जियें मार्गींचा कापाडी। महेशु आझुनी॥
आपल्या महान् हिंदुधर्म संस्कृतीमध्यें काहीं अपवाद वगळता बहुतांशी सण, उत्सव, व्रतादींची सुरुवात सूर्योदयापसून होते.भगवान् श्रीकृष्णाचा अवतारच मुळी मध्यरात्री झाल्यानें देवाचा जन्मोत्सव त्याचवेळी करण्यास दुसरा प्रत्यवाय नाहीं.परंतु शैव आणि शाक्त परंपरेत साधनेसाठी रात्रीचा काल प्रशस्त मानला आहे.दिवाळीसारख्या सणाला दिव्यांचे महत्त्व असल्याने संध्याकाळी व्रतानुसार संध्याकाळी पुजा होते.पण अशी उदाहरणे मोजकीच.तथापि उपासनेच्या दृष्टीने प्रदोषकाळी केल्या जाणाऱ्या शिवाराधनेला नि अश्विन नवरात्रोत्सवाची महती त्या त्या सांप्रदायांत अनन्यसाधारण आहे.
नवरात्रांमध्यें रात्री जागरण करून देवीची आराधना करणे हे उपवासाबरोबरचे महत्त्वाचे अंग.तिच कथा माघातल्या महाशिवरात्र या व्रताची.
मी जाणीवपूर्वक "व्रत" असा उल्लेख करीत आहे.कारण काहीं व्रतांची हल्ली सरसकट उत्सवात गणती केलीं जाते ती अगदी अयोग होय.
महाशिवरात्रीच्या व्रताचा प्रारंभ त्रयोदशीस एकभुक्त राहून होतो.चतुर्दशीला संकल्पादी करून संध्याकाळी व्रताची प्रथम पुजा केली जाते.नि रात्रीच्या चारही प्रहरात भगवान् श्रीशंकराची निरनिराळ्या मंत्राने, विशिष्ट नामाने अर्चन होते.
इतर सण वा उत्सव आणि नवरात्र किंवा महाशिवरात्रात यात मुख्य भेद आहे तो असा की, हा काळ साधकांना वैयक्तिक उपासनेसाठी मुद्दाम राखून ठेवला आहे.या काळात रात्रीच्या समयी विशिष्ट स्पंदन लहरी निर्माण होऊन मानवाच्या आत्मिक उन्नतीसाठी अत्यंत उपकार आहेत.म्हणूनच आपल्या थोर ऋषींनी, पूर्वजांनी योजनाबद्ध हा कालनिर्णय ठरविला आहे.
शिवाची वा शक्तीची उपासना जरी सगुणाला समोर ठेवून असली तरी त्याची आंतरीक उंची परतत्त्वाकडे झेपावणारी आहे. सगळे जग निजलेले असते तेव्हा खरा साधक, उपासक जगृत राहून त्याचे कार्य करतो.मग ते कार्य जगाच्या कल्याणासाठी अर्थात समष्टीसाठी असो वा भगवद्कृपेकरीता म्हणजेच व्यष्टीसाठी असो. पण भोगी ते त्यागी असा हा प्रवास होय.
भगवान् म्हणतात या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी। (गीता २:६९)
यांत गर्भितार्थ पुष्कळ असून तुर्तास आपण रात्री जागणारा ज्ञानी त्याची उपासना करण्यात मग्न असतो, एवढा घ्यावा.तो ज्ञानी पुरुष कोण किंवा जो अखंड ब्रह्मतत्त्वाच्या चिंतनात निमग्न असो कोण, तर स्वयमेव भगवान् श्रीमहादेव शंकर.परंतु तोही या अगम्य गुढ आणि अनंत परतत्त्वाच्या शोधार्थ सदा ध्यानांत राहिला आहे असें श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेथ प्रवृत्तितरूच्या बुडी। दिसती निवृत्तिफळाचिया कोडी। जिये मार्गींचा कापाडी। महेशु आझुनी॥ (ज्ञा॰६:१५३)
की, प्रवृत्तीच्या मार्गरूप वृक्षाच्या तळाशी असें म्हणून निवृत्तीमार्गाचे अनंत फल आहे, नि भगवान् श्रीमहेश या मार्गाचा यात्रेकरू असून साधनेत दंग आहे!
असा हा महाशिवरात्रीचा महापर्वकाल प्रवृत्तीमार्गी म्हणजेच संसारी जनांना अंशतः निवृत्तीमार्गाची निदान तोंड ओळख करून देणारे व्रत आहे, असें माझें वैयक्तिक मत होय.
अमड्ग़ल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलम्। तथापि स्मर्तृणां वरद परमं मड्ग़लमसि॥
भवसागरातली नश्वरता, अमंगलत्व, जरा, व्याधी, दुःख, नैराश्य, अशा एकना अनेक अशाश्वत बाह्यांगाचा पसारा पाहून, सहन करून मन व्यथित होते.हाहि तुझ्या लीलेचाच भाग आहे हे सुद्धा ठाऊक आहे. पण त्या पलिकडे तुझे "सत् चित् आनंदमय" रुप वा अरुप जे काहीं आहे, त्याची ओढ लागावी.ती लागून वृद्धींगत व्हावीं हिच प्रार्थना!
✍ अनिकेत घिवलीकर.
Comments
उत्कृषटरित्या शब्दांकन..
अनिकेत👌🙏