अलौकिक टिळक महाराज


भारताच्या इतिहासात एकोणवीसावे शतक हे मला सूर्यतेजाप्रमाणें झळाळणारेच भासते.त्याचे कारणही तसेच मोठे आहे. राजकारण असो वा अध्यात्म साहित्य,विज्ञान असो कीं सामाजिक चळवळ.प्रत्येक क्षेत्रांत अशी काहीं थोर माणसे झाली कीं त्याची केवळ यादी केल्यास त्यास ग्रंथाचे स्वरूप प्राप्त होईल.

इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध सुरु झालेले.१८५७च्या प्रचंड रणसंग्रामाच्या एक वर्ष मागे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे राजकीय नेत्तृत्व पुढे ज्यांच्या अमोघ सामर्थ्याने आपल्या हाती घेऊन योग्य दिशेला वळवली त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झालेला.लोकमान्यांनी राजकारणांत प्रवेश केल्यापासून ते त्यांच्या मृत्युपर्यंत भारताच्या राजकारणाचा तो काळ टिळक युग असा ओळखला जातो.इतके त्यांचे कर्तृत्व एकमेवाद्वितीय आहे.

टिळक महापुरुष होतेच.पण त्यांचे माहात्म्य केवळ राजकीय किंवा सामाजिक इतकेच नसून तर अध्यात्मिक दृष्ट्याही होती.याची साक्ष स्वतः श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामींनी दिली आहे.स्वामी महाराजांना कोणीतरी टिळकांविषयी विचारले तेव्हा स्वामी महाराज म्हणाले लोकमान्य पूर्वजन्मी योगी होते म्हणूनच त्यांच्या ठिकाणी लोकोत्तर बुद्धिसामर्थ्य आहे. श्रीभगवद्गीतेच्या योगभ्रष्टोऽभिजायते  या श्लोकांची आठवण होते.स्वामी महाराजांनी टिळकांना जपाची माळही पाठवली होती.

लोकमान्यांची योग्यता होतीच तशी.अनेक सत्पुरुष, संत यांचा त्यांना आशीर्वाद लाभलेला.खुद्द त्यांच्या मातुःश्रींनी पुत्र व्हावा म्हणून अनेक वर्षे सूर्योपासना केली नि टिळकांचा जन्म झाला तो भास्कारासारखाच तेजस्वी कां न व्हावा!

टिळकांप्रती लोकांची भावना किती निर्मळ होत्या तत्संबंधी एक आख्यायिका मला एका संन्यासी महाराजांनी काही वर्षांपूर्वी सांगितलेली,ती आपल्या समोर आज प्रथमच मांडतो.

टिळकांचे विश्रामाचे ठिकाण सिंहगड.एके संध्याकाळी आपल्या बग्गीतून ते गांवांत परत येत असताना वाटेत एक साध्वी बाई गाडी समोर आली.गाडीवानाने घोड्यांचा लगाम ओढला नि बाईला बाजू होण्यास सांगत होता.पण त्या बाई काही केल्या ऐकेना.लोकमान्यांची भेट घ्याची हाच हट्ट होता.बराच वेळ गेला तरी काही होत नाहीं हे पाहून टिळक बग्गीतून खाली उतरले आणि त्या बाईला गाडी समोर असे अचानक येऊन उभे राहण्याचे कारण विचारले.
त्या बाईंचे डोळे आसवांनी भरलेले.रडणे सावरून त्या म्हणाल्या "महाराज,माझे लग्न होऊन बरीच वर्षे झाली तरी मला मुलबाळ होत नाहीं,आणि त्यामुळें सासरी माझा अगदी छळ चालला आहे. महाराज,माझी आपल्याला एक कळकळीची विनंती आहे,ती अमान्य करू नये.हा नारळ घ्या आणि माझ्या ओटीत घाला नि मला आशीर्वाद द्या,माझी खात्री आहे माझी कूस नक्की धन्य होईल."
टिळकांनी सगळे बोलणे ऐकून ते शांतपणे म्हणाले,"बाई,आपला काही गैरसमज झालेला दिसतोय,मी कोणी बुवा किंवा संत नाहीं.आपण म्हणता ते मला काही करता यायचे नाहीं."
ती माउली काकुळतीला आलेली पुन्हा पुन्हा टिळकांना हात जोडून विनवणी करत होती.टिळकांनाही तिची दया आली आणि लोकांचे आपल्यावर किती प्रेम आहे याची पुरेपूर कल्पना आलीच. शेवटी नाईलाज म्हणून का होईना परंतु त्या बिचाऱ्या बाईचा शुद्ध हेतू लक्षात घेता टिळक म्हणाले,"बाई, मी कोणी चमत्कार करणारा बुवा नाहीं.पण तुमची श्रद्धा तुमचे मनोरथ पूर्ण करेल" नि तो नारळ घेतला आणि त्या बाईच्या ओटीत घातला.

लोकमान्यांविषयी जनमानसात किती प्रेम,भक्ती,निष्ठा,श्रद्धा होती हे या प्रसंगावरून समजू शकते.त्याचे कारण होते टिळकांचा  आचारः प्रभवो धर्मः हे होय.

त्यांचा उल्लेख लोकमान्य असा होत असेच तरी टिळक महाराज असा विशेष केला जात असे. त्यांच्या अनुयायांचा पक्ष टिळक सांप्रदाय असा ओळखला जाई.ही काही साधी बाब नाहीं तर अलौकिक गोष्टच होय.सावरकर एकदा म्हणाले होते कीं,  पुणे हे भारतीय राजकारणाची राजधानी असून टिळक आमचे राजे होते.
असे चारित्र्या घडायला अथपासून इतिपर्यंतचा प्रवास एखाद्या साधू वा संतांप्रमाणेच संयमाने करावा लागतो.लोकमान्यांनी तो मुद्दाम केला नसेलही,पण तो त्या प्रतीचा झाला हे सत्य आहे.

✍अनिकेत घिवळीकर .  १ ऑगस्ट २०२१

Comments

सुंदर 🙏🏻🙏🏻💐💐
AMITESH GHATE said…
खूप छान
लोकमान्यांना विनम्र अभिवादन
सुंदर 👌❤️
धन्यवाद🚩
धन्यवाद🚩
धन्यवाद🚩

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १