नाशिकमधील ते चोवीस तास
मला अजून आश्चर्य वाटत आहे की ह्या सगळ्या तुझ्या फेसबुकवर झालेल्या ओळखी आहेत! कमाल आहे !! किती आपुलकीने भेटले सगळे आणि वागण्यातही अकृत्रिमता!!! माझी ही त्र्यंबक-नाशिकची ट्रिप अविस्मरणीय झाली.बरं झालं आपण अलिबागला गेलो नाहीं.इथे जो आनंद लुटला त्याची सर तिथे आली नसती. खरंच थँक्स अनिकेत.अगं, मला का थँक्स? ती माणसचं मुळात चांगली म्हणून आपल्याला हा अनुभव आला. थँक्स त्यांना दिल्या पाहिजेत.
शनिवारी सकाळी आम्हा दोघांची टेलिपॅथी इतकी जुळली त्याला तोडच नाहीं.रमा ऑफिसला गेली आणि सहज विचार आला, तेरा तारखेला लग्नाचा वाढदिवस आहे तर कुठेतरी दोन दिवस जाऊन येऊ.त्र्यंबकेश्वरला जायचे अनेक दिवस मनात होतं.पण योग्य काही जुळत नव्हता.सकाळी अकराला वगैरे आदित्यला फोन केला आणि म्हटलं नाशिकला यायचा प्लॅन करतोय.कसं येणं सोईचे पडेल वगैरे चर्चा केलीं आणि ठरवले त्र्यंबकला जायचे.हिला फोन केला. "ऑफिसहून लवकर निघत येईल का? नाशिकला जाऊया.त्र्यंबकेश्वरला. म्हणाली, "अरे काय गम्मत आहे, आज सकाळीच माझ्या मनात आलेलं की त्र्यंबकला जाऊया म्हणून! आणि तू तेच ठरवतोयस्!!" बास मग,आता जाऊच. फोनवरूनच मला रमाचा आनंदित झालेला चेहरा दिसत होता. म्हटलं, रेल्वेने जाऊ.पांच सहाची कसारा गाडी आहे.तिथून पुढे शेर कॅब, रिक्षा वगैरे घेऊन नाशिक, मग त्र्यंबक.घाई घाईत तयारी झाली आणि आम्ही रेल्वेने निघालो.
पुष्कराजच्या संपर्कात होतो.तो म्हणाला तुम्ही नाशिकला या मी भेटतो. मग पाहू पुढचे.कसाऱ्याला उतरलो कसेबसे कोंबाकोंबीत शेर ओम्नीमध्ये बसलो. बरोबर सडेनऊला घैसास द्वारका स्टॅन्ड जवळ भेटला.आम्ही सगळेच पहिल्यांदा भेटत होतो.पण अनोळखीपणाची जाणीव कुणालाच झाली नाहीं. एसटीचा संप आणि रात्रही झाल्याने त्र्यंबकला जाणाऱ्या कुठल्याच गाड्या मिळाल्या नाहीत.शेवटी पुष्कराज म्हणाला आता घरीच चला, जेवणही व्हायचे असेल.ते करून आणि मीच घेऊन जातो गाडीने.हे ऐकून "अरे बापरे!" हेच पहिले उद्गार माझ्या तोंडून निघाले. आपण प्रथमच कोणाला भेटतोय आणि त्यांना असं कामाला लावावे! पण दुसरा कुठला मार्गही नव्हता.यामध्यें आपण काहीं निराळे करीत आहोत असा कुठलाच भाव पुष्कराजच्या चेहऱ्यावर नव्हता. अगदी प्रसन्नपणे त्याने हे ठरवून टाकले.
घरी गेलो, हातपाय धुतले आणि ताईने गरम गरम कॉफी आणली आणि त्या सैपाकाला लागल्या. माझं "कॉफी विथ घैसास" चालू होतं आणि छोट्या देविकाचं खेळणं.रमाला ती सोडतच नव्हती.काय काय वस्तू दाखवल्या, खेळ झाला, चित्र रंगवणं, असं मजेशीर लाडिकपणा चाललेला.काहीं वेळातच ताईने मस्त बटाट्याची भाजी आणि डोसे केलें.जेवणं आवरता आवरता अकरा वाजून गेले होते.त्र्यंबकला निघायची तयारी झाली आणि नवीन प्रथेप्रमाणें सेल्फी झाले अन् निघालो.त्याआधी पुष्कराजने गजानन महाराज संस्थेच्या भक्तनिवासात खोल्या आहेत का पहायला फोन केला.तर एकही खोली रिकामी नाहीं असें समजले.पुष्कराज थंडपणे म्हणाला, काही हरकत नाहीं,करू आपण काहीतरी.त्याची शांत मुद्रा आणि आतिथ्य तत्परता विलक्षण होता.
आम्ही निघालो आणि साधारण साडेबारा वाजता त्र्यंबकला पोहचलो.राहण्याची व्यवस्थाही त्यानेच त्यांच्या जागी करून दिली आणि सकाळी वाड्यात नाष्ट्याचेही निमंत्रण दिले.साधी फेसबुकवरची ओळख.तो आम्हाला घ्यायला काय येतो, घरचा पाहुणचार, त्र्यंबकला गाडीने घेऊन याणे, राहण्याची सोय करणे आणि परत सकाळी चहाचे बोलवणे! काय म्हणावे या सगळ्याला! आम्ही दोघंही आश्चर्याने हे अनुभवत होतो.वातावरण इतका छान होता की पलंगावर पडल्या पडल्या कधी झोप लागली समजले नाही.
सकाळी लवकर उठून त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेलो.कसलीच घाई गडबड न होता शांतपणे महादेवाचं दर्शन झालं.रमाला पुरातन वास्तुंच भारी आकर्षण असल्याने मंदिरातले कोरीव काम पहाण्यात हरखून गेलेली. गिरिजानाथाचे मनसोक्त दर्शन घेऊन ज्योतिर्लिंगाची मूर्ती नेत्रात आणि मनात साठवून बाहेर आलो. देवालयाच्या प्रांगणात काही वेळ बसून कमालीची आंतरिक शांतता लाभत होती.पण त्यातच बाजूला कुणा भटजींचा "गाळीव" रुद्र कानावर पडून अस्वस्थ झालो नि उठलो.फोटो बिटो कडून घैसासांच्या जवळपास चारशेहून अधिक जुन्या वाड्यात आलो.पुष्कराजचे वडील बंधू श्री.तीर्थराज गुरुजींशी भेट झाली.गप्पांबरोबर चहा नाष्टा झाला.घरातल्या देवांचेही दर्शन झाले.हे सगळ इतकं भरभर होत होते की आता आठवून मौज येतेय.तिथून आम्हाला कुशावर्त तीर्थ, श्रीनिवृत्तीनाथ महाराजांची समाधी आणि गंगाद्वाराला जायचे होते.
दरम्यान निफाडचा घनश्याम गोसावी भेटणार होता.तो कुशावर्ताला आला.नमस्कार-चमत्कार झाले आणि निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरात आलो.मागे दोन- तीनदा त्र्यंबकला येऊनही नाथांच्या समाधीचे दर्शन झाले नव्हते.पण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरलेली असते यावर माझा अगदी विश्वास आहे.समाधीवर डोकं ठेवताना मन हेलावून गेले.चारही भावंडांच्या अलौकिक समर्थाच्या कथा झर्रकन् डोळ्यासमोरून गेल्या.समाधी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम जोरात सुरु असल्याचे दिसले. आणि मुख्य म्हणजे सिमेंट- काँक्रीट फार न वापरता पाषाणातच गर्भगृह नव्याने बांधल्याचे पाहून बरं वाटले.नाहींतर आधुनिकतेच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची मंदिरं पहिली की, माफी करा, पण मला जावसही नाहीं वाटत.पैसा आणि सुविधा असून लोकं असं का करतात...याचे उत्तर आपल्यालाही माहित असेल. असो.
समाधीचे दर्शन घेऊन ब्रह्मगिरीवरच्या गोदावरीच्या उगमस्थानी, गंगाद्वारासाठी निघालो. घनश्याम सोबत होताच आणि जिथे वेळ मिळेल तिथे माझे आणि रमाचे फोटो काढत सुटलेला.त्याला आम्ही आल्याचा इतका आनंद झालेला की काय बोलावे! मला उगाच मुंबईचा कोणी सुप्रसिद्ध व्यक्ती असल्याचा फील देत होता!
तो वारकरी संप्रदायात श्रीएकनाथ महाराजांच्या परंपरेत संप्रदायाचं उत्तम शिक्षण घेत आहे.आचरण आणि बोलणं फार साधं आणि माहितीपूर्ण. लहान वयात त्याने जमवलेलं ज्ञान, माहिती कौतुक करण्यासारखी आहे.तरी कुठेही बडेजावपणा नाहीं. त्याला बोलायला खूप लागत असले तरी अवास्तव बडबड नव्हती. अशी माणसं कितीही वेळ बरोबर असली तरी कंटाळा येत नाहीं.नाहींतर काही लोकं अशी असतात की कधी जातेय पीडा असं होतं !!
गंगाद्वारासाठी डोंगर चढताना फार मजा आली आणि खूप काळानंतर अगदी लहान ट्रेकची झलक अनुभवली.वातावरणात थोडा गारवा असल्याने उन्ह असून थकवा जाणवत नव्हता.मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या आम्हाला कुठे अशी छान झाडं वगैरे दिसली की त्या सावलीच्या आश्रयाला बसून घटकाभर विसावा घेतला की काय बरं वाटतं सांगू! कट्ट्यावर थोडा वेळ बसत, गप्पा मारत गोदावरीच्या उगमस्थानी पोहोचलो.तीर्थप्राशन करून कड्यावरून त्र्यंबकचा परिसर पहात होतो. तो पाहता पाहता मनात हा विचार, पुन्हा त्या मुंबईच्या मायानगरीत, गर्दीत जायचे आहे.पण काहीं काळ या निसर्गाच्या सान्निध्यात घालवले नि खरोखरी अधिक प्राणवायुचा साठा शरीरात भरून आनंदाने मन प्रफुल्लीत झाले.डोंगर खाली उतरून वाटेत गावकरी मंडळींच्या हातचे लिंबू सरबत घेतले.जरा एनर्जी मिळाली आणि गावाकडे चालायला लागलो.
काहीं कामानिमित्त त्र्यंबकेश्वराचे पुजारी श्री.मयुरेश दीक्षितांना भेटायचे होते.त्यांना त्यांच्या व्यस्त कामातून निवांत वेळ मिळणे कठीण.तरी मला त्यांनी घरीच भेट घ्यायला बोलावले. माझा अंदाज जास्तीजास्त १०-१५ मिनिटे बोलणं होईल आणि ज्या कामासाठी आलो आहे ते करून निघू.काय सांगू तुम्हाला, जवळपास पाऊण तास आमच्या बरोबर गप्पा चाललेल्या! हातातली कामे बाजूला ठेवून गुरुजींनी आमची विचारपूस केली,चहा झाला.रुद्राक्षांचा विषय निघालेला आणि त्यांनी त्यांच्याकडील रुद्राक्षांचा अमुल्य खजिना दाखवला.विस्मय नजरेने ते आम्ही पहात होतो, हाताळत होतो.दीक्षितांच्या भारदस्त पण शांत व्यक्तिमत्वाची केवळ ओळखच नव्हे तर जवळीक साधता आली याचे पूर्ण श्रेय त्यांचेच आहे.वर्चुअल ओळख ते प्रत्यक्ष भेट यातले अंतर इतके सहज नाहीसे होऊन छान मैत्री होईल असा विचार करण्याअगोदरच ते सत्यात उतरले. सौभाग्यवती दीक्षितांनी रमेची ओटी भरली आणि पुन्हा येणायचे निमंत्रण देत आम्ही तिथून निरोप घेतला.दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आणि आम्हाला मस्त कुठल्यातरी खानावळीत जेवायची हुक्की आलेली.देऊळाजवळच एका दुकानात विचारले तर समोरच "पंगत"म्हणून खानावळ आहे तिथे जायला सांगितले.गेलो.छान खाली ताटं वाढलेली.तिथल्या मालकांनी कुठून आलात वगैरे विचारले आणि बसा म्हणले जेवायला.आजोबा अगदी छान होते.खास नाशिक पद्धतीतले जरा तिखट जेवण होते.वाढणाऱ्या काकू-मावशाही इतक्या छान होत्या, आग्रह करून वाढत होत्या.वरण भात,बटाट्याची भाजी, पुऱ्या, चपात्या(काहींजण पोळ्या म्हणतात.असो) छोलेची उसळ,आमटी, मिरचीचा ठेचा, लोणचे, पापड, खोबऱ्याच्या वड्या..वाह! अशा सुग्रास स्वादिष्ट भोजनावर यथेच्छ आडवा हात मारला.जेवण उरकता उरकता वेळ झाला आणि निघायची घाई झाली.
रमाला त्र्यंबकला नवीनच बांधलेल्या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचे होते.उशीर होत होता तरी म्हटले आलोच आहेत तर जाऊ.घनश्यामने ठरवलं की बाईकवरून एकेकाला तिथे नेतो म्हणजे वेळ वाचेल.हा मुलगा आमच्यासाठी एवढं करत होता आणि तेही इतक्या मनापासून की बोलायची सोय नाहीं.स्वच्छ सुंदर परिसर, उंचावर उभारलेलं स्वामी महाराजांचं भव्य मंदिर आणि निर्मल वातावरण पाहून खरच आनंद झाला.मंदिरात गेलो आणि स्वामींच्या मूर्ती समोर नतमस्तक झालो.मोठ्या सभागृहात "श्रीगुरुलीलामृताचे" सामुहिक पारायण चालले होते.वीणेवर नामस्मरण चालू होते.मंदिरातच कालभैरव,पंचमुखी मारुती, साडेतीन शक्तीपीठांच्या जगदंबेच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत.दर्शन घेऊन काही वेळ शांत बसून निघालो.
घैसास गुरुजींना खोलीची चावी देऊन लवकरच पुनर्भेटीचे आश्वासन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन नाशिकला निघणाऱ्या बसमध्ये चढलो.बसायला अर्थात जागा नव्हती आणि दुसरी कधी येईल याचा भरवसा नव्हता म्हणून उभानेच प्रवास केला. घनश्याम मागाहून बाईकवरून येणार होता.
वाटेत काहीजणांना भेटण्याची वेळ, स्थळ ठरून संध्याकाळी काळारामाच्या देऊळात भेटण्याचे सांगितले.बसमधून उतरून आम्ही पंचवटीतल्या रामकुंडावर आलो.गोदामाईच्या गार पाण्यात हातपाय-तोंड धुतले.मलातर पोहावसच वाटत होतं! अमित आणि निनाद काळारामाला आले होते.त्यांना कपालेश्वराला बोलावले तेवढ्यात घनश्यामही आला. अमित आणि निनाद (ह्याला मी छोटे निनादराव म्हणतो) सुद्धा पहिल्यांदाच भेटत होते.सगळ्यांचे एकमेकांस नमस्कार झाले आणि महादेवाच्या दर्शनाला पायऱ्या चढून वर गेलो.समोरच असलेल्या सुंदरनारायणाचे मंदिर दिसत होते. मागे विष्णु-शिव सहस्रनामाच्या लेखात या दोन्हीं मंदिरांच्या उत्सवांचा उल्लेख केलेला तो आठवला.पण सुंदरनारायणाच्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू असल्याने तिथे जाणे झाले नाहीं.
मग आम्ही सगळे काळ्यारामाच्या मंदिराच्या दिशेने निघालो. अमितने भेटल्यापासून स्थळमहात्म्य सांगायला सुरुवात केली ती अगदी आम्ही मुंबईला निघेपर्यंत अखंड.पण आम्हालाही ती आवश्यकच होती!
आम्ही काळारामाला आलो.हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराची ओळख आहे.थोड्या हिरवट-काळ्या पाषाणातले सुंदर काम, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि छान मित्रांच्या "गर्दीत" सुखावत होतो.मारुतीरायाचे दर्शन घेऊन मंडपातून रामरायाचे दर्शन घेतले.इथे सुद्धा शांतपणे रामचंद्राचे रूप न्याहळता आले.या मुर्ती वालुकामय असल्याची माहिती नंतर आदित्यने दिली.देवांच्या दिव्यवैभवाचे तेज हृदयसंपुष्टात साठवत साठवत दंडवत घातला.अमितने देवालयाचे मुख्य आचार्य श्री.सुधीरदास महंतांशी ओळख करून दिली.रामरायाची सेवा करणारी त्यांची ही सत्तवीसावी पिढी ऐकून आश्चर्य वाटले.त्यांनीही आमची आपुलकीने चौकशी केली.
बघता बघता ८ वाजून गेले आणि मग मुंबईला निघण्याची चाहूल लागली.नको असताना! कॅब बुक केली तरी निरोप घेताना तिथून पाय निघत नव्हता.त्यात अर्धा तास गेला.पण त्यातही मजा होती. "अरे, आज रहा, उद्या जा, अजून तुम्ही काहीच पहिले नाहींत नाशिकमध्यें, मिसळ खाल्ली नाहींत! " अशी मोहाची साद घालू लागले.आम्हालाही रहायचे होते,पण आज शक्य नव्हते. पुन्हा येण्याच्या कबुलीवरच आता सुटका होणार होती!
फेसबुकवरच्या या ओळखी.बोलावूनसुद्धा जर भेटले नसते तर काय असे होणार होते? रविवार होता, तशी कामं बेताची असली तरी एक सुट्टीचा दिवस, त्यातही बाहेर जायचे! कधी कधी नको वाटते.पण ही सगळी मंडळी इतक्या आपलेपणाने आणि उत्साहाने भेटली की त्यातून केवळ आणि केवळ प्रेम दिसत होते. कोणाचे मोबाईलकडे लक्ष नाहीं की निघण्याची घाई.सगळे शरीराने आणि मनानेही एकत्र होतो.सगळ्यांनी आम्हाला द्यायला काहीनाकाही वस्तू आणल्या.पण त्या वस्तूंपेक्षा त्यातली भावना महत्वाची होय.
घनश्यामने संपूर्ण दिवस आमच्यासाठीच राखून ठेवलेला.आम्ही निघेपर्यंत तो अगदी मारुतीसारखा आमच्या बरोबर होता! त्याची कामे बाजूला ठेवून.ओंकारला गाण्याची शिकवणी होती म्हणून नाईलाजाने त्याला लवकर जावे लागले पण फक्त पंधरा- वीस मिनिटे भेटायला आला हेही कमी नाहीं.आदित्यला न भेटता गेलो असतो तर मला परत नाशिकला येणं कठीण झालं असता.अशी प्रेमाची धमकीच होते! छोटे निनादराव आणि अमित यांनीतर बहारच आणली.
पुष्कराज! या व्यक्तीविषयी काय लिहू मला खरंच समजत नाहीं!! अहो, एवढं कोण करता आजकाल? पण त्याने आणि त्याचा पत्नीने नुसती आपुलकी दाखवलीच नाहीं तर ती आम्हांला प्रत्ययाला आणून दिली त्याबद्दल अनेक अनेक आभार. पण हे आभार कोरडे नसून मनापासून आहेत.त्याचा स्वीकार ते नक्कीच करतील याची खात्री आहे.
कॅब आली आणि आम्ही पंचवटीच्या गोऱ्यारामाच्या देवळाच्या पायऱ्या उतरून खाली आलो.गाडीत बसणार तेवढ्यात समोर श्रीदेव मामलेदारांनी समाधी दिसली.धावत जाऊन नमस्कार केला आणि गाडीत बसलो.बसेपर्यंत आदित्य, अमित,घनश्यामचे हास्य विनोद चालूच होते.त्यात दहा मिनिटे अजून गेली असतील.
शेवटी मुंबईला जायला निघालो.एका दिवसाच्या असंख्य आठवणींनी मनांमध्ये रिंगण घालायला सुरु केले.आदल्या दिवशी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता नाशिकला आलो आणि रविवारी नऊच्या दरम्यान पंचवटीहून परत चाललो.या २४ तासात सगळ्या मित्रांनी दिलेल्या सदिच्छा नि प्रेमाची शिदोरी घेऊन त्याचे स्मरण करत करत एका अविस्मरणीय सुखद प्रवासाची सांगता झाली.

ओंकार आणि आदित्यही तेवढ्यात आले.एकेकाला भेटताना किती आनंद होत होता हे सगळे शब्दात मांडणे खरचं कठीण आहे.रमाशीसुद्धा सगळी मंडळी ही त्यांची बहिणच असल्यासारखे बोलत होते, माहिती देत होते हे पाहून मला आणखी आनंद होत होता.
आदित्यने रामरायाला आणलेला नैवेद्य देण्याच्या निमित्याने परत मंदिरात आलो.त्यानेही सुधीरदास महंतांशी ओळख करून देताच, आमची ओळख झाल्याचे सांगितले.महंतांबरोबर माझा फोटो घेतो असं आदित्य म्हणाला तर महंत म्हणाले मी खालीच येतो सगळ्यांबरोबर फोटो काढू.ते खाली आले आणि पंधरा मिनिटे आमच्याशी बोलत उभे होते. मंदिराची वैज्ञानिक रचना, वापरलेला दगड, बांधकाम या विषयी उत्कृष्ट माहिती ते देत होते.मग फोटो, सेल्फी झाले.माणसांच्या पूर्वजन्माच्या सुकृताशिवाय अशा ठिकाणी सेवा करण्याचे भाग्य लाभत नाहीं.सुधीरदासजी त्यातले एक आहेत.आणि त्या जोडीला त्यांची श्रद्धा आणि निष्ठा आहे, हे महत्वाचे.
मग हनुमान मंडपात मी, आदित्य, घनश्याम आणि अमितने मिळून विष्णुसहस्रनाम म्हटले.तितक्यात पुष्कराज, त्याची पत्नी आणि मुलगी देविका आम्हाला भेटायला आले.छान भेटी झाल्या आणि नंतर आम्हाला पलीकडच्या गोऱ्यारामाच्या देवळात जायचे होते. निनादराव आधीच तिथे गेलेला. त्याने घरी, म्हणजे गोऱ्यारामालाच यायचे सांगितलेले. तिथे श्रीसमर्थांचे वंशज श्रीभुषणबुवा रामदासी आले होते.त्यांची भेट झाली.चहा बरोबर त्यांच्याशी समर्थांच्या विषयी बोलणे झाले.आदित्यने नुकताच समर्थांच्या दासबोधावर पीएचडी साठी प्रबंध लिहून हातावेगळे केलेला. त्यावर चर्चा झाल्या.गोऱ्यारामाचे सुंदर दर्शन झाले. छोट्या निनादरावांना इतका आनंद झालेला की त्याच्या डोळ्यातून तो ओसंडून वाहत होता हे जाणवत होते.त्या मंदिराचा इतिहास आम्हाला तो सांगत होता.
बघता बघता ८ वाजून गेले आणि मग मुंबईला निघण्याची चाहूल लागली.नको असताना! कॅब बुक केली तरी निरोप घेताना तिथून पाय निघत नव्हता.त्यात अर्धा तास गेला.पण त्यातही मजा होती. "अरे, आज रहा, उद्या जा, अजून तुम्ही काहीच पहिले नाहींत नाशिकमध्यें, मिसळ खाल्ली नाहींत! " अशी मोहाची साद घालू लागले.आम्हालाही रहायचे होते,पण आज शक्य नव्हते. पुन्हा येण्याच्या कबुलीवरच आता सुटका होणार होती!
फेसबुकवरच्या या ओळखी.बोलावूनसुद्धा जर भेटले नसते तर काय असे होणार होते? रविवार होता, तशी कामं बेताची असली तरी एक सुट्टीचा दिवस, त्यातही बाहेर जायचे! कधी कधी नको वाटते.पण ही सगळी मंडळी इतक्या आपलेपणाने आणि उत्साहाने भेटली की त्यातून केवळ आणि केवळ प्रेम दिसत होते. कोणाचे मोबाईलकडे लक्ष नाहीं की निघण्याची घाई.सगळे शरीराने आणि मनानेही एकत्र होतो.सगळ्यांनी आम्हाला द्यायला काहीनाकाही वस्तू आणल्या.पण त्या वस्तूंपेक्षा त्यातली भावना महत्वाची होय.
घनश्यामने संपूर्ण दिवस आमच्यासाठीच राखून ठेवलेला.आम्ही निघेपर्यंत तो अगदी मारुतीसारखा आमच्या बरोबर होता! त्याची कामे बाजूला ठेवून.ओंकारला गाण्याची शिकवणी होती म्हणून नाईलाजाने त्याला लवकर जावे लागले पण फक्त पंधरा- वीस मिनिटे भेटायला आला हेही कमी नाहीं.आदित्यला न भेटता गेलो असतो तर मला परत नाशिकला येणं कठीण झालं असता.अशी प्रेमाची धमकीच होते! छोटे निनादराव आणि अमित यांनीतर बहारच आणली.
पुष्कराज! या व्यक्तीविषयी काय लिहू मला खरंच समजत नाहीं!! अहो, एवढं कोण करता आजकाल? पण त्याने आणि त्याचा पत्नीने नुसती आपुलकी दाखवलीच नाहीं तर ती आम्हांला प्रत्ययाला आणून दिली त्याबद्दल अनेक अनेक आभार. पण हे आभार कोरडे नसून मनापासून आहेत.त्याचा स्वीकार ते नक्कीच करतील याची खात्री आहे.
कॅब आली आणि आम्ही पंचवटीच्या गोऱ्यारामाच्या देवळाच्या पायऱ्या उतरून खाली आलो.गाडीत बसणार तेवढ्यात समोर श्रीदेव मामलेदारांनी समाधी दिसली.धावत जाऊन नमस्कार केला आणि गाडीत बसलो.बसेपर्यंत आदित्य, अमित,घनश्यामचे हास्य विनोद चालूच होते.त्यात दहा मिनिटे अजून गेली असतील.
शेवटी मुंबईला जायला निघालो.एका दिवसाच्या असंख्य आठवणींनी मनांमध्ये रिंगण घालायला सुरु केले.आदल्या दिवशी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता नाशिकला आलो आणि रविवारी नऊच्या दरम्यान पंचवटीहून परत चाललो.या २४ तासात सगळ्या मित्रांनी दिलेल्या सदिच्छा नि प्रेमाची शिदोरी घेऊन त्याचे स्मरण करत करत एका अविस्मरणीय सुखद प्रवासाची सांगता झाली.
✍ अनिकेत घिवलीकर, मुंबई.
Comments
एकंदरीत खुप छान झाली तुमची यात्रा...
वाचतांना हेची देही हेची डोळा अनुभव मिळाला...
वाचून आनंद वाटला
एकदा कधीतरी असेच कोकणात या माझ्याघरी
आग्रहाचे निमंत्रण आहे - Rahul (admin of Insta page Dhoti Enthusiast )