श्रीविष्णुसहस्रनाम आणि दिवाळी, भाग:२
तो कृष्णरावो जेथ। तेथ लक्ष्मी॥ -श्रीज्ञानेश्वरी {१८:१६३८}
धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ ज्याच्या अधिष्ठानावर (ना.क्र ३२४) सनाथ किंवा सनात् (८९३) म्हणजे चिरकालीन टिकणारे तो भगवान् श्रीकृष्ण जेथें असणार तेथें सर्वकामद (८५१) सकल इच्छा पुरविणाऱ्या परमात्म्याची महाशक्ति (१७५) ही लक्ष्मी (९४३) असावयाची.
"दिवाळी आणि समुद्रमंथन" या पौराणिक कथेचा फार जवळचा संबंध मला आढळतो.नि या रत्नांचे प्रतिकात्म पूजन,व्रत आपण दिवाळीच्या पर्वकाळात करतो. राज-तम वृत्तीच्या अपार परिश्रमातून "लक्ष्मी"ची उत्पत्ती झाली नि तिचा विनियोग सात्विकतेच्या वेदीवर करणें हाच या मंथनाचा गर्भितार्थ भासतो. अशा लक्ष्मीचा विष्णुसहस्त्रनाम सहज अंतर्भाव करून ब्रह्म आणि मायेचे एकमेकास पूरक नाते प्रस्थापित केलें आहे. आणि म्हणून निवडक नामांना वेगळें काढून "शिव-शक्तिचे" निराळेपण दाखवणें अत्यंत कठीणच नव्हे तर अशक्यप्राय काम होय.
संपूर्ण सहस्रनाम परमेश्वराच्या परमदिव्य ऐश्वर्यस्वरूपाच्या वर्णनाचे असून ज्या पदात त्या दिव्याप्रभेची नामें आली आहेत त्यात लक्ष्मीचा वास असल्याने "टंक(टाईपिंग) पूजनाद्वारें" मांडण्याचा अल्प प्रयत्न करतो.
त्या लक्ष्मीला भगवान् विष्णूने आपल्या हृदयांत अढळ पद देऊन श्रीनिवास (१८३,६०७) किंवा लक्ष्मीने भगवंताला वररुपात स्वीकारलें म्हणून श्रीपति (६०३) झाला.
लक्ष्मी या नामाची व्याप्ती प्रचंड असून जें जें सौंदर्यवान्, वैभव, संपन्नता, ऐश्वर्ययुक्य तसेंच आत्मविद्या तेथें ही लक्ष्मी नित्य आहे. केवळ लौकिक धन नव्हे तर, दृश्य अदृश्य शक्ती,प्रयत्न,कार्य यांत तिची पाऊले उमटतात.
समर्थांनी एका ओवीत क्षर आणि अक्षर लक्ष्मीचे सुरस वर्णन केलें - सद्गुरू म्हणों लक्ष्मीवंत। तरी ते लक्ष्मी नाशिवंत। ज्याचे द्वारा असे तिष्ठत। मोक्षलक्ष्मी ॥ {दासबोध १:४:२७} याचा अर्थ असा कीं , सद्गुरुंना लक्ष्मीवंत म्हणावे तर ती स्थूल लक्ष्मी नाशिवंत आहे,पण त्यांच्याच दारीं "मोक्षदायी लक्ष्मी" हात जोडून उभी आहे. म्हणूनच लक्ष्मी "अध्यात्मविद्येचे आगर" होय.
"श्रीसूक्तामध्यें" ऋषींनी मानव कल्याणार्थ त्या "श्री" ठायीं अपार धन,समृद्धी मागितली. परंतु त्यात उदात्ततेची झालर आहे. कुठेहीं दंभ नाही. तर कृपेची याचना आहे. ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥(श्रीसूक्त २:४) इथेही सर्वप्राणिमात्रांमध्ये अधिष्ठित देवी परातत्वविलासिनी लक्ष्मीला समृद्धीकरिता आवाहन केलें आहे.
अशा एका व्यक्तीपूर्ती नव्हे तर समष्टीच्या वैभवासाठी या देवतेचे विष्णुसहस्त्रनामात माधव (७२) हें पहिलें थेट नाम आलें आहे. संस्कृतांत "मा" याचा एक अर्थ "लक्ष्मी ,आणि "धव" म्हणजे "पति". जो लक्ष्मीचा पती तो माधव. माधव दुसरा अर्थ (१६७)विद्यापती असाही केलेला आहे.आणि मेधावी (७७) म्हणून महाबुध्दि (१७३) होऊन तिचे वैभव प्रकट होते.
सर्वोत्तम लक्षणांनी युक्त असा तो सर्वलक्षणलक्षण्यः (३६०) भगवान् विष्णुचा सर्वत्र प्रचलित श्लोक "शान्ताकारमं भुजगशयानं.." यातले "लक्ष्मीकान्तम्" हे नाम पति याच पद्धतीत लागू होते.
"लक्ष्मीकान्तम्" म्हणजेच लक्ष्मीवान् (३६१) असा वैभवाचा भोक्ता (८८८) होय. संत वाङ्मयात "लक्षुमीच्या पती", "लक्ष्मीवल्लभ", "लक्ष्मीनायका" असें विष्णुसहित लक्ष्मीची स्तुती अनेक वेळा केली आहे.
वसु (१०४) म्हणजे संपत्तिस्वरुप आणि त्यात अनेक उत्तरपदे जोडून भगवंताच्या ऐश्वर्याचे अधिक वैशिष्ट्ये आपण पहिल्या भागात पाहिले. ती सगळी नामें लक्ष्मी नामाशी संलग्न आहेत.तेव्हा पुनरुक्ती टाळतो.
परमात्म्याचे सगळे कार्यच महत् होय. महातपस् (१२२) ज्ञान, ऐश्वर्यरूप तप, महामाय (१७०)विलक्षण सामर्थ्ययुक्त माया, महाद्युति (१७६), महातेजस् (६७३) अत्यंत तेजस्वी, महानिधि (८०६) सगळ्याचा भरपूर साठा, असें ज्ञान, शक्ती,सामर्थ्य याची खाण म्हणजेच "महालक्ष्मी"होय.
श्रीसूक्तामध्ये या वैभव लक्ष्मीचे वर्णन "हिरण्यवर्णाम्" असें केलें आहे कीं, जिचा वर्ण सोन्यासारखा तेजःपुंज आहे. तशीच कांहीं नामें सहस्रनामात आहेत ज्यायोगे परमात्म्याची स्तुती गायलेली आहे. हिरण्यगर्भ (७०,४११) , हिरण्यनाभ (१९४), हेमाड्•ग (७३८), सुवर्णवर्ण (७३७), सुवर्णबिन्दु (८००).
त्याच पद्धतीने देवीस कमळाची उपमा देत ऋषी म्हणतात,
पद्मानने पद्मऊरू पद्माक्षी पद्मसम्भवे। पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि। इत्यादी. सहस्रनामात पद्मी (३४४) ज्याने हातात कमळपुष्प धारण केलें ,अर्थातच लक्ष्मीच ज्याच्या हाताशी आहे असा. पद्मनिभेक्षण (३४५) अरविन्दाक्ष (३४७) म्हणजे कमलासारखे सुंदर नेत्र आहेत असा. पद्मनाभ (१९६,३४६) की हृदयरुपी कमलाच्या मध्यभागी रहाणारा सहाजिकच लक्ष्मीमध्येच वास करणारा नि म्हणूनच पद्मगर्भ (३४८) होय.
कमळ हे लक्ष्मीचेच स्वरुप हे आपल्याला ध्यानांत आलें असेल.
जेथें भगवान् नारायण तेथें भगवती नारायणी हा स्पष्ट न्याय दिसतो.
लक्ष्मी चंचल आहे असें आपण ऐकतो,तें अजिबात खरें नाहीं. आपल्या मानावाचे मनच चंचल असतें. परमात्मा स्थिर (२०३) च आहे, अतः लक्ष्मीही ध्रुवा (३८८) सारखी निश्चल आहे.
"श्री" हे लक्ष्मीचे सर्वात उत्कृष्ट स्वरुप. ऐश्वर्य, सौंदर्य, दिव्यत्व ह्याला समानार्थ शब्दच श्री होय.या पदाचा सहस्रनामात सतरा वेळा निरनिराळ्या तऱ्हेंनें विशेषणे योजिली आहेत. श्रीमत् (२२,१७८,२२०,६१३), श्रीनिवास (१८३,६०७), श्रीगर्भ (३७६), श्रीवत्सवक्षा (६०१), श्रीवास (६०२), श्रीपति (६०३), श्रीमतां वरः (६०४), श्रीदः (६०५), श्रीशः (६०६), श्रीविभावन (६०९), श्रीधर (६१०), श्रीकर (६११), श्रेय (६१२). अशी मनोहर (४६१) महामूर्ति (७१८) लक्ष्मी होय
लक्ष्मी सत् (४७८) म्हणजे सत्यस्वरुप तसेंच प्रेमळ वत्सल (४७१) रुपी धर्म (४०३) आहे. गायींच्या रुपाने समृद्धीचा आनंद (५२६) देणारी आणि घृताशिस् (७४४) म्हणजे ओज, तेज, पुष्टी,बुद्धी वर्धक, अन्नम् (९८३) हे परमेश्वराचेच दान.
हे अनन्तरुप (९३२), अनन्तश्री (९३३) परमात्मारूपिणी लक्ष्मी, तुझें स्मरण कधीही क्षुब्ध न होणारे अक्षोभ्य (८०१) असें अमृतांश (८१३) असून आमची वाणी शब्दातिग (९११) अशी शब्दाने वर्णनकरण्या पलीकडे आहे.
असें सहस्रनामांत भगवंताच्या ऐश्वर्याचे अर्थात लक्ष्मीचेही दर्शन आपल्याला होते.
अश्विन महिना संपून कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा अथवा दिवाळी पाडवा म्हणता.उन्मत्त झालेल्या बलिराजाला भगवंताने श्रीवामनावतार धारण करून पाताळात पाठविल्याची कथा आहे. वामनाने बलीला दंड केला तो विशिष्ट कारणास्तव.विद्यासंस्था, राज्यकारभार आणि व्यापार ही क्षेत्रे एका बलीने स्वतःच्या हाती घेऊन ती व्यवस्था विस्कळीत केलीं. त्या आसुरी वृत्तीवर सात्विकतेची पुनर्बांधणी करता संधाता (२०१) ठरला. ह्या कृतीमुळें वामनाचे एक नाम त्रिविक्रम (५३०) म्हणून प्रसिद्ध आहे.ज्याने या तीन कार्याने त्रिपद (५३४) स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ ज्याने आक्रमण केलें तो.
या वामनावताराशी निगडीत अनेक नामे आहेत.त्या पैकी उपेन्द्र (१५१) जो इंद्राचा धाकटा भाऊ, प्रांशु (१५३) बलीने संकल्प पूर्ततेचे जल सोडताच जो उंच झाला असा.ज्याची कुठलीही कृती व्यर्थ नसते तो अमोघ (१५४) नि सदा अत्यंत पवित्र तो शुचिः (१५५) तथा सदा बल, ऐश्वर्य, उन्नती करणारा तो उर्जित (१५६) होय.
असें हे महाविष्णुच्या तेजाचे वर्णन दैदीप्यमान् असून तो दीप्तमूर्ति (७१९) आहे.तो स्वयमेव धर्म (४०३) नि धर्मविदुत्तमः (४०४) असून धर्म जाणणाऱ्यांमध्यें श्रेष्ठ (६८) होय.
यादिवशी भगवान् श्रीकृष्णानें गोवर्धन पूजेची रुढी घातली आणि अन्नकूट करण्याची पद्धत आहे.अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या गोपवासीयांना श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर लीलया उचलून धरण्याची किमया केली म्हणून तो गोहित (५९१) झाला.
अन्नधान्याची संपन्नताही भगवंताच्या दयेने होते म्हणून सहस्रनामांत अन्न (९८३) की जो भूतमात्रांकडून खाल्ले जाते व अन्नाद (९८४) अन्नाचे भक्षण करणारा असें स्पष्ट उल्लेख आले आहेत. निर्माण करणारा तो, देणारा तो नि सेवन करणाराही तोच. म्हणून गीतेमध्यें भूतमात्रांपासून वनस्पतीपर्यंत सगळे माझेच स्वरूप आहे असा अर्जुनास सांगतात सगळे कर्म मला भक्तीपूर्वक तत्कुरुष्व मदर्पणम्। (९:२७) म्हटले आहे.
दिवाळीची सांगता होते ती यमद्वितीया अर्थात भाऊबीज या दिवसेने. सण- उत्सवांचे निमित्त करून प्रेमळ नाती सांभाळणे हाही हेतु यामध्यें साधला जातो.यमुनेने आपला भाऊ यम यांस घरी बोलावून ओक्षणादी पूजा केली आणि दरवर्षी यायचे असें वचन घेतले.
यम हे नाम म्हणून घ्या अथवा सिद्धी त्यात तत्त्वज्ञानाचे नि योग मार्गाचे मर्म आहे.साधनेमध्यें मन, शरीर, बुकचे यम-नियमन केल्याशिवाय सिद्धी लाभत नाहीं. यम हे नाम १६२ आणि ८६६ असें सहस्रनाम दोनदा आले आहे.अंतःकरणामध्यें स्थित होऊन नियमन करणारा तो यम होय, असे श्रीशंकराचार्य म्हणतात.अन्तर्यच्छतीति. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य नि अपरिग्रह हे ज्याचे दिव्यगुण असा तो भगवंत जो संहारासमयी सर्वांचा काल (४१८) ठरतो.किंवा ज्याला मृत्यु नाहीं असाही यम या नामाचा भावार्थ भाष्यकारांनी केला आहे.
विष्णुसहस्रनामाने मनुष्याला काय फल प्राप्त होते याचे चिंतन करताना श्रीतुकोबाराय म्हणतात नाव धड करा सहस्रनामाची। जें भवसिंधूची थडी पावे॥ इतके हे प्रभावी स्तोत्र आहे.मग या दिव्यस्तोत्राचे नि दिवाळी आदी सण- उत्सवांची सांगड घालताना परमेश्वराच्या अगाध महिमेचा विस्तार करता आपल्या भारतीय संस्कृतीची सर्वांगीण भव्यता पहाता कृतकृत्य कां न व्हावें ! मनावरील काळोखी दूर सरून ज्ञान दिव्याच्या प्रकाशाने ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात प्रज्वलित होवो हीच जगदीश्वराचरणी प्रार्थना. माऊली श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचा आधार घेत या लेखाचा समारोप करतो.
मी अविवेकाची काजळी । फेडूनी विवेकदीप उजळीं । तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥
✍ अनिकेत घिवलीकर, मुंबई. 9769681999
🪔 तमसो मा ज्योतिर्गमय 🪔
{दैनिक मुंबई तरूण भारत : ४ नोव्हेंबर २०२१}
Comments
आणि दिपावली सणा ची
अतिशय उत्तम सांगड घातली आहे..
लक्ष्मी स्तुती चा सहस्त्रनामातील
उलेख आणि विवरण
खरंच अभ्यासपूर्ण 👌🚩