सोपान आनंदें समाधि बैसला
त्याच चालीवर मला म्हणावेसे वाटते, दुर्लभं भारते जन्म महाराष्ट्रेऽतिदुर्लभम्।. की, महाराष्ट्रात जन्माला येणे त्याहून दुस्तर होय.यामध्यें रव्याच्या कणाएवढाही प्रांतवाद नसून नितांत अभिमानची आणि माझ्या पूर्वसुकृताची जोड आहे. आपण कुठे, कुणाच्या पोटी, कसल्या परिस्थितीत जन्माला यावे हे काहीं आपल्या हाती नाहीं.पण जिथे आलो त्या समाजाचे ऋण आपल्या शिरावर आहे नि अंशतः ते फेडायचेही आहे याची जाणीव महत्त्वाची.अशा या संतांनी, सत्पुरुषांनी पावन केलेल्या महाराष्ट्रात आपण जन्माला यावे हा बहुमान मिळण्यासारखे होय! असो.
किती अपूर्व गोष्ट आहे आपण कल्पना करा, एकाच घराण्यात पाठोपाठ ही चार भावंडे प्रकटावी आणि सगळ्यांनी मानवाच्या कल्याणाचा राजमार्ग दाखवून अल्पावधीत आपले नियत कार्य करून संजीवन समाधी घेत समस्तास धन्य करीत राहिल्या त्या कीर्ती जगामाजीं। असें म्हणत लौकिकार्थाने जगताचा निरोप घ्यावा! श्रीनिवृत्तीनाथादी भावंडांचे चरित्र पाहिलें कीं खरोखरी हीं "पूर्वनियोजित कथा असून तिचे नाट्य या भूतलावर खेळले गेलें" असेंच वाटते.वडिल श्रीविठ्ठलपंतांचे तीव्र वैराग्यवृत्तीमुळें संसार नि गृहत्याग करणें, गुरु रामानंदस्वामींची दीक्षा घेणें, स्वामींचे अवचित आळंदीस येऊन विठ्ठलपंतांचे लग्न झाल्याचे समजताच त्यांनी पुन्हा पंतांना गृहस्थाश्रमाचा स्वीकार करण्याची आज्ञा देणें, संसार पूर्ववत होऊन चार मुलांचा जन्म. "गृहस्थ संन्यासी" म्हणून संपूर्ण कुटुंबाला जातीबहिष्कृत करणें, ब्रह्मवृदांची आज्ञा शिरसावंद्य मानून मुलांना देवाच्या स्वाधीन करत प्रयाग येथें देहत्याग करणे. पुढे त्या लहान मुलांची झालेली वाताहत, त्या स्थितीत पैठणक्षेत्री जाऊन अलौकिक चमत्कार दाखवणे, तरी निंदा- छळ सोशित मनुष्याला हितोपदेश करून गीताभाष्यादी ग्रंथ रचून भगवद्रुप होणें; ही काहीं सामान्य गोष्ट नव्हेच.ते तसेंच होणार होतें आणि समाजाच्या कल्याणाचे होतें म्हणून ह्या घटना घडल्या.
शुचीनां श्रीमतांगेहे योगभ्रष्टोऽभिजायते॥ या गीतावचनाप्रमाणें शुद्धाचरणी अशा (ज्ञानसंपन्न) श्रीमंतांच्या घराण्यात योगभ्रष्ट (पूर्व जन्मी योग साधना केलेला) पुरुषाचा जन्म होतो. हा शुद्धात्मा लोककल्याणाकरीता अवतार धारण करतो ते अगदी खरे. निवृत्तीनाथादी भावंडांचा जन्म हा असाच जगावर परोपकार करण्यासाठीच झालेला.पैकी श्रीसोपानदेवांचा जन्म कार्तिक पौर्णिमेचा. विठ्ठलपंत आणि रखमाबाईंनी प्रायश्चितास्तव मुलाबाळांसह त्र्यंबककेश्वरी ब्रह्मगिरी डोंगराला प्रदक्षिणा घालीत असताना एकाएकी समोर वाघ आला नि सगळ्यांची पांगापांग झाली. निवृत्तीनाथ पळता पळता एका गुंफेत शिरले आणि तिथे योगेश्वर श्रीगहिनीनाथांचे दर्शन होऊन त्यांनी त्यांच्यावर अनुग्रह केला.आठ दिवस गहिनीनाथांनी योगसाधना करवून श्रीकृष्णाची उपासना आणि नामस्मरणाचा प्रसार करण्याची आज्ञा दिली.निवृत्तीनाथपरत येताच त्यांनी ज्ञानोबा, सोपानकाका आणि मुक्ताईंनाही दीक्षा दिली. सोपनकाका म्हणतात, तेजाकार दिशा बिंबी बिंब एक। निवृत्तीने चोख दाखविलें॥ सगळीकडे अद्वैताचे तेज पसरले असून बिंब आणि प्रतिबिंब अर्थात जीव आणि शिव एकच आहे, ते निवृत्तीदातारांनी नेमके दाखविले.असें गुरूच्या महतीचे वर्णन केलें आहे. गुरुमहिमेचे जवळपास तीस अभंग सोपनकाकांनी रचले आहेत.त्यात निवृत्तीनाथ दादाचे गुरुत्व लाभल्याने परब्रह्माचे गूढ तत्त्व आम्हाला दाखवून अद्वैताच्या अविष्काराचा साक्षात्कार झाला नि ही कुडी धन्य पावली, योगमार्गाचा दीक्षा आणि विठ्ठल नामाचा छंद आम्हांस देऊन त्या ज्ञानाच्या प्रकाशाने तृप्त केलें, असें उद्गार त्यांनी काढले आहेत.
सातशें-आठशें वर्षांपूर्वी वेदशास्त्रमर्यादा ही बाब किती प्रखर होती याची कल्पना आज आपण करूही शकत नाहीं आणि असेंही नाहीं ती आज अजिबात नाहीं.पण काळपरत्वे त्याची दाहकता कमी- अधिक असेल.या भावंडांवर जे जे कठीण प्रसंग ओढवले त्यासाठी त्यांनी केव्हांही वेदांचा, स्मृती-शास्त्रांचा, ब्राह्मण्याचा उपमर्द केला नाहीं.अपमानास्पद शब्द काढलें नाहींत.एक साधी गोष्ट आहे, जो महापुरुष रेड्याकरवी वेद वदवू शकतो, तो एका दृष्टीक्षेपाने दृष्ट प्रवृत्ती लोकांच्या मनातून त्यांच्याविषयी हीन भावना नाहीशी करु शकत नव्हते? खचितच होय.परंतु जेथें स्वयं भगवंताने रणभूमीवर असतानाही युद्ध रोखून कालचक्रात अडथळा आणला नाहीं, तद्वत ज्ञानरायांदी भावंडांच्या जें काहीं वाट्याला आले ते त्यांनी शांतपणे आनंदने भोगले.
लौकिकासाठी काहीं उपयोग नसले तरी "लोकसंस्था" (हा शब्द ज्ञानेश्वरीत आला असून समाज या अर्थाने आहे) जपण्याकरीता मुंजीच्या अधिकारासाठी पैठणला जाऊन आपला वृत्तांत "होता तैसा स्पष्ट निवेदिला". संन्याश्यांच्या मुलांची मुंज करण्यास शास्त्राधार नाहीं असें सांगून पैठणकर ब्राह्मणांनी निर्णय दिला की, श्रीहरीशीं जाऊनि शरण। सर्वांभूतीं करावें भजन। गोखरगजादि श्वान। समसमान वंदावे॥ (भक्तविजय) जी गोष्ट चारही भावंडे मनोमन मागित होते ती आपसुक मिळाली! तुम्ही चारही भावंडांनी सदा नारायणाचे नामचिंतन करून सर्वांभूती भगवद्भाव ठेवून ब्राह्मणांपासून प्राणीमात्र ते चांडालापर्यंत समबुद्धीने वंदावे.जे आधीच हरिनामात तल्लीन झालेले आणि निवृत्तावस्थेत जगणारे त्यांना हा निर्णय नसून तपश्चर्येवर उपदेशरूपी वज्रलेप झाल्यासारखे होते.
ऐकोनी निवृत्ती संतोषला चित्तीं। धन्य तुमचे वदती तीर्थरूप।
ज्ञानदेव म्हणे सांगल ते मान्य। मुक्ताई सोपान आनंदलीं॥
पैठण दिग्विजय करून ही भावंडे आळंदीत आली आणि जवळच्या सिद्धबेटावर मुक्काम पडला.दरम्यान त्याआधी ज्ञानोबांनी "भावार्थदीपिका" हे भगवद्गीतेवर अनुपम भाष्य लिहिले ज्याला आपण "ज्ञानेश्वरी" म्हणून ओळखतो त्याची निर्मिती झालेली.त्यांची कीर्तीही आळंदीकरांच्या कनावर गेलेली नि लोकांचा त्याबद्दल पूज्य भावही मनात होता.पण काहीं कर्मठांच्या डोक्यातून "ही संन्याशांची मुलं" हे खूळ गेलें नव्हते.त्यातले एक होते विसोबा चाटी.या लेकरांचा पदोपदी अपमान करणें, घालून पाडून बोलणें हा नित्याचा त्रास ते देत.
एकदा दिवाळीच्या सणाला निवृत्तीनाथांनी मुक्ताईस मांडे खायला करून घालण्यास सांगितले.ते करण्याकरीता मुक्ताई कुंभारवाड्यात खापर आणण्यास निघाली तो समोर विसोबा आले नि तिस कुणीही खापर देता कामानये असा कुंभारांना दम भरला.मुक्ताई रडत परत येता ज्ञानोबांनी कारण विचारले आणि योगसामर्थ्याने जठराग्नि प्रज्वलित केला नि मुक्ताईला आपल्या पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले.ज्ञानोबांची पाठ अत्यंत तप्त झालेली आणि मुखावाटे ज्वाळा नि डोळे आरक्त झालेले. हा सगळा अलौकिक चमत्कार विसोबांनी चोरट्या नजरेने पाहिला आणि त्यांचे डोळे खाडकन् उघडले.या भावंडांचे अचाट सामर्थ्य पाहून आपण किती कुज्या मनोवृत्तीचे आहोत याची जाणीव होऊन ते ज्ञानेश्वरांना शरण आले.तेव्हा ज्ञानोबांनी सोपानकाकांना विसोबांना उपदेश देण्यासाठी सांगून गुरुपद दिले.
सोपानकाकांनी विसोबांवर वरदहस्त ठेवून इह-परलोकी कल्याण केलें.त्या विसोबा चाटींची मति पूर्ण पालटून विसोबा खेचर म्हणून नव्याने जन्म झाला.द्वैताचे पाश सोपानदेवांकरवी मोडून अद्वैताचा सच्चिदानंद भोगित संत पदाएवढी त्यांची योग्यता झाली.हेच विसोबा पुढें नामदेवरायांचे गुरु झाले.नामयाचा गुरु। तो हा सोपान सद्गुरु॥
श्रीगुरु निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना भगवद्गीताभाष्य सांगण्याची कृपा होऊन ज्ञानदेवी प्रकटली, तसेंच त्यांनी सोपानकाकांना कृपाळू होऊन गीतेवरच ओवीबद्ध समश्लोकी स्वरूपात ग्रंथ रचण्यास सांगितला तो सोपानदेवी म्हणून प्रख्यात आहे.हा ग्रंथ आकाराने लघु असला तरी रसाळ, कमीत कमी शब्दरचना तरी तत्त्वज्ञानाने परिपूर्ण आहे.गीतेच्या सातशें श्लोकांवर सातशे एकोणचाळीस ओव्या सोपानदेवीत आहेत.अर्जुनास भगवंताने विश्वरुपदर्शन घडवल्यानंतर श्रीकृष्णाच्या तोंडीच्या ओव्या पहा- *हें माझें दुर्लभ रूप। तुंवा देखिले स्वरूप। हो(हे) पाहावया करिती तप। सर्व देव॥ वेद यज्ञ तप दान करुन। हे रुपा कोणा न दिसे जाण। तुंवा पाहोनी जालें ज्ञान। आणिक पाहावया कोणी शक्य नव्हे॥ मज पावणें जाणणें देखणें। ते साधारण भक्तीचे गुणे। ऐसें मज तत्त्वता जाणणें। तो भक्त माझा अर्जुना॥ मी उत्कर्ष ऐसें मनी धरी। निर्वैर सर्व भूता माझारी। मजकारणें जो कर्म करी। तो मज पावे पांडवा॥
या ओव्यांमध्यें भक्तीने दुर्लभ असें परमेश्वराचे दर्शन आणि कर्मसंन्यासवृत्तीने कर्म करुन भगवद्प्राप्ती असा आशय वर्तवता.
त्याच प्रकारे सोपानकाकांनी अनेक अभंग रचना केल्या.हरिपाठाचे अभंग, काही आरत्या, पदं असें नामस्मरण, तत्त्वज्ञान, भक्ती, ज्ञान, आत्मस्थिती, पंढरी महात्म्य, गुरुमहिमा, अध्यात्मिक अनुभूती असे अनेक सुंदर अभंग रचना निर्माण करून परमार्थक्षेत्रात तथा मराठी सारस्वतात अजोड रत्नाची भर घातली.ते सगळे अभंग सोपानदेव गाथा म्हणून प्रसिद्ध आहे.नाथ परंपरेत दीक्षित असून सोपानकाकांची योग साधना उच्च कोटीची होती.तरी गुर्वाज्ञेने भक्तपंथाची पताका खांड्यावर घेऊन सामान्यजनांसाठी नामस्मरण, कीर्तनाचा सुलभ मार्ग बंधु ज्ञानदेवांसारखा विशद करुन दाखविला.
नामस्मरण भवदोष हरण। सोपान म्हणे जन्म उद्धरण॥ अशा प्रकारचा उपदेश केला.
श्रीनिवृत्तीनाथांनी सोपनकाकांवर अनुग्रह केला तरी दादा ज्ञानोबांचे वेळोवेळी मार्गदर्शक लाभले असेही काहीं अभंगातून दिसून येते.अध्यात्मतत्त्वाचा बोध, कुंडलिनीशक्ती वा इतर गूढ अनुभवांनी समृद्ध केलें. ज्ञानेश्वरे अघटित केलें। ब्रह्मांड अवनी पीक आले। ते सोपान सांठविले। ब्रह्म गुह्य॥
श्रीनामदेवारायांसमवेत ही चारही भावंडे उत्तरभारताची तीर्थयात्रा करुन परत महाराष्ट्रात येताच, काहीं काळात ज्ञानोबा आपण समाधी घेण्याचा निर्णय प्रकट करतात.कार्तिक वद्य त्रयोदशीस ज्ञानराज जगाची माऊली होऊन आळंदीला संजीवन समाधी घेतात.त्यानंतर लगेच मार्गशीर्षात सोपनकाका समाधीचा निश्चय करतात.मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी ही तिथी ठरली आणि भक्तवत्सल पांडुरंग जसा ज्ञानेश्वरांना समाधी देण्यास अवतरले, तसेंच सोपानकाकांसाठी वैष्णवांच्या मेळा संगे अवतरले.
आता, स्वतः भगवंत आले म्हणजे काय तर सत्पुरुषांना अतिंद्रीय शक्तीने, अंतःकरण अतिशय निर्मळ झाल्याने सर्वत्र देवाचाच साक्षात्कार होत असें.असा त्याचा भावार्थ. भक्तां समागमें हरी। सत्वर आलें संवत्सरीं। ब्रह्मानंद परोपरी। चरण धरी सोपानदेव॥ अशी सोपानदेवांची मनोवस्था नामदेव महाराज वर्णन करतात.
संवत्सर म्हणजे आजचे सासवड.पुरंदर डोंगरमध्यें कऱ्हानदीच्या तीरी समाधीचे स्थान निश्चित झालें. धन्य कऱ्हेचे पठारीं। इंद्रनीळ पर्वत महागिरी॥जैसें आळंकापुरीं। तैसें पुण्यक्षेत्र हें॥
वद्य दशमीला जागर कीर्तन, नगरप्रदक्षिणा केलीं आणि सोपानदेव थोरल्या वटवृक्षाजवळ येऊन प्रार्थना करते झालें - वटेश्वरें वृत्तांत सांगितला सकळ। पूर्वीं आमुचें स्थळ याच क्षेत्रीं॥ येथूनियां वाट जातसे पाताळा। उघडिली शिळा समाधीची॥
एकादशी झाली,द्वादशीचे पारणे झाले नि त्रयोदशीचा सूर्योदय होताच सोपनदेव अध्यात्माचा सोपान चढून ब्रह्मस्वरूप होण्याच्या जवळ आले.
समाधीच्या स्थळी कुंकवाचे सडे घातले.नामदेवांचे पुत्र नारा, विठा, महादा आणि गोंदा यांनी समाधीचे विवर स्वच्छ करून तेथे तुळस, बेल दर्भ, फुलांनी आच्छादले. सोपानकाकांनी कऱ्हेत स्नान केलें नि भगवान् पांडुरंगाची आणि गुरु निवृत्तीनाथांची पूजा केलीं.सोपानदेवी ग्रंथ समोर ठेवून श्रीकृष्णाबरोबर गुरुनाथांची स्तुती करुन साष्टांग प्रणिपात केला.यावेळी लहानग्या मुक्ताईंची स्थिती काय झाली असेल याची आपण काय कल्पना करणार! ज्याने आईसारखा आपला सांभाळ केला, बरोबरीने खेळलो, अध्यात्माचे मर्म एकत्र अनुभवले त्या दुसऱ्या दादाचाही विरह होणार!!
सारा आसमंत पांडुरंगासहित निवृत्ती-मुक्ताई-विसोबा गहिवरले.नामदेवांची स्थिती तर दीर्घ ध्वनी करी नामदेव। अशी झालीं. धूप दीप उजळताच जनांनी हंबरडा फोडला.सोपानदेवांनी वैष्णवांना नमस्कार केला नि समाधीच्या भुयारात आता उतरले.
जयजयकारें टाळी पिटली सकळां। घातियेली शिळा समाधिसी॥
आज सोपानकाकांच्या समाधीचे सप्तशतकोत्तर रौप्य (७२५) उत्सव वर्ष आहे.सासवड येथें श्रीनागेश्वर महादेवाच्या देवालयामागे या महान् विभूतीचे समाधी मंदिर चैतन्याची प्रचिती देणाऱ्या दीपस्तंभासारखे उभे आहे.
संत या भूतलावर लोकांच्या कल्याणाकरीता, दुःख निवरण्यासाठी जन्म घेतात.त्यांना स्वतःला काहीं मिळवायचे असते का?अनंत ब्रह्मांडातून ते शुद्धात्मे आपल्यासारख्यांचे जीवन निरामय व्हावें याकरीता जन्माला येतात. भगवंताची भक्ती, करूणा आणि सन्मार्ग हाच त्यांच्या चरित्राचा हेतु असतो.आपल्याला त्यांचे तत्त्वज्ञान, आचरण, भक्तीमार्ग कितपत अंगी बाणवता येईल हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहेच.तथापि त्या पुण्यपुरुषांचे नित्य स्मरण तरी व्हावें यासारखे सुकृतही नक्कीच कमी नाहीं.ते सत्प्रवृत्तीच्या दिशेने जाणारे अभयकारक पाऊल ठरेल.
✍ अनिकेत घिवलीकर, मुंबई.
Comments