सतीचे वाण


 संत श्रीतुकाराम महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हाती घेतले
☆ सतीचे वाण ☆


काव्य रचना ही मनुष्यातल्या विशेष प्रसंगी उचंबळून आलेल्या अत्युच्च भावना व्यक्त करण्याचे हृदयस्पर्शी माध्यम आहे.त्यामध्यें शब्दलालित्य आणि कल्पनाविलासाची आवश्यकता कायम ठेवून आत्माविष्कारही पहायला मिळतो.अभिजात काव्यनिर्मितीसाठी जन्मजात प्रतिभेची देणगी निसर्गदत्त असतेच.केवळ शब्दांची ओढाताण, विषयांची सरमिसळ याने त्या वाक्यांना काव्य म्हणता येत नाही आणि दीर्घकाळ टिकतही नाहीं.
व्युत्पत्तिः अभ्यासः प्रतिभा इति काव्यहेतुः असें म्हटले आहे.

मागे श्रीतुकोबांनी रचलेले श्रीविष्णुसहस्रनामावरचे अभंग अभ्यासित असताना एक अभंग नजरेस चमकून गेला.तो अभंग वाचताना मनात असा विचार आला की, थोर माणसांमध्यें प्रकृतीनुसार भेद असायचेच.पण विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्यांत ती माणसे मागे पुढें पहात नाहीं.आणि मग समरसता नसली तरी क्वचित एक वाक्यता कुठेतरी आढळते.

लोकप्रवाहाच्या विरुद्ध जाऊन कार्य करायचे म्हटले कीं, त्यासाठी अलोट धैर्याची आवश्यकता असते.मग ते काम व्यक्तिकेंद्रित असो वा समष्टीसाठी. ध्येय निश्चिती झाली म्हणजे प्राणपणाने त्याची कास धरून जें कार्य सिद्धीस नेतात त्यासंबंधी नीतिशतकामध्यें भर्तृहरिने नेमके म्हणून ठेवले आहे. विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः। प्रारब्धमुत्तमजनः न परित्यजन्ति॥ म्हणजे - कार्यारंभ करून वारंवार विघ्न येऊनही ते काम पूर्ण होईपर्यंत जो सोडीत नाहीं तो उत्तमपुरुष.हा न्याय कुठल्याही मोठ्या ध्येयनिष्ठ पुरुषाला लागू होत नाहीं काय!

श्रीतुकोबांचा तो अभंग वाचताना मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माझे मृत्युपत्र या काव्यातील एक कडवं चटकन आठवले.त्यातील "सतीचे वाण" ह्या मध्यवर्ती शब्दप्रयोगातील साम्यता आपल्या पुढें, माझ्या आकलनाप्रमाणे मांडतो.सुरुवातीला मूळ अभंग आणि काव्य यातला अर्थ पाहून नंतर त्यातला भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न करतो.

तुकोबांचा अभंग :-
सतीचे ते घेतां वाण । बहू कठीण परिणामीं ॥
जिवासाठीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हें ॥
जरि होय उघडी दृष्टी । तरि गोष्ट युद्धाच्या ॥
तुका म्हणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥

अर्थ :- सतीप्रमाणें कार्य करून दाखविणे ही सोपी गोष्ट नाहीं.कारण त्याची पूर्तता करण्याची वेळ येताच ते अत्यंत कष्टमयही होते,कठीण होते.प्रसंगी त्या कार्यासाठी जीवही द्यावा लागतो,तेव्हा गौरवास पात्र होतो,उथळपणानें काहीं होत नाहीं.युद्धाच्या म्हणजेच आपत्तींना तोंड देण्याच्या गोष्टी तेव्हाच बोलाव्यात जेव्हा पूर्ण तयारी झाली असेल.शेवटी तुकोबा म्हणतात ही पूर्वतयारी एकदा झाली कीं अंगावर कोणताही कठीण प्रसंग आला तरी त्याला धैर्याने तोंड दिले पाहिजे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य :-
कीं घेतलें व्रत न हें आम्हिं अंधतेनें, लब्धप्रकाश इतिहास निसर्ग मानें,
जें दिव्य दाहक म्हणून असावयाचें, बुद्ध्याचिं वाण धरलें करीं हें सतीचें.  
अर्थ :- भारतमातेला परदास्यातून मुक्त करण्याचे व्रत आम्ही आंधळेपणाने घेतलें नसून अत्यंत तेजस्वी आणि दैवानेच दिलेल्या इतिहासाला साक्ष ठेवून घेतले.ते दिव्य,तेजस्वी तथा दाहकही आहे.तरी सुद्धा त्याचा अंगीकार पूर्ण विचारांती जाणूनबूजून केला,ते सतीच्या वाणांप्रमाणे तिच्या व्रताइतकेच अतिशय कठीण आहे.  

पुढल्या विवेचनास  सुरुवात करण्याआधी एक महत्वाची गोष्ट मला नम्रपणे नमूद करावयाची ती की,या लेखामध्यें संत आणि राजकीय व्यक्ती या दोहोंमधील समानता किंवा एकाच पातळीवर आणून त्याविषयी उहापोह करणे असा कुठलाही उद्देश नाहीं,हे स्पष्ट करतो.कारण हल्ली लोकांना विषय माहिती असो व नसो निव्वळ विरोध करून अपप्रचार आणि अर्थहीन वटवट करण्यांत धन्यता वाटते.तुकोबा आणि तात्याराव सावरकर आपापल्या क्षेत्रांत थोर पुरुष आहेतच.एकमेवाद्वितीयच. या लेखामध्यें त्याच्या रचनेतल्या भावार्थाला धरून त्यातील त्यांची ध्येयनिष्ठा दाखविण्याचा स्वच्छ हेतु आहे." तेव्हा वाचकांनी तुकोबांचा अभंग आणि सावरकरांचे काव्य सापेक्ष नजरेतून पाहून केवळ त्यातील "आत्माविष्कार" जाणून घ्यावा. 

सतीचे वाण म्हणजे-
या दोन्ही रचनामध्यें प्रखर ध्येयनिष्ठा आणि धैर्याद्वारें असाध्य वस्तु प्रयत्नपूर्वक साध्य करून घेण्याविषयीं निवेदन आहे.त्यास "सतीचे वाण" म्हटले आहे.हा वाक्प्रचार गुणी,पतिव्रता साध्वी स्त्रीने केलेल्या पराकोटीच्या समर्पण भावनेला उद्देशून आहे.कालांतराने विपर्यास होऊन आपल्या मृत पतीच्या चितेवर स्त्रीने केलेल्ये देहत्यागाच्या प्रथेला सती म्हणत.सतीची विकृत चाल बंद झाली, तथापि असीम त्याग आणि धैर्याची मूर्ती असलेल्या "अत्यंत कठोर महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या कार्यास सतीचे वाण" ही उपमा आजही योजतात.

श्रीतुकोबांच्या जीवनात आपत्तींची एका मागोमाग मालिकाच लागलेली नि त्यामुळे त्यांना संसाराचा वीट येऊन वैराग्य आलें. भगवंताच्या अनन्य भक्तीने आत्मोद्धारने त्यांना साक्षात्कार झाला आणि माझी मज झालीं अनावर वाचा असा "कवित्वस्फूर्तीचा" उमाळा आला.स्वप्रतिभेमुळे सहस्रावधी अभंग रचना झाल्या.अनेक विषयांनी "तुकोबांची गाथा" समृद्ध आहे.त्यात कुणीही यावे,भक्तीच्या सागरात यथेच्छ डुंबावे आणि कृतार्थ व्हावें.हा कवित्वाचा अविष्कार साधासुधा नाहीं,तर अंतरंग हेलावून टाकणारा आहे.

"सतीचे ते घेता वाण" या अभंगामध्यें तुकोबांनी परमार्थाच्या वाटेवर असणार्‍या साधकाला उपदेश केला आहे. स्वतः तुकोबांना या मार्गाने चालत असता अनेकदा लोकनिंदेला सामोरे जावें लागलें.पण कुठल्याही परिस्थितीत घेतलेला वसा टाकला नाहीं. कोणी निंदा कोणी वंदा। आम्हां स्वहिताचा धंदा॥ असें म्हणत आत्म तथा लोककल्याण केलें.

अजून एका अभंगाची आठवण या निमित्ताने होतें, रात्रं दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जग आणि मन॥ यामध्यें दररोज येणार्‍या कठीण प्रसंगाचे निराकरण सारखेच करावे लागते असें ते म्हणतात.मग तो झगडा स्वतःशी असो किंवा बाहेरच्या लोकांशीही.पण देवा, तुझ्या नामस्मरणाच्या जोरावर त्या आघातांना तोंड देत आहोत,असें शेवटी म्हणतात.
ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे, जी साधक वा सामान्य माणसालाही करावी लागते.
तसेच सामर्थ्य अंगी यावे आणि येणार्‍या आपत्तींशी धिटाईने झुंजावे म्हणून "सतीचे ते घेता वाण" या अभंगाकडे पहावे लागते.

सावरकरांची अवस्था याहून नक्कीच भिन्न नव्हती.फरक इतकाच, श्रीतुकोबारायांना विठ्ठलभक्तीची ओढ आणि सावरकरांना देश स्वातंत्र्याची तळमळ.आपल्यामुळें मायदेशी स्वकीयांचा छळ होऊ नयें म्हणून सावरकरांनी १९१०च्या मार्चमध्यें आपणहून लंडनला ब्रिटिश पोलिसांच्या स्वाधीन केलें.आपण उभारलेल्या कर्याची, भारतामातेला बंधमुक्त करण्याच्या स्वप्नाची इतिश्री असें मानून वहिनी सौ.येसूबाईंना "माझें मृत्युपत्र" या नांवाने ब्रिक्स्टनच्या जेल मधून काव्यरुपी पत्र लिहिले.

हे काव्यमय पत्र पंचवीस कडव्यांचे आहे.काव्याच्या सुरुवातीला सावरकर बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा देतात.घरातले आनंददायी वातावरण नि मित्र आप्तेष्टांनी सदा बहरलेले अंगण, वहिनीच्या हातचा अमृततुल्य सैपाक आणि चांदण्यात बसून सगळ्यांनी जेवणाचा घेतलेला आस्वाद याचे वर्णन करतात.

भारताच्या इतिहासाविषयीं उल्लेख करताना श्रीरामचंद्रांचे वनवासातील शौर्य, वीर तानाजी,चितोरगडचा पराक्रम नि मराठा साम्राज्याचे केंद्र शनिवारवाडा तसेंच ज्या राज्यक्रांतीने सावरकर सदा प्रेरित राहिले त्या ऑस्ट्रियन साम्राज्याच्या कचाट्यातून इटलिने केलेल्या सुटकेचा निर्देश करतात.
हिंदुस्थानाला इंग्रजांच्या मगर मिठीतून मुक्त करण्यासाठी अनेक तरुणांना उपदेश करुन बालपणाच्या रम्य काळातही उग्र, दिव्य निजामृत घेऊन झाल्या तदा प्रियकरांसह आणाभाका, त्या सर्व देवि वहिनी स्मरती तुम्हां कां? हे म्हणताना आम्हीही बाजी प्रभूंसारखे अमर होऊ अशी त्यावेळी व्यक्त केलेली भावना लिहितात.

ज्यासाठी आमुचे कुळ आणि इतर क्रांतिकारक सज्ज आहेत, ते हे धर्मार्थ कार्य म्हणून ज्याद्वारे निष्काम कर्मयोगचेच आचरण करीत स्वार्थसुद्धा अगदी जाळून टाकला,त्या या महान् कार्यासाठी पूरेसा काळीही लाभू नयें अशी खंत तात्याराव व्यक्त करतात. स्वातंत्र्यसमराच्या यज्ञवेदीवर सावरकरांचे घर नि धनाबरोबर थोरले बंधु बाबाराव,धाकटे बाळ, वहिनी, पत्नी,पुत्र अशा सगळ्यांच्या आहुत्या पडून आता स्वतःची आहुती अर्पण करीत आहे.अशी अंतःकरण पिळवटणारी भावना व्यक्त केलीं आहे.

तात्याराव आपल्या मातृतुल्य वहिनीच्या चरणांवर मस्तक ठेवून आशीर्वाद मागतात नि भारतीय स्त्रीचे तेज अजूनही माता पार्वती,राजपूती स्त्रीयांसारखे प्रखर आहे,हे व्रत आपण वर्धिष्णु करावे अशी विनंती करतात.
शेवटी "की घेतलें व्रत" हे कडवं अले आहे.(या कडव्याची द्विरुक्ती आहे.)

सावरकरांना आपण कुणा विरुद्ध बंड करत आहोत,कुठल्या प्रकाराचा रोष ओढवून घेत आहोत याची कल्पना नसावी कां? नक्कीच होती.परंतु त्यांची भावना तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण, अशी होती. उचलेले पाऊल सोपे नव्हतेच. चापेकरांच्या हौतात्म्याची घटना त्यांच्या स्वयंभू गुणांना मशालीप्रमाणे प्रज्वलित करणारी ठिणगी ठरली.कुळदेवी अष्टभुजा भवानीसमोर घेतलेली प्रतिज्ञा हा बुद्धिनिष्ठ आणि राष्ट्रभक्तीचा प्रखर निर्णय होता. "बुद्ध्याचि" असा शब्द प्रयोग म्हणूनच अत्यंत सावधतेने सावरकरांनी केला आहे.

तुकोबा अभंगात जे म्हणतात "जरि होय उघडी दृष्टी",म्हणजेच होत असलेल्या तथा होणाऱ्या घटना उघड्या डोळ्यांनी पाहून, आकलन करून "हें व्रत" घेतले."तरी गोष्टी युद्धच्या" याच पद्धतीने सावरकरांनी रणसंग्रामात उडी घेतली.प्रत्यक्ष कार्य केल्याशिवाय म्हणजे "जिवासाठी गौरव वाढे" त्यासाठी नुसती बडबड कामाची नव्हती तर परिणामांना अंगावर झेलण्याची शक्ती होती, "बहू कठीण परिणामी".
अशी तुकोबा आणि तात्याराव सावरकरांच्या रचनेत उत्कट धैर्यशीलतेचे साम्य आहे.

सावरकरांचे हे काव्य मूळातून आणि संपूर्ण वाचलें कीं त्यांची मातृभू हिंदुस्थानाविषयीं आत्यंतिक भक्ती,तळमळ लक्षात येईल.देशसेवा आता आता आकार घेत असताना मध्येंच काळाचा घाला पडून पूजा खंडित व्हावी याचे सावरकरांना अतिव दुःख झालें.पण त्याचीही पूर्वकल्पना असल्यामुळें केवळ कर्मण्येवाधिकारस्ते म्हणत अधिकाधिक कार्य करीत रहाणे हेंच त्यांचे लक्ष्य होते.

सावरकरांनी लहानपणापासून उत्कृष्ट वाङ्मय वाचले, त्याचे मनन केले. कीर्तनाच्या माध्यमातून कितीतरी संतांचे अभंग,पदं ऐकली असतील.तसेच गुरुतुल्य लोकमान्य टिळक आणि शि.म. परांजपे यांचे लेखन,भाषणे सावरकरांच्या सतेज बुद्धीने आत्मसात केलीं.त्या सगळ्याचा अर्क आणि त्यातून जन्मजात प्रज्ञा याचा परिपाक त्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त झाला.

दोघांच्या काव्यात आशय साम्य दिसण्याचे कारण मला भगवद्गीतेत आलेल्या एका अतिशय महत्वाच्या वचनाचे स्मरण देते. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः (गीता ३:११) म्हणजे,श्रेष्ठ पुरुष जसें आचरण करतो तसेच इतर जन आचरण करतात. या भगवद्वचनाचे उत्कृष्ट उदाहरण अशा महान् लोकोत्तर पुरुषांमध्यें दिसणार नाहीं तर कुठें!

श्रीतुकोबांनी तपश्चर्येच्या बळावर पाखंडांचे खंडन केलें, तर स्वातंत्र्यवीरांनी आत्मनिष्ठेने प्रतिभेच्या जोरावर लोकांमध्यें स्वातंत्र्याचे महत्व आपल्या कर्माद्वारें दाखवून दिले.
विषय भिन्न भासले तरी दोघांच्या भक्तीमध्यें अनन्यभावाचे बळकट प्रखर सूत्र आहे.त्या भक्तीची देवाने म्हणा वा नियतीने म्हणा पुरेपुर परिक्षाही घेतली.त्यातून ताऊन सुलाखून सुवर्णाप्रमाणें त्यांचे जीवन लखलखीत झालें.त्याचे तेज आजही कमी झालें नाहीं,ना होणार.हेच त्यांनी हाती घेतलेल्या सतीच्या वाणाचे महात्म्य वा कार्यसिद्धता होय.

या दोन्ही रचना लक्षपूर्वक वाचल्या की आपल्याला त्यातला "वीररस" सहज नजरेस येईल. तुकोबा जितके सौम्य,मवाळ, कनवाळू होते तितकेच कठोरही.या अभंगात साधकाला उपदेश करताना शब्दांवर नेमकेपणाने जोर देऊनच विषय मांडला आहे.सावरकर तर धगधगते यज्ञकुंडच. आपली प्रतिज्ञा त्यानी आत्मविश्वासपूर्वक आणि अधिकार वाणीने काव्यात प्रकट केली आहे.

  तुका म्हणे अंगा येता। तरी सत्ता धैर्याची॥ आणि म्हणूनच बुद्ध्याचि वाण धरिलें करीं हें सतीचें.
                       

अनिकेत घिवलीकर. दादर,मुंबई. 
ज्येष्ठ कृ १४. ८ जुलै २०२१
☎️ 9769681999.
📧 aniket.ghivalikar@gmail.com 

Comments

Unknown said…
सुंदर
धन्यवाद🚩
Thankyou very much 🚩🙌🏻
Anonymous said…
खूप सुंदर👌🏻

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १