श्रीरामानुजीय सांप्रदायी विष्णुसहस्रनामभाष्य
श्रीमन्महाभारतांतर्गत श्रीविष्णुसहस्रनामाचे महात्म्य भक्तांच्या मनांत अधिक दृढ करण्यासाठी आणि परमेश्वराच्या असीम गुणैश्वर्याचे दर्शन घडविण्यासाठी आपआपल्या परंपरेप्रमाणें थोर आचार्यांनी त्यावर भाष्यें केलीं. श्रीमच्छंकराचार्य हें सहस्रनामाचे पहिलें भाष्यकार. त्यानंतर अनेक शतकांनी रामानुजीय सांप्रदायातल्या आलवार संत स्वामी श्रीपराशर भट्ट यांनी सहस्रनामावर भाष्य लिहिले ते भगवद्गुणदर्पण या नांवाने ओळखले जाते.
श्रीरंगम् येथली श्रीरंगनाथस्वामी म्हणजेच महाविष्णुचे तीर्थस्थान. दक्षिणेतले प्रमुख वैष्णव आचार्य श्रीमद्रामानुजाचार्य यांनी याच क्षेत्री राहून आपला विशिष्टाद्वैती श्रीसांप्रदाय प्रचारात आणला.नि भगवान् श्रीरंगनाथ वासुदेव हे प्रमुख आराध्य दैवत मानले. या परंपरेतले १२व्या शतकात पराशर भट्ट जन्मले.
अल्पायुषी असूनही श्रीरंगनाथाची पराशरांनी केलेंली वाङ्मय सेवा उदंड आहे. अष्टश्लोकी, श्रीरंगराजस्तवन,क्रियादीप, भगवद्गुणदर्पण, गुणरत्नकोष, तिरुमंजन कवि, कैसिकामहात्म्य, इत्यादी संस्कृत आणि तमिळ भाषेत अनेक स्तोत्रे, भाष्ये रचिली. लेखनाचा काहीं भाग कालौघात लुप्त झाला.
श्रीरामानुजाचार्यांनीही विष्णुसहस्रनामावर भाष्य लिहायला घेतले होते, परंतु ते अपूर्ण राहिले. मुख्य आचार्यांकडून राहून गेलेलें कार्य दुसऱ्या पिढीतलें अनुयायी पराशर भट्ट यांनी ते समर्थपणें कळसास पोचविलें.अशी एक कथा मला समजली. रामानुजीय सांप्रदायी सिद्धांत म्हणजे ब्रह्म निर्गुण नसून सहस्रावधी मंगलगुणयुक्त असें आहे. तसेंच भगवान् श्रीविष्णुचे सर्वश्रेष्ठत्व हे होय.
हे भाष्य कां लिहावे,प्रेरणेचे कारण, याचें उत्तर स्वतः पराशरांनी मंगलाचरणाच्या श्लोकांत उद्धृत केले आहे-
श्रीरङ्गेश्वरकारितो विवृणुते नामसहस्रं हरेः।- श्रीरंगनाथाला प्रसन्न करण्यासाठी हे सहस्रनाम भाष्याद्वारे विवरण करतो. असें अत्यंत सश्रद्ध अंतःकरणानें आणि शरणागत बुद्धीनें भाष्याची सुरुवात करतात.श्रीनारायण आणि श्रीव्यासांना नमन करून भगवंत आणि भक्तांमधले स्वतः एक 'मध्यस्थ' अशा नम्र भूमिका स्वीकारतात.
या भाष्यामध्यें "तत्त्व","हित","पुरुषार्थ" अनुक्रमे सत्य, उपयुक्तता आणि मानवाचे साध्य वस्तु( धर्मार्थकाममोक्ष) या प्रमेयाधारें सांप्रदायिक भाष्य करतात.
श्रीवैष्णव मतानुसार भाष्यकारांनी परमात्म्याचे "सगुणत्व" प्रकाशित करून विशिष्टाद्वैती सांप्रदायाचे "शरीर आत्मभाव" याचे जगत् आणि परमात्मा याचा संबंध, मुक्ती, सर्वाधिश परमेश्वर आणि श्रीरंगनाथस्वामी भगवान् विष्णुशी अतूट नाते या दृष्टीने भाष्य लिहिले.
सहस्रनामात विशिष्टाद्वैत दर्शनानुसार ईश्वराचें अर्थपञ्चकविज्ञान सिद्धान्त मांडतात. त्याप्रमाणें भगवंताचे पांच रुप आहे-
१} पररुप - ह्यात परमात्म्याचे गुढतत्त्व,"पलीकडील" श्रेष्ठत्वाची प्रचीती येणाऱ्या नामांचे वर्गीकरण.ते श्लोक क्रमांक १ ते १२२ पर्यंत केलें. उदा. विश्वम्, अव्यय, सर्व, अनादिनिधन,स्थविष्ठ,ईश्वर,अज, इत्यादी.
२} व्यूहरुप - यामध्यें परब्रह्माचे रूप जाणण्यासाठी एक तार्किक रचन यांत अभिप्रेत आहे.ते १२३ ते१४६. उदा- वेद,लोकाध्यक्ष, धर्माध्यक्ष,चतुरात्मा,भोक्ता,इत्यादी.
३} विभवरूप - म्हणजे,विष्णु, वामन, प्रांशु,पद्मनाभ, नृसिंह, कृष्ण, कूर्म अशा नामांतून भगवंताचे ऐश्वर्य,सामर्थ्य, आणि ४थे अर्चावतार सुद्धा प्रकट होतात.
५} अन्तर्यामीरुप - या मध्यें विश्वात्मक पदांचा समावेश केला आहे.
स्वामी पराशर भट्टांची बुद्धीमत्ता इतकी विलक्षण होती की,भगवंताच्या नामाची व्याख्या वेदादी उपनिषदे, महाभारत, भगवद्गीता, रामायण, पुराणे यांचा आधार तर घेतलाच. त्याहून वैष्णवांचे पंचरात्र आगमग्रंथ, व्याकरणप्रकरणे याचाही यथासांग उपयोग केला नि प्रत्येक नामांचा एकमेकांशी असलेली संलग्नता, काहीं पदांचे समुह करून अवतार वर्णनात्मक नामांचे इतक्या बारकाईनें संशोधन करुन ग्रंथ सिद्ध केला की, पाहून थक्क व्हायला होतें. ते करीत असताना कुठेही नामांचा क्रम सोडलेला नाहीं.
भाष्यामध्यें पराशरांची श्रीनारायणाप्रतीची सगुण भक्ती पदोपदी पाहू शकतो.
भाष्याच्या सुरुवातीस श्रीपराशरांनी मंगलाचरणानंतर सहस्रनामाची महती कथन करताना एक चातुर्यता प्रकट केलीं.
युधिष्ठीर महाराजांनी जसे पितामह भीष्माचार्यांना सहस्रनामाच्या आधी सहा प्रश्न विचारलें- कोणाता देव श्रेष्ठ, त्याचें प्राप्तव्य स्थान कोणते, त्याच्या पूजन-स्तवनानें कोणते फल मिळते,श्रेष्ठ धर्म कोणता,कुठला जप आणि संसार सागरातून मुक्ती कशी मिळते .आणि मग भीष्माचार्य एक एक प्रश्न उलगडतात. तेंच पालुपद धरुन हे विष्णुसहस्रनाम लाभदायक कां, हें श्रीपराशरांनी आपल्या भाष्याच्या हेतुचेंही "सहा प्रकाराने" निवेदन केलें.
महाभारतसारस्वात् ऋषिभिः परिगानतः।
वेदाचार्यसमाहारात् भीष्मोत्कृष्टमतत्वतः॥
परिग्रहातिशयतो गीताद्यैकार्थ्यतश्च नः।
सहस्रनाम्नामध्याय उपादेयतमो मतः॥
☆महाभारतसारस्वात् - महाभारतास पांचवा वेद मानला आहे. यदिहास्ति तदन्यत्र।यन्नेहास्ति न तत् क्वचित्॥ (म.भा.१:६२:५३) - महाभारतता आहे ते अन्यत्र सापडेल. परंतु जे विषय महाभारतात नाहींत,तें इतर ठिकाणीं सांपडणें कठीण. असें महाभारताचे महात्म्य आहे.आणि त्यातच हे सहस्रनाम असल्यामुळे भगवंताच्या नामाचें सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण झाले आहे.असें लौकिक अभ्युदय आणि निःश्रेयसाची कामना करणाऱ्यांसाठी विष्णुसहस्रनाम सर्वाधिक उपकारक आहे.
☆ऋषिभिः परिगानतः - अनेक ऋषीगणांनी ज्या परमेश्वरी गुणांची धारणा केली, संरक्षित केलें तेंच प्रतिपादन या भाष्यात आहे.
☆वेदाचार्यसमाहारात् - वेदाचार्य कृष्णद्वैपायन व्यास हे प्रत्यक्ष वेदमूर्ती. वेद, ब्रह्मसूत्र याचे गहन ज्ञान महाभारतामध्यें सहजरित्या प्रतिपादन करून ऋषींनी भगवंताची केलेली स्तुती श्रीव्यासांनी एकत्रितपणे अनुशासनपर्वात त्याची स्थापना केल्येनें समस्त ऋषींना कृतकृत्य केलें. यास्तव बादरायण व्यासांची महती.
☆भीष्मोत्कृष्टमतत्वतः - पितामह भीष्मांच्या मुखाने प्रत्यक्ष भगवान् श्रीनारायणाच्या साक्षीनें आणि आशीर्वादानें या सहस्रनामाचे प्रतिपादन झाले.त्या गंगापुत्राचे अधिकार सर्वमान्य आहे.
☆परिग्रहातिशयतः - विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे सर्वत्र अत्याधिक समादार केला आहे. आयुर्वेदात महर्षी चरक यांनी व्याधी,रोगग्रस्तांना सहस्रनामाचा पाठ अवश्य सांगितला आहे.
ज्योतिष विद्येतही तो मान्य केला आहे. ग्रहादी शांतीसाठीही समस्रनामजपाचे महत्त्व आहे.
लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही स्थितीत उपकारक अशी ही सहस्रनामाची ख्याती वर्णिलेली आहे.
अतःएव हे स्तोत्र कुळ,गोत्र,वर्ण,धर्म,आचार आदी कुठल्याही वस्तु आड न येता परम "परिग्रहणशील" होय.
☆गीताद्यैकार्थ्य - प्रत्येक नामाला भगवद्गीतेमध्यें संलग्न श्लोक मिळतो. गीता श्लोकाशिवाय भाष्य हे अपूर्णच वाटते.कारण तसा भगवद्गीतेचा महिमा आहे. त्यामुळें गीता सिद्धान्त अवश्यक असून सहस्रनामाचे महात्म्य विवरणास उपकारक होय.
या सहा हेतुंच्या आधारे पराशर भट्ट या भाष्यात वासुदेव भक्ती आणि कल्याण असें भगवद्गुण प्रतिबिंबित करतात.काहीं श्लोक हे संपूर्णतः विष्णोवतारावरच्या महात्म्याचे आढळतात.त्या नामांवरचे विवरण करताना त्या त्या अवताराच्या गुणांचे वर्णन करताना पराशांची भक्ती आणि मूळ रचनाकार भगवान् श्रीव्यासांच्या दैवी प्रतिभेची स्तुती कशी करावी याचा प्रश्न पडतो.
उदाहरणार्थ, अमृत्युः सर्वदृक सिंहः संधाता संधिमान् स्थिरः।
अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा॥
हा संपूर्ण श्लोक नृसिंहावताराशी निगडीत आहे.
रामो विरामो विरजो मार्गो नयो नयोऽनयः।
वीरः शक्तिमतांश्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः॥ ही नामे श्रीरामावताराचे महात्म्य सांगणारी आहेत.
अशी आवश्यक तेथें वर्गवारी पराशरभाष्येत केलीं आहेत.
मला शक्य तितक्या सोप्या पद्धतीने पराशरभाष्याचा हा केवळ परिचयात्मक लेख आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.आणि खरंच सांगतो हे भाष्याचा तसें सोपे नाहीं.दक्षिणेत या भाष्याचा खूप अभ्यास झाला आहे,होत आहे.शंभर टक्के खात्री नसली तरी मला वाटत नाहीं आजपर्यंत मराठीत ह्या भाष्याचे साधे अनुवादही केलें असेल.माझ्या सहस्रनामाच्या निरुपणांमध्यें पराशरांच्या दृष्टीकोनाचा अंतर्भाव करीत असतो आणि माझे मलाच विष्णुसहस्रनामाचे नवनवे पैलू दिसतात.
इंटरनेटवर भगवद्गुणदर्पणाचे पीडीएफ उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी ते अवश्य पहावे.
लेखाचा समारोप सहस्रनाम, त्याचें भाष्ये इत्यादींचा मतितार्थ स्वामी पराशर भट्ट यांच्याच "अष्टश्लोकी" स्तोत्राच्या शेवटच्या चरणाच्या आधारे करणे उचित होईल.
एतज्ज्ञानमुपेयुषो मम् पुनस्सर्वापराधक्षयम्
कर्तासीति दृदोस्मि ते तु चरमं वाक्यं स्मरन् सारथे:॥
(पण) तू सांगितलेलें ज्ञान मी मिळवल्यावर माझ्या सर्व अपराधांचा नाश तूं करणार आहेस असें तुझें सारथ्याचे (कृष्ण) गीतेतलें अखेरचे वचन (मामेकं शरणं व्रज) आठवून मी (आता) आश्वस्त झालो आहे.
✍अनिकेत घिवलीकर, मुंबई.
☎️ 9769681999

Comments
Great work