भक्तवत्सल श्रीदत्तात्रेय
सगुण - निर्गुण, मंत्र - यंत्र - तंत्र, पूजन - जप - पारायण, योग - याग, किंवा केवळ स्मरणमात्रेने अश्या नानाविध मार्गाने ज्या एका देवतेची उपासना करून त्याची पूर्ण कृपा प्राप्त होते तो भगवान् श्रीदत्तात्रेय. या देवतेठायी गुरुत्त्व - दैवत्व आणि परतत्त्व यांचा त्रिवेणी संगम होऊन भक्ताचे ध्येय आणि ध्याता एकाच रूपाने नांदत आहे तो गुरुदेव दत्त होय.
पुराणांमध्ये आणि सत्पुरुषांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथात दत्तप्रभूंच्या महात्म्याचे साद्यन्त वर्णन करूनही या देवतेबद्दल अगम्य रहस्य सदैव अद्भुत नि विस्मयकारक ठरली आहे.त्याचा अनुभव आजही जनसामान्यांना येतो. सहसा तर्काने न पटणाऱ्या किंवा बुद्धीच्या पलीकडे एका अनाकलनीय शक्तीच्या सामर्थ्याचे श्रेष्ठत्व तथाकथित 'चार बुकं' शिकलेले जीव मान्य करीत नाहींत.त्याचे कारण केवळ आपल्याकडे कमीपणा येईल अशी भीती असते.स्वामी वरदानंद भारती अशांना एक प्रश्न नेहमी करीत की, पृथ्वीचा जर ताशी एक सहस्र मैल फिरून त्याचा "प्रत्यक्ष अनुभव" कोणासही येत नसेल तर तो गणिताने मांडलेला तर्क खोटा मानावा का? मग गूढ अश्या परमेश्वरी शक्तीचे सामर्थ्य का अमान्य करावे! असो. हे सांगण्याचा उद्देश असा की दत्तप्रभूंचे स्वरूप, कार्य, भक्तांसाठी केलेल्या लीलांचा उलगडा केवळ त्याचे भक्तच करू शकतात किंवा अनुभवतात.
दत्तप्रभूंचा सर्वत्र असणारा संचार अतर्क्य वाटतो, पण तो आर्त भक्तांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. काशीमध्यें स्नान, पंढरपुरात चंदन लेपन, कुरुक्षेत्री आचमन, पश्चिम सागरी संध्यावंदन, कोल्हापुरात भिक्षा, पांचाळेश्वरी भोजन, तुळजापुरात हस्तप्रक्षालन तांबुल भक्षण आणि माहूरगडावर निद्रा अस दत्तोबांचा संचार.जो स्वयमेव परमात्मा स्वरूप, त्यास विशिष्ट स्थानांमध्येच संचार असणे म्हणजे मर्यादा घालण्यासारखे नव्हे का?पण हा संचार अलौकिक असून भक्तांच्या संतोषकरीता आहे.
जटाभार,भस्मांकित काया, रुद्राक्षमाला, चर्मांबर, त्रिशूल, कमंडलू, खडावा असें एकमुखी स्वरूप किंवा विष्णुसारखे सालंकृत दिव्यालंकार धारण केलेंले त्रिमुखी षड्भुज राजास रूप म्हणजे दत्तात्रेय असें चटकन सगुणावतर ध्यानांत येतो. तसेच चार कुत्रीं आणि कामधेनू असा परिवार दत्ताच्या मूर्ती अगर फोटोमध्यें पाहतो. पण हाही रूपकाचा भाग होय. दत्तप्रभूंच्या अवतारांमध्यें प्रत्यक्ष अश्या परिवारासहित कोणी वावरलेले नाही.मात्र गुरुचरित्रात त्रिशूलधारी दत्त महाराजांचे वर्णन अनेक ठिकाणी आले आहे. आणि म्हणून त्या सत्य किंवा गूढ स्वरूपाचे मर्म जाणून घेण्यास औत्सुक्य असते. यावरून ईशावास्योपनिषदातला प्रसिद्ध मंत्र आठवतो हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्। तत् त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये॥ (मंत्र १५) अर्थ असा, त्या सूर्यानेच आपल्या प्रकाशाने मूळ ब्रह्म झाकून टाकले आहे. एकाच सत्य जे ब्रह्म, त्याचा धर्म बघण्यासाठी पूषाने (सूर्याने) ते उघड करून दाखवावे.
दत्तप्रभूंचे स्वरूप आणि लीला अश्याच गूढ पद्धतीचे आहे.की त्याचा उलगडा तेच करू जाणे. तथापि संपूर्ण शरणागत भावाने जो त्यांच्या चारणांशी लीन झाला त्याचे कल्याणाचे कर्तव्यच श्रीदत्त महाराज आपल्या शिरावर घेत.
दत्तोपासना व भक्ती महानुभाव पंथ, नाथ सांप्रदाय, वारकरी सांप्रदाय, व समर्थ सांप्रदायात आहेच.पण दत्तप्रभूंचे तंत्रसाधनेच्या सांप्रदायातही अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.परशुरामांना सांगिलेला "त्रिपुरारहस्य"चे उद्गाते दत्तप्रभूंच आहेत. याशिवाय श्रीनृसिंहसरस्वती स्वामी, श्रीवासुदेवानंद सरस्वतींची वैदिक परंपरा तथा योगमार्गात दत्तात्रेयाचे श्रेष्ठत्त्व सर्वमान्य आहे.
दत्तप्रभूंचे मूर्तिस्वरूप, एकमुखी की त्रिमुखी, सांप्रदायिक उपासना पद्धती, अवधूत वा दिगंबर वृत्ती, या सगळ्या रहस्यांमध्ये महत्वाचा भाग आहे तो "भक्तीभावाचा". त्रिवार सत्य असणाऱ्या भगवंताची भक्ती हीच श्रेष्ठ आहे, असें नारदभक्तिसूत्रात आहे- त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी।(८१)
श्रीदत्तावताराच्या सगळ्याच लीलेमध्यें महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी भक्तीच कारणीभूत झाली किंवा भक्ती हेच साधन नजरेस येते. पूर्वजन्मीचे पुण्य, प्रारब्ध योग असून शुद्ध अंतकरणाने जो त्यांना शरण गेला तो विन्मुख कसा जाईल. हें महत्त्व भगवद्भक्तीचे । पतन न होऊं दे भक्ताचें । दुर्वर्तन जें पूर्वीचें । तेंही तयाचें पालटी ॥ असें स्वतः दत्तप्रभू आयुराजाला उपदेश करतात.
श्रीदत्तात्रेयाची भक्तवत्सललीला पुत्रविरहाने व्याकुळ झालेली आपली माता अनसूयेला सांत्वनपर केलेल्या उपदेशाने सुरु होते.तो उपदेश तत्त्वबोधचा - आत्मबोधाचा आहे. आपले दोनही बंधू तपाचरणासाठी वनांत निघून जातात.तेव्हा मातेचे दुःख निवारण्यासाठी स्वतः बालरूपी दत्त "मी नित्य तुझ्या सेवेसी आहे" असे आश्वासन देतात माते विनंती परियेसी । मज भ्रमणें नित्य या जगतासी । अस्तमानीं घ्यावया दर्शनासी । येणें तुजपाशी जननीये॥ (दत्तप्रबोध) चारही युगात, कुठल्याही काळी स्मर्तुगामी असणाऱ्या दत्तप्रभूने आपल्या मातेला अशी ग्वाही दिली. भक्ताने देवाला आपल्या भक्तीने बद्ध करणें हे एक गोष्ट झाली.पण इथे दत्तप्रभूंची अगम्य "मातृभक्ती" पहायला मिळते. स्वये असोनी स्वतंत्र । भावाच्या भुकेने होसी परतंत्र ॥
आपल्याला निष्कंटक राज्य करता यावे म्हणून कार्तवीर्य याने दत्त कृपेचा लाभ घेतलात.अनन्य भावाने शरण आलेल्या अर्जुनाला (कार्तवीर्य)अक्षय संपत्ती, सप्तद्वीपांचे राज्य, मनोवेगाने सर्वत्र संचार, शत्रूंजय नि सहस्रबाहु मिळावे असा वर प्राप्त केला.सहस्रावधी वर्षे राज्य भोगून दत्तप्रभूंच्या वरदानाचा पश्चात्ताप झाला नि परत महाराजांपाशी येऊन कष्टी अंतःकरण निवदले.यावर दत्त महाराज म्हणतात माझ्या भक्त काय दुर्लभ। सर्व सिद्धी केल्या सुलभ। यावरी ठेविला लोभ। अजुनी सिद्धी किती देऊ॥" त्याउपरही सहस्रबाहुची निष्ठा आणि श्रद्धा पहाता दत्त महाराज अर्जुनाला वेदांग, योगमार्गाचे ज्ञान देऊन जीवमुक्त अवस्थेत कर्मे करावी असा उपदेश देऊन तृप्त करतात.
या कथेचे मर्म असें की दत्तप्रभू तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील, विपुल भोग देतील आणि मग तुम्हालाच त्याचा एके दिवशी वीट येऊन त्याचे नश्वरत्व प्रत्ययाला येऊन त्याचा लोभ सुटले.हीच दत्तात्रेयाच्या लीलेची मेख होय.
ऋतुध्वज - मदालसेचा पुत्र अलर्क याची कथा निराळी आणि त्याच्या पूर्व भागातला सादृश्य प्रसंग बऱ्याच जणांच्या वाट्याला येणारा दिसतो. थोरल्या भावांनी त्याला राज्यपद देण्याचे नाकारून राज्यातून हाकलून लावले. संसाराचे क्षणभंगुरत्व पाहून त्याचे डोळे उघडतात.विरक्त स्थितीत सह्याद्रीवरील रेणुकाश्रमात श्रीदत्त महाराजांच्या दर्शनाला येऊन त्यांनी त्यास अष्टांगयोग्य, नाना सिद्धी, अष्टमहासिद्धी, प्रणवोपासना इत्यादी अनेक मार्गांचा उपदेश करून अभ्यास करवून घेतला नि सख्या भावांनी केलेला दुटप्पीपणा मनातून समूळ निघून त्यांच्या प्रती प्रेमभावना निर्माण झाली.प्रारब्ध भोग भोगून संपल्याशिवाय पुढची गती प्राप्त होत नाही हेच खरे.पण गुरुकृपेने त्याचे यथायोग्य निरसनही अवश्य आहे. आयुराजालाही दत्तात्रेयांनी नवविधाभक्तीचा बोध दिला आणि पुढे २४ गुरूंचा महिमेचे वर्णन हा तत्त्वज्ञानाचा कळस आहे.
कुठल्याही देवतेच्या उपासना साधन म्हणून पूजा, यज्ञ, जप, स्तोत्रादी ग्रंथांचे पारायण ही असतात.पण भगवंत हा भावनेचा भुकेला आहे.आराधना करताना भावनेचा अभाव, दृढ निष्ठ नसेल तर अनेक कसरती करूनही ते फलीत होईल याची काय शाश्वती! सर्वभावें आलो तुजसि शरण। कायावाचामानसहित देवा॥
आणीक दुसरें न ये माझ्या मना। राहिली वासना तुझ्या पायीं ॥ शरीराने, वाणीने नि मनाने सर्व भावासहित तुला शरण आलो नि सर्व वासना, इच्छा आता तुझ्या पायी घालतो, असें तुकोबा म्हणतात. कारण त्यांनी तसे केलें म्हणून भगवद्रूप होऊन राहिले.आपण खरंच अश्या भावनेने भगवंताला भजतो का? पण अनन्य भक्तीने जो जो दत्तप्रभूंना शरण आले त्याला रिक्त हस्त महाराजांनी कधी परतवले नाहीं. हा इतिहास आहे आणि आजही असंख्य भाविकांना त्याचा प्रत्यय आहे.
गुरुचरित्रात भक्तीच्या महिमेचे जागोजागी उदाहरण सापडते. परिटाला राजा होण्याची इच्छा दत्तप्रभू त्याच्या पुढल्या जन्मी पूर्ण करतात आणि त्या जन्मात त्याचे स्मरणही राहील असा आशीर्वाद देतात.सायंदेवाला यवनापासून रक्षण करून त्यास शरण आणले, पूर्वजन्मीच्या देण्याकरीत स्त्रीची मुले मारणाऱ्या पिशाच्चाला मुक्ती दिली, गरीब ब्राह्मणा घराचा घेवड्याचा वेल स्वामी महाराजांनी उपटला नि नंतर त्या जमिनीखाली द्रव्याने भरलेला हंडा सापडतो. या सगळ्या लीला म्हणा वा चमत्कार.पण त्यांहून मोठी शक्ती आहे ती भक्तीची.
पुढे दत्तावतार म्हणून संतादिक ज्या विभूती अवतीर्ण झाल्या त्या सगळ्या सत्पुरुषांमध्येही भक्तवत्सलताच दिसून येते.नाथ परंपरेत गुरुचे महत्त्व निराळे सांगणे नको.गुरूच्या आज्ञेवरून प्राणाचीही आहुती देण्यास शिक्षांनी मागे-पुढे पहिले नाहीं.अक्कलकोटच्या स्वामींच्या लीला तशाच अगम्य, नित्य सोवळ्यात राहणारे श्रीटेम्बे स्वामी एका सात्विक स्त्रीची भक्ती पाहून त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू देण्याची अनुमती देतात, शेगांवचे गजानन महाराज कोरड्या विहिरीला जलाने पूर्ण भरून टाकण्याचे अलौकिक कार्य करतात, श्रीवामनराव गुळवणी महाराज एकाच वेळी वासुदेव निवासात आणि भक्तांच्या घरीही, असे आश्चर्यकारक लीला दाखवतात!असें शेकडो सत्पुरुषांच्या सहस्रावधी चमत्कार आहेत. या सगळ्याचे मूळ खरंतर शोधू नयें. केवळ त्यांनी निरपेक्ष भावनेनी केलेली गुरुभक्ती हेच ध्यानी धरावे.
असें अनेक लौकिक, व्यावहारिक चौकटीत न बसणारे कार्य दत्तप्रभू त्यांच्या भक्तांसाठी करतात.ही मुळीच अंधश्रद्धा नसून माणसाने नेहमी नम्रतेणे, श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने आपली कामे करून परोपकार करीत कर्मसंन्यास वृत्तीने राहावे म्हणून शिकवण आहे.भक्तवत्सल, भक्ताभिमानी असा भगवान् दत्तात्रेय आहे कारण तो संसारात ठेचकाळणाऱ्या त्याच्या लेकरांचा त्याची वृत्ती पाहून सांभाळ करतात, प्रसंगी दंडही करतात ज्यायोगे त्याचे कल्याण होईल. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते। हे ज्याचे ब्रीद आहे तो ते डावलून चालायला कृतघ्न नाहीं तर योगक्षेमं वहाम्यहम्॥ असें निश्चयात्मक सांगणाराच नव्हे तर अनुभूती देणारा परमात्मा आहे.
Comments