आठवण बाबूजींची
शिवाजी पार्कचे शंकर निवास.जात येता अनेकदा पहात नि मनांत विचार येई कधी या असामान्य व्यक्तिमत्वाची भेट होईल का! एके दिवशी ते धाडस करून जिने चढून वर गेलो.दारावरची सुधीर फडके अशी सुबक पद्धतीने रंगवलेली पाटी वाचून काहीं क्षण बेल वाजवण्याचा धीर होत नव्हता.मनाचा हिय्या करून बेल वाजवली. बाबूजींच्या पत्नी सौ.ललिताबाई फडके उर्फ माई यांनी दार उघडून विचारणा केली, कोण आपण, काय काम? माझं वय सोळा आणि थेट अहो-जाहो! मी ओशाळलोच.काम.. म्हटलं मी अनिकेत घिवलीकर,शिवाजी पार्कलाच रहतो,मला बाबूजींना भेटायचे आहे. बरं म्हणाल्या. पण बाबूजी घरी नाहींत तासा- दीड तासाने येतील तेव्हा या.मी नमस्कार करून परत घर आलो.पण आज निश्चयच केलेला बाबूजींना भेटायचे.
संध्याकाळी पुन्हा गेलो.बाबूजी अजून आले नव्हते.पण माईंनी एव्हाना बाबूजी येतील म्हणत मला घरात घेतले.घरात प्रवेश करताच बाबूजींचा मोठा फोटो दिसला आणि मनोमन नमस्कार केला.पोस्टवर जो फोटो लावला आहे तोच.माईंना माझा परिचय करून देत असताना दिवाणखान्यातल्या चारही भिंतीवरचे रॅक स्मृतीचिन्हांनी गच्च भरलेले पाहून थक्क झालो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि माई म्हणाल्या हं,आले बाबूजी.माझ्या पोटात गोळा आला!
बालपणापासून ज्यांची गाणी मनोभावे ऐकत मोठा झालो त्या सुरश्रीचे प्रत्यक्ष दर्शन होणार होते.आनंद,दडपण वगैरे संमिश्र भावनांनी कल्लोळ केला होता.
बाबूजी आले आणि मी पायावर डोकं ठेवला.मला खुणेनेच बैस म्हणाले.डोळे बंद करून डावे मनगट कपाळावर ठेवून तेही काहीं सेकंद स्वस्थ बसले आणि एकदम ताजेतवाने होऊन माझ्याशी बोलू लागले.आपण कोण,का आलात,काय करता वगैरे.मी काय मोठं सांगणार होतो म्हणा! मी अमुक अमुक इत्यादी जुजबी उत्तर दिली.मुख्य म्हणजे "आपल्याला भेटण्याची कैक वर्षांपासून फार इच्छा होती म्हणून आलो" असें सांगितले.ते सुखद हसले.मलाही हायसे वाटले.
बाबूजींच्या डोळ्यावरून माझी नजर हटत नव्हती.टपोरे तपकिरी रंगाचे पाणीदार डोळे आणि त्यातून झळाळणारे तपश्चर्येचे तेज.मी हरखून गेलेलो.
वास्तविक बाबूजी तेव्हा "वीर सावरकर" चित्रपटाच्या अंतिम कामात खूप व्यस्थ होते.वय झाले होते केवळ ८२! तरी कसलाही कंटाळा नाहीं,अगर तत्सम थकवाही मला जाणवत नव्हता.उत्साहाला सीमा नव्हती.आणि या व्यापातून ते घरी आले तर मी फक्त भेटण्याकरीत म्हणून गेलो असतानाही माझ्याशी इतक्या आपुलकीने बोलावे, विचारपूस करावी!माझ्यासाठी तो आनंदातून मोठा क्षण होता.
माईंनी मग चहा आणला.मी थोडेफार तबल्याचे धडे घेतो सांगितले.मराठी भावसंगीताच्या पंडिताला मी तबला वाजवतो हे सांगणे सुद्धा किती ओंगळवाणे आहे हे ते सांगतानाही मला समजत होते.
त्यानंतर मला कधी वेळ मिळाला की सहज बाबूजींना भेटायला जात होतो.काहीं महिन्यातच सावरकर चित्रपट प्रदर्शित झाला.स्वातंत्र्यवीर सावरकर हे बाबूजींचे दैवत.अपार कष्टातून बाबूजींनी हा चित्रपट तयार केला आणि त्यांची स्वप्नपूर्ती झालेली.तो पूर्ण होताच 'आता देवाने मला खुशाल नेले तरी चालेल"असें समाधानाचे उद्गार काढले होते.
लहानपणी आजोळी गेलो की बाबूजींच्या "देहाची तिजोरी" या कॅसेटची किती पारायणे केलीं असतील याचे मोजमाप नाहीं.मला संगीताची गोडी तिथूनच लागली. बाबूजींचा आवाज हा आपल्या घरातलाच कोणा व्यक्तीचा आवाज असावा असेच मला वाटे.त्यामुळे केवळ त्या आर्त स्वारांच्याच प्रेमात पडलो नाहीं तर त्या व्यक्तिमत्वाबद्दल आत्मीयता निर्माण झाली.त्यावेळी आपण ह्यांना कधी भेटू किंवा माझ्या घर जवळच ते रहातात हेही माहित नव्हते. गीत रामायण खूप नंतर ऐकले आणि त्या उत्तुंग शिखराकडे पाहून थक्क झालो.
एकदा असाच सकाळी भेटायला गेलो असता श्रीधर काका रेकॉर्डिंगसाठी जात होते.बाबूजींनी त्यांना मलाही व्हिनसच्या स्टुडिओमध्यें घेऊन जाण्यास सांगितले.तेव्हां श्रीधर काकांचे "घर असावे घरासारखे" या गाण्याचे रेकॉर्डिंग होत होतें.पहिल्यांदा रेकॉर्डिंग वगैरे तंत्र पहात होतो.तोही अनुभव छान होता. बाबूजींमुळेच ते शक्य झाले हे नक्की.
त्यावेळी आमच्याकडे कसले मोबाईल आणि काय!त्यामुळे आतासारखे सेल्फी वगैरे भानगड नव्हती.आणि असता तरी बाबुजींबरोबर सेल्फी काढण्याचे धाडसही झालें नसते. कधी कॅमेरा घेऊन साधा फोटो काढावा असेही मनांत आले नाहीं. एक आठवण राहिली असती हें खरें पण मनाच्या पटलावर वर्षभराच्या ज्या आठवणी कोरल्या आहेत,त्याची सर क्वचितच असती.परंतु बाबूजींची स्वाक्षरी मी मिळवू शकलो,हेही नसे थोडके! या जन्मात मला त्यांना भेटता आले हे माझे भाग्य होय.


Comments
पण माझा मित्र त्यना भेटला होता... Lucky chap ...
कसे वर्णन करू, कशी दाद देऊ. वाचताना सारे शब्द त्या आनंदाच्या भरात वाहून गेले एवढेच म्हणेन.