"BLOG-SPOT" वर आगमन
सोशल मिडियावर आल्यापासून सणांच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश किंवा संतादी महापुरूषांच्या जयंत्या- पुण्यतिथी दिनी दोन चार वाक्ये लिहून एखादा फोटो अपलोड करून आपली भावना व्यक्त करावी अशी लिखाणाची सुरुवात झाली.त्यानंतर वाक्यसंख्यांमध्ये वाढ होऊन माझ्या आवडत्या विषयांवर लिहिण्याचा छंद जडला.वाचन करता करता लिहिण्याची सवय केव्हां लागली मला फारसं आठवत नाहीं.तथापि २०१६ पासून फेसबुकवर संक्षिप्त स्वरुपांत लेखन पोस्ट करणें सुरु झालें.आणि पुढल्याच वर्षी श्रीविष्णुसहस्रनामाचा अभ्यास करीत असताना त्यावर लिहायला हवे हे ठरवून नाम निरुपण, सहस्रनाम महतीची लेखमाला हाती घेतलीं ती लोकांना आवडली.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे श्रद्धास्थान.त्यांच्या विषयींही लहान मोठे लेखन होत गेलें.
लेखक नसूनही वाचकांनी वेळोवेळी दिलेली पसंदीची पोचपावती ही माझे लेखन त्यांना आवडण्याचे लक्षण होतें आणि त्यामुळें माझा उत्साहही वाढला.
एखादा लेखक किंवा कलाकार त्याच्या विषयांत मन लावून अभ्यास, संशोधन करून ते लोकांपुढे सादर करतो.त्यात त्याचे मानसिक तथा शारीरिक श्रम असतात.आणि मग त्याच्या कामावर कुणी दुसरा व्यक्ती "चौर्यकर्म" करून अधिकार सांगतो आणि मिरवतो तेव्हा ते मूळ कर्त्याला न आवडणारे न रुचणारे, क्वचित प्रसंगी दुःखदायी होते.त्यामध्यें अहंपणा नसेल पण अनैतिक नक्कीच आहे.copy-pasteच्या जमान्यात हे सर्रस होतेंच नि ते थोपविणे अशक्य आहे हे सत्य.पण ह्या blogच्या माध्यमातून निदान कर्त्याला प्रथमाधिकार सिद्ध करण्यास वाव आहे.असो.
माझ्या blogचे नांव "स्वभावस्तु प्रवर्तते". म्हणजे काय? हे वचन श्रीभगवद्गीतेतल्या पांचव्या अध्यायांत आहे.थोडक्यात अर्थ सांगायचा तर, "माणसाची प्रकृती किंवा स्वभाव त्याला कर्म करण्यास भाग पाडतो." माणसाचा स्वभाव म्हणजे त्याचे जन्मजात गुण. त्यागुणानुसार त्याचे वर्तन होते.
इथे त्याचा संबंध इतकाच कीं, माझा स्वभाव आणि आवडी-निवडी या प्रमाणें माझें लेखन,मत प्रदर्शन असते.ते या blogद्वारें श्रीशारदेची सेवा तसेंच धर्म, तत्त्वज्ञान आणि इतिहासासंबंधीची माहिती माझ्या तुटपुंज्या शब्दांनी मी आपल्या समोर मांडण्याचा विशुद्ध हेतु प्रकट करीत आहे.
आपण प्रिय वाचकजन, मित्र, आप्तेष्ट, पत्नी सौ.रमा आणि कुटुंबियांनी मला नेहमी प्रोत्साहन,आशीर्वाद दिलें, ते सदैव तैसेच राहो अशी आशा बाळगतो.
जें जें जेथें पावे। तें तें समर्पावें सेवे॥(श्रीतुकोबा)
✍ अनिकेत घिवलीकर. ज्येष्ठ पौर्णिमा

Comments
लिहीत रहा!!