श्रीमद्भगवद्गीता जयंती
☆ श्रीमद्भगवद्गीता जयंती ☆
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत॥
सर्व उपनिषदें ह्या गाई,श्रीकृष्ण हाच त्यांचें दूध काढणारा,बुद्धिमान अर्जुन हा तें दूध पिणारा वासरूं आणि गीतारूपी अमृत हें त्या गीईचें दूध होय. सुबुद्ध वाचक हा त्या गीतारूपी अमृताचा भोक्ता होय. हा गीतामहात्म्यचा प्रसिद्ध श्लोक बहुतांश भाविकांनी परिचयाचा असेल.
प.पू.स्वामी वरदानंद भारती यांना घरात रथारूढ कृष्णार्जुनाचे चित्र लावावे की नाहीं असा प्रश्न केला होता.
स्वामींनी क्षणार्धात उत्तर अधोरेखित करून अवश्य लावावें याची द्विरुक्ती केलीं.नि त्याचे कारण सांगताना म्हणाले "श्रीकृष्ण आणि अर्जुन एकत्र असणे हे स्वतःचे भाग्य उदयाला आणण्याचे पहिलें साधन आहे." आणि त्याचा गीतेमध्येंच निर्वाळा दिला तो -
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मातिर्मम॥ (१८:७८)
जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण व जिकडे धनुर्धर अर्जुन तिकडेच श्री, विजय, शाश्वत ऐश्वर्य व नीति, असें माझें (संजय) मत आहे.
आता प्रत्यक्ष गीतेतच वचन आल्यानें कुणीही इतरानें विरुद्ध सांगून कांहींही उपयोग नाहीं!
हे सांगण्याचा हेतु असा कीं हा प्रश्न कित्येक वर्षे मीच स्वतः ऐकत आलो आहे आणि आपल्या कानावरही नक्कीच येऊन आपल्याकडे नेमके उत्तर नसल्यानें गप्प रहाण्याव्यतिरिक्त अन्य मार्ग नव्हता.पण आता तसं न करता "परिप्रश्न" केलाच पाहिजे.(मात्र, उत्तर आधी तयार ठेवा!)
मार्गशीर्ष शु. एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी म्हणजेच श्रीभगवद्गीता जयंती.
किती वर्षांचा काळ उलटून गेला हो? ह्या प्रश्नाला विद्वानांनी निरनिराळे कालनिर्णय दिले आहे. तथापि त्या तपशिलात न जाता नि भाबडेपणानेही न पहाता,सहस्र वर्षे झाली तरीहीं त्यातले सत्व, तेज, तत्त्वज्ञान आणि समस्त मानवजातीच्या कल्याणाचा राजमार्ग दाखविणारा केवळ ओजस्वी ग्रंथ नव्हें तर प्रत्यक्ष "भगवान् श्रीकृष्णाची वाङ्मय मुर्ती" होय.
गीतेच्या महती बाबत बोलण्याची वा लिहिण्याची योग्यता माझ्यात अजिबात नाहीं.तरीहीं जें जें मंगल,पवित्र, नित्यप्रकाशमान आणि जीवनांस चैतन्यदायी,त्याचे स्मरण करणेतरी आपल्या हातात आहे,खरेंतर कर्तव्य आहे ते खचितच करु शकतो.
आजवर गीतेवर विपुल लेखन झाले असले तरी अंती मूळ संहितेकडेच वळावे लागते. ती समजण्यास कठीण असली तरी त्यावरचे सत्पुरुषांनी लिहिलेंले भाष्य आदी लेखन योग्य मार्ग चोखाळून कृतार्थता पदरी घेऊ शकतोच.
सांप्रदायिक भाष्ये पूज्य आहेतच. त्यात कमी अधिक भेदही रहायचे.भावार्थ सांगताना कुणी कर्ममार्गी अवलंब केला, कुणी शुद्ध संन्यासपर, कुणी ज्ञानमार्गी, कुणी केवळ भक्ती, कुणी विज्ञाननिष्ठ तर अलीकडे त्यात मॅनेजमेंट दिसते! आपआपल्या प्रकृती आणि प्रज्ञेप्रमाणें आजवर शेकडो थोर पुरूषांनी त्याचे अनेक वर्षे मनन चिंतन केलें आणि त्यांना गीता जशी प्रतित झाली तशी त्यांनी विवरण करुन जनां समोर ठेवली.पण अंती मामेकं शरणं व्रज (१८:६६) शिवाय पर्याय नाहीं.
या दूधातून जितके नवनीत काढावें आणि आत्मतृप्ती करावी,तरी त्यातले ओज अक्षरच राहिलें.
अनादि काळापासून आलेंले हे ज्ञान गीतारुपाने निदान पांच सहस्र वर्षे होऊनही आपला राष्ट्रीयच नव्हे तर "आत्मिक अनमोल ठेवा" आहे. त्याच स्वरुपांत आपल्यापर्यंत आला आहे नि पुढेही नित्य राहिल.आणि तो जपणें हेही आपलेच कर्तव्य आहे.
तथापि भगवंताचे सांगणे काय याचा अभ्यास सापेक्ष बुद्धीने व्हायला हवा नि त्यासाठी मूळ ग्रंथचीच अवश्यकता होय. आणि तो करण्याची बुद्धीही परमात्माच देतोच. त्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकण्याची खोटी,कीं मग चालवितो हाती धरोनिया या तुकोबांच्या उक्तीचा अनुभव चुकणार नाहीं.
श्रीविष्णुसहस्रनामाच्या लेखनासाठी गीतेच्या श्लोकांचा केवळ आधारच नव्हे तर समानार्थी दुजोरा अवश्य लागत असल्यानें त्याची भव्यता अनुभवणें हे तर फार उच्च स्थरावरची गोष्ट झाली,तरी या निमित्त्याने त्याची महती नक्कीच लक्षांत आली.
महाभारतातल्या या दोनही प्रकरणांवर भगवंताची विशेष कृपा असल्यानें सर्व संतांनी, आचार्यांनी त्यास हृदयाशी धरुन प्रचिती घेऊन प्रचार केला.
माऊली श्रीज्ञानेश्वर महाराज भगवद्गीता ग्रंथ हा ७०० श्लोकांचा (दुर्गासप्तशतीतही सातशें श्लोक आहेत) मंत्रमालाच असल्यानें मोहरुपी महिषासुराचा वध करणारी जगदंबाच आहे असें म्हणतात-
कीं गीता हे सप्तशती। मंत्रप्रतिपाद्य भगवती। मोहमहिषा मुक्ती। आनंदली असे॥ (१८:१६६६)
आम्ही भगवद्गीता वाचतो.. हो केवळ वाचतो. आचरणांत आणण्याचा प्रयत्न? ... अं... मोठं प्रश्नचिन्ह! पण, पण, भगवान् श्रीकृष्णाने अर्जुनास उपदेशील्या असंख्य गोष्टींपैकी एक श्लोक मनाला आश्वास्त करतो तो -
पार्थ नैवेह नामुत्र विनाशास्तस्य विद्यते।
न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति॥ (६:४०)
पार्था, त्याचा (योग, अभ्यास करणारा) विनाश इहलोकच नव्हें तर कुठेच होत नाहीं.अरे बाबा, कल्याण, आत्मोद्धरासाठी कर्म करणारा मनुष्य अधोगतीला जात नाहीं.
संसारसागरांत गटांगळ्या खाणारे यकश्चित जीव आम्ही! आत्मोद्धराची किंवा भगवद्कृपेची वाट इतकी सोपी आहे होय? एका जन्मात हे होणें शक्य आहे का? एक वेळ राष्ट्रापती होता येईल, पण परमात्माची कृपा संपादणे ही अनंत जन्माची शिदोरी असल्याखेरिज दुरापास्त.तथापि माझा पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास आहे.या जन्मांत नाहीं तर पुढल्या जन्मी काहीं पुण्य पदरी बांधून याच भूमीत येऊ. ज्ञानोबा म्हणतात जे हे श्रवणें पाठें अर्थें। गीता नेदी मोक्षाआरौतें। जैसा समर्थु दाता कोण्हातें। नास्ति न म्हणे॥
की,जसा समर्थ दाता कुणाला विन्मुख पाठवत नाहीं तद्वत भगवद्गीतेच्या श्रवणाने, पठणाने अथावा अर्थव्यत्पत्ति द्वारें, मोक्षाच्या अलीकडील फळ देण्याचे गीतेला माहितीच नाहीं. हाच भावार्थ श्रीएकनाथ महाराजांनी लिहिला आहे- एकाजनार्दनीं गीतार्थी। पठणें श्रवणें सर्वांसी मुक्ती। ऐसें पार्वतीप्रती। शंभु सांगे॥ आणि त्यायोगे काय होते, ते श्रीसमर्थ सांगतात-
नासे अज्ञान दुःख भ्रांती। शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती। ऐसी आहे फळश्रुती। ईये ग्रंथी॥ - (दासबोध १.१.३०.)
-अनिकेत घिवलीकर, मुंबई.

Comments
अभिनंदन अनिकेत पंत 👏🏻👏🏻
दिलीप कृ ओढेकर
नाशिक