माझी पहिली आळंदी यात्रा

 

             

                          कोण भाग्याचे संतुष्ट। जेथें प्रगटलें वैकुंठ।
                              विठ्ठल नामें पूर्ण। आळंकापुरीसी॥     - श्रीनामदेवराय


योग्य वेळ आल्याशिवाय काहींही होत नाहीं. आणि जेव्हा तो योग येतो,त्याचा आनंद केवळ अवर्णनीय असतो.त्यातही आपल्या आवडती गोष्ट असली की गगन ठेंगणे होते,असा अनेकांचा अनुभव असणार.

असाच अनुभव मला वर्षाच्या सुरुवातीलाच आला. अनेक वर्षांपासून देहू-आळंदी ही दोन तीर्थक्षेत्रं करावीं ही मनीषा होती. असंख्य वेळा पुण्याला जाऊनहीं माझी पाऊलें त्या दिशेने वळली नाहीं हें खरोखरी दुर्दैवच होय. पण हो, कुठल्या गोष्टीची वेळ ठरलेलीं असते.यात माझ्या मनांत शंका नाहीं.

यंदाच्या मकरसंक्रांतीचा पर्वकाल.आळंदीचा रस्ता धरला आणि संध्याकाळी इंद्रायणीवरच्या पुलावरून गांवात जाताना हृदय धडधडू लागले! तो घाट,त्यावर अनेक सत्पुरुषांच्या समाधी आणि मागे दिसणारा देवळाचा कळस... आहाहा!!!... काळजात भावनांचा जो "काला" चाललेला ते मला शब्दांत सांगताच येत नाहीं.

गुरुवार असल्याने माऊली श्रीज्ञानेश्वर महाराजांची मंदिर प्रदक्षिणेची पालखी असते.तो सोहळा पहायचा असं ठरवलेंले.मित्राच्या घरी रात्री उशीर होईल म्हणून नमस्कार करून परतणार होतो.पण,देवालयात गेल्यानंतर माझी अवस्था वेळ काळाचे भान कुणाला!


मित्र अक्षय जाधव-पाटील मुळें देऊळ वाड्यात जाणे शक्य झालें.कारण कोविडमुळे मंदिरात प्रवेश मिळणे कठीण होते.
दिंडी दरवाज्यातून आत शिरलो,आणि.... तुका म्हणे कांहीं। बोलायाची उरी नाहीं॥ अक्षरशः अशीच अवस्था झाली.
मला विश्वास बसत नव्हता कीं, आज पर्यंत जें दृष्य टीव्ही किंवा फोटोत पहात होतो ती श्रीज्ञनोबरायांची संजीवन समाधी याची देहि,याची डोळा  पहातोय! किती अगणित थोर पुरुष,भाविक भक्तजनांनी,आबालवृद्धांनी या कैवल्याचा महामेरू, कोमलहृदयी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले असतील.आणि माझी पूर्वपुण्यायींच कीं आज मलाही त्या सुकृताचा लाभ होत आहे. हे विचार चालू असताना डोळे डबडबले आणि बांध फुटला.हे असं कां घडतं याला उत्तर नाहीं, आणि कुणी शोधूही नयें.ही अंतरीची खुणगाठ असते.ज्याले ते भावेल तोच त्या परम सुखाचा आनंद घेईल.

थोड्या वेळाने भानावर आलो तो ४०-५० टाळ आणि दोन पखवाजाच्या आणि उंच आवाजात चाललेल्या अभंगांच्या नादाने.
माऊलींची पालखी समाधीच्या मंदिराच्या मागच्या "मुक्ताई मंडपात" विसावलेली नि तरुण वारकरींचे भजन चाललेलें.
आहाहा! काय तो नाद!! त्यात क्षणार्धात तल्लीनच झालो नाहीं तर आतून माझे मन नाचत होते.नि त्यात अडीच तास कसे निघून गेलें समजलेही नाहींत. कसला आराम आणि कसली झोप! शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने झालें. किती वेळा माऊलींच्या पादुकांवर डोकं ठेवलं माहित नाहीं.हा अनुभव विलक्षण होता.पुनः तसा योग येईल किंवा नाहीं,पण हृदयांत तो सदैव जागृत रहाणार याची खात्री मात्र नक्की.

ते सिद्धेश्वराचं देवालय,त्या समोरचा नंदी आणि बाजूला श्रीज्ञानोबा ज्या विवरात जाण्यास प्रवेशकरते झाले ती शिळा पाहून मन हेलावलून गेलें.अजानवृक्ष, श्रीनाथ महाराजांचा पार,देऊळवाड्यातले मारुती ह्यांचे दर्शन घेताना मन तल्लीन झाले होते.

हा आनंद सोहळा सुरु असताना अखेरचे भजन झालें आणि पादुका पालखी पुन्हा मंदिरात जाण्यास सिद्ध झाली. तेवढ्यात अक्षय म्हणाला "पालखी घेशील कां खांद्यावर?"  माऊलींनी किती लाड पुरवावें हो! भजन ऐकायचे होते त्याचा मनसोक्त आनंद लुटू दिला आणि आता प्रत्यक्ष पालखीचा भोई! नकार देणें हे स्वप्नांतही शक्य झालें नसतें. पालखीला खांदा लावला नि कृतार्थ झालो. मुक्ताई मंडप ते अजानवृक्षापर्यंत ते भाग्य लाभलें ही अलौकिकता जाणवत होती. तेथ बुझिजे (जाणावा) बोधु बोधें।आनंदु घेपे आनंदें।सुखावरी नुसधें। सुखचि भोगिजे॥{ज्ञाने.१८:१२१५}
पादुका पालखीतून समाधीपाशी विसावल्या ,त्यानंतर अगदी शेजारतीपर्यंत "कारंजा मंडपात"बसून सगळा सोहळा न्याहाळत होतो. माऊलींसाठी नेलेली अल्पशी भेट अर्पण केलीं नि धन्य पावलो.
पाऊल बाहेर निघत नव्हते पण,जड पायांनी माघारी फिरावें लागलें तें पुनः येण्यासाठीच.
खरोखरी "सोहळा" हाच शब्द योग्य आहे, अन्य शब्दच नाहीं.
उशीरा कां होईना निदान या जन्मांत त्या नित्य जागृत चैतन्याच्या सान्निध्यांत काहीं क्षण सन्मार्गी लागल्याचे समाधान मिळालें.

या आळंदी फेरीत माऊली आणि चांगदेवांच्या भेटीचे स्थळ, श्रीनृसिंह सरस्वती स्वामींच्या समाधी, श्रीलक्ष्मीनारायण मंदिर, श्रीगजानन महाराज संस्थेचे संगमरवरी भव्य मंदिर याचेही दर्शन घेतले.
साखरे सांप्रदायाचे साधकाश्रम केवळ पाहून निघणार होतो.तेथें श्री यशोधन मामा आणि श्रीचिदंबरेश्वर मामा साखरे यांच्यासमवेत अध्यात्मिक वार्तालाप करताना दीड तास कसा गेला समजले नाहीं.मित्र आषिक कंकाळमुळें येथें प्रवेश शक्य झाला आणि त्यामुळे ह.भ.प डाॅ.श्रीकिसन महाराज साखरे यांचेही दर्शन करता आलें.


मित्र अक्षय हा निमित्त जरी असला तरीं तो निमित्तही कमी महत्त्वाचा नसतो असें माझे मत आहे. त्याचे केवळ कोरडे आभार मानणार नाहीं,पण खरोखरी त्याच्यामुळें शक्य झाले हे सत्य आहे.पुनः आळंदीची यात्रा कधी होतेय याची वाट पहात आहे.

- अनिकेत घिवलीकर, मुंबई.

Comments

अभय said…
खर तर हा अवर्णनीय प्रसंग आहे
मी देखील एकदा याचा अनुभव घेतला आहे डोळे भरून येणं, छातीत धडधडण, भरून येणं, घशाला कोरड पडणं, अंगावर शहारे येणं नक्की काय चाललं आहे समजतच नाही...
याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात
तो प्रसंग तू फार छान पद्धतीने मांडला आहेस... फारच छान पुन्हा एकदा तुझ्याच निमित्ताने तो अनुभव घेता आला
धन्यवाद!
माऊली माऊली जगाची अधिष्ठात्री...
.... ज्ञानोबा माऊली भेट घडवली... तुम्ही शब्दात...

माझी पहिली भेट आठवली...मला
हे सगळं वाचून भेटी लागी जीवा लागलीसे आस या अभंगाचा प्रत्यय मला येतोय...अप्रतिम अवर्णनीय..!जय जय रामकृष्ण हरी🚩🙏🙏
Unknown said…
भाग्यवंत म्हणो तया....
सगळा सोहळा डोळ्यादेखत ऊभा केलात.
रामकृष्णहरि माऊली
होय, अवर्णनीय आहे ते.. धन्यवाद 🚩
खरे म्हणजे,तेथे शब्दांचे कामच नाहीं 🚩
Unknown said…
अतिशय सुरेख वर्णन. वाचताना असे वटत होते की मी हा सोहळा स्वतः अनुभवत आहे.
धन्यवाद😊🚩
Unknown said…
त्यांच्या लीलेसमोर शब्द टिकतील कुठे..? अशीच अवस्था झाली असावी.
छान वर्णन केलंस, डोळ्यासमोर सगळं उभं राहिलं.

माऊली माऊली माऊली... !!!
अगदी खरे आहे.शब्दांनी केवळ समानान "मानावे" !🚩😊
पूर्वपुण्याई थोर म्हणून हे भाग्य लाभले, अवर्णनीय अनुभूती🙏

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १

श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १