतो. त्या साध्वी मीराबाईंनी विष प्राशन करूनही "जन्ममरणां केला नास" हें आपण जाणतो. कृष्णभक्तीमध्यें इतक्या तादात्म्य पावल्या कीं भौतिकाचा काहींच परिणाम झाला नाहीं. भक्तीची शक्ती ती हीच!
तुकोबा येथें विष्णुसहस्रनामाचा उल्लेख करताना "आरोळी" ह्या शब्दाची योजना शक्तिवर्धक मात्रे सारखा करून, भगवंताचे नामघोष करणारें एकाहून एक बलवान् आहेत अशी ग्वाही देतात. 
असें नामांत दंग झालेंले विष्णुदास देवाशिवाय कुणाचीही परवा करीत नसून मोक्ष आणि अष्टसिद्धींनाही घरच्या दासी झाल्या.


अभंग ३}
आमचा तूं ऋणी ठायींचाचि देव । मागावया ठेवा आलों दारा ॥
वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥
बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं । आतूनिं बाहेरी येओं नेदी ॥
तुज मज सरी होईल या विचारें । जळो भांडखोरें निलाजरीं ॥
भांडवल माझें मिरविसी जनीं । सहस्रवोवणी नाममाळा ॥
तुका म्हणे आम्हीं केली जीवेंसाठी । तुम्हां आम्हां तुटी । घालूं आतां ॥

भावार्थ - देवानें आता अधिक चेष्टा करू नयें आणि भक्तीचा ठेवा जो तुझ्यापाशी आहे तेंच मागण्यासाठीं दाराशी आलो आहोत. नामरूपी वर्म साधकाच्या नेमके हातीं लागलें आहे.देवाच्या दाराशी धरणें धरून बसलो आहे असें वचन मुद्दाम घातले आहे,कारण देवाला आत कोंडल्यानंतर त्याची आणि भक्ताची केव्हांही ताटातूट न व्हावीं. एखाद्याला कठीण गोष्ट साध्य झाली कि इतरांना त्याचा मत्सर वाटतो.म्हणून "जळो भांडखोर निलाजरी" असें म्हटलें.
देवा,नाम चिंतन हा भक्तांचा विषय आहे,पण तू तो जागत मिरवतोस! ही सहस्रनामाची माळ हें माझे "भांडवल" आहे!!
सहस्रनामात भगवंताचे एक नाम महाधनः (४३४) असें आहे. ज्या अर्थी तुकोबा भांडवल म्हणताहेत ते परमेश्वराच्या असीम ऐश्वर्य असें धन होय. हे ऐश्वर्य सद्गुणांचे, पराक्रमाचे, भूतदयेचे असें आहे.
बरें, मी तुझ्यासाठी जीव वाहिला सर्वस्व दिलें, आतातरी अधिक अंत न पाहता आपल्यातली उणीव काढून टाका, असें तुकोबा देवाला विनवीत आहेत.
ह्या अभंगाला चाळवाचाळवीचे अभंग म्हणतात. कि देवाने भक्ताची पदोपदी परीक्षा पाहून अगदी थकविले आहे. लावुनियां सवे । पळतां दिसाल बरवे॥ म्हणजे आम्हाला सवय लावून आता पळ काढणें तुम्हाला शोभेल कां असा एका अभंगात प्रश्न करतात.  
इथे तुकोबा विष्णुसहस्रनामाला भांडवल असें म्हणून माझा म्हणजे भक्तांच्या अधिकारात येणारी गोष्ट आहे असें सांगतात.        


अभांग ४}
व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा ॥
एका नामा नाहीं ताळा । केली सहस्रांची माळा ॥
पाहों जातां ठायीं । खेळसील लपंडाई ॥
तुका म्हणे चार । बहू करितोसी फार ॥

भावार्थ - या अभंगात तुकोबा देवांशी जोरदार बोलणें करीत आहेत. कीं, तुझ्या शब्द तू पाळत नाहींस,तुझा व्यवहार खोटा आहे,ह्यापुढें तुझ्या वाट्याला येणार नाहीं! तुझी नामें तरी किती! एकावर तुझे भागले नाहीं म्हणून सहस्रनामांची माळ गुंफली!! आणि मग एके ठिकाणी तुला पाहावें तर तू लपंडाव मांडला आहेस. तुकोबा शेवटी म्हणतात देव फार (चार) चेष्टा चालविल्यास तू. आता दर्शनाची उत्कंठा अधिक ताणू नयें.
सद्भक्त आणि देवाचे नाते आणि त्यांचा संवाद,भांडण आपल्या बुद्धी पालीकडची गोष्ट आहे खरी. साधकाच्या आयुष्यात असा क्षण येतो कीं इतर कुणाशीही तो बोलू शकत नाहीं,आणि देवशिवाय अन्य समाधान कोणी करूही शकत नाहीं. अश्या अवस्थेतला हा अभंग असायची शक्यता आहे.
आपल्या प्रिय जनांशी यथेच्छ भांडून परत त्याच्याशीच प्रेमानें बोलावें असेच भगवंत - भक्ताचे प्रेमळ नाते असते. 

अभंग ५}
कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥
पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥
शेवटचें दान । भागा आला नारायण ॥
तुका म्हणे पोट । भरलें वारला बोभाट ॥

भावार्थ - हें पीक कुठल्या धान्याचे व शाकाचे नाहीं तर "नामाचे" आहे. भंगवंताची षोडशोपचाराने पूजा होऊन मस्तकावर रत्नजडित मुकुट चढविला आणि मग सहस्रनामाने त्याची नामपूजा केलीं. त्याचे फळ शेवटी पदरी पडले ते त्याच्या कृपेचे.सगळ्या कार्याचा भाग संपवून तुकोबांचे आनंदाने पोट भरले असें म्हणतात ते परमेश्वरानें त्यांच्यावर केलेल्या अनुग्रहामुळें.
अनेक वर्षें साधना केल्या नंतर तुकोबांना देवांचा अनुग्रह झाला. केलेंल्या तपश्चर्येचे फळ मिळाले असा हा आत्मानंदाचा परमोच्य अनुभव तुकोबांनी ह्या सांकेतिकरित्या चरणातून व्यक्त करून सहस्रनामाच्या पठणाचा लाभ काय झाला ते सांगताहेत.


अभंग ६}
माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें ॥
सहस्रनामाचें रुपडें । भक्तकैवारी चोखडें ॥
साक्षीविण बोलें । तरी मज पाहिजे दंडिलें ॥
तुका म्हणे माल । माझा खरा हो विठ्ठल ॥

भावार्थ - देवा तू भक्तकैवारी असून सहस्रनाम धारण करणारे तुझे रूप अत्यंत मोहक आहे, ती तुझे जुने नामच मी मागत आहे,नवें कांहींही नाहीं.आणि हे आधाराशिवाय बोलणें नाहीं आणि असें असेल तर तो दंडनीय अपराध आहे.तुकोबा म्हणतात माझा खरा ऐवज हा विठ्ठल आहे,त्याच्या शिवाय अन्य मला छंद नाहीं असा ह्या अभंगाचा आशय आहे.
यामध्यें "नाहीं करावीत नवें" आणि "साक्षीविण बोलें" हि विशेष शब्दयोजना सहस्रनामच्या प्रास्ताविक श्लोकांची आठवण करून देणारी आहे जी युधिष्ठिरांनी पितामह भीष्मांना केलेंल्या प्रश्नांचे उत्तर दिलेल्या श्लोकांत आहे- यानि नामानि गौणनि विख्यातानि महात्मनः । ऋषिभिः परिगीतानि तानि वाक्ष्यामि भूताये ॥
हि सहस्रनामें वेदांपासून निरनिराळ्या प्रसंगी महान ऋषींनी गायिली गेलीं आहेत,ती कल्याण साधण्यासाठीं मी (भीष्म) सांगत आहे.
तुकोबांनी या अभंगात या भीष्मोवाचाचे ११ श्कोलांचा अर्कच मांडला आहे असा मला भास होतो.आणि अर्थातच तुकोबांनी सुरुवातीपासून देवाचे गोड नाम घेतच होतें असाही आशय आहे.

शेवटच्या चरणांचा गर्भितार्थ तुकोबांना स्वप्नदृष्टांतात सद्गुरूंनी मंत्र दिला तोही तुकोबा आधीच प्रिय असलेला "रामकृष्णाहरि" हा. आवडीचा मंत्र सांगितला सोपा। ह्यांत सामावलेलें आहे असें दिसते. 


अभंग ७}
हेंचि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध ।
आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥
सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा मेळा ।
पदर लागों नेदी खळा । नाममंत्र माळा विष्णुसहस्र ॥
भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान ।
तरीच घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥
नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा ।
बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥
पासी तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी ।
होईल घुसळीलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥
न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा ।
होसील आधीं होतासी तैसा । तुका म्हणे दशा भोगीं वैराग्य ॥

भावार्थ- जन्म-मृत्यु,व्याधी मद मत्सरादी षड्रिपू यां भवरोगांचा समूळ नायनाट होईल असें एकमेव औषध आहे ते म्हणजे सहा शास्त्र, चारही वेद नि अठरा पुराणांत वर्णिलेल्या परब्रह्माचें नाम.तोच पंढरीचा सावळा परब्रह्म पांडुरंग.
एका विष्णुसहस्रनामाच्या जपाव्यतिरिक्त कुठलाही अन्य छंदाचा स्पर्शही न होवो. औषधाचा गुण यावयाचा असेंल तर तशी पथ्येही सांभाळी पाहिजेत.तसें नामस्मरणाचे आहे. एक तत्व नाम दृढ धरीं मना। -ज्ञानोबा.
"नये निघों आपुलिया घरा" ह्या चरणांत साधना करणाऱ्यां मुमुक्षानें बाहेरच्या जगांत विनाकराण बडबड करण्यात वेळ काढून तो वाया घालवू नयें असें मार्गदर्शक केलें आहे.त्यानें अहंकार बळावेल असेंही सुचवले आहे.आपल्याजवळचे सद्विचार,ज्ञान द्यावें. ते लोणी सारखें मृदु सार आहे बाकी ताक टाकून द्यावे.
या चरणांत मला तुकोबांनी आपल्या जावयाला हुंड्याच्या रूपात  विष्णुसहस्रनामाची प्रत देऊन संसारात राहून परमार्थ साधन करावें हा उपदेश दिल्याचा भास होतो.की, जगात व्यवहार करा,पण निमित्तमात्र राहून त्यात गुंतवून न घेता अंती पुढच्या दिशेने जायचे आहे हे ध्यानां ठेवा, असं सुचित करताहेत.
तुकोबा म्हणतात अनुताप वा प्रायश्चित्तपूर्वक आशेचा त्याग करून वैराग्यवृत्ती अंगी बाणून पूर्वी होतास तसा पुनः होशील, म्हणजे मूळ ब्रह्ममय होशील.

या अभंगात औषध,मंत्र,भोजन, अन्न हे शब्द योजून सहस्रनामातलें भगवंताची नामेंच गुंफली आहेत.


अभंग ८}
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥
नासिवंत आटी प्रियापुत्रधन  । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥
नाव धड करा सहस्र नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥
तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥  

भावार्थ - नश्वराच्या मागे न पळता शाश्वत सत् - चित् - आनंदाची कास धरूनच परमानंद पदास पोहोचतील अन्यथा नाहीं.असें म्हणत तुकोबा परमेश्वराचे नाम सदा मुखांत धारण करा,जेणें जन्म मरणाच्या फेऱ्यातून  कायमची सुटका होईल.आप्त-संसारांत राहून त्यातच गुरफटून हाती दुःखाशिवाय कांहींही येणार नाहीं.याचा तुकोबांना पुरेपूर अनुभव आला होता. यास्तव विष्णुसहस्रनामचे पठण कर,पक्के करून त्या नामरूपी होडीत बसून या भावसागरास पार करून जन्माचे सार्थक होईल.आणि मग अगदी काळ जरी समोर आला तरी त्याला थोपविण्याचे सामर्थ्य हरीनामरुपी रामबाणांत नक्कीच आहे.

आत्मविश्वास आणि आत्मानुभूतीशिवाय असें अधिकारवाणीने सांगणें हें संतांचेच कार्य.यात अतिशयोक्तीचा प्रश्नच नाहीं कारण आपण किती निष्ठेने आणि श्रद्धेनें  अनुष्ठान करतो,हा मुद्दा महत्वाचा.तुकोबांनी याचा प्रत्यय स्वतःच्या आचरणातून दाखवून दिला,तो त्यांनी कथन केला.कां?तर माझ्या प्रमाणें इतरांचाही उद्धार व्हावा.आणि तस असंख्या जीवांनी करून जन्माचे सार्थक करूनही घेतलें.
श्रीज्ञानेश्वरीमध्यें अश्याच प्रकारची ओवी आहे-
नामाचेया सहस्रवारी । नावा इया अवधारी । साजूनियां संसारी ॥ तारुं जाहलो ॥ {ज्ञा १२:९०}


अभंग ९}
धरिल्या देहाचे सार्थक करिन । आनंदे भरेन तिन्ही लोक ॥           
लावीन निशान जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या ॥
नामाचिया नौका करी सहस्रवरी । नावाडा श्रीहरि पांडुरंग ॥
भाविका हो येथें धारा रे आवांका । म्हणे दास तुका शुद्धयाति ॥

भावार्थ - देवाच्या नामसंकीर्तनाने काय करूं शकतो या आशयाचा अभंग तुकोबा देतात. अनेक योनीतून फिरून मनुष्य देह प्राप्त झाला,त्याचा सत्कारणी उपयोग झाला नाहीं तर काय मिळविले! उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् । (गीता ६:५) हें जरी खरें असले तरी संतांचे जीवन मनुष्यदेह ऐसा निघ । साधिले तें साधे सिद्ध । करुनि प्रबोध । संत पार उतरले ॥ असें जनसेवेसाठी वाहून घेतलेलें असते. पण केव्हां? स्वतः पूर्ण साधना केल्यानंतर. आणि मग सर्वत्र आनंदाशिवाय अन्य देण्यासारखे कांहीं शिल्लकच नसतें,केवळ- तुका म्हणे आतां। उरलो उपकारा पुरता।
तुकोबा जेथे गेलें तेथें लोकांना सन्मार्गाचे, श्रद्धेचे नि भक्तीचे रोपटे लावले.याचे कारण "जाया वैकुंठा". कथा-कीर्तन-नामगजर ह्याने लोकांना एकत्र आणले.जणू मोठ्या पेठा उभारल्या.
तुकोबा सदेह वैकुंठाला जायला निघालें तेंव्हा पत्नी जिजाईंना बरोबर येण्यास सांगितलें,त्यांनी नकार देऊन तुकोबांनी जिजाईस १२ अभंगात पूर्णबोध केला. त्याचे कारणच असें कीं,तुकोबांनी फक्त बाहेरच्या लोकांचाच नव्हे तर घरच्यांचाही तितकाच विचार केला.
भवसागरातून तारुन नेण्यास स्वयं भगवंतच नावाडी आहे,तेव्हां सहस्रवेळा नामाचा घोष म्हणजेच विष्णुच्या सहस्रनामाचा जप करून त्याचीच नौका बांधायला हवी.
अहो,भाविक जन हो, ह्या गोष्टी तुमच्या आवाक्यातल्या (आवांका) आहेत,मुखी नाम घेता कुठले सायास करावें लागते? म्हणून ते नाम चित्ती घट्ट धरून ठेवा.
या अभंगात एक निराळेपण आहे.९९टक्के अभंगात तुकोबा आपला उल्लेख "तुका म्हणे" असा करतात.माझ्या पहण्यात कांहीं तुरळकच अभंग आले कीं ज्यामध्यें "दास तुका" असा नाम निर्देश केला आहे. आणि पुढें "शुद्धयाती" म्हणजे शुद्ध,निर्मळ अंतःकरण जातीचा. याती म्हणजे जात.पण इथे याती किंवा जाती हा शब्द "विशिष्ट प्रकारचा" किंवा "तऱ्हेचा" या अर्थी योजिला आहे. अर्थात नामस्मरणामुळें देह आणि चित्त अंतर्बाह्य कोमल झाल्याचाही निर्देश करता येईल.लोकांनी निर्मळ शुद्ध व्हावें अशी तुकोबांची वाणी आहे.

हे ९ अभंग सोडून तुकोबांनी विष्णुसहस्रनामावळी सदृष्य अभंग यांतून तुकोबांनी आपल्या आराध्याचे,श्रीविठ्ठलाचे नाम घालून कांहीं रचना केल्या आहेत.आणि शेवटच्या चरणांत भगवंताच्या कृपेची अभिलाषा व्यक्त करून भोळ्या भक्तांना या "विराट" रूपाचे कोडे उमजणार नाहीं म्हणून सगुणांत येण्याची विनवणी प्रकट करतात.

श्रीअनंता मधुसूदन । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥
वासुदेवा दीनानाथा । कमललोचना श्रीअच्युता । निजभक्तांसि सौख्यदाता । तुजविण सर्वथा असे चिना ॥
क्षीराब्धिवासा शेषशयना । लीळाविग्रहा गोपिकारमणा । सगुणस्वरूपा भक्तभूषणा । गुणनिधाना गुप्तरुपा ॥
या पद्धतीचे अनेक अभंग आहेत.

विष्णुसहस्रनामाच्या कांहीं नामावरूनही अभंग रचना केल्याचे आढळते ,ते नमुन्यादाखल पाहू -
१} विश्वं विष्णुं (ना.क्र १,२) - विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ॥
२} वेदविद् (१२८) - वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा । येरांनी वाहवा भार माथा ॥
३} वैद्य (१६४) - वैद्य एक पंढरीराव । अंतर्भाव तो जाणे ॥
४} चक्रगदाधर (५४६) - घेऊनिया चक्रगदा । हाचि धंदा करितो । भक्ता राखे पायापाशी - "रक्षणः" (९२८) । दुर्जनांसी संहारी ॥ -"दण्ड" (८५९)
५} भक्तवत्सल (७३६) - भक्तीप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये॥
६} धर्मो धर्मविदुत्तमः (४०३,४०४) - धर्माचि तू मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥
७} सुप्रसाद (२३६) - पाहें प्रसादाची वाट । द्यावें धुवोनियां ताट ॥
८} अमृतांशोऽमृतवपुः (८१४) - जीवाचे जीवन । अमृताची तनु । ब्रह्मांडभूषण । नारायण ॥
९} जन्ममृत्युजरातिगः (९६६) - जन्ममरणाची कायसी चिंता । तुझ्या शरणागता पंढरीराया ॥
१०} भयकृत् भयनाशनः - (८३३-३४) - भय होतें आम्हीपणे । पाठी येणें घातलें । ... समर्थाचें नाम घेता । मग चिंता काशाची ॥

असो.तुकोबांनी विष्णुसहस्रनामाचे केवळ परायणें वा जप केलें नाहींत तर प्रत्येक नामावर सखोल चिंतन केलें हें अभंगांच्या भावार्थावरूनही समजून येते.पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । असा "सुघोष" करुन भवसिंधू पार करण्यासाठी नि आत्मोन्नतीचा हा सोपा उपाय तुकोबांनी आचरला आणि  जडमुढांनाही आत्मकल्याण व्हावें म्हणून सहज परंतु अनन्यभावाने त्याच मार्गावरून जायची प्रेरणा दिली.
                  तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस॥
जवळजवळ चारशें वर्षाहून अधिक काळ लोटला.तुकोबांनी दिलेल्या या अविट ब्रह्मरसाचे सेवन मुमुक्षुजन करीत आहेत.अजूनही त्याची गोडी किञ्चितही कमी झालीं नाहीं,ना कधीं होणार.ती अधिकाधिक वृद्धींगत होत आहे. कारण ते साधेसुधे साहित्य नव्हें, तर अक्षयवाङ्मय आहे. त्याद्वारें अनेकांचे जीवन परमानंदात तल्लीन होत कृतार्थ केलीं.
विष्णुसहस्रनामाची महती तुकोबा इतक्यासहज सुंदरतेने सांगतात नि त्यायोगे नामस्मरणाच्या साधनेनें काय होऊ शकते ह्याची ग्वाही देताना म्हणतात  - बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥, जी सूज्ञ आणि अज्ञांच्या हृदयांत जाऊन भिडते. ह्याहून थोरला दुजोरा तो आणखी काय असावयाचा?

                 भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम् ।
आता माझे शब्द संपले नि विचार करण्याची शक्तीसुद्धा.तुकोबा किंवा नामाविषयीं लिहिण्याची माझी योग्यता नाहीं हें मी जाणतो.तुकोबांचे केवळ अभंगच समर्थ आहेत, तिथे माझ्या गबाळ्या शब्दांचे मोल नाहीं.तथापि सहस्रनाम हा विषय माझ्या श्रद्धेचा असल्यानें अल्प धाडस केलें. या लेखात तुकोबांच्या सहस्रनाम चिंतनाचे व त्यायोगे नामसंकीर्तनाचा लाभ आपल्याला घेता आला असला तरीं,दहा पंधरा अभंगांची उदाहरणं देणे म्हणजे सागरातील एक थेंब होय.गाथेचे अभ्यासक मंडळी खूप आहेत,ते ह्या मध्यें अधिक मोलाची भर घालू शकतील याची खात्री आहे.तथापि तुकोबारायांच्या कृपेनें थोडी फार सेवा करण्याची बुद्धी होऊन हा लेख सादर- सभक्ती सद्गुरुंना समर्पण करतो.

               तुझ्या शरणागत । जन्मोजन्मीचा अंकित ॥
           आणीक कांहीं नेणें देवा । तुझ्या वाचूंनि केशवा ॥
                 हेंचि माझें गाणे । तुझें नामसंकीर्तन ॥
            तुझ्या नामाची भूषणें । तुका म्हणे ल्यालो लेणे ॥

अनिकेत घिवलीकर,मुंबई. श्रीतुकारामबीज.

[या लेखातला काहीं भाग दिनांक २० मार्च २०२२ रोजी मुंबई तरूण भारत वृत्तपत्रात छापून आलेला]



Comments

Vinay said…
धन्यवाद अनिकेतजी. श्री तुकाराम बीजेनामित्त सुंदर निरूपणाचा लाभ झाला !!!
धन्यवाद🙏🏻😊
Wa aniket khup chhan abhyas ...bhakipurna ani rasal
🙏🏼 सखोल अभ्यास आणि चिंतन! दाद द्यावी तितकी कमीच

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १