आचार्य विनोबा भावे यांचे विष्णुसहस्रनाम
देवादि तूं तूं चि पुराण आत्मा, जगास ह्या अंतिम आसरा तूं।
तूं जाणतोसी तुज मोक्ष धामा, विस्तारिसी विश्व अनंत-रुपा॥ {गीताई}
महाराष्ट्रातील प्रज्ञावंत व्यक्तिमत्व आचार्य विनोबा भावे यांचे श्रीभगवद्गीतेचे रसाळ पद्यात्मक मराठीत रुपांतर "गीताई" आपल्याला परिचयाचे आहे.अनेकांना ते शाळेत शिकल्याचे स्मरण होईल.लहान मुलांकरीता त्यांनी लिहिलेल्या बोधप्रद कथा आजही मार्गदर्शक आहेत. त्याच प्रकारे सर्वसामान्यांना दुर्बोध वाटणार्या विष्णुसहस्रनामाचा भावार्थ अत्यंत सोप्या आणि प्रत्यक्ष व्यवहारातली उदाहरणं देऊन विनोबांनी त्याचे विवरण केले.
म.गांधींच्या आज्ञेने वर्धा येथील परंधाम आश्रमातील कार्य ,भूदान यात्रा हे सामाजिक सेवाकार्य त्यांनी केलेच. तथापि बालपणापासून धर्म नि अध्यात्माविषयीं पराकोटीची श्रद्धा व निष्ठा विनोबांच्या जीवनाचा मूळ गाभा होय. कुमारवयांत सुरु झालेल्या त्यांच्या या वाटचालीमुळे त्यांच्यात वैराग्य बाणले होते नि तसेच पोषक वातावरणही लाभले.
विनोबा त्यांच्या अध्यात्मिक जीवनाचे तीन टप्पे मानीत. ते म्हणतात, "माझ्या जीवनातील पहिल्या अवस्थेत पांच संतांचा (ज्ञानेश्वर,नामदेव,एकनाथ,तुकाराम,रामदास) प्रभाव होता. दुसऱ्या अवस्थेत(१९१८-६८)वेदांचा मुख्य प्रभाव. आता(उतारवयांत) तिसऱ्या अवस्थेत गीता सोडली तर सर्वांत अधिक प्रभाव विष्णुसहस्रनामाचा आहे.
सहस्रनाम विनोबांच्या नित्यपाठात होते.आणि केवळ विनोबाच नव्हे तर, पवनार येथील आश्रमामध्यें तसेंच इतर आश्रमात देखील दररोज सकाळी ईशावस्योपनिषदासहित १०:३० वाजता सहस्रनामाच्या पाठाची वेळ ठरलेली असें(आहे). "आम्ही सर्व एक आहोत" या उदात्त भावनेचा स्पर्श या कृती मागे विनोबांनी आखलेला.
प्रार्थना,नामस्मरण यावर विनोबांची विशुद्ध श्रद्धा होती. ते म्हणत, "नाम पारायणाचा जो मुख्य लाभ आहे तो गूढ लाभ आहे.प्रकट लाभ हा की वाणी स्वच्छ होते. परमेश्वराच्या स्मरणानें,केवळ नामाच्या उच्चारणानें प्रसन्नता कशी येते याची मी चिंता करीत नाहीं."
"सहस्रनामानें स्नान होतें आणि प्रसन्नता वाटतें,तर गीतेने जणू अमृतभोजन. ज्ञान,ध्यान,कर्म,भक्ति,योग, चित्त-विकास, विभूति-विस्तार, आत्मानात्मा- विवेक, आदि विविध खुराक गीतेतून मिळतो, त्याने पुष्टि मिळते. परंतु विष्णुसहस्रनामाने स्नान होतें, मन धुतलें जाते. "
"विष्णुसहस्रनामाच्या परिणामस्वरूप चित्त उत्साहपूर्ण झालें पाहिजे. स्मरण करतांना भाव असेल तर शुद्धीचा अनुभव येईल."
"गुणचिंतनाने गुणविकास होईल.बाकी, तो अंतर्यामी ईश्वर विवेकानेच जाणला जाऊ शकतो. नामस्मरणाबरोबर रूपचिंतनाची देखील आवश्यकता आहे.त्याच्या गुणांचा स्पर्श आपल्याला झाला पाहिजे,त्याच्या प्रेमाचा साक्षात्कार झाला पाहिजे. नाम स्वयमेव संदेशवाहक आहे."
विनोबांनी श्रीशंकराचार्यादी भाष्यकारांचे विष्णुसहस्रनाम अभ्यासिले आणि स्वतःस जसा अर्थ प्रतीत झाला त्याप्रमाणें निवेदन केला. भारतातल्या वैदिक तसेंच अवैदिक पंथ-उपपंथ याचा संदर्भ देत. उदाहरणार्थ- नारायण,नृसिंह,वामन,राम, आदी विष्णुवाचक नामें सोडून "शिव,स्थाणु,रुद्र" ही शंकराची नामें, "स्कंद" हे कार्तिक स्वामीची आठवण करुन देणारे नाम, सूर्य, अग्नी, शक्तीवाचक, गणेश्वर इत्यादी.
त्याच प्रमाणें "सिद्धार्थ" म्हणून गौतम बुद्धाचा निर्देश करतात.
"वर्धमानः" ,"महावीर्यः- यात जैनांचे तीर्थंकार म्हणून उल्लेख केला.
"पुण्यश्रवणकीर्तन" यांमध्ये शिखांच्या गुरु नानकांचा संदर्भ देतात.
मराठी संतांनी गायलेल्या नाम महिमाचेही कौतुक विनोबा नमूद करतात.
तदनंतर विष्णुसहस्रनाम आणि इतर धर्मांतल्या परमेश्वरी नामांचा अर्थ नि साधर्म्य उलगडून दाखवला आहे.त्यात इस्लाम,ख्रिस्ती,यहुदी,पारशी या धर्मांचा समावेश केला.त्यातील उदाहरणे पाहू.
इस्लाममध्ये "अल्लाहुनुरुस्समावाति वल अरद्" म्हणजे अल्लाह आकाशातील प्रकाश आहे.यालाच समान्तर विष्णुसहस्रामध्ये "प्रकाशात्मा प्रतापनः" (श्लोक क्र.३०) म्ह. प्रकाश देणारा,तापविणारा हे नाम आले आहे.
"अल् मलिकु" ह्याचा अर्थ ईश्वर मालक आहे. सहस्रनामात तो "लोकस्वामी" (श्लोक क्र ८०) आहे.
असें विनोबांनी इस्लामी जप "अस्माउल् हुस्ना" यातले ९९ नामें आणि त्यास विष्णुसहस्रनामातले नाम कसें समानार्थक आहे याची यादी दिली आहे.
ख्रिस्तांमधली "ट्रिनीटी"ची कल्पना "The Father,The Son(Jesus)& The Holy Spirit" घेऊन सहस्रनामातलें "पूतात्मा परमात्मा च मुक्तानांपरमागति" (श्लोक क्र.२) असा येशुचा समावेश केला.
यहुद्यांचा "यह्व" म्हणजे शक्ती याचा संबंध "महाबुद्धिः महावीर्यः महाशक्तिः महाद्युतिः" (श्लोक १९)
आणि पारशांचा अहुरा मज्द म्हणजे महान परमेश्वर "गुणभृन्निर्गुणो महान्" (श्लोक ९०) याच्याशी जोडला.
विनोबांच्या संवेदनशील मनाचा ठाव सहस्रनामाच्या निरुपणांमध्यें तर दिसून येतोच, तसेच काहीं ठिकाणी नामाला साजेसे किंवा त्याच्या भावार्था व्यक्त होणारी बाळबोध चित्रे रेखाटली आहेत.
गांधी तत्त्वज्ञानच्या निस्सीम वारकर्यानें विष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या साहाय्यानें केलेंला "सर्वधर्मसमभावाचा प्रयोग" आपण हिंदुजन स्तुत्यच मानतो कारण आपल्या संस्कारात असलेली कृण्वन्तो विश्वमार्यम् (ऋग्वेद) आणि सर्वेषां हिते रतः (म.भा.) ह्या उच्च ध्येयाचे बाळकडू अप्रत्यक्षपणे अंतर्भूत असतेच नि म्हणूनच कौतुक करतो.पण ते आपल्यापूरतेच.
आचार्य बाबांनी नामस्मरणाच्या गुणसंकीर्तनरूपी दृष्टीने सहस्रनामाचा विचार भाविकांपर्यंत पोहचविण्याचा केलेला यत्न आणि नाम यज्ञ जिज्ञासुंनी परंधाम प्रकाशन, पवनार येथून छापलेंले पुस्तक मूळातून जाणून घ्यावे अशी मी इच्छा व्यक्त करेन.
✍अनिकेत घिवलीकर, मुंबई.


Comments
(नाम स्वयमेव संदेशवाहक आहे ).....हे योग्यच
पण आमच्या सारख्या प्राथमिक पातळी वर असणाऱ्या नाम साधक ला..
(नामस्मरणा बरोबर रूपचिंतनाची
देखील आवश्यकता आहे).. हि गरज.
.मन नामात स्थिर होण्यासाठी
लेखन उत्तम झाले आहे..👌👋