माझे देहू दर्शन

 


               तुका म्हणे आतां जाली हेचि भेट। उरल्या त्या गोष्टी बोलावया॥

मकरसंक्रांतीला रात्री आळंदीला श्रीज्ञानोबांचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी अक्षयबरोबर श्रीतुकोबारायांचे दर्शन घेण्यास देहूला गेलो. खरंतर देहूला जायचे ठरलें नव्हते. पण आले देवाजीच्या मना। तेथे कुणाचे चालेना॥ असेंच झाले. अर्ध्या तासाचं ते अंतर.मग वेळ का दवडता? एक्टिवा घेऊन निघालोच.

गप्पा गोष्टी करीत गांवात आलो आणि अक्षय म्हणाला, हं, आलं बरं का देहू.हेच देहू गांव! बास,माझी बोलती एकदम बंद झाली नि मन चारशे वर्ष मागे गेलं.मनच ते ! पुढेतरी जाईल नाहींतर मागे.
अगदी प्रभात फिल्म कंपनीच्या संत तुकाराम चित्रपटातलं ब्लॅक ॲन्ड व्हाईट दृष्य डोळ्यासमोर आले.जी भूमी श्रीतुकाराम महाराजांसारख्या परम भगवद्रूपी विभूतीच्या सहवासाने पवित्र झाली ,तिथे माझे पाय लागावें हा देहधर्म असला तरी अंतःकरणात पादस्पर्शं क्षमस्व मे हा भाव जागृत होता.

संस्कृतभाषेनुसार "देहू" या शब्दाची मी फोड अशी केली. पहिले अक्षर "दे" म्हणजे प्रेमाने काळजी घेणें,माया करणें. आणि "हू" याचा अर्थ "आश्चर्याने निघणारा उद्गार".ज्याच्या संवेदनशील मनातून भगवंतासाठी भक्तीचा एक भावोत्कट उद्गार जरी निघाला,त्याला तुकोबा सदैव प्रेमाने नेमका राजमार्ग दाखवतात ते देहू होय!  व्याकरणाचा भाग बाजूला ठेवून भाव तेवढा घ्यावा.

पुढे जात जात मोठी चिरेबंद भिंत आणि महाद्वारावर गरुडारूड जगद्गुरु श्रीतुकाराम महाराजांची मुर्ती दिसली. आहाहा! शब्दातीत सगळे!!
लहानपणापासून दर आषाढीवारीला पादुका प्रस्थानाचे क्षणचित्रे पहात आलो.हाच तो महाद्वार,देऊळवाडा, आज केवळ पहात नव्हतो तर, हृदयाच्या संपुष्टात साठवून ठेवत होतो.

प्रथम तुकोबांच्या रहात्या घराच्या दिशेन गेलो.पुन्हा काळजात घालमेल सुरू.समाधान एवढेच होते कीं या जन्मांत ह्या परम पवित्र स्थानांचे दर्शन घडत आहे.त्या वाड्यात तुकोबांची विठ्ठलस्वरूपामध्यें कमरेवर दोन्ही हात ठेवलेली काळ्या पाषाणातली उभी मुर्ती विराजमान आहे.तिथे दंडवत घालून पुढे गेलो.

बरें झालें देवा बाईल कर्कशा। बरी हे दुर्दशा जनामध्यें॥ असें परमार्थासाठी योग्य दान पदरी पाडले म्हणत,थोर पतिव्रता साध्वी जिजाईविषयीं लिहिणारे तुकोबा, परंतु योग्यसमयीं तिस तुका म्हणे तरी तुझा माझा संग।घडेल वियोग कधीं नव्हे॥ असा पूर्ण बोध दिला. त्या माऊलीच्या घरी गेलो.त्या वाड्यात मातुश्री जिजाईंची रखुमाईस्वरूपांत कटिवर हात ठेवलेली पाषाणातली सुबक मुर्ती आहे.तिच्या मंगल पवित्र पाऊलांवर डोकं ठेवलं नि मग तुकोबांचे आठवें पूर्वज विश्वंभरबावा यांचे दर्शन घेतले. मोडकळीस आलेलं ते घर पाहून खूप वाईट वाटलं. आपल्याकडे ऐतिहासिक वास्तुंविषयीं उदासिनता कधी जाईल देवांस ठाऊक!

परिवारातील सत्पुरुषांचे दर्शन घेऊन आता महाद्वारातून मुख्य मंदिरात आलो.हात-पाय धुवून श्रीपाण्डुरङ्गाच्या दर्शनासाठी गेलो.
देऊळवाड्यात ज्या श्रीरखमाई -श्रीपाण्डुरङ्गाची मुर्ती विराजमान आहेत त्या विश्वंभरबावांनी स्थापिले.त्या किती पुरात असाव्या?तर तुकोबांपासून आठ पिढ्या आधी,प्रत्यक्ष तुकोबांनंतर आजपर्यंत आपण दर्शन घेऊन धन्य होत आहोत,इतक्या जुन्या आहेत.

श्रीविठ्ठलाचे दर्शन होताच सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा अभंग न आठवला तरच नवल होते!
वारीचा प्रस्थान सोहळ्यात किंवा बीजेचा उत्सवात मुंगीलाही आत शिरता येऊ नयें असे सदा गजबजलेलं देवालय,कोविडमुळे गर्दी नसल्याने माणसं बेताचीच होती.त्यामुळें मंदिर परिसर नीट पहाता आला. रामाचं देवालय, शिळामंदिर, सभा मंडपात असलेली तुकोबांची पालखी,समोर असलेला गरुड,अभंगांच्या प्रती ठेवलेली खोली, हे सगळे दर्शन करताना मनांत तृप्तीचा भाव होता.ज्या थोर पुरूषाने आतां तरीं पुढें हाचि उपदेश। नका करुं नाश आयुष्याचा॥ असें म्हणत आपल्या बरोबर लोकांनाही सन्मार्ग दाखविला,त्यांच्या मालकीच्या स्थानी उभा असताना मला लाजल्याहून लाज येत होती,एका बाजूला. नि दुसऱ्या बाजूला असा विचार कीं, काहींतरी माझे काहीतरी सत्कृत्य असावें,नाहींतर संतजनांचे दर्शन असे  सुखासुखी कैसे!

बाहेरच एका दुकानात माला पाहिजे असलेली  श्री.नेऊरगांवकरांनी केलेंली सार्थ गाथा तुकोबांच्या वंशजांकडून मिळाली नि "रखुमाईच्या पतीस" दंडवत घालून वाड्याच्या बाहेर पडलो.

कसं आहे, हा सगळा सोहळा लिहिणे म्हणजे प्रेमपत्र लिहिण्यासारखेच होय! कारण भावना इतक्या नाजूक आहेत कीं शब्दांच्या पाकळ्यांना टंकरुपी काटे लागावे आणि काहींच लिहिता येत नाहीं म्हणून कागद किंवा नोटपॅड मोकळाच रहावा!! तरीं, एका पामराची शब्दरुपी कुरवंडी तुकोबा स्वीकारतील अशी विनंती नक्कीच करु शकतो.

वाड्यातून मग गेलो तुकोबांच्या सदेह वैकुंठ गमन स्थली. फाल्गुन कृ. द्वितीया, शके १५७१. तुका झालासे संतुष्ट। घरा आले वैकुंठपीठ॥ अशा असीम समाधानी चित्ताने तुकोबा प्रयाण करते झाले. त्यांना नेण्यासाठी प्रत्यक्ष "मेघश्याम हरि" येतो नि कुडीसह महाराज परमेश्वरात लीन पावतात.सगळे अद्भुत आहे.
त्याजागी उंच मंदिर उभारले आहे नि आत वीणा- चिपळ्या घेतलेली तुकोबांच्या सुबक मुर्तीची प्रतिष्ठापना केलीं आहे.दुपारची शांतता आणि लोकांची वर्दळ नव्हती.अक्षय सगळ्या खाणाखुणा सांगत होता.तुकोबा सदेह वैकुंठ गमन करते वेळी त्यांच्या पत्नीची,मुलांची नि तिथे असलेल्या देहूकर भक्तमंडळींची काय अवस्था झाली असेल,याविचाराने मनाचा एक कवाड भावुक झालेला...

नंतर इंद्रायणीच्या घाटावर आलो. तुकोबांची महती जाणू न शकणारे नि सतत दुस्वास करणाऱ्यांनी अभंगांची गाथा इंद्रायणीत बुडवायला लावली.तरी त्यांच्यावर राग न धरता केवळ ब्रह्ममुर्तींची आज्ञा मानून महाराजांनी त्या वह्यांच्या बाडात पाषाण घालून वस्त्राने लपेटून डोहात सोडून दिल्या. गाथा बुडविल्यानंतर १३ दिवस तुकोबांनी अन्न पाण्याचा त्याग करून काठावरच्या दगडावर कष्टी होऊन पडून राहिले.अशा तळमळणाऱ्या मनःस्थितीत १९ अभंग मुखातून बाहेर पडलेले.

त्याच शिळेभोवती लहानसे स्मृतीस्थळ उभारले आहे.नंतरच्या काळात त्यातल्याच पाषाणांतला भाग देऊळवाड्यात आणून शिळामंदिर स्थापले. त्या शिळेवर डोकं ठेऊन नमस्कार करताना तुकोबांचा प्रत्यक्ष आशीर्वाद घेतल्यासारखेच होत होते.
त्या घाटावर तुकोबांच्या चरित्राविषयीं काहीं वेळ चिंतन करून, इंद्रायणीचे दोन थेंब प्रोक्षण करीत,नमस्कार करुन माघारी फिरलो.तरी तुकोबांची आवडती स्थाने भामनाथ,गोराडा,भंडारा डोंगर हे पहायचे राहिले.

आपल्या आवडत्या देवतेचे दर्शन घेण्यास कुठल्या तीर्थाला अगर संतांच्या समाधीस्थळी गेलो की आपसूक डोळ्यातून पाणी येतं, अनामिक चैतन्यमय शक्तीचा अनुभव येतो.असें का होते याचं उत्तर मुद्दाम शोधायला जाऊ नयें असे मला वाटते.जे होते ते निर्मळ अंतःकरणाने अनुभवायचे.आपल्या त्या विभूतीठायीं असलेली निरपेक्ष आणि परम श्रद्धायुक्त भक्ती अशा संमिश्र भावना दाटुन येतात.त्याची परिणीतीही ह्याला म्हणू शकतात.प्रत्येकाचा अनुभव निराळा असेल.

"विठ्ठल विठ्ठल", "ज्ञानोबा माऊली तुकाराम" ह्या शब्दांचे नाद कानी पडताच कुठल्या सश्रद्ध मराठी माणसाच्या डोळ्यासमोर पंढरीचे सावळे परब्रह्म उभे रहात नाहीं?हृदयांत कालवाकालवं होत नाहीं?? किंवा "गणपती बाप्पा मोरया" आणि "छत्रपती शिवाजी महाराज की जय" ही गर्जना करताना "मोरया" आणि "जय" आपहून तोंडाबाहेर न पडले तर तो मराठी माणूसच काय म्हणायचा! हे कुणाला शिकवावे लागतच नाहीं.कारण ते सगळं आपल्या रक्तातच भिंनले आहे. ऋषी,आचार्य,संत यांचे संस्कार आपल्या डीएनए मध्यें उतरले आहेत.ते प्रसंगी उत्स्फूर्तपणे बाहेर येतं.

आळंदी आणि देहू हे अध्यात्माचे खऱ्या अर्थाने "मुक्त विद्यापीठ" आहेत.यात किन्तु नाहीं.आवश्यकता आहे ती श्रद्धा आणि निष्ठेची.
आळंदी,देहू आणि नंतर ज्ञानोबांचे धाकटे बंधु श्रीसोपानकाकांच्या समाधीचे दर्शन घेण्यास सासवडला गेलो.
ही क्षेत्रे अशी आहेत कीं जिथे जोपर्यंत अंतःकरणपूर्वक शरणागत होत नाहींत, तोपर्यंत या देहाची सार्थकता झाली असें यःकश्चित म्हणता येणार नाहीं.

तुकोबा वैकुंठ गमनेच्या वेळी म्हणतात तुका म्हणे आतां जाली हेचि भेट। म्हणजे,आता ही आपली शेवटची भेट आहे.पण तसं मी न म्हणता, हा दर्शनाचा योग वारंवार यावा अशीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.परतीच्या वेळी लतादीदींनी गायलेला कन्या सासुऱ्यासी जाये। मागें परतोनी पाहे॥ हा तुकोबांचा अभंग कानांत गूंजत होता...

- अनिकेत घिवलीकर, मुंबई. जानेवारी २०२१

Comments

Unknown said…
Apratim..itke sundar lihile aahes ki ek chan aadhyatmik safar ghadvun aanlis🙏
धन्यवाद😊🚩
Unknown said…
सुंदर लेख
धन्यवाद🚩😊🙌🏻
अप्रतिम हृदयस्पर्शी लिखाण! आपणही ते सगळं प्रत्यक्ष अनुभवतोय असं वाटलं. भक्तिमार्ग हेच मोक्षाचे साधन आहे अशी अनुभूती देणारा लेख आहे हा! अभिनंदन अनिकेत भाऊ 👏🏻👏🏻
अनेक आभार 🙏🏻🚩
ज्याच्या संवेदनशील मनातून भगवंतासाठी भक्तीचा एक भावोत्कट उद्गार जरी निघाला,त्याला तुकोबा सदैव प्रेमाने नेमका राजमार्ग दाखवतात ते देहू होय!....

अप्रतीम हो पंत...
बुवा, खूप खूप आभार🙏🏻🚩😊

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १