विष्णुसहस्रनामाचे पहिले भाष्यकार "श्रीमत् आद्य शंकराचार्य"
गेयं गीतानामसहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रम्।
नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम्॥ (भज गोविन्दम्)
आद्य श्रीशंकराचार्यांचे कार्य हे हिमालयासारखे उत्तुंग आणि समुद्राप्रमाणे खोल आहे.जवळपास दोन सहस्र वर्षांचा काल लोटूनही शंकराचार्यांचे कार्य, तत्त्वज्ञान नि वाङ्मय आताच्या डिजीटल युगापर्यंत येऊन तितकेच सतेज राहिले आणि पुढेही रहाणार.याची कारणमीमांसा करायची झाली तर श्रीसमर्थांचे वचनच उद्धृत करावे लागेल- सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥
वैदिक धर्माची पुनर्बांधणी,हिंदु सांप्रदायिकांचे एकत्रीकरण, नास्तिकमताचे पारिपत्य इत्यादी अनेक कार्यासाठी शंकराचार्यांचा अवतार झाला.
श्रीशंकराचार्यांचे ब्रह्मसूत्र,उपनिषदे आणि भगवद्गीता या प्रथानत्रयींवरील भाष्यग्रंथ हे उत्तमाधिकारी साधकांसाठी आहेत.याचे कारण असें कीं त्यांतलें विषय आणि तत्त्वज्ञान इतके उच्च स्थरावरचे आहेत त्यासाठी पूर्वाभ्यास अवश्यक लागते.नाहींतर त्याचे आकलन होणे अवघड.
याशिवाय मध्यमाधिकारी मुमुक्षूंसाठी प्रकरणग्रंथ.त्यामध्यें मुख्यतः गुरु-शिष्यांचे प्रश्नोत्तरात्मक संवाद पहायला मिळातो. शतश्लोकी,अपरोक्षानुभूती,तत्त्वबोध,विवेकचूडामणि इत्यादी.
आणि अवराधिकारी म्हणजे सामान्य भाविकजनांकरीता स्तोत्रवाङ्मय रचले.चर्पटपञ्चरिका किंवा भज गोविंदम्, कनकधारा, देव्यापराधक्षमापन स्तोत्र अन्नपूर्णा स्तोत्र, शतकं, अष्टकं, षट्कं,पञ्चकं इत्यादींचा समावेश होतो.
शंकराचार्यांच्या वाङ्मयाचे असे वर्गीकरण केलें आहे.
या सगळ्या रचनांमध्यें शंकराचार्य आपल्या अद्वैत सिद्धांताचा पुरस्कार करतात.त्याचे साधारण स्वरूप असें कीं, अनंत, अव्यय, निराकार ब्रह्म हेंच एक सत्य आणि सृष्टीत जी विविधता दिसते वा भासते ती मायेच्या अंधकारामुळें. श्रवण,मनन आणि निधिध्यासाने साधकास आत्मबोधाने ब्रह्मज्ञान होऊ शकते आणि परमानंदाची प्राप्त शक्य आहे.
अथातो ब्रह्मजिज्ञासा अशा परतत्तवाची व्याख्या,मीमांसा करून शंकराचार्य अहं ब्रह्मास्मिचा बोध सांगतात.
श्रीशंकराचार्यांनी सामान्य जनांना भक्तीमार्गाने साधना करता यावी म्हणून विविध देवदेवतांवर अनेक सुंदर स्तोत्रे रचली.
आचार्यांनी भगवंताच्या नामसंकीर्तनाची महती विस्तृतपणें मांडली ती श्रीविष्णुसहस्रनामभाष्य ग्रंथामध्यें.महाभारतातले विष्णुसहस्रनाम हे परमेश्वराचे गुणसंकीर्तनाचे भक्ती स्तोत्र आहे.शंकराचार्यांनी त्यातल्या प्रत्येक नामावर भाष्य करताना निर्गुण आणि सगुण अशा दोन्ही पद्धतीने व्याख्या केलीं.तथापि अधिक विचार त्यातल्या निर्गुण परमात्म्याचा केला आपल्याला पहायला मिळातो.
शंकराचार्यांच्या या रचनेबद्दल एक परंपरा असे मानते की, ब्रह्मसूत्रादी भाष्यानंतर सहस्रनामभाष्याची निर्मिती झाली.तर दुसरी परंपरा मानते सहस्रनामभाष्य हिच आचार्यांची पहिली रचना.
याविषयीं आख्यायिकाही आहेत.पण त्या केवळ महती वाढवणाऱ्या कथा म्हणून पहावे. आद्य शंकराचार्य सहस्रनामाचे पहिले भाष्यकार म्हणून गणले जातात हे निर्विवाद.
भाष्याची सुरुवात करताना आचार्य म्हणतात, सच्चिदानंदरुपाय कृष्णाय अक्लिष्टकारिणे। नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे॥
जो सत् चित् आनंदरुप, विनासायास कार्य करणारा, वेदान्ताचा ज्ञाता, बुद्धिसाक्षी गुरुवर अशा भगवान् कृष्णाला नमस्कार असो.पुढे
भगवान् श्रीव्यासांना नमन करून या सहस्रनामाच्या पठणाने मनुष्याला जीवनात शांती लाभावी म्हणून हे स्तोत्र सर्वोत्तम आहे असें सांगतात. सहस्रनाम्नां स्तवनं प्रशस्तं निरुच्यते जन्मजरादिशान्त्यै॥
यानंतर सहस्रनामाच्या प्रास्ताविक श्लोकांच्या निरुपणात शंकराचार्य सहस्रनामाच्या पठणाचे महत्त्व वर्णन करताना महाभारतातला श्लोक उद्धृत करतात- जपस्तु सर्वधर्मेभ्यः परमो धर्म उच्यते। अहिंसाया च भूतानां जपयज्ञाः प्रवर्तते॥ कीं,सगळ्या धर्मकार्यात जप सर्वश्रेष्ठ म्हणतात कारण या जपयज्ञामध्यें पशुहिंसा होत नाहीं.नंतर मुख्य स्तोत्राच्या भाष्याला सुरुवात होते.
या स्तोत्रात परमेश्वराची एक सहस्र नामांचा अर्थ,त्याची व्युत्पत्ती, गूढार्थ, त्या नामांचा निर्देश अथावा तत्त्वसाम्यता कुठल्या वेद, उपनिषदांमध्ये आली आहेत,भगवद्गीता,रामायण वा महाभारतात, अवश्यकतेप्रमाणे पाणिनीसूत्रानुसार त्याचे व्याकरण,पुराणांत त्याचा अर्थ कुठल्या प्रकारे योजला त्यावर आचार्यांची व्याख्या आहे.अशा तर्हेने भाष्याची रचना झालेली आहे.याचे प्रयोजन इतकेच की भक्तांच्या मनांत भगवंताच्या गुणएश्वर्याचे माहात्म्य वज्रलेपासारखे पक्के व्हावे.
सामान्यजन ईश्वराच्या कृपेपासून वंचित राहू नयें म्हणून असंख्य स्तोत्रे आणि हे नामसहस्रभाष्य असें रसाळ पक्वान्ने वाढून ठेवले. आपआपल्या बुद्धीप्रमाणें ज्यानें त्यानें मार्ग निवडावा आणि अभ्यास करावा.
नामस्मरण आणि त्याच्या जोडीला तत्त्वज्ञानाची गुफंण ही सुरुवातीला दिलेल्या शंकराचार्यांच्या चर्पटपञ्जरिका अर्थात 'भज गोविंदम्' या स्तोत्रातल्या चरणात पहायला मिळाते. त्याचा अर्थ असा कीं, दररोजच्या व्यवहारी जीवनाच्या रहाटगाडग्या रममाण न होता काहीं उच्च ध्येय गाठायचे असेल तर साधनेचे चार धोपट मार्ग आहेत- गीता व सहस्रनाम नित्य वाचन मनन चिंतन, विष्णु म्हणजेच भगवंताचे अखंड स्मरण,संत सज्जनांची संगत आणि अडलेल्यांना मदत. बास म्हणले!एवढे करा!!
आपल्या सगळ्या संतांनीही परमार्थसाधनेत नामसंकीर्तनाचे अनन्य साधारण महत्त्व उच्चरवाने सांगितले आहे. भगवद्गीतेचे प्रसिद्ध वचन अनेकांना माहित असेल. यज्ञानां जपयज्ञोऽस्मि (गीता१०:२५) यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे,म्हणजे त्यात परमेश्वराचा वास आहे.
श्रीशंकराचार्यांनी सनातन धर्माच्या पुनरुत्थानासाठी भारतभर प्रवास केला नि हिंदु समाजाची नाडी नेमकी ओळखली.बोजड तत्त्वज्ञान हा सर्वसामान्य माणसांचा विषय होऊ शकत नाहीं.तरी देवाची भक्ती त्यांनाही सुलभपणे करता यावी म्हणून सोप्या पद्धतीने भक्ती आणि ज्ञानाचे स्तोत्रवाङ्मयांत अंतर्भाव केला.हिंदु लोकांना एकसंघ बांधून ठेवण्याचा हा महान् उपक्रम होता असें म्हटले तर ते हिंदूंच्या हिताचेच ठरेल.त्यांनी पेरलेल्या रोपाचे भले मोठे वृक्ष झालें,आता सांभाळायचे दायित्व आपले होय.
हे विष्णुसहस्रनामभाष्य कुठल्याही उपासकाला फलदायी आहे. मग तो ज्ञानमार्गी असो वा कर्ममार्गी,भक्तीमार्गी असो किंवा संन्यासी; सर्वांना परमेश्वराचे नामसंकीर्तन तितकेच पोषक आहे.
या नामस्मरणाने काय होते याचे उत्तर भगवंतांनीच गीतेत दिलें आहे.
जो "अनन्यभावनेने" भगवंतास भजतो त्या एकनिष्ठ पुरुषांचे चरितार्थ मी चालवतो.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥ (गीता ९:२२)
✍ अनिकेत घिवलीकर, मुंबई. ज्येष्ठ कृ. ११.
☎️ 9769681999

Comments
🙏🙏🙏